जे घडते ते चांगल्यासाठीच घडते
जे घडते ते चांगल्यासाठीच घडते
यंदा, कारने घरी जाव असा बेत आखला होता आणि कार घेऊन मी घरी जाण्यास निघालो. उत्सुकता शिघेला होती. आनंद गगनात मावेनासा होत होता. कधी मी माझे घर जवळ करतो असे वाटले. गावाकडची ओढ ही वेगळीच. ती शब्दात नाही सांगता येणार. वाटेत मला आजी आजोबा भेटले. त्यांची बस चुकली असे वाटत होते. मी पुढे जाऊन माझी कार थांबवली आणि त्यांना सविस्तर पणे सर्व विचारले. थोडेसे पुढे गेल्यावर आणि त्यांच्याशी झालेल्या संवादावरुन मला कळले की, त्यांची बस चुकलेली होती आणि ती पण त्याच्या गावाची आणि ती त्यांच्या गावात जाणारी शेवटची बस होती. आता या नंतर त्यांना कुठलीच बस नव्हती. एकतर वेळ होती रात्रीची आणि त्यात तो हायवे. त्यामुळे तिथे वाहणे सुसाट धावत होती पण थांबायला कुणी तयार नव्हते. मग मी त्यांना माझ्या कार मध्ये बसविले व त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी मार्गस्थ झालो. पुढे त्यांच्याशी थोडा अजून वार्तालाभ झाल्यावर मला कळले की ते आजी आजोबा त्यांच्या घरी एकटेच आहेत. त्यांना मूलबाळ नाही. आजोबांच्या थोड्या दिवासापूर्वी एका डोळ्याचे ऑपेरेशन झाले. त्यांचे वय ८० वर्ष पण तरी न चुकता ते रोज काम करतात व मिळेल त्या पैश्यात उदरनिर्वाह करतात. त्यांना ना कुणाकडून आशा ना अपेक्षा.मिळेल त्या पैश्यात सुखी समाधानाने आयुष्य जगायचे असे त्यांचे दैनंदीनी जीवन. हे सर्व ऐकून माझ्या डोळ्यांत पाणी आले पण त्याच वेळेस कळले की सुखी आयुष्य म्हणजे काय? तेवढ्यात त्यांचे गाव आले व त्यांनी मला त्यांच्या घरी जेवण्याचा आग्रह केला. त्यांच्या आग्रहापायी मी त्यांच्या घरी गेलो. घर तसे त्यांचे साधेसुधे. त्यात त्यांच्या घरी वीज पण नाही. होता तो फक्त दिवा. त्यांनी दिवा पेटवला व मला म्हणाले, " आज बाळा, तु इथेच जेवण कर व मुक्काम कर मग पहाटे जा" त्यांनी माझ्या साठी बनवीलेल्या झुणका भाकरी चे भोजन मी केले. फक्त पोटच नाही तर मन पण भरले होते व मी तृप्त झालो होतो. त्या घरात समाधानता नांदत होती असे वाटत होते. बाहेर जोरदार अतीवृष्टी असल्या कारणाने मी त्या दिवशी तिथे मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी त्यांचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या गावाकडे रवाना झालो. थोडे पुढे जात नाही की मला कळले की मी ज्या रस्त्याने जाणार त्याच रस्त्यावर वीज कोसळली आणि ही घटना काल घडली पण त्यात कोणतीही जीवीत हाणी झाली नव्हती. हे माहीती झाल्यावर खूप थरकाप उडाला व त्याच वेळेस ईश्वराचे आभार मानले. म्हणून म्हणतात ते खरे आहे जे घडते ते चांगल्यासाठीच घडते.
