Sam Jadhav

Horror Fantasy

3  

Sam Jadhav

Horror Fantasy

एक रात्र अशी ही...

एक रात्र अशी ही...

4 mins
185


अमावस्येची रात्र असल्याने सर्वत्र काळोख पसरला होता.


आज वातावरण थोडं वेगळंच भासत होते. काळोख्या रात्रीला सोबत होती ती सोसाट्याच्या वाऱ्याची. आता

वातावरणात गारवा जाणवत होता. ढग ही भरून आले होते अस भासत होते.

कोणत्या तरी ठिकाणी एका जंगलामध्ये एक मुलगी प्राण मुठीत घेऊन पळत होती. पळता पळता कोसळत होती, पुन्हा उठून पुन्हा पळत होती.

तिच्या मागे एक तरुण मुलगा हळूहळू पाऊले टाकत येत होता.

"थांब मिशु, खरच मी खूप प्रेम करतो तुझ्यावर"

तो प्रेमाने बोलण्याचा आव आणत बोलत होता.

ती मात्र मागे न पाहता मिळेल त्या वाटेने पळत होती. पळून ती खूपच पुढे आली होती.

"हे बघ पळून काही ही उपयोग नाही, तू या जंगलातून बाहेर जावू शकत नाहीस" तो आता रागाने बोलला.

त्याचा आवाज आसमंतात पसरला. तरी ही ती पळत होती. तो तरुण एका विजेच्या लहरी प्रमाणे तिच्या समोर येऊन थांबला. तशी ती थबकली आणि घाबरून मागे पाऊल टाकू लागली.

"प्लिज वरूण मला मारू नको, प्लिज" ती रडत बोलत होती.

"वेडी आहेस का, मी का मारेन तुला. तू तर माझ्यावर प्रेम करते ना? म्हणून मी तुला माझ्यासोबत घेऊन जाण्यासाठी आलो आहे" तो खुनशी हसत बोलला.

"प्लिज मला सोड, माझ्या आई वडिलांना माझ्या शिवाय कोणी नाही. त्यांचा तर विचार कर, दोघेही खूप लाड करतात ना रे तुझे; मग का मारत आहेस तू मला" ती हात जोडून रडत गयावया करू लागली.

"हो, माहीत आहे मला. म्हणूनच तर मी तुझं रक्त पिऊन तुला कायमची माझी बनवणार आहे" अस म्हणताच त्याचे सुळे दात ओठातून बाहेर डोकावू लागले आणि डोळ्यातही एक चमक जाणवली.

हे पाहून तर मिशाला दरदरून घाम फुटला. तशी ती भुरळ येऊन पडली.

त्याने तिला अलगद हातांवर उचललं व जंगलातील एका पडक्या घरात आणलं.

रात्रीचे बारा वाजून गेले होते. मिशाला जाग आली आणि तिने आजूबाजूला नजर फिरवली, तर ती एका आलिशान वाड्यात असल्याचं तिला जाणवलं. तशी ती ताडकन बेडवर उठून बसली. तिला आठवलं की ती तर जंगलात होती मग...इथे कशी काय?

ती विचार करतच होती की वरूण रूममध्ये आला. वरुणने आपल्या शक्तीने त्या पडक्या घराचं रूपांतर आलिशान वाड्यात केलं होतं.

तिच्या जवळ येऊन तो बसला, तशी ती घाबरून त्याच्यापासून दूर सरकू लागली. तिचा हात पकडून त्याने तिला जवळ खेचलं व चेहऱ्यावर येणाऱ्या केसांना बाजूला करू लागला.

त्याचा स्पर्श होताच ती भीतीने थरथरू लागली.

"मिशू, प्लिज तू माझं ऐकून घे, तू मला हवी आहेस माझ्या जगात म्हणून मी तुला इथे घेऊन आलो आहे ना, आणि तूच म्हणाली होती ना,"मी कधी कधी तुझी साथ सोडणार नाही" मग आज अस का करतीयेस?" तो प्रेमाने बोलला.

"कारण मी ज्याच्यावर प्रेम केले होते तो एक सर्वसामान्य मनुष्य आहे असे मला वाटले होते, पण तू तर ..."अस म्हणून ती पुन्हा रडू लागली.

"हो! मी आहे एक व्हॅम्पायर, पिशाच्च, पण मला नको आहे का सर्वसामान्य लोकांसारखं आयुष्य. मला ही तुमच्या सर्वांसारखं आयुष्य जगायचं आहे. पण त्यासाठी मला सात तरुण मुलीचं रक्त हवं होतं. म्हणून मी वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन अस मुलींना प्रेमात पाडून एक दिवस त्यांचं रक्त पित होतो. त्यामुळे माझं आयुष्य ही वाढत होत आणि मी मनुष्य म्हणून जगात वावरू शकत होतो."

हे समजताच मिशा रडतच पण थोडं रागात बोलली,

"मग मी कितवी मुलगी आहे वरूण."

"सातवी."

"म्हणजे तू मला पिशाच्च योनीत ढकलून स्वतः मनुष्य योनीत जगणार होतास? मला लाज वाटते स्वतःची, की मी तुझ्यासारख्या पिशाच्चच्या प्रेमात पडले" ती रागात बोलत होती.

कारण तिला कळून चुकले होते की ती आता जिवंत राहू शकणार नाही, कारण वरूण तिच रक्त पिऊन तिला मारून टाकेल.

"अस नाहीये मिशू, अग तू सातवी मुलगी होतीस. म्हणजे मी तुला मारणार नव्हतो, कारण सहा मुलीचं रक्त आणि सातव्या मुलीशी लग्न करून पहिली रात्र घालवली की मी मनुष्य रुपात येणार होतो कायमचा, मग मी आणि तू नेहमी खुश राहिलो असतो. पण...पण त्या आधीच तुला माझे सत्य समजले मग तू का माझ्याशी लग्न करशील. उलट तू माझ्याबद्दल सगळीकडे सांगत बसली असती, म्हणून मी तुला इथं आणलं तुला समजावून सांगायचे होते मला सर्व"

"माझं सत्य तुझ्यासमोर आल्यानंतर तू माझ्याशी लग्न करायला तयार झाली नाहीस तर मग....." अस बोलुन तो थोडावेळ थांबला आणि पुन्हा बोलू लागला.

"मग विचार केला की मी मनुष्य रुपात येऊ शकत नसलो तरी तू माझ्या जगात येऊ शकतेस आणि आपण नेहमी एकत्र राहू.."

"ओ... शटअप वरूण तुझ्या तोंडून प्रेमाची भाषा चांगली नाही वाटत" ती तिरस्काराने बोलली.

"तू आता अति बोलत आहेस, तू आहेस म्हणून मी अजून पर्यंत शांत होतो, कारण तुझ्या संमतीने सर्व करायचे होते मला, बाकी दुसर कोणी असते तर आतापर्यंत मी मारून मोकळा झालो असतो" तो ही रागाने बोलला.

"हो, तर मग माझ्यावरच इतकी मेहरबानी कशाला?मारून टाक मला ही लगेच. पण एक लक्षात ठेव, मला तू मारला तरी मी तुझी कधीच होणार नाही ना या जगात ना त्या जगात."

हे ऐकून त्याचा राग अनावर झाला आणि दुसऱ्याच क्षणी त्याचे डोळे रक्तासारखे लाल झाले व पुन्हा त्याचे सुळे दात ओठातून बाहेर पडू पाहत होते, बाहेर येताच ते चमकू लागले.

हे पाहून मिशा घाबरली, पण त्याच्या डोळ्यात पाहताच ती हरवली. अगदी संमोहित झाली होती ती. त्या डोळ्यांमध्ये काही तर वेगळीच जादू होती.

हळूच त्याने तिची मान तिरपी करून त्यावर आपले दात रुतवले, मिशा हळूच वेदनेने ओरडली आणि दुसऱ्याच क्षणी ती शांत झाली.

आता त्याच्या एकाच डोळ्यातुन एक अश्रू अलगद गालावर आला. ती त्याच्या मिठीत निपचित पडली होती आणि तो तिला पाहत राहिला.



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror