खेळणी
खेळणी
“कृष्णा ये कृष्णा, अरे आवरलं नाही तुझं ? पटकन आवरायचं ? उशीर केला तर आपणास यात्रेला पोहचायला उशीर होईल.” वसंता आपल्या लाडक्या कृष्णाला समजावत म्हणाला .
आज म्हसोबाचीवाडी येथील यात्रा होती. साऱ्या पंचक्रोशीतले ग्रामस्थ त्या ठिकाणी जमा होत आणि गावची यात्रा मोठ्या आनंदात उत्साहात पार पाडत. गावचा आनंद ओसंडून वाहत होता. गावची यात्रा परंपरागत दरवर्षी नित्य नियमाने भरत होती. प्रत्येकाच्या धमन्यात आनंद ओसंडून वाहत होता.
आपल्या कृष्णा ला सुद्धा आपल्या गावची यात्रा दाखवावी म्हणून त्याचा बाप आणि त्याची माय गडबड करीत होते.
वसंता ने आपल्या धर्मपत्नी ला आवर्जून सांगितले, “आज फक्त मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेच यात्रेला जाणार आहोत ! आणि खूप मजा यात्रेच्या ठिकाणी करणार आहोत. कृष्णाची ही पहिलीच यात्रा आहे. त्याला तरी कळू दे यात्रा कशी असते ती ? यात्रात काय काय असतं ?”
“हो लय लाडाचा लेक तुमचा. तो माझा पण आहे म्हणलं ! मला माहिती आहे माझा लेक मला सोडून एकटा आतापर्यंत कोठे पण गेला नाही आणि आज पण तो एकटा तुमच्या बर येणार नाही. बघाच तुम्ही.” यमुना गालाला पदर लावत हसत म्हणत होती.
“बघ कि आता तूच. लेकाचा जीव कुणावर जास्त आहे तो ?” वसंता म्हणाला.
कृष्णा आतल्य खोलीत तयार होत होता. त्याला बाहेरचा फक्त हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता. आज तो भलताच खुश होता. त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
कृष्णा आवरून तयार झाला. मस्तपैकी त्यांने रंगीबिरंगी कपडे घातले आणि आपल्या आबाला तो आवाज देऊ लागला.
“आबा मी आलो आहे, चल बरं आता उशीर नको लावायला. आपल्याला यात्रे मध्ये जायचंय. मी खूप मज्जा करणार आहे तिथं. मी आईस्क्रीम खाणार आणि खेळणी बघणार जी आवडणार ती घेणार.” कृष्णा लाडात म्हणाला
जाता जाता अचानक कृष्णाला आपल्या आईची आठवण आली
“आई तू चल की माझ्यासंग तू आली तरच मी जाईन. मला गर्दी मध्ये खूप भीती वाटते. तू असली म्हणजे मला कशाची भीती वाटणार नाही.” कृष्णा म्हणाला.
“माझ्या लेका आधी तुझ्या बा ला इचार मी बरोबर येऊ का कशी ती ?”
“आबा तुम्ही आईला सांगा ना ?” कृष्णा बापाकडे बघत मोठ मोठ्याने ओरडत म्हनाला मी नाही तुमच्या सोबत येणार मी आई आणि तुम्ही आपण सगळेच जाऊ.” कृष्णा हट्टाला पेटला होता.
“बर माझ्या लेकरा तु म्हणशील तसं ! आम्हाला काय तुला आनंद मिळाला त्यातच आम्ही खुश ?
यमुना ये यमुना “बरं बाबा मी हरलो, बघितलं माय लेकाच प्रेम. चल यमुने आमच्या बरोबर चल सगळेच जाऊ ?.” .
“जरा आवर पटापट. लवकर गेलो तर दिस मावळायला लवकर घरी येऊ.” वसंता यामुनाकडे पाहत म्हणाला.
“होय ऐकलं मी किती जीव आहे. माझ्या लेकराचा माझ्यावर दिसते मला. तुम्ही नका काळजी करू ? तुम्ही तर एकटेच जाणार होतात ना? ,पण माझ्या लेकराला बघा किती काळजी आहे माझी. मला पण चल म्हणतोय. लई गुणाचं लेकरू माझं गं ! , स्वयंपाकाचं सगळं उरकलं हाय माझं, काय बी राहिलं नाही. थांबा लगेच साडी बदलते पटकन. मग जाऊ बीगी बीगी.” यमुना म्हणाली.
वसंता, कृष्णा आणि यमुना सगळेच आता म्हसोबाच्या यात्रेला निघाले. वर्षात एकदा येणारी यात्रा खूपच धुमधडाक्या मध्ये भरत होती. यात्रा वसंताच्या घरापासून दोन मैल कोसावर असणाऱ्या डोंगरावर भरलेली असायची. त्या ठिकाणी जायचं म्हटलं तरी नको नको व्हायचं. रस्ता लई विचित्र. चालता येत नव्हतं, रस्त्यावर नुसते काटेच काटे. पानंद रस्ताच होता शेवटी. पण आज या रस्त्यावर वर्दळ चांगलीच चालू होती.
चलता चलता वसंता ओळखीच्या व्यक्तीला राम राम घालीत होता. ज्याला त्याला या आजच्या दिवसाचची नवलईच वाटत होती. जो तो आनंदात होता. वर्षातून एकदा आलेला दिवस आनंद घेऊन यायचा व वर्षभर टिकायचा. यात्रा म्हटली कि कुस्तीच्या ह्गाम्याची चर्चा व्हायची. गावातलं धा बारा पोरं लंगोट बांधून तयारच असायची. अंगात जल्लोष पसरायचा त्यामुळे आजचा दिवस सगळ्यांनाच भारी वाटायचा. या मुळे प्रत्येकाची लगबग चालू होती.
वाट तुडवीत कृष्णा वसंता आणि त्याची कारभारीन यमुना बोलत बोलत यात्रेच्या दिशेने चालू लागली. यात्रेतील भोंग्याचा आवाज आसमंत दुमदुमवीत होता. रस्त्यातून चालताना वाटेत पाल इचू फुलपाखरू पक्षी दिसत होते. फुलपाखरू दिसले कि कृष्णा ती पकडण्यासाठी धावायचा. रात्रीच अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे कुठे कुठे रस्त्याचा रेंदा चेंदा झाला होता. जो तो दमानं चालत होता. वाट वेडी वाकडी असल्यामुळे रस्ता लवकर उरकत नव्हता. पण आता बरंच अंतर कापल्यामुळे लांबूनच सगळ्यांना यात्रेतील पालं, झेंडे व मंदिराचे शिखर दिसू लागले. मंदिराचे शिखर दिसताक्षणी जो तो कपाळाला हात जोडत नमस्कार घालीत होता.
‘पटापटा चल कि आई, तू पायच उचलत नाही ?” नाचत बागडत कृष्णा म्हणाला.
“अरे आत्ता थोड्यावेळात पोहचू तू घाई करू नकोस.”
“तुला कसं कळत नाही आई ? यात्रा संपली म्हणजी ?”
“नाही संपत अजून दिस माथ्यावर पण नाही आला. मग कशी संपणार बरं ? चल हळू हळू नाहीतर पोह्चायच्या अगोदर पडशील आणि इथेच रडत बसशील.”
“मी नाही रडणार आणि पडणार पण नाही.” आई ला आनंदानं वाकडं दाखवीत उड्या मारत कृष्णा म्हणाला.
“ताशाचा आवाज लय घुमतोय, कुस्ती चांगली रंगात आली वाटतं !” कृष्णा मनाशीच पुटपुटत होता.
“अरे माझ्या लेका तुला आत्ताच बर कुस्तीतलं कळायला लागलंय. तुला आजून खूप मोठ व्हायचंय. तुला कुस्ती आत्ताच आवडली व्हय.”
“आबा मला कुस्ती पहायला लय आवडती.”
“दोन पहिलवान एकमेकाला कसे पाडतात. जिंकण्यासाठी किती आटापिटा करतात. लय मजा वाटते मला. मी टीव्हीवर काल बघितलं होतं. आता मला माझ्या डोळ्यांनी आखाड्या जवळ जाऊन कुस्ती बघता येणार हाय.”
“माहितीये काल तू कुस्तीचा पिक्चर बघत होता तवा कसा उचल ѕѕ!.... आपटѕѕ!...... पकडѕѕ! ........ढकलѕѕ!.........!नुसता ओरडत होता. बघितला तुला आम्ही.”
“मी तुला आज कुस्तीच्या फडापाशी नेतो. खरी कुस्ती कशी असते ते जवळ जाऊन दाखवतो.” अन् तुला पण आखाड्यात सोडतो. मग लंगोट बांधून मार उड्या आखाड्यात. असं म्हणताच सगळ्यांचा हशा पिकला.”
एवढ्यात यमुना ओरडली, “कृष्णा ते बघ तो मोर, बघ त्या झुडपांमध्ये लपलाय ! दिसला का ?”
“आई किती भारी दिसतोय हा मोर !” चल आपण त्याला आपल्या घरी नेऊ, आपण त्याला खाऊ घालू ,त्याला पाणी पाजू आणि आपल्या घरी ठेऊ.”
“अरे माझ्या लेकरा तसं असतं का कुठं ? घरी त्याला नेलं तर सरकार आपल्यावर केस करीन आणि आपल्याला जेलात टाकीन. तो जंगलातच राहत असतो आणि आपण त्याला पकडायला गेलो तर तो हाती लागत नाही. पळतो किंवा उडून लांब जातो. जसं तुला आम्ही आवडतो, तुझं घर तुला आवडतं तसं त्याला पण हे जंगल आणि येथील हे सौंदर्य आवडतं.”
“ठीक आहे आई याला राहू दे इथेच, आपलं निघू पटापटा. नाहीतर यात्रा संपल ?”
“नुसतं खुळ्यागत करतंय सगळंच हवय त्याला.” अहो तुम्हीच समजावून सांगा तुमच्या लेकाला. वसंता कडे पाहत यमुना म्हणाली.
“अगं, तू थांब जरा. ती बघ बोलता बोलता आली यात्रा. इथंच थोडं थांबू. पाणी पिऊन घेऊ अन् लागू डोंगर चढायला.” थोडंस थांबून वसंता म्हणाला.
सगळ्यांनी थोडा विसावा घेतला घटकाभर थांबले, पाणी पिले तोवर कृष्णा इकडे तिकडे सारखा यात्रेतील पालं दुकानाचे शेड, मंदिराचा कळस येणारे जाणारे लोकं सर्वांना निरखून पाहत होता.
घटकाभर थांबल्यावर कृष्णा वसंता आणि यमुना म्हसोबाच्या दर्शनासाठी डोंगरमाथा चढू लागले. जस जसे ते डोंगरमाथा चढू लागले तशी लोकांची गर्दीची लाट वाढू लागली. गोंगाट वाढू लागला. भोंग्यांचा कर्कश आवाज कानठळ्या बसऊ लागला. सामान घेऊन बसलेले व्यापारी मोठ मोठ्याने आपल्या मालाची विक्री करू लागले. प्रत्येक व्यापाऱ्याचा आवाज एकमेकांत मिसळून गायब होत होता. दुसरीकडे कुस्त्यांचा आखाडा सजला होता. त्याच्यामधे कसलेले पहिलवान आपली पैलवानकी दाखवीत होते. ताश्याच्या आवाजाने प्रत्येकाच्या अंगातून विरश्री दौडत होती. जिकडे तिकडे आनंदाला उधान आले होते.
इकडे देव दर्शनासाठी भली मोठी रांग लागली होती. जो तो एकमेकास ढकलत ढकलत पुढे पुढे जात होता. कुणाचा हात तर कुणाचा पाय तुडवत होता. वसंताने कृष्णाला आपल्या डोक्यावर घेतले. हळू हळू तो व यमुना दर्शनासाठी पुढे पुढे सरकू लागले. देव्हारात आल्यावर कृष्णाला वसंताने खाली उतरविले. देवाचे दर्शन घेऊन निवद ठेऊन गर्दीतून बाहेर पडले. ते सर्व एका ठिकाणी झाडा खाली सावलीत बसले.
यमुना तुम्ही सर्व या ठिकाणी बसा मी तुम्हाला थंड गार आईस्क्रीम घेऊन येतो . नंतर आपण “कृष्णाला घेऊन त्याला जसी खेळणी हवी आहे तसी त्याला घेऊन देऊ. मी आलो लगेच.” असं म्हणून वसंता आईस्क्रीम आणायला गेला .
वसंता थोड्या वेळातच आईस्क्रीम घेऊन वापस आला. सर्व आनंदात आईस्क्रीम खाऊ लागले. . कृष्णाची हि पहिलीच यात्रा होती. खूप मोठी यात्रा असल्या मुळे तो गांगरून गेला होता. त्याला त्याचा स्वभाव एका जागेवर बसू देत नव्हता. तो हळूच आपली जागा सोडायचा. पण त्याच्या आई ने त्याला घट्ट पकडले होते. ती त्याला समजून सांगत होती .
“कृष्णा बाळा तू आमचा हात सोडू नको रे नाहीतर ह्या गर्दीत हरवशील?” यमुना म्हणाली.
त्या मुळे कृष्णाचा नाईलाज झाला व तो तिथेच आईस्क्रीम खाऊ लागला. येणाऱ्या जाणाऱ्यांना पाहू लागला
आबा चला ना आपण कुस्ती पाहून येऊ. बघा कसं जोर जोरात ताश्या वाजतोय. चल उठ कि.” कृष्णा हट्टाला पेटला होता. अन् त्याने आबाकडे हट्ट धरला.
“ये यमुना मी आणि कृष्णा कुस्त्याच्या फडाकडे जाऊन येतो. तू तो पर्यंत खाया पियाचं घेऊन ठेव. आम्हाला येळ लागल. जाता जाता त्याला खेळणी पण घेतो.” असं वसंता म्हणला.
वसंताने कृष्णाच्या बोटाला धरलं. कृष्णा चलता चलता खेळण्याची दुकानं निरखून पाहत होता. एखादी खेळणी आवडली कि ती घेण्यासाठी तो आबाकडे हट्ट धरायचा. एकुलता एका पोराचा हट्ट भागवल्याशिवाय त्याला गत्यंतर नव्हते. तो पण नाही म्हणत नव्हता. हवी ती खेळणी तो आपल्या लाडक्या कृष्णा साठी घेत होता.
पिपाणी, रोबोट, भांडे, बासरी, बाहुली इत्यादी वस्तू खरेदी करून दोघेही कुस्त्याच्या फडाकडे निघाले. कृष्णाचा आनंद आज द्विगुणीत झाला. त्याला आज हवं ते मिळालं होत.
तो पिपाणी वाजवण्याच्या नादात चालू लागला. थोड्याच वेळात ते अखाड्याजवळ आले. बघतेत तर काय तिथे तुफान गर्दी. पार एकमेकाला रेटीत जो तो जागा पकडीत होता. वसंता पण कृष्णाला डोक्यावर घेत कुस्ती दाखवू लागला. दोन मल्ल चांगलेच एकमेकाला टकरा देत होते. एकमेकांची ताकद अजमावत होते. ते पाहून इकडे प्रेक्षकात टाळ्यांचा कडकडात चालू होता.
कोणी शिट्या वाजवत तर कोणी रुमाल उडवत होते. शिट्ट्या चे फवारे उडत होते. हे सर्व पाहून कृष्णा पण आपली पिपाणी मोठ मोठयाने वाजवत होता. त्याला पण अत्यानंद झाला होता. आबाने आज त्याची इच्छा पूर्ण केली होती.
कृष्णा बराच वेळ आबाच्या पाठीवर बसल्यामुळे अवघडून गेला होता. तो सारखा आबाला म्हणायचा, “आबा मला खाली उतरवा ѕѕ!.... आबा मला खाली उतरवा ѕѕ!....
पोरगं रडू लागलं तसं वसंताने त्याला खाली उतरविला. व म्हणाला ,” हे बघ कृष्णा गप् गुमान कुस्ती बघ. नसता तुला तुज्या आई कडे सोडतो.”
“हो हो सोडा !” कृष्णा लाडात येऊन बापाला वाकडं दाखवीत म्हणाला.
बापाला पण पोराचं नवल वाटायचं.
आता सर्व कुस्ती पाहण्यात दंग झाले होते. तोच कुणीतरी बाजूला बांधलेल्या मानाच्या घोड्याची शेपटी पिरगाळून टाकली. तो घोडा उधळला अन् थेट आखाड्यात आला. बघता बघता आखाड्यात धावपळ उडाली. जो तो सैर भैर झाला. जिकड वाट मिळेल तिकडे तो पळत सुटला. या राड्यामध्ये वसंताचा अन् कृष्णाचा हात कधी सुटला कळलंच नाही.
कृष्णा गांगरून गेला. त्याला त्याचा बाप दिसत नव्हता. तो मोठ मोठ्याने रडू लागला. इकडे वसंता पण आपल्या लेकाला शोधू लागला. त्याला पण घाम सुटला. आपलं काळीज कोणी तरी कापत चाललं अस त्याला वाटू लागलं.
दोघांची फाटाफूट झाली. दोघे विरुद्ध दिशेला गेले. दोघेही एकमेकांना शोधत होते. वसंता प्रत्येकाला आपल्या मुला बद्दल विचारत होता. तो हि हताश झाला.
इतक्यात त्याला त्याची बायको यमुना दिसली. त्याने मोठ्याने हंबरडा फोडला.
“यमुनेѕѕ!... आपला कृष्णा हरवला. तों सापडणं झालय. सगळीकडे शोधलाय पण कुठ घावनं ?” रडत रडत वसंता म्हणाला.
वसंताचे बोल एकताच यमुना गळून पडली. तिला सर्वत्र शांतता भासली. तिची दातखिळी बसली. शून्यात नजर हरवली. तोंडातून फक्त कृष्णा.ѕѕ!.. कृष्णाѕѕ!...शब्द बाहेर पडू लागले.
कोणीतरी तिच्या तोंडावर पाणी शिंपडले. तिला शुद्ध आल्यावर तिला एका बाजूला बसविले. ती हमशा हमशा रडू लागली. सारखी कृष्णाची आठवण येऊ लागली.
“माझा लाडाचा लेक गं बाईѕѕ!... कधी एकट्याला बाहेर सोडला नव्हताѕѕ! ...... आता कोठे गेला ѕѕ!........ मला सोडूनѕѕ!....... मला त्याच्या कडे न्या रे ѕѕ!......... मला सोडा मला जाऊ द्या. ѕѕ!......... मला माझ्या लेकाला शोधू द्या ѕѕ!.........” रडत बोलत होती.. लोकांनी गर्दी बाजूला पसरविली.
वसंता व वाडीतले ओळखीचे लोकं कृष्णा चा शोध घेऊ लागले. कृष्णा काही सापडत नव्हता. सगळ्यांनी अख्खी यात्रा पालथी घातली पण कृष्णा काही सापडता सापडत नव्हता. या गर्दीत सापडण थोडं अवघड होत. तरी सगळ्यांचा शोध सुरु होता.
म्हणून एकाच्या डोक्यात एक कल्पना सुचली. तडक तो मंदिरात शिरला. तिथे एक माईक ठेवला होता. घेतला हातात माईक अलौन्सिंग करू लागला. फुल आवाजामुळे जो तो त्या आवाजाकडे लक्ष देवून ऐकू लागला.
यात्रेत पोरगं हरवल्याची खबर देण्यात आली. सापडणाऱ्यास योग्य बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले.
जो तो एखादा एकटा मुलगा दिसला कि त्याची चौकशी करत होता.
कुणी मोठ्या दगडा माघे, झाडा झुडपात शोध घेत होतं तर कोणी नदी नाल्यात शोध घेत होतं.
इतक्यात तुक्याला एका घोळक्यात एक लहान मुल रडताना दिसलं. त्याने जवळ जाऊन त्याची अस्तेवाईक चौकशी केली. त्यांनी जे माईक वर वर्णन ऐकिले होते तसेच हुबेहूब दिसणारा हा मुलगा आहे. त्याला कळून चुकलं कि हा वसंताचाच मुलगा कृष्णा आहे.
लागलीच त्याने कृष्णाला आपल्या खांद्यावर टाकले व मंदिरात घेऊन आला.
कृष्णा ला बघता क्षणी आई च्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती पटापट त्याचे मुके घेऊ लागली.
“मला सोडून कोठे गेला होतास. अरे तू नव्हतास तर जीव गेल्ता माझा. असं नक करीत जाऊ.” यमुना म्हणाली.
“आई त्या गर्दीत मी चेंगरलो होतो. आबाचा हात सुटला अन् मी हरवलो. या काकांनी मग मला शोधलं आणि तुझ्याकडे आणले बघ, आता मी माझ्या कडचे सगळी खेळणी त्यांना देणार ! माझी आईच माझं खेळणं आहे. मी तिलाच जपणार. मी तिच्याच कुशीत राहणार. मी तिच्याशिवाय राहूच शकणार नाही. आबा कुठंय ? मी त्यांना खूप रागावणार माझा हात त्यांनीच सोडला बघ. आता त्यांच्याशी कट्टी.” कृष्णा लाडावल्या स्वरात बोलत होता.
कृष्णाने तुक्याला खेळणी देऊ केली. हे पाहताचक्षणी तुक्याचे डोळे पाणावले. त्याने परत ती खेळणी कृष्णाला दिली. सोबत अजून एक खेळणी आणून त्याला दिली.
“ हि मामा कडून भेट !”, असं तुक्या म्हणाला.
त्याचे हे बोल ऐकून सर्वच गहिवरले. आई लेकाचे प्रेम पाहून सगळ्यांना आनंद झाला.
मुलगा सापडला अशी पुन्हा दवंडी माईक वरून देण्यात आली. ती ऐकताच वसंता आणि कृष्णाचा शोध घेणारे सर्व मंदिरात आले.
कृष्णाला पाहताच बापाचं काळीज फाटलं आपसूक त्याच्या डोळ्यातून आनंद आश्रु वाहू लागले. त्याने आपल्या लेकाला घट्ट मिठी मारली. त्याचे पापे घेतले.
ज्याने आपल्या मुलाला परत आणले त्या तुक्याचे वसंताने आभार मानले...............अन् र्हदय पूर्वक सत्कार केला.
“म्हसोबाच्या नावानं चांगभलं !” असं म्हणत सर्वांनी जयघोष केला.
अजून हि माणुसकी जिवंत आहे म्हणून जगायलाही आनंद आहे हे आजच्या दिवशी सर्वांना उमजले. नंतर यात्रा मोठ्या धुमधडाक्यात पार पडली.
यात्रा संपल्यावर सर्व मंडळी आपआपल्या घरट्याकडे वळली.............पुन्हा पुढील वर्षी येण्यासाठी. आनंदाची उधान करण्यासाठी.........!
