जन्मदोष... सामाजिक प्रतिष्ठा आणि बळी - भाग १
जन्मदोष... सामाजिक प्रतिष्ठा आणि बळी - भाग १


मितालीच्या मुलाचा वाढदिवस होता म्हणून आम्ही सगळ्या मैत्रिणी बऱ्याच दिवसांनी एकत्र जमलो होतो. आम्ही सारे खूप दिवसांनी भेटल्यामुळे गप्पांना उधाण आलं होतं. पण स्मिता थोडी शांत शांतच होती. स्मिता आम्हा सगळ्यात वयाने खूप लहान होती. पण तिच्या मनमिळावू स्वभावामुळे तिने लौकरच सगळ्यांच्या मनात घर केलं होतं. पण नेहमीपेक्षा आज थोडी गप्पच वाटली. आम्ही दोघी जवळजवळ एक वर्षानंतर भेटत होतो म्हणून कदाचित मला तसं जाणवलं असेल. वर्षभरापूर्वी मी जेव्हा तिला शेवटचं भेटले होते तेव्हा ती आठ महिन्यांची गरोदर होती. नंतर त्यांनी त्यांचं घर बदललं, आणि ती दुसरीकडे राहायला गेली. दरम्यान, तिला मुलगी झाली असं कानावर आलं होतं. आणि आज जवळपास एक वर्षानंतर ती मला भेटली होती.
"अरे स्मिता!!! आप अकेले अकेले, आपकी गुडीया कहाँ हैं, गुडीया को नही लाए।" ती उत्तर भारतीय होती. तिला मराठी समजत होतं, पण बोलता येत नसे.
माझ्या या वाक्यावर ती एकदम दचकली, आणि माझ्याकडे नुसतीच पाहू लागली. ती अशी का पाहतेय मला काहीच कळत नव्हतं. पण काहीतरी होतं तिच्या नजरेत. एक आगतिकपणा, लाचारी, रोष की आणखीन काही, काही उमगत नव्हतं. पण काहीतरी वेगळंच होतं.
"गुडीया कहाँ है, पापा के पास है क्या?" मी परत विचारलं.
"मेरी गुडीया... मेरी गुडीया!!!" ती बोलताना चाचपडत होती.
"अरे!!! मैने तो उसे अभी तक देखा भी नही, आज देखुंगी पहली बार। एक साल की होगी ना अभी?" आणि मी तिच्याकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहिलं.
ती काहीच बोलली नाही. तिचे डोळे मात्र एकदम निर्विकार भासले.
"अरे!!! कुछ तो बोलो भाई, ऐसे क्या देख रही हो।" मी तिला बोलत करण्याचा प्रयत्न केला.
"मेरी गुडीया अब इस दुनिया में नही है, उसे मार दिया गया।" ती इतकंच बोलली, इतक्यात मितालीने केक कटिंगसाठी सगळ्यांना स्टेजजवळ बोलावलं आणि हा विषय इथेच संपला. पण स्मिता काय बोलली? "मार दिया गया" ती नक्की हेच बोलली ना? का मी काहीतरी वेगळं ऐकलं. काही समजत नव्हतं. वाढदिवस मस्त मस्ती करत पार पडला. साऱ्या मैत्रिणींनी छान धमाल केली, पण माझ्या डोक्यातून स्मिताचे विचार काही केल्या जात नव्हते. ती अशी का बोलली "मार दिया गया।" काय घडलं असेल ते समजल्याशिवाय मला काही चैन पडणार नव्हती. तिचे ते भकास, निर्विकार डोळे माझ्या नजरेसमोरून हटत नव्हते. स्मिताविषयी मितालीकडे चौकशी केली असता तिचं बाळ वारलं याव्यतिरिक्त तिलाही जास्त काही माहीत नव्हतं.
दुसऱ्या दिवशी मितालीकडून स्मिताचा पत्ता घेऊन पहिलं तिचं घर गाठलं.
"स्मिता काल तू असं का बोलली की, मेरी गुडीया को मार दिया गया. क्या हुआ था, स्मिता? बोलो..." मी तिच्या घरात प्रवेश केल्या केल्या तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
"नही दीदी ऐसा कुछ नहीं हैं। आपने गलत सुना हैं। हाँ! यह बात सच है कि मेरी बेटी अब इस दुनिया मे नहीं है।"
"देखो स्मिता तुम झूठ बोल सकती हो, लेकीन तुम्हारी आँखे नहीं, कल जो मैने तुम्हारी आंखो में देखा था, वह क्या था, कल तुम्हारी आँखे कुछ और ही बयान कर रही थी। सच-सच बताओ स्मिता क्या हुआ था।" मी थोडं चढ्या आवाजात विचारलं. तशी स्मिता रडायला लागली.
शांत झाल्यानंतर ती सांगू लागली की तिच्या मुलीत जन्मदोष होता. तिचा वरचा ओठ जन्मतःच फाटलेला होता आणि तिच्या घरच्यांच्या मते ग्रहणामुळे तिच्या बाळात हा जन्मदोष निर्माण झाला होता. पण ग्रहण काळात तिच्या सासूने तिला एकदम कडक ग्रहण पाळायला भाग पाडले होते. वेध लागल्यापासून ते ग्रहण सुटेपर्यंत ते पाळायला लावले होते. मग त्यात झोपायचे नाही, अन्न वर्ज्य, बोटे कशीही वळवायची नाहीत, कोणतेही काम करायचे नाही, अशा प्रकारे ग्रहण पाळायला लावले तरीही बाळात जन्मतःच शारीरिक व्यंग आलं होतं ना.
"अगं पण स्मिता, ग्रहणाने काही होत नाही. ग्रहण म्हणजे सूर्य, चंद्र, आणि पृथ्वी यांच्या सावल्यांचा खेळ. त्याचा आणि जन्मदोषाचा दूरदूरवर काहीही संबंध नसतो गं. जन्मदोषाची कारणं वेगळी असतात. आणि घरच्यांच्या आग्रहाखातर तू ग्रहण पाळलं होतंस ना!!! तरीही बाळात व्यंग आलंच ना!!! मग यावरून काय समजतं ग्रहणामुळे जन्मदोष उपजत नाहीत. जन्मदोष हे जनुकीय किंवा गुणसूत्रांच्या दोषामुळे किंवा अन्य घटकांच्या कमतरतेमुळे होतात. पहिल्या दोन महिन्यात घेतलेल्या काही औषधांमुळेही जन्मदोष होतात. ग्रहण पाळण्याचे काही तोटेही आहेत, गं!!! गर्भवतीला आणि गर्भाला भूक सहन होत नाही. जास्त वेळ उपवास केल्यामुळे रक्तातील साखर उतरते. चक्कर येते, थकवा येतो. एका ठिकाणी सतत बसल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह मंदावतो. काहीवेळा हे धोकादायकही ठरू शकते. पाणी वर्ज्य केल्यामुळे लघवी कमी होऊन मूत्रमार्गाचे इन्फेक्शनही होऊ शकतं." मी तिला समजावण्याच्या सुरात बोलले.
"दीदी मुझे पता हैं, पर घरवालों को कौन समझाएगा। पुराने खयालातवाले लोग है। मैने उन्हे बहोत समझाया की मेडिकल सायन्स में इस बात का भी हल है। ऑपरेशन या फिर प्लॅस्टिक सर्जरी से उसे ठीक किया जा सकता है। लेकीन वह लडकी थी ना, दीदी!!! लडकी पर इतना खर्च कौन करेगा।" म्हणत ती परत रडू लागली.
"अगं म्हणून मग काय तिचा जीव घ्यायचा..."
स्मिता आणि तिच्या मुलीसोबत पुढे काय घडलं. पाहुयात पुढील भागात
क्रमशः