Vinita Kadam

Drama

1.7  

Vinita Kadam

Drama

जिद्द

जिद्द

7 mins
917


"ये आये! सावकार आलाय तुला भेटाया. बघतोय कसा बघ, मारक्या म्हशीगत." संकऱ्या पळत पळत येऊन लाहीला सांगू लागला. तशी लाही रागात शिव्या देत बाहेर आली. "त्याचा मुडदा बशिवला. कितींदा सांगायचं हेला माझं झोपडं काय बी झालं तरी तुला देणार नाय मजी नाय. कुत्र्याला कितीदा हाड म्हटलं तरी बी लोचटासारख येतंय दारात." इतकं बोलून तिनं हातानं चुलीजवळची ढपली सावकाराच्या दिशेनं फेकली.


लाही आदिवासी पाड्यात राहणारी एक २३ वर्षाची महिला जिच्या पदरात ३ लेकरं त्यातील मोठा ५ वर्षाचा संकऱ्या आणि बाकी २ तान्ही. नवऱ्यानं दारूपायी घरातलं होतं नव्हतं ते सारं सावकाराच्या घशात ओतून स्वतःही लाहीची साथ सोडून मरून गेला. लाहीजवळ दमडी नसताना गावात मिळेल ते काम करून आपलं आणि आपल्या लेकरांचं पोट भरत दिवस काढत होती.


राहायला चंद्रमौळी झोपडी. त्यात अठराविश्व दारिद्र्य, त्यात सावकराचं कर्ज. अशाही परिस्थितीत ती येणाऱ्या संकटाशी दोन हात करत होती. पण स्वाभिमानाने जगत होती. कोणापुढेही हात पसरायचा नाही. मेहनत करून भाकरी मिळवायची असंच तिनं ठरवलं होतं. तिला नवरा मेल्याचं दुःख नव्हतं. काळजी होती ती लेकरांचं पोट कसं भरायचं? एकवेळ ती उपाशी राहून मुलांची भूक भागवत होती. तिच्या झोपडीला छप्पर होतंही आणि नव्हतंही...


अचानक एके दिवशी आभाळ दाटून आलं. सोसाट्याचा वारा, वावटळ आणि पाऊस एकत्रच आलं. त्यात तिची चंद्रमौळी झोपडी कस्पटासारखी कुठं उडून गेली. हे तिचं तिलाच समजलं नाही. पाड्यातील सर्व लोक जीव वाचवण्यासाठी आडोसा मिळेल तिथे जात होती. पण लाही मात्र डोक्यावरचं छप्पर उडूनही जागेवरून हलली नव्हती. लेकरांना जवळ कवटाळून पोटाशी धरून तशीच बसून राहिली. होतं नव्हतं तेवढं सगळंच गेलं, राहिली ती फक्त बसल्या जागची माती.


वादळ शांत झालं तसा पाऊसही संपला होता आणि लाही पण शांत होती. निसर्गापुढे आपलं काय चालणार असं समजून गप्प बसली. कसं अन् काय सावरायचं हेच तिला कळेना.


"आये! भूक लागलीया. जंगलात जाऊन येतू. काय मिळतं का बघतु. तू हाथच थांब." संकऱ्या म्हणाला.


"आरं तू थांब! बारक्यापाशी. म्या येती जाऊन.. कंदमुळं मिळत्याल." लाही.


लाहीन कंदमुळं आणून पोरांची तात्पुरती भूक भागवली. तेवढ्यात सावकार परत आला होता.


"अग लाहे! कशाला राहिलीया हत? काय हाय आता तुझ्याकडं? झोपडं आन तुझा नवरा नेला काळानं.... झोपड्याची जागा दे आणि पैका घेऊन जा." सावकार बोलत होता.


लाही गप्प होती. ती उठली तशी जंगलात जाऊन काटया, झावळ्या, काटक्या आणून पुन्हा कसंतरी झोपडं उभं केलं. पाड्यातील सारी लोकं तिच्या जिद्दीकडे आ वासून बघत होती.... तिने पुन्हा एकदा सावकाराच्या नाकावर टिच्चून घरकुल उभं केलं होतं.


"अगं किती दिस उभी राहशील? तेच बघतू. येईन परत. बघून घेईन." धमकी देऊन सावकार निघून गेला.


लाहीने ठरवलं होतं की या पाड्यात जगण्याचं साधन उरलेलं नाही म्हणून शेजारच्या शहरात जाऊन दिवसभर काम करायचे.... खाली मान घालून पैसे कमवायचे. असं ठरवून तिनं तशी सुरुवातही केली. सुरुवातीला दोघांना झोपडीत ठेवून बारक्याला बरोबर घेऊन जाऊ लागली. पण त्याच्यासारख्या रडण्याने कामे मिळेनाशी झाली म्हणून नंतर ती पोरांना संकऱ्याच्या जीवावर सोडून कामाला जाऊ लागली.


दिवसामागून दिवस जात होते. पोर मोठी होत होती. लाहीपुढे आता फक्त पोटाचा प्रश्न नव्हता. प्रश्न होता तो मुलांच्या भविष्याचा. पाड्यात एक गुरुजी येत असत. लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन सरकार दरबारातील सामान्य लोकांसाठी असलेल्या उपाय योजना काय आहेत याची माहिती देत असत. एकदा लाही त्यांच्याकडे गेली. त्यांना विनंती केली.


"राम राम गुरुजी! म्या लाही, माझं काम व्हतं तुमच्याकडं." लाही बोलली.


"बोल लाही, काय काम आहे?" गुरुजी.


"गुरजी, म्या लांब सहरात जाऊन दिसभर काम करती. माझी ३ लेकरं हाथच झोपड्यात असत्यात. पण दिसभर निसती उंडारत्यात. आमच्यासारख्या लोकांच्या पोरांना साळंत घालायची लायकी नाय. माझ्या कमाईत फकस्त लेकरांचं पोट भरतंया. मनुन तुमच्याकडं आली. तुम्ही पोरांना काहीतरी लिहाय, वाचाय शिकवा. नायतर माझ्यासारखी अडाणी राहत्याली. शिकली सावरली तर कायतरी बनत्याल. शिकवाल ना?"


"हो! शिकवेन की. नक्कीच! कामच आहे माझे ते..." गुरुजी.


"लय उपकार झालं गरीबावर..." लाही.


आता लाही नव्या उत्साहाने कामाला लागली. जास्त वेळ काम करू लागली. शहरात जाऊन बऱ्याच चांगल्या लोकांच्या घरी जाऊन त्यांची धुणीभांडी करू लागली. त्यांच्यात राहून काही चांगल्या गोष्टी शिकत होती. आता तिचं राहणीमानही सुधारत होतं. तिची मूलंही गुरुजींकडे चांगलं शिकत होती. त्यांच्यात प्रगती होत होती. आदिवासी पाड्यात लाही म्हणजे एक चर्चेचा विषय झाली होती. कोणाच्या ना अद्यात ना मद्यात. आपण भलं आणि आपलं काम भलं. सावकाराकडे लाहीच्या प्रगतीची बातमी पोहोचली होती. सावकारानेही तिच्या जिद्दीपुढे हार मानली होती. तिचं आयुष्य तिला जगू द्यायचं असं ठरवून सावकाराने तिला त्रास द्यायचं सोडून दिलं.


एव्हाना लाहीचा आत्मविश्वास वाढला होता. पण संकटं काही तिची पाठ सोडत नव्हती. नेहमीप्रमाणेच लाही शहरात कामासाठी गेली. त्यादिवशी गुरुजी सकाळी पाड्यात लवकर येऊन दुपारपर्यंत निघूनही गेले. तिची पोरं झोपडीत खेळत होती. संकऱ्याने दोन्ही भावंडाना जेवायला घालून झोपवलं. आणि स्वतः झोपडीच्या दारात खेळत बसला. संध्याकाळ झाली.आईची वाट बघत दारात बसून राहिला.


लाही लेकरांच्या ओढीनं घरी जायचं म्हणून काम भरभर आवरत होती. अचानक थंड वारे वाहू लागले. वातावरणात बदल झाला तशी लाहीच्या हृदयात धडधड वाढली. तिला लेकरांची आठवण झाली. पटकन ती काम संपवून पाड्याकडे निघाली. तोपर्यंत आकाशात काळे ढग जमा होऊन जोरात पावसाची रीपरीप सुरू झाली. त्यात वादळी पाऊस, विजांचा कडकडाट सुरू झाला. मग लाही जास्त वेगाने काही वाहन मिळते का ते बघू लागली. पण तिचं लक्ष सर्व झोपड्याकडे होत. मनाशी पक्कं बांधलं होतं की या वादळी पावसात झोपडं नाही टिकणार पण माझी लेकरं? त्यांचं काय? त्यांना कोण बघेल? आडोसा मिळेल? सुरक्षित राहतील का? काळजीने झपाझप तिची पावले घराच्या दिशेने पडत होती. ती नखशिखांत भिजली होती. चालताना चप्पल तुटली तरी चप्पल तिथेच सोडून अनवाणी धावत सुटली. वाटेत वादळी वारे, पाऊस आणि विजांचीही भीती तिला वाटेनाशी झाली. तिच्या डोळ्यांसमोर फक्त तिची लेकरे दिसत होती.


पाड्यात येईपर्यंत तिला बरीच रात्र झाली होती. तोपर्यंत पाऊसही थांबला होता. सगळीकडे अंधार होता. तिला काहीच दिसत नव्हत. ती जशी पाड्यात आली तशी तिने संकऱ्या आणि बारक्याला हाका मारायला सुरुवात केली. पण तिला कोणतेच उत्तर मिळत नव्हते. तशी ती घाबरली. काय झालं नक्की काहीच कळेना. इतका अंधार होता की पाड्यातील ओळखीचे कोण भेटेना. फक्त ऐकू येत होता तो बरबाद झालेल्या लोकांचा आक्रोश. पण या वेळीही लाही शांतच होती. अंधारात ओरडून काही उपयोग नाही हे जाणून होती. तांबड फुटायची वाट बघायची ठरवून आहे तिथेच बसून राहिली.


एकदाच उजाडलं... सगळं चित्र स्पष्ट झालं. लाही डोळे मोठे करून सर्व पाहात होती. तिने सर्वात आधी लेकरांना शोधलं. पण कुठेही दिसत नव्हती. आता मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. घाबरली. आजुबाजूच्या लोकांना विचारू लागली पण कुणीच काही सांगत नव्हतं. झोपडी तर नव्हतीच. निसर्गाने पुन्हा तिचं सर्व उद्ध्वस्त केलं होतं. मोठ्या धीराची, जिद्दीची होती तरीही पोरांच्या काळजीने तिचे डोळे पाणावले. आता मात्र तिला रडावंसं वाटत होतं. तिचा धीर खचत चालला होता. जिकडे तिकडे तिला फक्त चिखल आणि साठलेलं पाणी दिसत होतं कुठेही पाय ठेवायला जागा नव्हती.


तिचा नवरा मेला तेव्हाही रडली नव्हती. याआधी निसर्गाने रौद्र रूप दाखवल होतं तेव्हाही ती शांतच होती पण ज्यांच्यासाठी ती जगत होती मेहनत करत होती तोच आधार तिचा नष्ट झाला होता. जगायचं कोणासाठी आणि का? आता मात्र दाबून ठेवलेलं सगळ दुःख बाहेर पडू पाहात होते. अचानक तिनं हंबरडा फोडला आणि जोरजोरात रडू लागली. निसर्गापुढे तिच्या हिमतीने, जिद्दीनं कात टाकली होती. तिचं अवसान गळून पडलं होतं. शरीरातून प्राण निघून जावेत तशी ती त्या चिखलात बसून होती. निस्तेज, निष्प्राण. चैतन्य हरवल होत. एकटक शून्यात बघत होती.


"ये आये! अगं तू कुठं व्हती? आम्ही किती वाट बघितली? आपलं झोपडं गेलं वाहून. काय बी राहिलं नाय." अचानक तिच्या कानी आवाज आला.

तिच्या पोरांचा आवाज ऐकुन अमृताचा कलश सापडावा तशी ती बहरली. आणि तिने मागे वळून पाहिलं तर तिची तिन्ही पोरं तिला येऊन बिलगली. तिने पटापट त्यांचे मुके घेतले. प्रेमाचा पान्हा फुटला. डोळ्यातून आनंदाश्रु वाहत होते. तिने तिन्ही लेकरांना घट्ट मिठी मारली आणि जोरजोराने रडायला लागली. तिचं दुःख आणि आनंद बघायला कोणाला वेळ नव्हता. सगळेच आपापल्या कार्यात मग्न होते. लाही आता शांत झाली होती.


"लाहे! बस झालं, किती रडशील? अगं! तुझी पोर म्याच घेऊन गेलो व्हतो माझ्या घरी. म्या वस्तिव आली व्हतो कामासाठी. तवाच पाऊस आला. लोकांची दाणादाण उडवून दिलती बघ. म्या लगबगीनं घरी निघालो तवा तुझ्या झोपडीत ही पोरं दिसली. झोपडी तर कवाच पाचटासारखी उडून गेलती. मला दया आली. म्हणून तुझी पोरं म्या घेऊन गेलो." सावकार लाहीला सांगत होता.


तशी लाही चिडून म्हणाली, "आरं सावकारा! यात तुझा कायतरी डाव आसंल. घे माझं झोपडं आणि त्याची जागा पण. मला तुझं पैकही नको आन काय बी नको."


तसा सावकार पुढं झाला आणि लाहीला म्हणाला, "अगं म्या आता पहिल्यासारखं नाय राहिलो. विनाकारण लोकांना पैशासाठी तरास नाय देत. तुझ्या कर्तुत्वाला तर तोडच नाय बघ. तुझ्या जिद्दीला आणि मेहनतीला माझा सलाम. तू माझी धर्माची भन हाय. आजपासनं तुलाच काय पण या पाड्यातील कोणालाच माझं तरास नाय होणार कधी बी. सगळ्यांचं कर्ज म्या माफ केलं. तुमच्या जमिनी, घरं तुम्हाला परत दिली. रहा सुखात. आणि लाही! तुझं घर धर्माचा भाऊ म्हणून म्या बांधून देईन. तुझ्या नवऱ्याची जमीन बी परत दिली."


पण कोणाचे उपकार घेईल ती लाही कसली.... सावकाराला धन्यवाद देऊन घरासाठी सावकाराने केलेली मदतही तिने कष्ट करून परतफेड केली.. आता ती आपल्या पक्क्या घरात आपल्या लेकरांसोबत सुखाने राहू लागली. बिनधास्त आपल्या स्वत:च्या शेतात कामाला जाऊ लागली..


समाप्त.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama