जन्मदोष... सामाजिक प्रतिष्ठा आणि बळी - भाग २ - अंतिम
जन्मदोष... सामाजिक प्रतिष्ठा आणि बळी - भाग २ - अंतिम
(भाग - २ )
अगं स्मिता!!! ती एक मुलगी आहे, लग्न होऊन सासरी लोकांच्या घरी जाणार म्हणुन तिच्या उपचारासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा तिला मारून टाकणे सोपं आहे का गं ? तिची थोडीसुद्धा दया नाही आली का? माझा राग आता अनावर होऊ लागला होता. लोकांची कुंठित मानसिकता कधी बदलणार आहे कोण जाणे. इतकंच नाहीतर स्मिताच्या मते तिच्या घरच्यांना मुलगा हवा होता पण मुलगी झाली आणि तीही अशी जन्मदोषा सहित. तिच्या घरच्यांना तिची मुलगी त्यांच्या घराण्याच्या नावावर लागलेला एक कलंक वाटत होती. अशी ओठ फाटलेली, शारीरिक व्यंग असलेल्या मुलीमुळे त्यांच्या खानदानाची बदनामी होणार होती. स्मिताच्या मुलीचं अस्तित्व तिच्या घरच्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. अशा जन्मदोष असलेल्या मुलीला त्यांच्या घरातील सदस्य म्हणून जगाशी ओळख करून देताना त्यांना लाज वाटणार होती.
आजच्या प्रगत युगात विज्ञानाने खुप प्रगती केली आहे. वैद्यकीय उपचाराने तिला ठीक करता आलं असतं पण ती एक मुलगी होती. एका मुलीवर खर्च करून काय उपयोग शेवटी ती लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाणार. तिच्या उपचारासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा तिचा जीव घेणं सोपं वाटलं होतं स्मिताच्या घरच्यांना!!!
स्मिता अजुन ही रडतच होती. तिच्या रडण्यात तिची लाचारी, तिचा आगतिकपणा स्पष्ट जाणवत होता. ती रडता रडता सांगत होती " घरवालोंने इस बात को कब और कैसे अंजाम दिया मैं कुछ समझ ही नहीं पाई। मेरे सामने तो मेरी बीटीया के साथ सब अच्छा बरताव करते थे, उनके दिमाग मे क्या चल रहा है इस बात की मुझे भनक तक नही लगने दी किसीने। एक दिन अचानक गुडीया की तबीयत खराब हुई। उसे उलटीयाँ होनेे लगी इसलिये उसे अस्पताल लेकर गए। उसे क्या हुआ है, कुछ समझ पाते तब तक सब खत्म हो चुका था। वह इस दुनिया को छोडकर जा चुकी थी।"
पण हे सगळं तिच्या घरच्यांनी केलं आहे हे तिला कसं समजलं हे विचारल्यावर तिने सांगितले कि तिच्या सासुने तिच्या मुलीला काहीतरी विषारी औषध पाजलं होतं. हे सगळं घडल्यानंतर तिची तब्येत देखील थोडी खराब राहू लागली. सारखे बाळाचेच विचार मनात येतं होते. ती मानसिकदृष्ट्या खचत चालली होती म्हणुन तिच्यावरही डॉक्टरांचे इलाज चालू
होते. तिच्यावर पैसे खर्च होतं होते म्हणुन तिची सासु सारखी चिडचिड करायची आणि एक दिवस असेच पैशावरून बडबड करत असताना चुकून त्यांच्या तोंडून निघुन गेलं कि " दोनो माँ और बेटी सिर्फ नुकसान करना जानती हैं, अच्छा हुआ एक को ठिकाणे लगा दिया, वरना पुरी जिंदगी छातीपर बैठकर मुंग दलती। मनहुस !!! कहीं मुंह दिखाने लायक नही छोडती। जिंदा होती तो पुरी बिरादरी मे नाक कटा दिया होता।"
स्मिताने हे तिच्या नवऱ्याला सांगितले तर आईबापाला जाब विचारायचा सोडून तो तीलाच समजावू लागला. जे झालं ते झालं आता सगळं विसरून जा. आई बाबांनी काहीतरी विचार करूनच हे सगळं केलं असेल ना. पुन्हा नव्यानं आपण सुरुवात करू. हे सगळं ऐकल्यावर तर तिची खात्रीच पटली कि तिचा नवरा देखील या सगळ्यात सामील होता म्हणून. तिने याबाबत तिच्या आईबाबांना देखील सांगितलं तर त्यांनी " इस घरसे तुम्हारी डोली उठी है और उस घर से तुम्हारी अर्थी निकलेगी। बाकी तुम्हारा नसीब। असं म्हणत त्यांनी देखील हात वर केले. ह्या सगळ्यामुळे ती फारच खचुन गेली होती. ती आता जीवनभर कोणावरच विश्वास करू शकणार नव्हती. आता झालं ते स्वीकारण्या शिवाय तिच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता.
तर मैत्रिणींनो या सगळ्यात स्मिता आणि तिच्या मुलीचा काय दोष ? एक कळी उमलण्या आधीच खुडून टाकली होती. चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या या सावल्यांच्या खेळाचा शास्त्र आणि परंपरा यांच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने बागलबुवा करू नका. ग्रहण काळात जन्मलेले बाळ देखील इतर बाळाप्रमाणेच सुदृढ आणि निरोगी असते. ग्रहण काळातील बाळ हे जन्मदोषासहीत जन्मते हा लोकांचा गैरसमज आहे. वास्तविक बाळाचा जन्म आणि ग्रहण यांचा काहीच संबंध नसतो. अंधश्रद्धा आणि सामाजिक प्रतिष्ठे पोटी अजुन असे किती बळी जाणार...जेव्हा लोकांना समजेल की मुलगी ही एक ओझ नसून मानवजातीला आधार देणारा एक महत्वाचा पाया आहे. तेव्हा मुलींची हत्या होणं नक्कीच थांबेल. कारण विज्ञान कितीही पुढे गेले तरी आईविना मूल जन्माला घालण्याइतके प्रगत नक्कीच झाले नाही.
© copyright
All rights reserved.
( कथा आवडल्यास नक्की लाइक, शेअर आणि कंमेंट करा. कथा नावासहित शेअर करावी. )