जरा विसावू या वळणार
जरा विसावू या वळणार
मानसी अग ए मानसी .........
ओ देईल तर शपथ.
शरद चा राग विकोपाला गेला...
कधी पण हिला आवाज द्या पण ओ मात्र येत नाही.
शरद... वय साठ, त्यामुळे शरद चा आता शरदराव झालेला, रिटायर्ड होऊन दोन वर्षे झालेली.
पण हेकडी स्वभाव आणि मी पणा वयानुसार कमी व्हायचा सोडून वाढतच गेलेला....
शरदरावा च्या पूर्ण विरुद्ध मानसीताई......
वयाच्या बावन्नव्या वर्षी ही अगदी
तिशीच्या तरुणीसारखी.......
डोक्यावर अर्धे केस चंदेरी झालेले पण टापटीप,हसरा चेहरा ,सगळ्यात मिसळणे....
पै पाहुणे तर तिच्या आवडीची गोष्ट.......
माहेरचं तस जवळच कोणी नव्हतं.
लग्न करून आल्यापासून सासर माहेर हेच म्हणून राहिली..
शरदराव कंपनीत मोठ्या हुद्द्यावर त्या मुळ, घरी दारी हुकूमशाही गाजवायची सवय झालेली..
दोघांच्या संसाराच्या वेलीवर अनुष्का आणि अनिकेत अशी सुंदर हुशार दोन फुल होती...
दोन्ही ही मुल आईच्या स्वभावासारखीच गुणी..
अनुष्का डॉक्टर होऊन लग्न करून सासरी गेलेली तर अनिकेत मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजर होता..
त्याच्यासाठी स्थळ पाहण्याचं चालू होतं..
तस मानसीताई लेकाला नेहमी म्हणायची तूला कुणी मुलगी आवडत असेल तर नक्की मला सांग,मी तुझ्या निर्णया सोबत असेल..
कारण आयुष्य तुला जोडीनं घालवायच आहे, त्यामुळे मनासारखा जोडीदार हवा,नाहीतर जीवाची घुसमट होते रे....
आईच्या बोलण्यातून काहीतरी अनिकेत ला नेहमी वाटायचं पण विचारायचं धाडस झालं नाही...
आज ही तसच शरद रावांच्या मित्राने सुचवलेल स्थळ अनिकेतन नापसंत केलं होतं त्यामुळे त्यांचा पारा जास्तच चढलेला....
अनिकेत ऑफिस ला निघून गेला,घरी राग काढायला हक्काची बायको असायची...
मानसीताई मागच्या पाच सहा दिवसापासून चक्कर येतेय ,मला काहीतरी होतय अस सांगत होती ,पण आजारी असूनही कधी अंथरुणावर न पडलेल्या मानसीताई ला नवरा.. बायको तर सोडाच पण साधं माणूसही समजत नव्हता..
अनिकेत गेल्यावर मानसीताई बेडरूम मध्ये जाऊन पडली आणि डोळा लागला,
शरद रावांच्या आवाजाने दचकून उठली,
दचकून म्हणण्यापेक्षा घाबरून उठली,कारण नवऱ्याचा राग एवढा भयंकर होता की या वयात ही हात उचलला जायचा..
मानसी ताई एवढी पण बावळट नव्हती पण माहेरचा आधार नसलेली आणि स्वतः कमाईच्या बाबतीत independent नसल्यामुळे सगळं सहन करण्यापलीकडे पर्याय नव्हता...
बारावी नंतर लग्न करून या घरी आली, पुढील शिक्षण आणि नोकरी ही स्वप्नच राहिली..
नवऱ्याला प्रतिकार करण्याचं बऱ्याचदा धाडस सुद्धा केलं पण त्याच एकच वाक्य असायचं, माझ्या जीवावर खातेस म्हणून
जिवंत आहेस ,
सहन होत नसेल तर जा माझ्या घरातून मार्ग सुचेल तिकडे .....
नाविलाजास्तव सहन करण्यापलीकडे काही option नव्हता.
काही निर्णय घ्यावा तर लोक काय म्हणतील? जावई आला आणि हे काय चालले आहे....
शरद राव रिटायर्ड झाल्यापासून मानसिक त्रास देन खूपच वाढलेलं...
स्वतः मॉर्निंग वॉक ला जायचे पण मानसीताई गेल्या की सगळं घर डोक्यावर घ्यायचं..
आजकाल मानसीताई ची तब्येत ठीक राहत नव्हती ,मोनोपॉज ची वेळ म्हणून जास्तच त्रास व्हायची,पण सांगणार कुणाला.
मुल समोर असताना वडिलांनी काही सुरू केले तर मुल समजवण्याचा प्रयत्न करत पण ऐकतिल ते शरद राव कसले..
वर मुलांना च ऐकून दाखवायचे,मी कमवल म्हणून तुम्ही आहात, मी खर्च केला म्हणून तुमची शिक्षण झाली,नाहीतर तुमची आई काय कामाची....
कुठे नादाला लागायचं म्हणून मुल ही शांतच असत,त्यात मानसीताई मुलांना वडिलांना उलट बोलू नये हेच संस्कार देत आलेल्या..
मानसीताईंनी जीव लावलेली सोसायटी मधील मानस ,मैत्रिणी ,मुलांचे मित्र मैत्रिणी ,यातील कधी कोण घरी आलेच तर शरद रावांच्या चेहऱ्यावर बारा वाजयच्या,त्यामुळे अपमान नको म्हणून होता होईल तेवढं मानसीताई त्यांना लांबच ठेवत असत...
आवाज दिला तरी मानसी ओ देत नाही म्हणून शरद राव तावातावाने बेड रूम कडे गेले, मानसीताई लगबगीने उठत होत्याच...
लालबुंद चेहरा करून शरद रावांनी मानसीताईचा हात धरला आणि ओढतच बाहेर आणले..
तुला माझं ऐकायचं नाही न तर माझ्या घरातून आताच्या आता चालती हो...
मानसी ताई रडू लागल्या,अहो हे शोभत का आपल्याला या वयात, पण
शरद राव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते ..
त्यांनी मानसीताईवर हात उचलला ,
आज मात्र मानसीताईच्या सहनशीलतेचा अंत झालेला,त्यांनी तसाच हात डाव्या हाताने धरला आणि स्वतःचा हात मारण्यासाठी वर केला,पण
मर्यादा आडवी आली आणि बायकोधर्म जिंकला....
पण त्या घाबरल्या नाहीत ,आज डोळ्यात रक्त वाहत होत,ओरडून त्या शरद रावाना म्हणाल्या मी आजारी आहे,मला काय होतंय हे विचारायचं सोडून मला त्रास देताय,आजची शेवटची वेळ, इथून पुढे मी कोणतीही मर्यादा ठेवणार नाही....
अस रागात बोलून शरद रावांचा हात त्यांनी झटकून दिला....
शरद राव हे बायकोच रूप लग्नाच्या तीस वर्षात पहिल्यांदा च पाहत होते...
सगळं घर सुन्न झाल... स्वाभिमान दुखावला गेला होता त्यांचा.
मानसीताई बेडरूम मध्ये जाऊन स्वतःचा चेहरा तळहाताने झाकून रडत होत्या...
काय करत होते मी?
नवऱ्यावर हात उचलला..
काय वाटल असेल त्यांना.
ईकडे शरद राव भ्रमित झाल्यासारखे सोफ्यावर बसून होते ,अहंकाराला ठेच पोहचली होती...
दुपारचे बारा वाजले पण मानसीताई बेडरूम मधून बाहेर आलेल्या नव्हत्या,
शरद रावांच्या डोक्यातून अजून ही राग गेलेला नव्हता,
त्यांनी पुन्हा आवाज दिला पण काहीच रिप्लाय येत नव्हता,मुद्दाम अशी वागते म्हणून रागात ते बेडरूम मध्ये गेले,
समोरच दृश्य पाहून त्यांना घाम फुटला,
मानसीताई खाली फरशीवर बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या..
शरद रावांना काही सुचत नव्हते ,शेजारच्या शशी ला धावत जाऊन बोलावून आणले,शशी हा अनिकेत चा बालमित्र,शशी घरी आला की शरद रावांच्या कपाळावर आठ्या पडायच्या...
शशी ...मानसीताईला हाका मारू लागला,पण काहीच रिस्पॉन्स मिळत नसल्याने त्याने कुठलाही विचार न करता माणसीताईला उचलून घेतले,
निघताना शरद रावांना गाडीची चावी घ्या म्हणून सांगितले,
मानसीताईला गाडीत बसवून पुढे शरद रावांना बसण्यास सांगितले,
काहीही विचार न करता पंधरा मिनिटात
शशीने गाडी हॉस्पिटलमध्ये पोहचवली...
डॉक्टराणी इमर्जन्सी वॉर्ड मध्ये लगेच नेले,
मानसीताईवर उपचार सुरू झाले,
शरद राव बधिर झाल्यासारखे बाकड्यावर बसून होते,
शशी औषध,सलाईन साठी धावाधाव करत होता...
अर्ध्या तासाने डॉक्टर बाहेर आले,
डॉक्टर काय झाले मानसीला??
डॉ...
त्यांना पॅनिक अटॅक आला आहे, आणि हो तुम्ही त्यांचे मिस्टर न मग तुम्हाला त्यांचा त्रास माहीत नव्हता का?
शरद राव--
कसला त्रास??
अहो त्यांना मोनोपॉज डेट मध्ये रक्तस्राव होऊन त्यांच्या रक्ताची पातळी पूर्ण खाली आली आहे..
अजून काही दिवस नसते उपचार झाले तर कॅन्सर होण्याचा धोका होता.
आण कसल्यातरी दडपणाखाली आहेत त्या.म्हणून पॅनिक अटॅक आला आहे....
त्यांच्यावर वेळेत उपचार झाले नसते तर जीवावर बेतले असते.......एवढं बोलून डॉक्टर निघून गेले.
शरदराव सुन्न होऊन बेंच वर खाली मान घालून बसले...
शशीने अनिकेत ला कॉल केल्यामुळे तो ही अट हॉस्पिटलमध्ये पोहचला होता....
आईला विंडोज मधून पाहून बाबा शेजारी जाऊन बसला..
शरद रावांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, बाबा नका काळजी करू तुम्ही, काहीही होणार नाही आईला,
खूप सहनशील आहे ती, अहो साधं देवदर्शनाला मैत्रिणींसोबत जात नाही ती, का? तर म्हणे आमच्या यांची जेवणाची सोय लागत नाही आणि बाहेरच नको बाई त्यांना त्रास होतो...
मग सांगा बाबा ती तुम्हाला सोडून आताही नाही जाणार...
शरदराव अनिकेत कडे नुसतेस बघत होते...
तेवढ्यात नर्स आली आणि म्हणाली तुमच्या पेशंट ला शुद्ध आली आहे,
अनिकेत नर्सने सांगितल्या बरोबर आई होती त्या रूम कडे धा
वत निघाला मागे शशी पण होता,
शरदराव शून्यात नजर लावून बसले होते,
रूमच्या दारात गेल्यावर शशीच लक्ष मागे गेलं,
काका या काकू शुद्धीवर आल्यात,
शशीच्या आवाजाने शरदराव तंद्रीतून बाहेर आले .....
हं येतोय ...
म्हणून दोघांच्या मागे रूम मध्ये गेले,,
मानसीताईला सलाईन चालू होते,
डोळे बंद करून निपचित पडलेल्या होत्या....
अनिकेत ने डोक्यारून हात फिरवत आई कस वाटतय ग आता?
मानसीताईंनी डोळे उघडले आणि नजरेनेच ठीक आहे असं सांगितल.
अनिकेतच्या मागे शशी उभा होता, आई तुला बाबा आणि शशी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले,
शशिकडे कृतज्ञतेने पाहिले....
थोडं तुटक उभे असलेल्या शरद रावांकडे मानसीताईंचे लक्ष गेले...
आपसूकच डोळ्यातून अश्रू वाहू लागले,
अनिकेतने बाबांकडे पाहिले ,त्यांची नजर जमिनीकडे होती,
बाबा काळजी करू नका आई लवकर बरी होईल...
पुढील ट्रीटमेंट साठी नर्स ने सगळ्यांना बाहेर जाण्याची विनंती केली.
मानसीताईंनी नजरेने शरद रावांकडे पाहून जवळ येण्याची खूण केली,
शरदराव जवळ जाताच ,मानसीताई च्या तोंडून निघाले माफ करा मला.....
आता मात्र शरद रावांना गहिवरून आले....
त्यांनी मानसीताईंचे हातावर हात ठेवला आणि लगेच मागे फिरून रूम बाहेर आले...
त्यांना भडभडून आलं होतं, काय कराव समजत नव्हतं..
शशी आणि अनिकेत जवळ आले ,
बाबा आम्ही थांबतो इथे तुम्ही घरी जाऊन अराम करा...
शरदराव मानेनेच नाही म्हणाले,
तसेच खुर्चीत भिंतीला डोकं टेकवून विचार करू लागले.......
मागील तीस वर्षात एकही दिवस आजारी आहे म्हणून कधी अंथरुणावर पडून न राहणारी मानसी आज हॉस्पिटलमध्ये??
म्हणजे तिने किती सोसल असेल,किती भोगल असेल?
आई बाबांची पसंती म्हणून लग्न करून आल्यापासून मी कधी तिला महत्त्व दिलेच नाही.
तिला कधी काय हवं नको ते विचारलं सुद्धा नाही...
हळद फिटते न तोपर्यंत घराच्या कामाचा ताबा घेऊन राबराब राबत राहिली....
माझ्या आईवडिलांचे दुखणे खुपणे, नातेवाईक,सगळ्यांचे पै पाहुणचार, मुलांची लहानपण, दुखनिभानी...
शाळा ,कॉलेज ,संस्कार.....
मी यात कुठेच नव्हतो सोबतीला तिच्या पण तिने कधी साधी तक्रार सुद्धा केली नाही....
महत्त्वाचं म्हणजे घराचं पैशाच बजेट ,त्यातच घर,मुलांचं शिक्षण सगळं कसं मॅनेज करत असे....
आपलं घर,आपले पाहुणे,आपली मुलं....
आणि मी ???
माझं घर ,माझा पैसा...
किती निष्ठुर वागलोय मी.
मी नेहमी हॉलिडे,विकेंड ला बाहेर फिरायला जायचो...
तिला तिच्या मैत्रिणी म्हणाल्या तर नको म्हणायची..
खर्च होतो आणि मग बजेट बिघडत...
संसाराचं बजेट बिघडू नये म्हणून किती इच्छा मारून जगली असेल...
एक न अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालत होते...
शशी जेवणाचा डबा घेऊन आला,
याच लेकरांना मानसीने जीव लावला म्हणूनतर आज विचार न करता धावत आला ..
पण मी सदैव याना कमी लेखत आलो....
थोडस खाऊन तिथेच डोकं ठेऊन तिघांनी रात्र काढली....
सकाळी उठून तोंडावर पाणी मारून शरदराव मानसीताई च्या रूम मध्ये गेले,
काहीतरी निश्चिय करून गेल्यासारखे..
मानसीताई आता बऱ्यापैकी सावरल्या होत्या..
शरद जाऊन बेड जवळ बसले, बायकोचा
हात हातात घेऊन डोळे भरून पाहत होते...
मानसीताई नि काहीतरी विचारात असल्याचं ओळखल,
काय विचार करताय??
बरी होतेय मी...
नका काळजी करू..
एक सांगायचं होत तुम्हाला...
शरदराव...
हं बोल.
हॉस्पिटल च्या बिलाच टेन्शन नका घेऊ,
आपल्या घरखर्चातून पैसे मी थोडे मागे टाकत होते,त्यातून पॉलिसी भरत होते,
कपाटाच्या ड्राव्हर मध्ये कार्ड आहे त्यातून बिल वजा होऊन जाईल...
शरद रावांना गहिवरून आल, डोळ्यातील थेंब मानसीताई च्या हातावर पडले,
अशी कशी ग तू???
एवढी सहनशीलता कुठून आणते,समजुतदार पणा कसा एवढा तुझ्यात...
त्यांच परत तेच उत्तर...
त्यात काय एवढं आपलच आहे न सगळ......
हातातला हात घट्ट पकडून शरदराव म्हणाले हो मानसी सगळ आपलं आहे ...
दोन दिवसानंतर मानसीताई ची प्रकृती सुधारत होती...
डॉक्टर ना भेटून शरद राव नियमित काळजी घेत होते,
डिस्चार्ज चा दिवस आला,सगळी हॉस्पिटलची प्रोसेस करून मानसीताईना घेऊन अनिकेत आणि शरद राव निघाले..
गाडीत बसल्यावर शरद रावांनी अनिकेत ला गाडी एअरपोर्ट ला घ्यायला सांगितली...
अनिकेत ला बाबांचा स्वभाव माहीत होतं,त्याला वाटले त्यांना जायचे असेल कुठेतरी...
गाडी एअरपोर्ट वर आली, शरद राव गाडीतून उतरले,मानसीताई बसलेल्या त्या बाजूला येऊन दारं उघडले, हात पुढे करून शरद राव म्हणाले चल मानसी, मानसीताई ला काही कळेना,अनिकेत पण गाडीतून उतरून बघत होता....
चल मानसी ,फ्लाईट ची वेळ झाली.
अहो पण कुठे?? आणि मी??
काही बोलू नकोस,
चल आपल्याला जायचं आहे,
आपल्या दोघांच्या जगात...
अहो पण?
मानसीताई ला काय बोलावे कळत नव्हते...
अहो पण कुठे???
ते नंतर सांगतो...
अनिकेत म्हणाला बाबा कुठे जात आहात आणि सोबत बॅग्स,सामान काहीच नाही घेतले....
त्यावर शरद राव म्हणाले, कोणत्याही सामानाची गरज नाही ,सगळं नवीन शॉपिंग करू.
अरे तुझ्या आईने एवढं मॅनेज केलं की माझ्या सर्विस आणि रिटायरमेंट चा बक्कळ पैसे बँकेत आहे....
त्यात आमची तीस वर्षाची सुंदर स्वप्न पूर्ण होतील...
मानसीकडे बघून शरदराव म्हणाले माफ कर बक्कळ पैसे आहेत आपल्याकडे,जे तुझ्यामुळे वाचले आहेत,तुझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत आता.
मानसीताई शरदरावांकडे बघत होत्या ,डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते,
अनिकेत चे ही डोळे भरून आले,
आज आईच्या बोलण्यातला खरा अर्थ त्याला समजला होता.
अनिकेतला बाय बाय करून मानसीताई चा हात हातात घेऊन निघणार तेवढ्यात काहीतरी आठवल, म्हणून त्यांनी पॉकेट मध्ये हात घातला ,त्यातून हिरव्या पानातील गुंडाळलेली फुलांची वेणी काढून मानसीताईपुढे धरली,घे मानसी ..
तुला सोनचाफा आवडतो हे मला माहित आहे, तू कधी स्वतःहून स्वतःच्या इच्छा बोलून दाखवल्या नाहीत..
मानसीताई वेणीला हात लावणार तेवढ्यात त्यांनी हात मागे घेतला...
पाठमोरी हो.., आज मी माळतो तुझ्या केसात वेणी....
मानसीताई गोड लाजल्या ,इश्श काहीतरीच काय?
त्यावर अनिकेत म्हणाला
आई घे ग माळून .
तू बाबांची dear लव्हली आहेस...
आणि तिघेही हसू लागली....
तेवढ्यात गंभीर होऊन शरदराव म्हणाले अनिकेत आम्ही परत येईपर्यंत तुला जी मुलगी आवडते आहे तिच्या घरच्यांना सांगून ठेव ,आम्ही आलोत की लग्नाचा बार उडवायचा आहे..
हो बाबा म्हणून अनिकेत लाजला....
शेवटी गुड बाय म्हणून दोघे निघाले,
विमानात बसल्यावर मानसीताईंनी डोकं शरदरावाच्या खांद्यावर टेकवले, स्वप्न पूर्ण होतय याचा खूप खूप आनंद होत...
मनातल्या मनात त्यांचं आवडत गाणं गुणगुणत होत्या...
दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !
स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार होईल येथे
आनंदाची अन् तृप्तीची शांत सावली इथे मिळे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !
समाप्त
नमस्कार
प्रिय वाचकांनो
कथा कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा,विनंती