STORYMIRROR

Preeti Sawant

Comedy Drama Others

3  

Preeti Sawant

Comedy Drama Others

होम मिनिस्टर (भाग ३)

होम मिनिस्टर (भाग ३)

3 mins
193

रेवामूळे खरं तर निलिमाचा कामाचा भार हलका झाला होता. पण त्याकडे कानाडोळा करून ती पार्लरमध्ये तयार व्हायला निघून गेली. रेवाने आजच्या प्रोग्रामसाठी स्वतः सगळे चमचमीत पदार्थ बनविले होते. तिला नीलिमाचा स्वभाव माहीत होता. त्यामुळे तिने बाकी सगळं आवरायला तिच्या घरचा घरगडी सख्याला बोलाविले होते. सख्याने अगदी लखलखीत किचन साफ केले मग रेवा तिच्या तयारीला लागली.

जॉइंट थीममुळे तिने तिच्या पार्लरवालीला घरीच बोलाविले होते आणि बरोबर अजून २-३ जणींना मदतीला घेऊन ये असेही तिला सुचविले होते.

पार्लरवाल्या ताई आणि त्यांच्या टीमने सर्वांना उत्तम रीतीने तयार केले. रेवा तर दृष्ट काढण्याइतकी सुंदर दिसत होती. रेवाने अनिलचा तो नको म्हणत असतानाही पार्लरवाल्या ताईकडून लाईट मेकअप करून घेतला.

तेवढ्यात नीलिमा तयार होऊन घरी आली. नीलिमाला पाहताच अनिल तिला बघतच राहिला. नीलिमा आज खूप सुंदर दिसत होती. तिला पाहताच अनिल थोड्यावेळापूर्वी निलिमाचा आलेला राग विसरला. त्याने शिटी वाजवून निलिमाला इशारा केला. नीलिमा ही लाजली आणि आतल्या खोलीत गेली.

इकडे सोसायटीत ऋतुजाने संस्कारभारतीची मोठी रांगोळी काढली होती. त्यामध्ये सुस्वागतम् होम मिनिस्टर असेही लिहिले होते. सोसायटीच्या तरुण मंडळींनी मेन गेटला फुलांनी सजविले होते. तसेच स्वागतासाठी रेड कार्पेटही अंथरले होते. समीरा आणि तिच्या पंटर लोकांनी या दिवसाची जय्यत तयारी केली होती.

गेम खेळले जातील म्हणून सोसायटीचे अंगण झाडून त्यावर पाणी शिंपडले गेले होते. सोसायटीचे वातावरण अगदी स्वच्छ आणि निर्मळ दिसत होते. ३ वाजायला अर्धा तासच उरला होता. बाकी सोसायटीचे रहिवाशी तयार होऊन आदेश भावोजी येण्याची वाट पाहत होते.

विनू आणि राजूने फटक्यांची माळ आणि २-३ ढोल वाजविणाऱ्यांची सुद्धा व्यवस्था केली होती.

शमिने आधीच समिराला फोन करून आदेश भावोजी येताच कळवायला सांगितले होते.

मोरे, लिमये, काटकर, सबनीस अगदी सदरा पायजमा घालून घरात लग्न समारंभ असल्यासारखे नटले होते. आज लिमये दाम्पत्याला नीलिमाच्या घरी सख्खे शेजारी म्हणून सन्मान दिला जाणार होता. त्यामुळे लिमये जरा जास्त फॉर्म मध्ये होते.

लिमये: मिना जरा तिजोरीतली माझी चैन, अंगठी आणि ब्रेसलेट दे पाहू. आज टीव्हीवर दिसणार आहोत आपण दोघे  मग नको का तयार व्हायला.

मिना : हे घ्या. कशी दिसतेय मी?

लिमये: वाह! अगदी लक्ष्मी दिसतेय माझी राणी.

असं म्हणत तिला जवळ घेत ते म्हणाले,

लिमये : तो लक्ष्मीहार पण घालायचास ना. तुला फार शोभून दिसतो.

मिना : नको बाई, ह्या साडीवर तो जराही सूट करत नाही.

जास्त सोनं डोळ्यात खुपत लोकांच्या. म्हणून म्हटलं आज अंगावर फक्त कानात सोन्याचे जुमके आणि दोन हार, त्यावर पाटल्या आणि सोन्याच्या चार बांगड्या, सोन्याचे बाजूबंद आणि कमरपट्टा इतकेच दागिने घातलेत मी. सिम्पल आणि सोबर.

असे म्हणत मिना स्वतः ला आरशात न्याहरू लागली. तेवढ्यात तिला आठवलं. तिला शेजारी बनण्याचा मान मिळाला आहे हे शमिकाला सांगायला तर ती विसरली.

म्हणून ती लागलीच शमीकाच्या घरात गेली.

मिनाला असं सजलेल बघून शमिका आणि मनी दोघांनाही आधी हसू आवरले नाही. पण नंतर मिनाचे सगळे दागिने बघण्यात त्यांचा वेळ निघून गेला.

तेवढ्यात खाली फटाक्यांचा जोरदार आवाज आला आणि ढोल वाजू लागला. म्हणून सगळे रहिवाशी पटापट गेटकडे धावले. तर कळलं की काटकरांच्या चिंटूने दिवाळी समजून घरातून अगरबत्ती आणून कोणाचे लक्ष जायच्या आत माळ पेटविली होती आणि ढोलवाल्यांनी त्यांना आधी सुचना दिल्याप्रमाणे फटाके वाजल्यावर ढोल वाजवला होता.

विनूने चिंट्याला एक रपटा दिला. एक तर मुश्किलीने फटाके मिळाले होते ते ही गेले ह्याबद्दल सगळ्यांना थोडे वाईट वाटले.

त्याचबरोबर खाली आलेले रहिवाशी फजिती झाली म्हणून मागे फिरले. जोशी काकू गुडघे सांभाळत कशाबशा गेटपर्यंत आल्या होत्या त्यांचा ही हिरमोड झाला.

सगळे घरी परतले तेवढ्यात अनिल फोनवर बोलत धावतच खाली आला. त्याच्यापाठोपाठ आरतीची थाळी घेऊन नीलिमा आणि त्यांचा मुलगा चिन्मय उर्फ चिनू ही खाली आले. पुन्हा ढोल वाजायला लागले आणि होम मिनिस्टरच्या गजरात आदेश भावोजींचे स्वागत झाले.

क्रमश:

(आता अजून पुढची गमंत वाचा कथेच्या पुढील भागात. कथा आवडल्यास तिला शेअर करा. धन्यवाद.)



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Comedy