sam jadhav

Inspirational Others

4.0  

sam jadhav

Inspirational Others

"अनपेक्षित" माझा जीवन प्रवास

"अनपेक्षित" माझा जीवन प्रवास

6 mins
192


मी एक प्राध्यापिका आहे. लहानपणी टीव्हीवर "संजीवनी" ही एक डॉक्टरी पेशावर आधारित मालिका लागायची आणि आम्ही बहिणी ती मालिका आवडीने पाहायचो.


दोन हजार चार साली लागणारी ही मालिका पाहता पाहता मनामध्ये डॉक्टर होण्याची इच्छा निर्माण करून गेली.


एक दिवस मी, माझी छोटी बहीण व तिची मैत्रीण असे घरी खेळत होतो. मी टीचर आणि त्या दोघी माझ्या विद्यार्थीनी बनल्या. मी त्यांना एक-दोन, बाराखडी अस काही काही शिकवत होते.


त्यांना मी पाढे म्हणायला लावले. माझ्या बहिणीने ते व्यवस्थित म्हणले पण तिची मैत्रीण तिला काही पाढे आले नाहीत. आम्ही ही काय फार मोठे नव्हतो. त्यामुळे शाळेत मॅडम जे करायच्या त्याचाच अनुकरण मी करत होते.


शाळेत जस मॅडम आम्हाला शिक्षा द्यायच्या, अगदी तस मी ही केलं. तिच्या हातावर छोट्या पट्टीने मारलं. ती आधीच गोरी आणि अंगाने बारीक त्यामुळे दोन पट्टी मारताच तिचा हात लालभडक झाला आणि ती रडू लागली.


रडत खाली गेली, तर आमचे बाबा समोर. झालंss म्हणलं आता काही आपलं खरं नाही. मी घाबरूनच तिथून पुन्हा वरती जाऊन बसले.


बाबांनी तिला रडण्याचे कारण विचारले, तर ती माझं नाव सांगून रिकामी.


"दिदी मारली"


ती गोरी असल्याने रडून तिचा चेहरा लालबुंद झालेला व हात अजून ही लालभडकच दिसत होता. बाबांनी मला आवाज दिला. तशी मी घाबरतच बाबांच्या समोर गेले.


ती तर निघून गेली तिच्या घरी पण मी अडकले ना. बाबा खूप ओरडले मला.


"तू फार हुशार आहेस का? त्या मुलीला इतकं मारलं अँड ऑल"


पुन्हा मला म्हणाले," जा तुझं दप्तर घेऊन ये"


तशी मी यंत्रवत आत गेले व माझ दप्तर घेऊन पुन्हा बाबांच्या समोर येऊन उभी राहिले. भीतीने छातीची धडधडत तर वाढलीच होती, आता हात पाय ही थरथरू लागले.


मी लहानपणी पासूनच बाबांना खूप घाबरत होते. कारण ते खूप कडक स्वभावाचे आणि मी फार मस्तीखोर. जे घरात करू नको म्हणतील तेच मला करायचं होतं नेहमी. 


माझ्या दप्तरातील गाणिताच पुस्तक घेऊन त्यांनी मला एक गणित सोडवण्यास दिले. पण मला काही केल्या ते जमत नव्हते. भले ही ते गणित आता सोपं वाटत असले तरी त्यावेळी ते खूप अवघडच वाटायचे.


बाबा तासभर मला समोर घेऊन बसले होते. त्यांच्या ही हातामध्ये मोठी लाकडी पट्टी होती. मला जर गणित सोडवता नाही आले तर ते मला त्या पट्टीने हातावर फटके देणार होते.


मला गणित सोडवता येत नसल्याचे पाहून बाबांनी स्वतःच पाटीच्या मागे ते गणित सोडवून पाहिलं. एक तास ओलांडून गेला तरी मला ते गणित काही केल्या सुटेना. 


घरी बाबांचे मित्र आले म्हणून बाबा उठून बाहेर गेले. तेवढ्यात मी लगेच बाबांनी सोडवलेलं गणित पाहिलं व लिहू लागले. पण तरी थोडं फार चुकलंच होत हे मला समजत होत.


काही तरी महत्वाचे काम असल्याने बाबा त्यांच्या मित्रा सोबत बाहेर निघून गेले आणि माझी सुटका झाली आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला. त्यावेळी जाणवलं की विद्यार्थी होणं जितकं कठीण असत तितकंच शिक्षक होणं ही.


म्हणजे बघा ना, जेव्हा शिक्षक वर्गात येऊन विद्यार्थ्यांना काही शिकवत असतात त्याआधी त्यांना ही त्या विषयाचा अभ्यास हा करावाच लावतो ना. 


बाबांनी जेव्हा मला गणित सोडवण्यासाठी दिले, तेव्हा आधी त्यांनी ते सोडवून पाहिले. तेव्हा पुन्हा एकदा नवीन इच्छा निर्माण झाली ती म्हणजे शिक्षक होण्याची.


पण मला मेडिकल विभागाचे अफाट आकर्षण. त्यामुळे मी डॉक्टर होण्याचे ठरवले. पण खरंच जेव्हा महाविद्यालयात प्रवेश घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र पैशांचा विचार करून माघार घेतली.


आम्ही तीन बहिणीच, बाबांना सगळ्यांनाच चांगलं शिक्षण द्यायची दृढ इच्छा. माझी बारावी झाली आणि छोट्या बहिणीची दहावी.


मोठी बहीण अभियांत्रिकी करत होती. छोट्या बहिणीला ही दहावी होताच अभियांत्रिकी करायची इच्छा होती. पण मी मात्र शांतच होते.


बाबा मला म्हणाले,"तुला काय करायचे आहे पुढे?"


"मला बी.एससी करायची"


तस दोघी बहिणी मला थोडं आश्चर्याने पाहू लागल्या. कारण माझं डॉक्टरी पेशावरच प्रेम त्यांना ही माहीत होतं. पण बाबांच्या समोर बोलायला कोणाचीच हिंमत नव्हती.


"बी.एससी करून काय करणार आहेस?"


"मी शिक्षिका होईल"


तसे बाबा माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागले. मी अस काही बोलेन यावर कदाचित कोणाचाच विश्वास नव्हता. पण मला समजत होत घरी कमावणारे फक्त माझे वडील त्यामध्ये तिघींचे शिक्षण. 


अभियांत्रिकीची शुल्क ऐकून माहीत होती. मेडिकलसाठी ही तितकाच किंबहुना थोडा जास्तच खर्च होता. त्यामुळे मी डॉक्टर होण्याचं स्वप्न स्वप्नच राहू दिलं.


बी.एससी झाली, एम.एससी ही झाली. नोकरीला लागले नोकरी करता करता बी.एड ही केलं.


मला नोकरी मिळाली हे समजताच माझे बाबा किती खुश झाले. आनंदाने सर्वांना सांगू लागले की माझी मुलगी महाविद्यालयात प्राध्यापिका झाली.


त्यांच्या डोळ्यामध्ये खूप आनंद दिसत होता. त्यांना माझं फारच कौतुक वाटू लागले. पण कस असतं ना की प्रत्येकाचे आई वडील आपल्या मुलाचे मुलीचे कौतुक हे करतातच. 


पण काहींना ते मान्य नसत. त्यांना आपलं कौतुक ऐकायच नसतंच. असेच माझ्या बाबतीत ही झालं. समाजामध्ये विविध विचारसरणीची माणस राहतात.


माझा स्वभाव असा की, मी नवीन व्यक्तीसोबत जास्त लवकर मिक्सअप होऊ शकत नाही, पण हो एकदा ओळख झाली की बोलायची थांबत नाही.


बहुतेक माझ्या सगळ्या मैत्रिणी मला नेहमी म्हणायच्या की,"ही आधी कशी होती आणि आता कशी आहे..."


म्हणजे महाविद्यालयात पहिला दिवस अन महिन्याभरानंतरचा दिवस...


"अबोल वाटणारी, नॉन स्टॉप बदबडते..."


पण काही जणांना अस वाटत की मला माझ्या शिक्षणाचा गर्व आहे. पण मला तर तस कधीच जाणवलं नाही किंवा माझ्या घरच्यांना ही, माझ्या जवळच्या लोकांना ही नाही.


पण काही जण असे ही असतात समाजामध्ये ज्यांना आपली प्रगती बघवत नसते. आता यावरून एक किस्सा आठवला.


मी एका वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापिका म्हणून काम करू लागले. माझं गाव तस छोटच म्हणजे एक खेडचं. त्यामुळे जेव्हा गावात समजलं की मी एका नामांकित महाविद्यालयात सहायक प्राध्यापिका म्हणून लागले, तर पंचाहत्तर टक्के लोकांनी माझ्या बाबांना येऊन म्हणाले,"पोरीन नावं केलं तुझं"अस खूप काही येऊन भेटून बोलून जात होते.


पण उरलेल्या पंचवीस टक्के लोकांना ही गोष्ट रुचली नाही. मग त्यांच्या प्रतिक्रिया काही अशा असायच्या.


"प्रशिक्षण घेत असेल..."


"खाजगी शाळा असेल..."


अस बरच काही...


एकटीने तर खूप भारी बोलल माझ्याबद्दल.


"काही नाही, कोण तर मॅडम गेली असेल प्रसूतीसाठी म्हणून सहा महिन्यासाठी घेतलं असेल...."


अन हे बोलणारी आमच्याच समाजातील मुलगी होती हे विशेष. हे समजल्यावर मला खूप राग आला. थेट जाऊन तिच्या तोंडाव बोलावं अस ही वाटलं.


पण माझी आई मला समजावून सांगत म्हणाली, "ती एकटी अस म्हणाली म्हणून बाकी लोक जे चांगलं बोलतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नको, असे समाजात खूप खेकडे भेटतील तुला. आता तर सुरुवात आहे. तिला सहा महिन्यानंतर समजेलच ना खर काय ते"


तरी ही माझं मन म्हणावं तस मान्य नव्हतच यासाठी, की मी तीच ऐकून घ्यावं. पण एक दिवस आला जेव्हा महाविद्यालयात ती स्वतः माझ्याकडे येऊन माझी मदत मागत होती.


झालं असं की, तीन वर्षांनंतर तीच मुलगी मला महाविद्यालयात भेटली. मी तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघाले. तिने ही जास्त काही ओळख दाखवली नाहीच.


पण.....जेव्हा महाविद्यालयच्या कार्यालयात तिचे काही काम होते, अन तिचे कागदपत्रे घेतले जात नव्हते. तेव्हा ती मला शोधत आली माझ्या विभागापर्यंत.


विषय असा होता की, ती ही त्याच महाविद्यालयात बाहेरून बी.ए. करत होती. अन शिष्यवृत्तीसाठी कागदपत्र जमा करायचे होते. अंतिम तारीख निघून गेली होती अस समजलं तिला.


मग काय तेव्हा तिला माझी आठवण झाली की, मी ही याच महाविद्यालयात काम करते. मग काय मॅडम आल्या शोधत मला.


विभागात येऊन मला सगळं सांगून मदत मागितली. मग काय." हमारे ही गाव की छोरी...मदत करना तो बनता ही हे"


म्हणजे आपण मदत करतोच ना अस विद्यार्थ्यांना ही, मग ते कोणत्याही विभागाचे असोत. कार्यालयात जाऊन चौकशी केली, तेव्हा समजलं की अजून दोन दिवस होते मुदतीचे.


पण या मॅडम महाविद्यालयातून फोन केला की फोन घेत नाहीत. महिनाभर आधी पासून बाहेरून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संदेश व फोन करून सांगितलं होत, कारण महाविद्यालयात आद्यायावत केलेल्या गोष्टी त्याना लवकर मिळत नसतात. बाकी विद्यार्थी येऊन कागदपत्रे जमा करून गेलेले, तरी या मॅडम काही प्रतिसाद देत नाहीत."


मग मी तिथे असणाऱ्या सरांशी थोडं बोलले आणि तिचा अर्ज व कागदपत्र जमा केला. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. जाताना "आभारी आहे" म्हणाली.


मग काय माझं समाधान झालं.


मला काही बोलायची गरजच भासली नाही की मी सहा महिन्यासाठी नाही तर कायमची रुजू झाले इथे.


प्रत्येकाची वेळ असते आणि ती तिच्या वेळेवरच येते. 


पहिला घटना मला माझे व्यवसायिक क्षेत्र निवडण्यासाठी मदत करून गेली अस म्हणता येईल. कारण दोन गोल सेट केलेले मी एक तर डॉक्टर किंवा शिक्षिका होणे.  


दुसरी घटना मला हे सांगून गेली की, समाजामध्ये विविध प्रकारचे लोक राहतात. काही ना आपलं चांगलं झालेलं पाहून आनंद होतो तर काहींना दुःख. काही लोक विनाकारण आपल्याला दुसऱ्या समोर कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात.


खरच माझी आई खूप अर्थपूर्ण व बोध घेण्यासारखे नेहमी बोलत असते. या प्रकरणात ही ती खूप अर्थपूर्ण बोलून गेली. समाजात खेकडेच आहे. ज्यांना दुसऱ्याची प्रगती झालेली पाहवत नाही मग ते त्याचा पाय पकडून मागे खेचण्याचा प्रयत्न करतात.


पण आपण अशामुळे खचायच नाही. अमीर खानच्या चित्रपटातील एक सवांद जो खूप छान आहे


"क़ामयाब होने के लिए नहीं, क़ाबिल होने के लिए पढ़ो…कामयाबी आपने आप झक मारते हुए आपके पिछे आएगी"



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational