samarth krupa

Fantasy

4.3  

samarth krupa

Fantasy

जादू

जादू

5 mins
266


एके गावात सोमदत्त नावाचा चित्रकार राहत असे. तो रोज सकाळी जवळच्याच शहरात चित्रे विकण्यासाठी जात असे. निसर्गाचे,माणसांचे प्राण्यांचे,मंदिरांचे तो इतके हुबेहूब चित्र काढायचा की बघणाऱ्याला चित्र विकत घेण्याचा मोह होत असे,त्यामुळे भराभर त्याचे चित्रे विकल्या जात असत, आणि संध्याकाळ पर्यंत तो परत आपल्या घरी येत असे. त्याला आईवडील,नातलग नसल्यामुळे घरात तो एकटाच राहायचा. एकदा असेच तो चित्रं घेऊन शहरात गेला,परत येताना त्याला खूप अंधार झाला आणि अंधारात त्याची वाट चुकली,तो भरकटत जंगलात गेला,तिथे बराच वेळ त्याचा रस्ता शोधण्यात गेला पण रस्ता काही मिळाला नाही,त्याला तहान आणि भूक लागली. आता काय करावे ह्या विचारात असताना त्याला दूरवर एक दिवा लुकलूकताना दिसला. त्याने विचार केला ज्याअर्थी दिवा आहे म्हणजेच तिथे कोणीतरी राहत असलं पाहिजे,तिथे जाऊनच आपल्याला काहीतरी मदत मिळेल. आणि सोमदत्त दिव्याच्या दिशेने चालू लागला,थोडं जवळ गेल्यावर त्याला दिसलं एक झोपडी आहे आणि तिथला दिवा लुकलूकतोय,झोपडी जवळ जाऊन त्याने बघितलं आणि आवाज दिला, "कोणी आहे का?"


त्याला आतून काहीच आवाज आला नाही म्हणून त्याने आत वाकून बघितलं तर एका खाटेवर एक जख्ख म्हातारी झोपली होती. त्याने आवाज दिला,"आजी ! मी वाट चुकलोय,मला पाणी मिळेल का"

आजीचा थरथरता आवाज आला,"कोण आहे! "


"मी सोमदत्त! मी जवळच्याच गावात राहतो,व्यापारासाठी शहरात गेलो होतो,येताना वाट चुकलो,आता सकाळ होईपर्यंत मला वाट मिळेल असं वाटत नाही,मला खूप तहान आणि भूक लागलीय,तुम्ही काही मदत करू शकाल तर मी खूप आभारी राहीन.",सोमदत्त म्हणाला.


"बाबा! मी म्हातारी बाई,माझ्याकडे अन्न तर नाही पण रानातून सकाळी मी काही फळं तोडून आणले ते त्या दुरडीत आहे आणि ह्या पलीकडल्या माठात पाणी सुद्धा आहे,तू आत ये आणि घे,फळं खा,पाणी पी, तुला जरा हुशारी वाटेल",आजी बोलल्या.


"बरं आजी फार उपकार झाले तुमचे",असं म्हणून सोमदत्त झोपडीत गेला,त्याने काही फळं खाल्ले आणि पाणी पिलं.


 "मी सकाळ होईपर्यंत इथेच झोपलं तर चालेल का आजी",सोमदत्त


"हो हो झोप न पण तुला खालीच झोपावं लागेल,माझ्याकडे एकच खाट आहे",आजी


"मी खालीच झोपेन आजी,काही काळजी करू नका",असं सोमदत्त ने म्हंटल आणि तो घोरू लागला.


सकाळी उन्हं वर आल्यावरच त्याला जाग आली. त्याने बघितलं आजी झोपडीबाहेर बसली होती,तो आजीचा निरोप घ्यायला बाहेर गेला,त्याने आजीच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि आभार मानले पण त्याला जाणवलं आजीचे पाय गरम लागत होते म्हणून त्याने आजीच्या कपाळाला हात लावून बघितलं तर आजीला ताप आला होता.


 "आजी तुम्हाला तर खूप ताप आलाय",सोमदत्त


 "हो काल रानातून येतानाच थोडी कणकण वाटत होती",आजी


 "आता काय करायचं,इथे जवळपास औषध सापडणार नाही मला शहरात जाऊनच औषध आणावं लागेल",सोमदत्त काळजीने म्हणाला.


 "शहरात जायची गरज नाही,इथून डाव्या हाताला वळलं की वीस पावलं गेल्यावर किरमिजी रंगाचे झुडपं दिसतील,त्याचा पाला तू आणू शकशील तर फार बरं होईल",आजी


 "हो हो मी नक्की आणतो",असं म्हणून सोमदत्त पाला आणायला निघाला,थोड्या वेळात तो पाला घेऊन आला,आणि आजीने सांगितल्याप्रमाणे त्याने पाला कुटून त्याचा रस आजीला पाजला आणि थोडा कपाळालाही लावला. सोमदत्त आजीचा ताप उतरेपर्यंत तिथेच राहिला, संध्याकाळपर्यंत आजीचा ताप उतरला. सोमदत्त म्हणाला, "आजी तुमचा ताप सध्या उतरला आहे पण मला वाटते की सकाळपर्यंत जर पुन्हा तुम्हाला ताप आला नाही तर मी माझ्या गावी जाईन,तशीही संध्याकाळ झालीय,परत वाट चुकू शकते",सोमदत्त


"हो हो! थांब तू सकाळ होईपर्यंत",आजी


सोमदत्त ने रानातून आणलेले फळं खाऊन आजी आणि।सोमदत्त झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी खडखडीत बरी झाली होती,चांगली चालू फिरू शकत होती.


सोमदत्त ने आजीच्या कपाळाला हात लावून म्हंटल,"आजी।तुमचा ताप पूर्णपणे बरा झालेला आहे आता मी माझ्या गावी जाऊ शकतो"


 "हो बाबा! बरं झालं तू होता म्हणून मला औषधी पाला मिळाला नाहीतर मी एकटी म्हातारी किती दिवस खितपत पडली असती काय माहीत?",आजी सद्गदित होऊन म्हणाली.


आजीचं बोलणं ऐकून सोमदत्त सुद्धा सद्गदित झाला,"आजी तू एकटी इथे जंगलात कशी काय राहू शकते,तू तयार असशील तर माझ्यासोबत माझ्या गावी तुला घेऊन जाऊ शकतो,तिथे मी तुझी चांगली देखभाल करू शकेन",सोमदत्त म्हणाला.


"तुझे आईबाबा,बायकापोरं कुठे आहेत?",आजीने विचारलं.


 "आजी तुझ्यासारखाच मी एकटा आहे,माझं कोणीच नाही ,म्हणूनच म्हणतो चल माझ्यासोबत ह्या जंगलात राहण्यापेक्षा",असं सोमदत्त म्हणाला आणि सद्गदित झाल्याने, त्याच्या डोळ्यातुन अश्रुंचे थेंब आजीच्या हातावर पडले आणि काय आश्चर्य!!! म्हातारीचं एका सुंदर आणि तरुण राजकन्येत रूपांतर झालं,सोमदत्त डोळे विस्फारून, अवाक होऊन, अनिमिष नेत्राने बघत राहिला,काही वेळ त्याला काय बोलावे हेच सुचेना. त्याची अवस्था पाहून राजकन्या सांगू लागली,


"सोमदत्ता! तुला आश्चर्य वाटणं अगदी स्वाभाविक आहे,मी खरी एक राजकन्याच आहे माझं नाव सोमपुष्पा, पण एका मांत्रिकाच्या शापाने जख्ख म्हातारी झाली होती, एकदा तो राजदरबारी आला असता, त्याच्या विद्येवर मी अविश्वास दाखवून त्याची टिंगल केल्यामुळे त्याने मला शाप दिला.


तुझ्या आजूबाजूला बघ",असं राजकन्येने म्हणताच सोमदत्त चे लक्ष बाजूला गेले आणि तो आणखी आश्चर्यचकित झाला,कारण त्याच्या आजूबाजूला जंगलाऐवजी मोठा राजवाडा होता,तो राजप्रासादात उभा होता,दास दासींची लगबग सुरू होती.


 पुढे राजकन्या सांगू लागली,"त्या मांत्रिकाला जेव्हा मी उ:शाप मागितला तेव्हा त्याने सांगितलं की जेव्हा एखादा तरुण तुझी सेवा करेल आणि तुझ्या अवस्थेवर अश्रू ढाळेल तेव्हा तू पूर्ववत राजकन्या होशील.


 त्याने राजवाड्याला जंगलात,माझ्या आईबाबांना आणि राजवाड्यातल्या सगळ्यांना पाषाणात रूपांतरित केलं होतं पण तुझ्यामुळे सगळे जण शापमुक्त होऊन पूर्ववत झाले" सोमदत्त अचंबित होऊन ऐकत राहिला.


 थोड्यावेळाने तो भानावर आला आणि म्हणाला,"मला संध्याकाळ होण्याआधी गावी पोचलं पाहिजे."


राजकन्या म्हणाली,"सोमदत्त आत्ताच तू म्हणाला होतास न की घरी तुझी वाट बघणारे कोणी नाही म्हणून, आणि माझं बोलणं पूर्ण व्हायचं आहे,ऐक तर खरं!",असं म्हणून राजकन्या पुढे बोलू लागली,"जेव्हा मांत्रिकाने मला असा उ:शाप दिला तेव्हाच मी ठरवलं होतं की ज्या तरुणामुळे मी शापमुक्त होईन त्याच्याशीच मी विवाह करेन. तु माझ्याशी विवाह करायला तयार आहेस का?"


 काही वेळ सोमदत्त ला काही अर्थबोधच झाला नाही,नंतर तो हळुवार पणे म्हणाला," हो मी तयार आहे तुमच्याशी विवाह करायला"


राजकन्या सोमदत्ताला राजा राणी कडे घेऊन गेली,सगळ्यांच्या साक्षीने सोमदत्त आणि राजकन्येचा रीतसर धुमधडाक्यात विवाह झाला. विवाहापश्चात राजकन्या आणि सोमदत्त त्यांच्या शयनकक्षात बसले होते तेव्हा सोमदत्त राजकन्या सोमपुष्पाला म्हणाला,"मी तुला काहीतरी दाखवू इच्छितो" राजकन्या कुतूहलाने म्हणाली,"काय दाखवायचंय?" सोमदत्त राजकन्येला एका चित्राकडे घेऊन गेला आणि त्याने चित्रावरचा पडदा दूर केला,ते चित्र बघून राजकन्या स्तिमित झाली आणि हसली. "हे चित्र कधी काढलं?",राजकन्या


"जेव्हा तू औषधी पाल्याचा रस पिउन झोपली होती आणि मला ताप उतरेपर्यंत थांबायचंच होतं,त्यामुळे माझ्याजवळ वेळ होता तेव्हा हे चित्र काढलं." असं सोमदत्त म्हणाला आणि ते दोघेही हसू लागले.


 ते चित्र होतं खाटेवर झोपलेल्या एका जख्ख म्हातारीचं. अशा रीतीने राजकुमारी आणि सोमदत्त आनंदाने राहू लागले.



Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy