Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Vrushali Thakur

Crime Others

3.3  

Vrushali Thakur

Crime Others

एक चुकलेली वाट - भाग १

एक चुकलेली वाट - भाग १

12 mins
2.3K


"अहो.... सोडा ना..." लाडीकसा नखरा करत तिने अनिकेतला ढकलल. पण तो तिच्या विरोधाला असा थोडीच जुमाननार होता. त्यानेही आपल्या पिळदार बाहुंच्या ताकदीने तिला झपकन जवळ खेचलं. नाजूक गोऱ्यापान अंगकाठीची ती लगेच त्याच्या मिठीत सामावून गेली. तिच्या नजरेतील लाज हळू हळू गालांवर उतरत होती. त्याच्या मोरपिशी स्पर्शाने तिच्या अंगावर हलकासा शहारा फुलून आला होता. उमलणाऱ्या शहाऱ्यानुसार ती अजुनच त्याला बिलगत होती. त्याच्या कणखर शरीराचा उबदार रेशमी स्पर्श तिलाही आतुर करत होता. एव्हाना तिचा लटका विरोध मावळून गेला होता. त्याच्या शरीराचा अंग प्रत्यंग श्वासात भरून घेण्यासाठी ती बेभान होत होती. इतक्यात..... ट्रिंग ट्रिंग.... बाजूच्या टेबलावर ठेवलेला फोन वाजला. प्रणयात रमलेल्या दोन जीवांची सगळी धुंदी उतरली. त्याच्या स्पर्शासाठी आसुसलेल्या तिला बाजूला करत तो फोन कडे वळला. रिसिव्हर कानाला लावेपर्यंत एक दोन शिव्या आपसूक त्याच्या तोंडून निघून गेल्या. 

"निदान आज तरी काही नसू दे....देवा " ती मनातच देवाला साकडं घालू लागली. ती.... अनुराधा... इनिस्पेक्टर अनिकेतची बायको... अनिकेतच्या नोकरीपायी वैतागून आपला एका मोठ्या नामांकित कंपनीतील जॉब सोडून हाऊस वाइफ झाली. सततची त्याची फिरती आणि कोणत्याही केसच्या संदर्भात कधीही कुठेही जायची तयारी. तिला मग नोकरी सांभाळून घर सांभाळणं.... त्याही पेक्षा त्याला सांभाळणं जमेना. मग इतक्या वर्षांचं बिजनेसच स्वप्न साकार कराव म्हणून स्वखुशीने जॉब सोडून दिला... पण ह्या आनिकेतच्या मागे पळता पळता ते ही आकार घेईना... बरं आज त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस.. मागचे दोन महिने कसतरी कन्विंस करून त्याला सुट्टी घ्यायला लावलेली. कामाच्या बाबतीत सदैव तत्पर अश्या अनिकेतने बायकोच्या हट्टापायी सुट्टी टाकली.... पण... आता वाजलेल्या फोनच्या घंटीने तिच्या हृदयात धकधक चालू झाली. थोड्याशा रागाने तिने अनिकेतकडे पाहिलं. त्याचा गंभीर चेहरा पाहून आपल वाढदिवसाचं सगळं प्लॅनिंग बारगळलय हे समजायला तिला ज्योतिषाची गरज नव्हती. आपल्या गोऱ्यापान अनावृत्त अंगाभोवती बेडशीट लपेटत ती पाय आपटत बाथरूममध्ये गेली. 

शिंदेंनी फोनवर दिलेल्या बातमीने अनिकेत मात्र बरेच हादरले होते. रोजच गुन्हे आणि गुन्हेगारांशी संबंध येत असला तरी काहीवेळा त्यांचं काळीजपण कापायच. फोन वरच्या माहितीनुसार प्रकरण बरच गंभीर असाव. आता वेळ घालवून उपयोग तर नव्हता पण बायकोच्या नाकावरचा राग..... " जाऊदे संध्याकाळी समजावता येईल. पण आता समजावणं म्हणजे महायुद्ध चालू होईल... त्यापेक्षा अशीच कल्टी घेतलेली बरी. " स्वतःच्या मनाला समजावत त्याने भराभर आवरून एकवार बंद बाथरूमकडे पाहत दार लोटलं.

"नशीबच खराब आहे माझं..." स्वतःशी पुटपुटत त्याने गाडी स्टार्ट केली. " दोन वर्षाच्या वैवाहिक जीवनात दोन दिवस सुखाचे गेले असतील तर शप्पथ.." आज तो बराच वैतागला होता. कारणही तसच होत म्हणा.. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पण अशीच काहीतरी केस चालू होती. आणि आज पण... ह्या केसेस पण ना.... माझ्या घरच्या फंक्शनचा मुहूर्त बघून येतात वाटतं. आपल्या विचारांवर त्याला हसू फुटलं. स्वतःवर हसत त्याने हळूच स्वतःला टपली मारली. 

"हाय.." बाजूच्या गुलाबी स्कूटीवर कुणाचं तरी काळीज धडधडल. सुस्कारा कानावर पडूनही त्याने कानाडोळा केला. पोलिसी व्यायामाने कमावलेल्या अनिकेतच्या परफेक्ट बॉडीला बघून कोणीपण घायाळ होई. त्यात त्याची ती रापचिक किलर स्माईल... आय हाय.. दोन्ही गालावर हळुवार स्पर्श करावा अश्या पडणाऱ्या खळीने तर कित्येकांच्या हृदयात खड्डा केला होता. अनिकेतला तशा नजरांना प्रतिसाद देण्यात कधीच इंटरेस्ट नव्हता. आणि आता तर काहीतरी विचित्र केस होती. बिचारा तिथे स्वतःच्या बायकोला तडफडत ठेवून आला होता तर इथे ह्या स्कूटीवालीच काय...

वेडेवाकडे रस्ते पार करत त्याची बाईक एकदाची त्या गावाबाहेरच्या पहाडी खाली थांबली. साधारण उंचीची पण चढायला बरीच अवघड असणारी ती ठेंगणी पहाडी सकाळच्या धुक्यातून हळूच खुणावत होती. समोरची छोटीशी मळलेली पायवाट वाकडी होत मागच्या जंगलात गुडूप होत होती.त्या एवढुश्या पायवाटेने गाडी घेऊन जाणं अशक्यच. अनिकेत तिथेच गाडी पार्क करून गाडीवरून उतरला. छोटेसे दगड आणि लाल माती एकत्र होऊन, चालून चालून मळलेली ती पायवाट. त्याच्या दोन्ही बाजूला तरारून उगवलेल गवत, त्यावर इवलुशी फुललेली फुल जणू त्या पायवाटेवरून चालणाऱ्याच स्वागत करत असावी. कोकणाला निसर्गाने किती भरभरून सौंदर्य दिलंय ना.. क्षणभर अनिकेतच्या मनात आल. अनिकेत तसा विदर्भातील... पण त्याचे एक दूरचे नातेवाईक कुठेतरी कोकणात स्थायिक झालेले. लहानपणी त्यांच्याकडे कोणत्यातरी समारंभाला त्याने पहिल्यांदा कोकण पाहिलं. आणि तेव्हाच तो कोकणच्या प्रेमात पडला. पोलिस खात्यात रुजु झाल्यावर जेव्हा त्याला कोकणात पोस्टिंग दिली तेव्हा तर त्याची खुशी विचारूच नका. इतक्या वर्षांचं स्वप्न साकार झाल जणू...

" साहेब..." शिंदेंच्या जोरदार हाकेने अनिकेत भानावर आला. दूरवरून पळत येणाऱ्या शिंदेंना बघून त्याने जोराने हात हलवला. 

" काय झालंय..?" शिंदेंना श्वास घ्यायला देखील उसंत न देता अनिकेतने प्रतिप्रश्न केला. 

"वरती जाऊन प्रत्यक्षच बघा.." शिंदेंसह अनिकेत झपाझप पहाडी च्या दिशेने चालू लागले. ऐन डिसेंबर असल्याने पहाडीच जंगल दुक्याची दुलई पसरून अजूनही काहीस झोपेतच होत. पानापानांवर साचलेले दवबिंदू चालण्याच्या धक्क्याने हळूच घरंगळून त्यांना भिजवत होते. छोटीशी झुडूप एखाद्या खट्याळ बाळासारखी त्यांच्या पायाला गुदगुल्या करण्यासाठी पुढे पुढे सरसावत होती. पण त्यांना आता त्या झुडूपांना गोंजरायला वेळ नव्हता. भराभर चालत ते दोघेही पहाडी च्या टोकावर पोचले. तिथे अजुन एक शिंदेंचे सहकारी परब आणि कोणीतरी सकाळी गुर घेऊन चरायला निघालेला एक गावकरी होता. 

" हा कोण आहे....?" अनिकेतने गावकऱ्याकडे पाहत विचारलं. 

" ह्यानेच कळवलं साहेब...." शिंदेंनी उत्तर दिलं.

" अरे वाह.... लोक सुधारायला लागले वाटतं" स्वतःशीच गालातल्या गालात हसत अनिकेतने कमेंट पास केली. 

भोवताली अगदी तीव्र कुजलेला असा कुबट वास पसरला होता. नाकाला रुमाल बांधण्याशिवाय एक पाऊल पण पुढे टाकलं जाणं शक्य नव्हतं. पण अनुराधेच्या रागाच्या नादात त्यांचा रुमाल घरीच राहिला होता. आजूबाजूच्या कुबट वासाने तस त्याच्या ध्यानात आलेलं की काय मामला असेल पण.... प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विधान मांडणं त्याच्या पोलिसी तत्वात बसत नव्हत. कसबस दोन्ही हातानी नाक दाबत अनिकेत परब उभे असलेल्या जागी पोचला. 

" नमस्कार साहेब.. हे बघा" परबांनी नमस्कार करतच एका झाडामागे पडलेल्या गोणीकडे निर्देश केला.

" नमस्कार.." झाडाच्या दिशेने चालतच मागे न बघताच त्यानेही प्रत्युत्तरादाखल नमस्कार केला. दोन्ही हातानी नाक शक्य तितकं बंद करत ते गोणीपर्यंत पोचले. आश्चर्य वाटाव अस काहीच नव्हतं पण पोलीस असले तरी ते ही माणूसच होते. समोरच दृष्य बघून त्यांचं काळीज थरथरलच. अर्धवट उघड्या सिमेंटच्या गोणीच्या तोंडातून काळपट मांसाचे तुकडे उठून दिसत होते. बरेच दिवस झाल्याने गोणीच्या छिद्रातून वाहिलेले रक्ताचे ओहोळ सुकून काळपट पडले. त्यावर हजारो माश्या मेजवानी मिळाल्यासारख्या भिरभिरत होत्या. 

" शिंदे, तालुक्याला वर्दी द्या...." 

" परब जरा आजूबाजूला तपासा अजुन काही मिळते काय..? " दोघानाही सूचना देत त्याने आपला मोर्चा मगापासून बघ्याची भूमिका घेतलेल्या गावकऱ्याकडे वळवला. 

" तुम्ही रोजच इथे गुर चरायला येता का...?"

" नाय सायेब. मी तर खालच्या गावात रवतय. रोजच येतंय गुरा घेवन. पन इतक्या वर येवक कोणाक झेपात... मी तर बाबा खालच्या खाली फिरवतय. पाय दुखतत ओ. आता जरा वय झाला ना....."

" बरं बर..." गोष्ट सांगण्याच्या आवेशात आलेल्या ह्या गावकऱ्याला कसं थांबवावं हे अनिकेतला समजेना. " आपल नाव काय?"

" पेपरावरचा नाव गणोजी साळकर पण सगळे गण्याच म्हणतत.... " हा काही थांबायचं नाव घेईना.

" बरं गणोबा... चालेल ना गणोबा बोललेल...?" अनिकेतच्या  प्रश्नावर त्याने मान डोलावली. गालात हसून अनिकेतने त्याला पुढे बोलायची खुणा केली. 

" तर मी काय म्हणत होतंय... आज ह्यो पाडो नुस्तो उधळत होतो. उड्यो मारीत मारीत वरपर्यात गेलो. माका काय झेपना... पन तरीपन इलय कसोतरी " गणोबा काही थोडक्यात सांगायला तयार होईना. त्याच्या ' लंब्या ' कथेला अनिकेतही वैतागला होता. पण प्राथमिक चौकशी पण तेवढीच महत्त्वाची होती. मनातून कितीही वाटतं असल तरी त्याला गणोबाची कथा ऐकणं भाग होत.

" गणोबा....मुख्य विषयावर या... " अनिकेत थोडा रागातच ओरडला.

" बरा... थोडक्यात सांगतय... पाड्या पाटोपाट इलयं तर खरो... पन हयचो वास घेवन मात्र... म्हटला काय झाला ता बगुया तर... माका वाटला येकादा जनावर आसात... पण ह्या काय भलताच... म्हटला नसती ब्याद पाटी लागाच्या आदी तुमका सांगुक होया..." एखाद्या कथेचं सार सांगावं त्या आविर्भावात शेवटी एकदा गणोबाने आपल बोलणं संपवलं. गणोबाच भाषण संपल्यावर अनिकेत मात्र जरा खूष झाला. इतका वेळ कुजलेल्या मांसाच्या वासाने दुखणार त्याच डोकं गणोबाच्या बोलण्याने भणभणायला लागलं होत. 

" ठीक आहे. आता जाऊ शकता पण अजुन काही माहिती लागली तर पुन्हा बोलावू... त्यावेळी यावं लागेल " त्याची बोळवण करायच्या उद्देशाने अनिकेतने तो विषय आटोपता घेतला.

पायातील वहाणेची करकर करत गणोबा ती पहाडी उतरू लागला. ' काय पण एक एक नमुने भेटतात...' गणोबावर हसतच अनिकेतने शिंदेंकडे मोर्चा वळवला. 

' हं शिंदे, काय अपडेट...?" 

" तालुक्याहून तासाभरात टीम पोचेल. "

" बरं,... तोवर आपण बाकीची पाहणी करूया." 

तालुक्याहून देसाई आणि मोरेबाई धावत पळत हजर झाल्या होत्या. बऱ्याच वर्षांपासून एकाच भागात कार्यरत असल्याने इनि. देसाई बरीच मदत करू शकत होते. तसेच ही पहाडी तालुक्याच्या सीमेवर असल्याने पुढील सगळे प्रसंग टाळण्यासाठी त्यांना आताच सूचना देणे आवश्यक होते. त्यात मोरेबाईंच्या हजारो ओळखी. न जाणो त्यांच्या ओळखीचा झालाच तर फायदाच होईल ह्या उद्देशाने त्यांनाही पाचारण केले होते. पाच जणांची जोडी मिळून अख्खी पहाडी धुंडाळू लागली. क्वचितच वावर असलेल्या त्या पहाडीवर हिरवेगार काटेरी रान चांगलेच माजले होते. त्यातून वाट काढत इंच न इंच तपासताना पाचही जण चांगलेच ओरबाडले गेले. 

" साहेब... हे बघ काय सापडलंय " मोरे बाईंच्या जोरदार हाकेने सगळेच त्यांच्या आवाजाच्या दिशेने पळाले. मागचे दोन तास अर्धी पहाडी पालथी घालूनही काहीच सापडलं नव्हतं.

मगासारखा सेम सिमेंट च्या गोणीमध्ये भरलेले मांसाचे तुकडे फक्त फरक इतकाच होता की ही गोणी अर्धवट जळालेली होती. जळलेल मांस कुजून त्याचा खूप घाणेरडा वास पसरत होता. बाजूलाच एक बिअर ची बॉटल पडलेली होती. कदाचित ती बिअर टाकून गोणी जाळण्याचा प्रयत्न झाला असावा. अर्थात हा फक्त प्राथमिक अंदाज होता. अनिकेतने मोरेबाईंना सांगून जमा केलेले काही मांसाचे नमुने मेडिकल चेकिंगसाठी तातडीने पाठवले. 

सगळ्यात जास्त तर देसाई टेंशनमधे होते. कुजका वास असह्य होत असतानाही पहाडी पिंजूनही काहीच हाती न आल्याने तपास कसा करायचा ह्याची काहीच कल्पना येत नव्हती. केवळ मांसाच्या तुकड्यांवरून शोधायचं म्हणजे सूतावरून स्वर्ग गाठायचा की.

" तुला काय वाटतं अनिकेत..?" 

" गुन्हेगार खूप पोचलेला आहे.." आजूबाजूच्या परिसराला न्याहाळत अनिकेतनें उत्तर दिलं.

" ते तर कळतच आहे म्हणा... पण तपास कसा करायचा..?" देसाई अजूनही संभ्रमात.

" सध्या तरी काहीच समजत नाहीये.... पण मला अस वाटतंय की आपण काहीतरी चुकतोय म्हणजे काहीतरी सुटतय....." 

" नक्की काय सुचवायचं तुला..." 

" मला वाटतं की पुन्हा सगळा परिसर एकदा पायाखाली घातला पाहिजे. त्याशिवाय खून कुठे झालाय ते कळणार नाही. " अनिकेतने आपल मत मांडलं.

" तुला काय म्हणायचंय मर्डर इथे झालाय...." देसाईंचा स्वभाव तसा चिडचिडाच. त्यात त्या कुजक्या वासाने, शोधाशोधीच्या त्रासाने आणि काहीच न सापडल्याच्या रागाने ते वैतागले होते. 

" असूही शकेल. माझ्या अंदाजाप्रमाणे, एखाद्याचा खून करून त्याची डेड बॉडी इथे आणण जरा जास्तच रिस्की आहे. खालच्या मेन रस्त्यापासून इथे यायची वाट ही जेमतेम दोन पावलं मावेल तेवढीच. त्यात खालून एखादी डेड बॉडी आणायची म्हणजे कोणीही बघण्याची भीती कारण मेन रस्त्यावर नाही म्हणाल तरी थोडीफार ये जा असतेच. " 

अनिकेतच्या बोलण्यात तथ्य होत. त्याला सपोर्ट म्हणून देसाई पण त्यांच्या शोधमोहीमेत जॉईन झाले. देसाई म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्व. वयाने थोडे मोठे असल्याने अनुभव दांडगा होता. शोध लागेपर्यंत शोधन हा त्यांचा मंत्र. त्यामुळे ज्या ज्या शक्यता वाटतात त्या पडताळून पाहिल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. अनिकेतच्या प्लॅनप्रमाणे मगाशी वर वर पाहिलेल्या साऱ्या जागा पुन्हा डोळसपणे पाहायच्या होत्या. परबांना काही सूचना देऊन अनिकेतने त्यांना पोलिस स्टेशनला पाठवलं. मोरे बाई स्वतः जातीने गोळा केलेले सगळे सँपल घेऊन तालुक्याला निघाल्या होत्या. अनिकेत, देसाई आणि शिंदे तिघे मिळून पुन्हा त्या पहाडीचे माळरान पिंजू लागले. सकाळच कोवळ ऊन जाऊन दुपारची रखरख चालू झाली होती. सकाळी दवबिंदूनी भिजवणाऱ्या रानात आता दुपारच्या उन्हात सगळे घामाने भिजून निघाले होते. 

" साहेब, मी काय म्हणतो.." कधीपासून शिंदेंच्या मनात काहीतरी चालू होत. पण देसाईंच्या चिडचिडीला घाबरून त्यांना बोलण्याची हिम्मत होत नव्हती. देसाई जरा बाजूला जाताच त्यांनी अनिकेतशी बोलायला सुरुवात केली.

" बोला ना शिंदे " येवढ्या वेळाने शिंदे बोलल्यावर अनिकेतला जरा बरं वाटलं.

" आपण कधीपासून ह्या वरच्याच भागात शोधतोय... थोड खाली जाऊन त्या कोपऱ्यातल्या भागात बघुया का...? कदाचित तिथे काहीतरी सापडेल. म्हणजे...." पहाडीच्या खालच्या बाजूने एक थोडीशी ऐसपैस सपाट जागा होती. त्या जागेकडे बोट दाखवत शिंदे थोडे चाचरत बोलले.

" वा शिंदे.... आपण येड्यासारखे शोधायचं शोधायचं म्हणून कधीपासून ह्या रानातच फिरतोय... बाजूच्या भागात लक्षच नाही गेलं.... मुद्दाम लपवून ठेवल्यासारखी जागा आहे... चला... बघुया जरा..." 

" जरा जपून साहेब... वाट नीट नाहीये.." शिंदे जरा काळजीने म्हणाले. शिंदे आणि अनिकेतची गट्टी अगदी पहिल्या दिवसापासून. वयाने थोडे मोठे असल्याने शिंदे कधी कधी वडीलकीचाही अधिकार गाजवीत. त्यात अनुराधाने त्यांना काका म्हणून नात जोडल्यापासून तर काही विचारूच नका. काका सोबत आहेत तर अनुराधाचाही जीव खालीवर नाही व्हायचा.

शिंदेंसहीत अनिकेत भरभर उतरत आणि मोठाल्या दगडांवर कसरत करत त्या सपाट भागाच्या दिशेने चालू लागले. टेकडीच्या टोकावरून तिथंपर्यंत पायवाट तर सोडा साधी वाटही नव्हती. मोठंमोठ्या दगडांवर कसबस पाय ठेवत, स्वतःचा तोल सावरत, काट्यांपासून वाचत चालणं म्हणजे दिव्यच होते. दुरूनच ती जागा बघून अनिकेत मात्र गालात हसला. एव्हाना देसाईही त्यांच्या मागोमाग कसरत करत येऊन पोचले होते. वेड्या वाकड्या पहाडीवर ही जागा जरा बऱ्यापैकी सपाट आणि ऐसपैस होती. थोड्या अंतरावरच पहाडीच्या टोकावर असलेल्या झाडं झुडूपांची गर्दी होती. दुपारच्या उन्हात ती काटेरी झाडं मान उंचावून डुलत होती. हिरवट काळपट काटेरी झाडांवर उमलेली छोटीशी रंगीत फुल स्वतःच वेगळं अस्तित्व सिद्ध करत होती. अनिकेतने शिंदेंना काटेरी जाळीच्या दिशेने इशारा केला. शिंदे ही तो इशारा समजून त्या काटेरी जाळीच्या दिशेने निघाले.

" देसाई... म्हटलं नव्हतं आपण काहीतरी चुकतोय... कदाचित हीच ती जागा...." अनिकेत ने देसाईना जमिनीच्या दिशेने इशारा केला. तिथलं बरचसं गवत कसबस उचकटून साधारण तात्पुरती बसण्यायोग्य जमीन नीट केली होती. तिथेच काही अंतरावर काटेरी झुडूपांमागे बऱ्याचश्या दारूच्या बाटल्या पडल्या होत्या. कदाचित इथे पिण्याचा प्रोग्राम झाला असावा. दारूच्या बाटल्या पाहता नक्कीच एखादा ग्रुप येऊन गेला असावा.

" हम्म... बरोबर बोलतोय अनिकेत.... हा भाग तर आपल्या लक्षातच आला नव्हता. " देसाईंच्या अनुभवी नजरेने तो सर्व एरिया स्कॅन करायला सुरुवात केली. चांगला दोन दशकांचा तगडा अनुभव गाठीला बांधून असल्याने कोणताच गुन्हा त्यांच्या नजरेतून सुटत नसे. त्यात आता मेंदूला केसचा खुराक मिळाल्याने ते खूष झाले. चिडचिड जाऊन ते नव्या जोमाने जमिनीचं निरीक्षण करू लागले. " जरा नीट बघ जमीन.. काय वाटतंय तुला..?" 

देसाई रिचार्ज झाल्याचं अनिकेतच्या ध्यानात आलं. पण त्यांच्या प्रश्नावर मात्र त्याच डोकं चालेना. त्याला तर तस काही वेगळं जाणवत नव्हत. त्याने देसाईंकडे पाहत नकारार्थी मान डोलावली. 

" माती बघ जरा निरखून बघ... हा जो काळसर रंग आलाय ना तो सुकलेल्या रक्ताचा आहे." देसाईंच्या वाक्यावर अनिकेत चमकलाच. वरवर पाहता सर्व नॉर्मल दिसत होतं. कोणालाही कळलं नसत की काय झालंय. मातीतील छोटासा बदल तर अनिकेतच्या पण लक्षात आला नव्हता. " जे काही घडलय ते इथेच घडलय अनिकेत... घडलय तर घडलय वर सगळे पुरावे मिटवायचा पुरेपूर प्रयत्न केला गेलाय. " देसाईंची मुद्रा अतिशय प्रसन्न होती. छोटासा का होईना एक धागा तर सापडला. 

" अनिकेत साहेब...." शिंदेंनी आवाज दिला. हातातील माती सँपल बॅगेत टाकत दोघेही शिंदेंच्या दिशेने गेले. त्या सपाट जागेवरून थोडंसं आतल्या भागात चालत गेल्यावर अजुन एक जागा होती. भोवतालच्या काटेरी झुडूपांच्या मागे ती जागा लपली गेली होती. चहूबाजूने काटेरी झाडे आणि मध्येच मात्र सगळं नीट सपाट थोड आश्चर्यच होत. काट्यांच्या वर दिमाखात डोलणाऱ्या सफेद फुलांमध्ये दुरूनच काहीतरी लालसर उठून दिसत होत. " शिंदे, जरा ते बघा काय आहे.." 

शिंदे सावकाश एका एका झाडाला वाकड करत ते जे काही लालसर होत त्याच्यापर्यंत पोचले. ग्लोव्हजवाल्या हातांनी कसतरी खेचलं. हातभार लांब असा एक कापडाचा तुकडा होता. तो तुकडा तसाच घेऊन ते अनिकेत समोर आले. अनिकेत व देसाई दोघांनीही काळजीपूर्वक निरखून तो तुकडा बघितला. बराचसा पातळ आणि नक्षीकाम केलेला जाळीदार तुकडा ओढणीचाच असावा असा दोघांनीही तर्क लावला. 

" ओढणी..." अनिकेत आणि देसाई एकत्रच बोलले. 

" आणि हे बघा साहेब.." शिंदेंनी खिशातून एक सँपल बॅग काढली. प्लास्टिकच्या बॅगेत अजुन एक रक्ताळलेला कापडाचा फाटलेला तुकडा होता. साधारण पाहता तो लेडीज अंतर्वस्त्राचा फाटलेला भाग होता. 

" देसाई..." देसाई नुसत्या इशाऱ्यानेच समजून गेले. 

क्रमशः


Rate this content
Log in

More marathi story from Vrushali Thakur

Similar marathi story from Crime