STORYMIRROR

Varsha Pannase

Inspirational

2  

Varsha Pannase

Inspirational

गोड दिवाळी 🌺

गोड दिवाळी 🌺

6 mins
197

दिवाळी आली दिवाळी आली

आनंद प्रकाश कुटी महाली

हसर चांदन खुले कळी

गरीब श्रीमंत प्रत्येक गाली......

     

आज इतक्या वर्षांनंतर मला समजले.दिवाळी फक्त श्रीमंताचीच असते हे सत्य नाकारता येत नाही ,नव्हे सत्यच आहे हे.कारण ,आपण इतरांचा विचार करण्या इतपत समजदार नाही .आपण वरवर विचार करणारी माणसं, आपण आपलं कुटूंब एवढंच आपलं विश्व त्याच्या पलीकडे विचार करण्याची क्षमता आपल्यात नाहीच मुळी. मी वेगळी नाही मीही त्यातलीच. त्यासाठी काही घडावं लागतं किंबहूना घडवून आणावं लागतं.

   दिवाळीत सोनपावलांनी लक्ष्मी आपल्या घरात सुख समृद्धी,यश, किर्ती घेवून येते.आपल्या आनंदाला उधाण येते. वाऱ्याच्या वेगाने आपण तयारी करत असतो फराळ , कपडे, दागदागिने,रोशनाई दिवे, खरेदी दिवाळीच्या दिवशी पर्यंत चालूच रहाते.पण आपल्या मनात गरीबांचा विचार येत नाही खरेदीचा जोश असतो म्हणा का इतर काही .

 मनात विचार येतो का? आला तरी का ? करावा इतरांचा विचार! त्यांनींही पैसा कमवावा आणि आनंदानी दिवाळी साजरी करावी.....,..

 अगदीं बरोबर ! मलाही असंच वाटतं

 पण माझं मत आता बदललंय,पैसा असुन चालत नाही तर समाधान असावं लागतं दुसऱ्याच्या सुख दु: खात सहभागी व्हावं .पैसा नसला तरीही आनंदानी समोरच्या माणसाची विचारपुस करावी माया,प्रेम आपुलकी याला पैसा लागत नाही माणूसकी लागते आणि तिचं महत्वाची.

   मला हिच माणूसकी एका रांगोळी विकणाऱ्या बाईत दिसली तिचे बोलणे वागणे एखाद्या श्रीमंत माणसालाही लाजवेल असं होतं.आम्ही नवराञात देवीला गेलो माझ्या सोबत माझी मुलगी होती अंबा देवीचे दर्शन घेऊन आम्हीं बाहेर निघालो प्रचंड गर्दी, गोंधळ याञाच ती.मी माझी मुलगी ,आम्ही प्रत्येक दुकानात डोकावत होतो. पुरुष मंडळीसोबत नव्हती, त्यामुळे आम्ही जवळपास एक तास खरेदी केली .फार दमले होते मी नुकतेच मोठ्या आजारा मधुन मी बाहेर पडले होते.मुलगी कानातले घेण्यासाठी एका दुकानात थांबली.मी कानातले गळ्यातले पहाण्यात गुंग होते.तितक्यात एक तरणीताठी बाई तेथे आली. दिसायला सुंदर,सावळी अगदी वेरुळ लेणी आणि स्वच्छ होती.पण चेहेरा जरा थकलेला होता.माझ्याकडे पहात होती अगदी एकटक मी तिच्याकडे पाहिले आणि ती क्षणात बोलली, बाई! किती साजरी दिसतं वं इंदिरा गांधी वानीच!

आम्ही अचंबित.आम्ही तिच्याकडे पाहत राहिलो. हसलो..

ती जरा बावरली,घाबरली,आणि म्हणाली बाई तुमाले राग आला का? माझी मुलगी म्हणाली ,नाही काकु ! 

उलट आईला खुप छान वाटलं.आनंद झाला इंदिरा गांधी. म्हंटल्याचा.मुलगी बोलल्यावर ती लगेचच म्हणाली बाई! तुले चांगला नवरा भेटीन,तुवं सार आयकिन ! एखाद्या मायेच्या व्यक्तीने बोलावं तसं ती बोलत होती,नवलच वाटलं तिचं आम्हाला.तिच्या जवळून आम्ही काही घेत नव्हतो का तिची आमची ओळख नव्हती.पण ती उस्फुर्त प्रसन्न ,निर्मळ अंतःकरणाने बोलत होती. येतो !असे म्हणत हसुन आम्ही दुकानाबाहेर पडलो, तरी तिची नजर आमच्यावरच. 

आता माञ उत्साह वाढला होता ,एका महान व्यक्तीची तूलना आपल्यासोबत केली गेली व्यक्ती कोणी सामान्य नव्हती .माननिय इंदिरा गांधी! परत खरेदी करण्यासाठी आम्ही उत्साहाने फिरत होतो .मुलगी म्हणाली आई किती सुंदर आहे ग ती बाई ! किती छान !गरीब आहे बिचारी! पण आई, मस्त वाटले ना तिला भेटून .चेहऱ्यावरचे सुख दु:खाचे भाव मुलीला लगेच कळतात .मी खळखळून हसताच तिने हेरले ,आज आई आनंदी आहे, खुश आहे.ती मनोमन सुखावली. परत खरेदी चालू झाली.

  काय आश्चर्य ! बाई तब्बल एका तासानी आम्हाला परत दिसली,रांगोळी विकत होती बिचारी,आम्ही मुद्दामच तिच्याजवळ गेलो.ती आमच्याकडे पाहून प्रसन्न मुद्रेने हसली.तिच्या बाजुला एक आठदहा वर्षांचा मुलगा कोमेजल्या सारखा बसला होता.मी विचारले कोण हा ? ती म्हणाली ! माला पोरगा हाय, बाई ! माझे मन आता मुलां कडे बघुन सुन्न झाले होते, मी लागलीच शंभराची नोट काढली आणि तिच्या हातात दिली ती म्हणाली, बाई रांगोई घेतली नाई, पैशे कसे घेऊ? माझी मुलगी म्हणाली.घ्या काकु ,तरी तिने पैसे घेतले नाही. विचार करा, किती स्वाभिमानी असावी.

 मी तिला म्हटले .तुम्हाला नाही ,मुलाला खाऊ म्हणून ठेवा. तेव्हा तिने हात समोर केला.मला तिच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसली. आशिर्वादाची ज्योतच ती ! 

घरी आलो,थकवा खुप आला होता.जरा सोफ्यावर लेटले डोळे मिटून पडले. डोळ्यासमोर ती बाई आणि तिचा मुलगा जातच नव्हता सारखा त्यांचाच विचार.

एवढी सुंदर देखणी सुस्वभावी बाई, का ?आली असेल ही परीस्थिती तिच्यावर,काय असेल तिच्या जिवनात.

कठीण परिस्थितीत आयुष्य कसे जगायचे हे तिच्या कडून शिकावे.रखरखत्या उन्हात मायेची सावली देणारा मनमोहून टाकणारा ,बहरलेला दुर्लक्षित केशरी "पळस, मला तिच्यात दिसला. स्वत:ची दुःख बाजुला ठेवून दुसऱ्याच्या सुख दुःखात सहभागी होणे किंवा प्रोत्साहन देणे ,नवलच वाटले.

काय करावं ह्या लोकांसाठी आपण काहिच मदत करु शकत नाही, हाच विचार सतत मनात घोळत होता.

    विचार आला आपण मॉल मधे खरेदी करतांना एका पैशाचा विचार करत नाही, आणि भावही. आणि या गरीब लोकांना आपण एक रुपया सुद्धा जास्त देत नाही.उलट, भाव कमी करण्यास भाग पाडतो .का विचार येत नाही आपल्याला ह्या मेहनती लोकांचाॽ का आपण त्यांचा मोबदला त्यांना देत नाहीॽ उलट ,भाव कमी करण्यास भाग पाडतो.त्यात धन्यता मानतो. एरवी,हाॅटेल्स, मॉल येथे चिक्कार पैसा खर्च करतो . उडवतोच म्हणाना.....

  व्यक्ती वाईट नसते .परिस्थीती वाईट असते .मला प्रकर्षाने जाणवले. आणि मी ठरविले कधीच छोट्या ,मेहनती लोकांना भाव कमी करा असे म्हणणार नाही.भाजीवाल्यानी विस रुपये पाव सांगीतले की आपण दहा रुपये पाव भाजी मागतो.पणत्या,लाह्या, बत्तासे,रांगोळी फुगे,विक्रेत्याला शंभर रुपये रोज मिळत असतील.आपली परिस्थिती चांगली आहे. आपण त्यांनी म्हटलेला भाव दिला तर ,आपण गरीब होत नाही ,पण त्यांच्या मनातली ज्योत जरुर तेवेल आणिआपल्याला समाधान मिळेल.त्या ज्योतीचा प्रकाश गरीब मेहनती व्यक्तीच्या डोळ्यातआपल्याला दिसेल. म्हणतात ना"ज्योत से ज्योत जगाते रहो प्रेमकी गंगा बहाते चलो........

आपल्याला वाटते त्यांनी पण पैसा कमवावा आणि जगावे आनंदी जीवन रहावे,पण तसं होतं नसतं. पैसा असा सहज कमवता येत नाही ,त्यासाठीआई वडिलांची पुण्याई असावी लागते वाडवडिलांनी कमावलेले असते थोडे कष्ट आपण घेतो मग हा डोलारा उभा रहातो.पण गरीबाच तसं नसतं. हाताच पोटावर असतं त्यांचं. पाच पन्नास रुपये कमवून माणूस कसा मोठा होईल .कसं आपल्या पोराला मोठं करेल? हा! शिक्षण घेतले तर नक्किच भविष्य उज्वल होईल.उत्तम आयुष्य जगायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही,हे माञ तितकेच खरे.पण शिक्षणासाठी योग्य परिस्थिती होती ,की नव्हती हा दुसरा मुद्दा. कुणाला वडिल नसतात ,कुणी अनाथ असतं किंवा उत्तम मार्गदर्शन नसतो, जबाबदारी असते. इतर कोणत्याही कारणाने त्याच शिक्षण रहातं.मग तो त्या जैसे थे परिस्थितीत जगत रहातो.

त्यांनाही भावना असतात, त्यांनाही इतरांसारखे जगायचे असते .पैसा नाही, पण त्यांनाही दिवाळी साजरी करावी असं वाटत असते. घरी दारी तोरण बांधावे, मुलांसाठी कपडे आणावे, फराळ करावा.आणि संध्याकाळी आपल्या झोपडीत दिवा लावावा,मनातली गोष्ट मनात विरत असेल असंच काहीसं मला वाटतं. फटाके फोडण्याचा आवाज गरीब मुलांनाही भुरळ घालतच असेल ना!

 श्रीमंत, मध्यमवर्गीय घरचा मुलगा रडला असता कपडे फटाके घेण्यासाठी त्याने हट्ट केला असता, पण म्हणतात ना परिस्थिती माणसाला सर्वकाही शिकवून जाते.माझे मन विचारांनी कासाविस झाले.चिमुकली मुल मुलीं हाती जेव्हा फुगा,पतंगा,खेळणी घेवून विकत असतात ना! त्यांना पाहून मन दुःखी होत.वेदना होतात, वय काय त्यांचं ? पण त्यांच्यातला स्वाभिमान आपल्याला दिसतो.

एखादा धड धाकट तरुण किंवा मुलं-मुली सुद्धा जेव्हा भीक मागतात ना तेव्हा त्यांनी ती परिस्थिती स्वतः बनवलेली असते ती माणसं मुलं नेहमी त्याच परिस्थितीत आयुष्य काढतील. 

स्वाभिमानी मुलं हा..हा म्हणता पुढे जातील नाही शिकले तरी स्वाभिमानाने जगतील आणि समाजात त्याचा मान राहिलं कोणतेही काम छोटे नसते बघणाऱ्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे हि काळाची गरज आहे.


"जाणा दु:ख दु:खी बोली

हृदयीं पेटवा मायेच्या मशाली,


 माणसाची माणूसकी महत्वाची हे मला प्रकर्षाने जाणवले. ही माणूसकी ,आपल्या जिवनात प्रकाश टाकल्याशिवाय रहाणार नाही दिवाळीचे दिवे पणती, तेल, वात, रोशनाई करुन पेटणार नाही. दिवा माणसाच्या मनात लावायला पाहिजे. तेव्हा आपल्या हृदयाचा कोना कोना रोशन झाल्या शिवाय राहणार नाही.


आली आली दिवाळी

दिवा लावू हृदयी राउळी

सांभाळा गरीब भोळी

येईल लक्ष्मी सोनं पाऊली

     

हा सकारात्मक विचार माझ्या मनात आजपर्यंत का आला नसावा,ह्याची खंत मला वारंवार सतावत होती.

 मी स्वतःलाच समजावलं," चलो देर आये दुरुस्त आये, माझा दृष्टिकोन का बदलला . मी एवढा विचार दुसऱ्यांबद्दल कधीच केला नाही.झालीही असेल जखम झाल्याही असतील वेदना, पण तात्पुरत्या!

मला तिने इंदिरा गांधी म्हटले,स्तुती केली माझी,म्हणून तर मी वाहवत गेले असेल , असेही मनात वाटले . विचार आला स्तुती सर्वांना आवडते देवही स्तुती प्रिय आहे.कोणाला आवडणार नाही आपली स्तुती केलेली. म्हणून तिचा विचार केला असेल का?असो केलाही असेल पण एकसकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची ताकद माझ्या मनात आली .मदतीचा हात पुढे करावा असे वाटले.चांगलेच झाले.कुठलीही चांगली गोष्ट होण्याकरता अनुभव यावा लागतो,नाहीतर एखादी गोष्ट घडावी लागते.

 विशेषतः, आपण आपल्या जवळच्यांच विचार जास्त करत असतो.दिवाळीत आप्तांना फराळ,पेढ्याचे डब्बे, चाकलेट, सुकामेवा आणि दिवाळी गीफ्ट घेतोच पण आता,गरीबांचा विचार करावा ,असे ठरवले. नाही पैशाची मदत होत निदान भाव तरी करायचा नाही. हे तर पक्के ठरवले.भाव करुन आपले बंगले बांधले जाणार नाहीत. खरेदीला गेले असता लहान मुले विक्री करत असतील तर निदान दहा रुपये खाऊ त्याला जरुर द्यावा,एवढं तर आपण करुच शकतो.किंवा आपल्या जवळची काहीतरी वस्तु त्याला द्यावी, चला खायलाच घाला. मग बघा दिवाळीचे दिवे नेहमीच आपल्या हृदयात आणि मनात लखलखतील,तेवत रहातील अगदी अखंड ! आयुष्याची नविन पहाट उगवेल. स्वतः लाच प्रसन्न वाटेल. आयुष्य सुखकर होईल.यावेळी या सुंदर अनुभवातून काहीतरी शिकल्याचा आनंद मिळाला .आणि तो आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत .या वर्षी दिवाळी प्रत्येकांचा विचार करुन आनंदाने साजरी करणार आहोत.

पहा, बघा करुन अशी आनंदाची ,समाधानची , दिपावली !


आली आली दिवाळी आली

दिप लावू कुटी महाली......


दिवाळी होईल यंदा साजरी.    

मनामनात घरी दारी    

अवघी धरणी किरणात न्हाली

पणती,नेञी ज्योत तेवली........

 

आली आली दिवाळी आली

दीप लावू कुटी महाली...........


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational