Shrikant Karande

Drama Tragedy Thriller

4  

Shrikant Karande

Drama Tragedy Thriller

हुंदका

हुंदका

5 mins
346


झुंजुमुंजू झालं तसं रम्यानं दावणीला बांधलेली जनावरं सोडून दुसरीकडे बांधली. गेली चार दिस जनावरं ताठून गेलती. जनावरांना जागा बदलल्याने जरा पायाच्या मुंग्या मेल्या गत झालं अन् थोडं टवटवीत वाटाया लागलं. तसं त्यांच्या पाठीवरून त्याने मायेने हात फिरीवला व पाठ थोपटली. आपल्या जनावरांवर रम्याने लेकरावाणी जीव लावला होता.

“एक वेळ घरात भाकर नसली तरी चालेल पण सर्ज्या सोन्याचा खुराक बंद झाला नायं पायजे” इतका जीव त्याने आपल्या बैलांना लावला होता.

पावसानं चांगली उघडीप दिल्यानं रम्या जरा आनंदातच होता. गेली चार दिस साध कुणाचं तोंड पण दिसलं नाय. का कुणाला राम राम झाला नाही. आज वापसा झाल्यानं सगळेच लगबगीनं कामाला लागले.

जो तो आपली पेरणी कशी पूर्ण होईल हेच पाहत होता. इकडे रम्याला सुद्धा दम नव्हता. पेरणीच्या सनगाची जुळवा जुळव चालू होती. पटापटा काम आवरीत पेरणीची तयारी करीत होता.

“अगं रखमा हात आवर कि पटापटा. कसला विचार करतेस.” अग चांगलं फटाकलं हाय. लवकर गेलो तर पेरणी तरी होईल, तण तोडका पण निघेल .” रम्या सनगं गाडीत भरीत बडबडत होता.

“अहो थांबा जरा. थोडसं जेवण करून घ्या. आव एकदा काम सुरू झालं कि पुनंदा येळ नाही मिळायचा. एकदा जुपलं कि जूपलं.” रखमा फडक्यात भाकरी गुंडाळीत म्हणाली.

इकडे हातावर भाकर घेत रम्या बैल गाडीकडे निघाला. सर्ज्या व सोन्याला पाणी पाजून आणलं.

“ बोलण्यातच वेळ काढशील ? आवर लवकरं.” अग ती बघ धुर्पा. धुर्पाला पण इचार येणार हाय का कशी ? या रिपरिपीने लय तण झालया. एखादी बाय आगावू ठेवली तर काम उरकण.” गाडीला सर्ज्या अन् सोन्या जुपत रम्या म्हणाला.

“ये धुर्पा ऽऽ! ये धुर्पा ऽऽ! अग ऐक ना.”

“काय अक्का !” धुर्पा म्हणाली.

“आज कुठ कामाला जाणार हाय काय ? नसलं तर येना दोन तीन दिवस. अग तण लय झालयं. बायाचं भेटणं मुश्कील झालयं.”

“अक्का आली असते, पण त्यो बेवडा तुमच्यात काय कामाला येऊ देयचा नाय? कशाला भांडणाचं ?”

“अग मी विचारू का भाऊजी ला ?”

“बघ तुझ एकलं तर ? नाहीतर उगं संध्याकाळी मारायचा ?”

“हाय का घरात ?”

“हो. हाय ना घरात.”

“अहो मी आलेच !” रखमा रम्याकडे पाहत म्हणाली.

“लवकर ये.”

इकडे धुर्पाचा नवरा नशेतच पडला होता. त्याला बघताच रखमेन तोंड वाकड केलं.

“भाऊजी ओ भाऊजी.” तोंडाला पदर लावीत रखमा म्हणाली.

“कोणयं ?”

“अहो म्या रखमा.”

“काय वहिनी ?” आज सकाळी सकाळी ईकडं ! वाट चुकला कि कायं?”

“नायं ? मुद्दामच आली होती. धुर्पाला कामाला नेयाचं होतं. बायाच भेटणं मुश्कील झालयं.”

“अहो वहिनी त्यात काय विचारयचं. न्या कि कुठं दुसऱ्याचं काम हाय.”

“ये धुर्पा चल गं बांध भाकरी. भाऊजी जा म्हन्तेत.” धुर्पाला खुणावत रखमा घरी निघाली.

“अक्का आलीच ?” अस म्हणत धुर्पा पण लगो लग रखमाच्या मागो-माग नवरा डाफरायच्या आत निघाली.

रखमा , धुर्पा, रम्या आता शेत शिवाराकडे निघाले. शेत शिवार पालथं घालीत गाडी एकदाची वावरात दाखल झाली. बांधाला गाडी लावली. रखमा धुर्पा दोघींनी रम्याला सनगं उतरायला मदत केली. रम्यानं एकदाची नजर रोखीत सगळा टापू नजरेत सामावून घेतला. शेजारीच भिमा व शिवा पेरीत होते.

भिमा ये भिमा वापसा झालं का रं ?

“अण्णा चांगला वापसा झालं कि !”

“अर् इकडे ये कि जरा. पाभर तरी बांधू लाग ?”

“अण्णा आलोच.”

शिवा ला थांबून भिमा पाभर बांधायला रम्याकडे आला.

“अण्णा सर्ज्या, सोन्या लय गुबगुबीत झालेत रे ! नजर लागल एकाद्याची. लय जपतात तुम्ही त्यांना. अण्णा येळच्या येळेला कामाला जुपित जा, नाहीतर त्यांना काम जमायचं नाय. लय लाडावलेले बैल कधी कधी धोकादायक असत्यात.” भिमा पाभर बांधीत रम्याला म्हणाला.

“भिमा हि दोन जोड म्हणजे माझा जीव कि प्राण ! यांच्या बिगर मी अन् माझ्या बिगर हे कधीच जगू शकणार नाय. अर् मी लांबच दिसलो कि हंबरडा फोड्त्यात ! . आधी यांच्या जवळ जाऊन यांना थोपटाव लागतयं अन् मग घरात शिरायचं. लहानाचं मोठं डोळ्यांसमोर झालीत. धोका नाय देयाची. अर् कामाची सवय असावी म्हणून तर कधी कधी वावरात आणतो बघ. तसं नसतं तर छपरातलं ट्रकटेर नसतं का आणलं ?, पोरं पन् लय जीव लावत्यात बघ. दोघांच्या पाठडावर पण बसत्यात. झ्या झ्या म्हणीत फेर फटका मारत्यात. लय जीव गुंतावलाय बघ !”

अण्णा तुमची काळजी वाटली म्हणून म्हंटलं. काही घटना लय डोळ्या समोर घडल्या ? तस होऊ नाय एवढ वाटतं ? येतो अण्णा, काही लागलं तर सांगा. हाय इथच.” रम्याचा निरोप घेत भिमा म्हणाला.

रखमा, धुर्पा गवत काटकी येचत होत्या तर रम्याने पेरायला सुरवात केली. अर्ध्याच्या वर पेरून झालं.

बघता बघता दिस माथ्यावर आला. थोडा विसावा म्हणून लिंबाच्या झाडा खाली दोन घटका सगळेच बसले.

पाणी पीऊन परत रखमा, धुर्पा आणि रम्या कामाला लागले. त्यांच्या अंगातला त्राण कुठल्या कुठे पळाला कळलेच नाही. पुन्हा नव्या जोमानं कामाला लागले.

आता रान चांगलंच भुसभुशीत झालं होत. थोडा विसावा मिळाल्यामुळे सर्ज्या, सोन्याला तरतरी आली. ते पण अंगात वार शिरल्यागत पाभर ओढीत होते.

चालता चालता अचानक सर्ज्या बुजला. पाभरीला हिसका बसला तशी पाभर जाग्यावर गरा गरा फिरली. रम्याला काय झालं हे काय कळणा. तरी रम्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

सर्ज्या, सोन्याच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना तो शांत करीत होता.

बैल शांत झाल्यावर रम्याने आसूड घेतला. तो ढेकूळ चापसू लागला.

बऱ्याच वेळ ढेकळं, माती चिवडून झाल्यावर. एका ठिकाणी त्याला काही हालचाल झाल्याची दिसली. तसाच तो त्या दिशेने जाऊ लागला. तोच ढेकळा खालून नागाच्या पिलाने आपला फना वर काढला. रम्याला वाटलं इतकूस पिल्लू हे काय करणारं . त्याने आसूड घेतला तसा त्यावर उगारला. पण घाव काय त्याच्या तोंडावर पडण्या एवजी त्याच्या शेपटीवर बसला. सरकण नागाच्या पिलाने पलटी मारून रम्याला डंख मारला. तोच रम्याला भुरळ आली.

पहाडा सारखा रम्या धाडकन खाली कोसळला.

रखमा, धुर्पा धावतच रम्या कडे पळाले. बघतेत तर काय. समोर नागाचं पिलू सळसळ पळत होतं.

तिला घाम सुटला.

“ये भिमा ss! ये शिवा ss! अरे या रे ss! ” अण्णाला पान लागलं रे !”, वाचवा त्यांना वाचवा रे ss! ”. रखमा मोठमोठ्याने ओरडत होती. ढसा ढसा रडत होती.

भिमा अन् शिवा धावतच तिथे आले. बघतेत तर अण्णा गार होऊन पडले होते. ते जाग्यावर गतप्राण झाले होते. त्यांनी आपल्या मित्रांना फोन करून कल्पना दिली.

सगळा गोतावळा एका क्षणात तेथे जमा झाला.

हे सर्व होत असताना मात्रं कोणाचं लक्ष सर्ज्या सोन्याकडे नव्हत. त्यांच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहत होते.

जो मालक जनावरांवर लेकरवानी जीव लावत होता. तोच आज आपल्याला सोडून गेला. याची खंत त्यांना वाटत होती.

मालक गेला हि घटनाच सर्ज्याला सहन झाली नाही !

तो सुद्धा धाडकन खाली कोसळला. बघानार्याच्या काळजाचा ठोकाच चुकला.

“काय झालं ? काय झालं ?” म्हणत सगळेच सर्ज्याकडे धावले.

पण तो पर्यंत उशीर झाला होता.

एका मुक्या प्राण्याने आपल्या मालकाची साथ मरेपर्यंत तर सोडलीचं नाही, अन् मरणानंतर हि सोडली नव्हती.

उभं जग दोघांच्या जाण्याने हळहळ करीत होते.

इकडे मात्र रखमाच्या अन् सोन्याच्या डोळ्यातला हुंदका तसाच दाटून राहिला. तो हि कायमचा..........



Rate this content
Log in

More marathi story from Shrikant Karande

Similar marathi story from Drama