Kalyani Deshpande

Inspirational

4.5  

Kalyani Deshpande

Inspirational

नवी दिशा

नवी दिशा

5 mins
37


सुमेध खूप निराश झाला होता, सलग तिसऱ्या प्रयत्नात ही त्याला मेडिकल सीईटी मध्ये हवे तसे मार्क्स मिळाले नव्हते. त्यामुळे त्याला एमबीबीएस ला प्रवेश मिळू शकणार नव्हता. त्याचे आईवडील सुद्धा नाराज झाले होते. आपला एकुलता एक मुलगा आपल्यासारखाच सर्जन व्हावा असं त्यांना वाटे. सुमेध चे आईवडील दोघेही सर्जन होते.


"काय करू बाबा, मी पूर्ण तयारी केली होती परीक्षेची पण कळत नाही मार्क्स एवढे कमी कसे मिळाले? मला तर मित्रांसमोर जायलाही लाज वाटते",सुमेध


"आता लाज वाटून काय उपयोग सुमेध! मला तर आश्चर्य वाटते आम्ही दोघे डॉक्टर असून तुला सीईटी मध्ये मार्क्स नाही मिळवता आले पण तुझ्या क्लास मध्ये असलेला तो रिक्षाचालकाचा मुलगा तो सीईटी मध्ये अव्वल आलाय आणि लवकरच तो एमबीबीएस ला ऍडमिशन घेईल",सुमेध चे बाबा


सुमेध चं लक्ष कशातच लागेना,त्याला सतत उदास वाटू लागलं,सगळे आपल्याला चिडवत आहेत असं वाटू लागलं. तो घरात घरातच राहू लागला,जेवण्यातही त्याला रस वाटेना,हळूहळू तो अशक्त होऊ लागला, त्याच्याशी बोलण्यासाठी आलेल्या मित्रांना, नातेवाईकांना तो भेटेनासा झाला, त्याच्या खोलीतच तो बसून राहू लागला.

आता त्याच्या आईबाबांना त्याची काळजी वाटू लागली.


"अरे! सुमेध इतकं मनाला लावून घेशील तर कसं जमेल,परत प्रयत्न कर, निराश होऊन काही फायदा नाही बेटा!",सुमेध चे बाबा म्हणाले.


"पुन्हा मी प्रयत्न केला आणि परत असंच झालं तर! त्यापेक्षा नकोच ते",सुमेध


"अरे मग काय संपूर्ण आयुष्य याच खोलीत बसून काढणारेस का?",सुमेध चे बाबा


"संपूर्ण आयुष्याचं तर माहीत नाही पण सध्या तरी मला एकट्याला सोडा बाबा प्लिज!",सुमेध


हताश मनाने सुमेध चे बाबा खोलीबाहेर पडले.


"काय झालं! काय म्हणतो तो, ऐकलं का तुमचं?",सुमेध ची आई


"तो काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही,मी परोपरीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही.",सुमेधचे बाबा


"काय करायचं मला तर काहीच समजत नाही,मला त्याची अवस्था पहावल्या जात नाही",असं म्हणताना सुमेधच्या आईचा गळा भरून आला.


एकेदिवशी सुमेध ची चुलत बहीण सीमा, सुमेध च्या घरी सुमेध च्या आईबाबांना म्हणजेच तिच्या काका काकूंना भेटायला आली, तेव्हा सुमेध विषयी चौकशी केल्यावर तिला त्याच्या निराश अवस्थेबद्दल समजलं,तिला फार वाईट वाटलं.


"सीमा इथेच चार दिवस राहायला का येत नाही,तेवढंच आम्हा सगळ्यांना बरं वाटेल आणि तुझ्या जोडगोळीला ही घेऊन ये,फार छान वाटते त्यांचे बोलणं ऐकायला",सुमेध ची आई म्हणाली.


"हो येते उद्याच माझी बॅग घेऊन येते आणि मयूर-केयुर ला ही घेऊन येते",सीमा


सीमा निघून गेली आणि पुन्हा सुमेधच्या आईबाबांना घर खायला उठलं.


दुसऱ्या दिवशी सीमा तिच्या पाच वर्षांच्या जुळ्या मुलांसोबत काही दिवस मुक्कामी राहायला बॅग घेऊन आली. 


"चल मामा,बाहेर चल आमच्याबरोबर खेळायला",असं म्हणून मयूर-केयुर नी सुमेधला अक्षरशः खोलीतून बाहेर ओढून नेलं.


"बघ मामा! मी आणि केयुर लपतो,तू आम्हाला शोध,मग ज्याला आधी तू शोधशील त्याच्यावर राज्य येईल.",मयूर म्हणाला


"तू  का सांगितलं मामाला, मला सांगायचं होतं न",केयुर रुसून म्हणाला.


"त्यात काय झालं रे, मी सांगितलं तर,मी मोठा भाऊ आहे न तुझा!",मयूर समजावणीच्या सुरात म्हणाला.


"मोठा म्हणे! फक्त सात मिनिटांचं अंतर आहे आपल्यात",केयुर


"मग काय झालं! सात मिनिटं तर सात मिनिटं, सात मिनिटांनी का होईना मी आहे न मोठा बस तर मग!",मयूर फुशारून म्हणाला.


"अरे अरे! काय छोट्याशा कारणाने भांडता! आणि किती मोठया माणसासारखं बोलताय तुम्ही!",सुमेध ला हसायला येत होतं.


"अरे! मोठेच झालो आहोत आम्ही मामा!,हो किनई रे मयूर",केयुर म्हणाला.


"हो! मग! आम्ही सिनियर केजी ला गेलोय, सिनियर म्हणजे मोठे आणि ज्युनिअर म्हणजे छोटे, माहितीय मला! आणि ऐ! केयुर! मला मयूर काय म्हणतो! मयूर दादा म्हण!",मयूर ठणकावून म्हणाला.


"बरं बरं! चला आता आपण खेळू मी राज्य देतो, तुम्ही पटापट लपा.",सुमेध म्हणाला.


घरातून सुमेध चे आईवडील, सीमा त्यांचं खेळणं बघत होते,सुमेध ची आई सीमाला म्हणाली,

"बघ सीमा तू आणि तुझे बच्चे मंडळी आलेत ते किती बरं झालं, आज कित्येक दिवसांनी सुमेध सगळ्यांमध्ये मिसळला, मनमोकळेपणे वागला आणि खळखळून हसला."


मयूर-केयुर त्यांच्या सुमेध मामा सोबत मनसोक्त खेळले, मग त्यांना खेळून खेळून भूक लागली.


"आजी आम्हाला भूक लागली काहीतरी दे बरं खमंग पदार्थ",केयुर सुमेधच्या आईला म्हणाला.


"मला गोड गोड दे काहीतरी आज्जी! मला गोड आवडते!",मयूर म्हणाला.


मग सुमेधच्या आईने छान ड्रायफ्रूट शिरा आणि खमंग भजे केले, ते बघून  मयूर-केयुर आनंदाने टाळ्या वाजवत उड्या मारू लागले आणि म्हणू लागले,


"गोड गोड शिरा आणि खमंग भजे फस्त करतील क्षणात मयूर राजे-केयुर राजे"


"ओ! मयूर राजे-केयुर राजे! तुमच्या मामाला सुद्धा ठेवा हं, त्यांनाही भूक लागली म्हंटल!",सुमेध दोघांना गुदगुल्या करत हसत म्हणाला तशे मयूर-केयुर खदखदून हसायला लागले.


"चल आपण हे सगळं घेऊन हॉल मध्ये बसू आणि मामा तू आम्हाला छोटा भीम किंवा टॉम अँड जेरी लावून दे",मयूर म्हणाला.


"तुमच्या कडे बेबी टीव्ही दिसतो का रे! मामा! मला फार आवडते बघायला आणि मोगली पण",केयुर म्हणाला.


"हो हो सगळं दिसते, तुम्ही जे म्हणाल ते लावून देतो, चला", असं म्हणून मयूर-केयुर,सुमेध हॉल मध्ये बसले आणि सुमेध ने त्यांना टीव्ही वर कार्टून लाऊन दिले.


टीव्ही बघत बघत मयूर-केयुर आणि सुमेध ने शिरा आणि भजे फस्त केले आणि तिथेच सोफ्यावर मयूर-केयुर दोघेही झोपून गेले.


सुमेध फार कौतुकाने दोघांकडे बघत होता, त्याच्या मनात विचार आला, किती निरागस आहे हे बालपण हे दोघे यायच्या आधी माझी मनःस्थिती कशी होती आणि आता मला किती फ्रेश वाटतेय! असं रोजच वाटलं तर किती बरं होईल! 


हे लहान मुलांचं जग किती जादुई आहे, ह्यात नाराज मनाला उल्हासित करण्याची ताकद आहे, मला ह्यांच्या जादुई जगाचा भाग बनता आलं तर! असा सुमेध विचार करू लागला. तेवढ्यात त्याची नजर आजच्या वर्तमानपत्रकडे गेली त्यात अनिमेशन स्कूल ची मोठ्ठी जाहिरात होती ती त्याने कुतूहलाने वाचली आणि अंधारात पट्कन दिवा लागावा तशी एक कल्पना त्याच्या डोक्यात आली, मी अनिमेटर झालो तर! मला छान छान कार्टून फिल्म्स बनवता येतील आणि ह्या जादुई जगाचा भाग बनता येईल.


त्याने त्याच्या आई बाबांना बोलावलं आणि त्याची कल्पना सांगितली.


"आई- बाबा , मी ठरवलंय मी ऍनिमेशन स्कूल जॉईन करणार पुढच्याच महिन्यात ऍडमिशन घ्यावी लागेल, तीन वर्षांचा कोर्स आहे, माझं drawing ही बऱ्यापैकी चांगलं आहे, चित्रकलेत मला नेहमीच जास्त मार्क्स मिळत आलेले आहेत, त्यामुळे अजून वेळ न दवडता मी ह्यातच करिअर करण्याचं ठरवलंय."


हे ऐकून त्याच्या आई बाबांना काय बोलावे हे कळेना, हा सर्जन बनेल असे स्वप्न आपण बघत होतो आणि हा ऍनिमेशन शिकतो म्हणतो, ते शिकल्यावर पुढे काय स्कोप आहे? ह्याची सगळी माहिती काढलीय का ह्याने?


असा ते विचार करत होते तेवढ्यात सीमा तिथे आली आणि तिच्या काका काकूंना म्हणाली,


"काका- काकू त्याला ज्यात रस आहे तेच करिअर करू द्यावं असं मला वाटते,तुम्ही त्याला जबरदस्ती डॉक्टर करण्याच्या मागे लागलात आणि त्याची मनस्थिती बिघडून गेली होती हे आपण बघितलंच आहे. त्याला अनिमेटर व्हायचं आहे तर वाईट काय आहे त्यात? त्याला ही खूप स्कोप आहे, माझी मैत्रीण च अनिमेटर आहे, ती एका सॉफ्टवेअर कंपनीत ग्राफिक्स डिझाईनर च काम करते, ऍड एजन्सी, ऍनिमेशन फिल्म्स ह्यात खूप स्कोप आहे, त्याच्या करिअर ची काळजी करण्याची गरज नाही, मी तर म्हणते, तुम्ही अगदी डोळे झाकून परवानगी द्या त्याला"


थोडावेळ विचार करून सुमेध च्या आई वडिलांनी त्याला ऍनिमेशन स्कूल मध्ये ऍडमिशन घेण्याची परवानगी दिली.


सुमेध ला खूप आनंद झाला, त्याला नवी दिशा मिळाली होती. 


ऍनिमेशन चा कोर्स पूर्ण करून, आणखी काही छोटे छोटे  ऍडव्हान्स टेक्निकल  कोर्सेस त्याने पूर्ण केले आणि स्वतः ची ऍनिमेशन फिल्म्स ची कंपनी सुरू केली, त्यात त्याने खूप प्रगती केली.


मयूर-केयुर आता थोडे मोठे झालेत पण तरीही त्यांना सुमेध मामाने बनवलेल्या कार्टून सिरीज आवडतात.

त्यांना च्या तर गावीही नव्हतं की त्यांच्यामुळेच त्यांच्या सुमेध मामाला नवी दिशा मिळाली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational