STORYMIRROR

Laxman shinde

Horror

3  

Laxman shinde

Horror

एक अविस्मरणीय प्रवास

एक अविस्मरणीय प्रवास

5 mins
135

डोंगरदऱ्यांनी वेढलेल, डोंगराच्या कपारीत वसलेलं, शिवथर घळी हे गाव. याच निसर्गरम्य कडाकपारी मध्ये रामदास स्वामी यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला. शिवथर घळ हे रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले एक लहानसं खेडं. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात, पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्याच्या हद्दीवर अगदी निसर्गरम्य, डोंगर रांगांनी वेढलेले हे छोटसं गाव. पावसाळ्यात निसर्गाचा आनंद लुटणे व या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक देश-विदेशातून येत असतात.

मला ही गड किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे पहाणे व पर्यटनाचा छंद असल्याने मी ही मित्रांबरोबर, पै पाहुण्यानं बरोबर या ठिकाणी आनंद घेण्यासाठी गेलेलो आहे. या ठिकाणचे पावसाळ्यातील वातावरण म्हणजेच स्वर्गच जणू. पावसाच्या अचानक येणाऱ्या सरी हिरवा-गार उंचच उंच डोंगर रांगा, उंच डोंगर रांगा मधून कोसळणारे पाण्याचे धबधबे. असे मनमोहक वातावरण या ठिकाणी जाण्याचे कारण ठरत.

मी भोर तालुक्यात भोर या ठिकाणी वास्तव्यास असल्याने जवळचे, निसर्गरम्य, अल्हाददायक, मनमोहक आशा ठिकाणाला अनेक वेळा भेटी देण्याचा योग आला. भोर वरून वरंधा घाट मार्गे शिवथर घळी या ठिकाणी चारचाकी गाडीने जाता येतं. वरंधा घाट म्हणजे पावसाळ्यात स्वर्गाकडे जाण्याचा एक मार्गच. वरंधा घाटाच्या एका बाजूला घनदाट असे जंगल आणि दुसऱ्या बाजूला खोल अशा दरा-या पावसाळ्याच्या दिवसात वरंधा घाटात येणारे ढग म्हणजेच आपण स्वर्गात असल्याचा आनंद मिळतो. वरंधा घाटाच्या मध्यभागी भोर तालुक्यात वाघजाई हे देवीचे प्रसिद्ध आणि जाणाऱ्या येणाऱ्याचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी असणारी वानर सेना पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. या ठिकाणी असणाऱ्या खोल दरा-यांचा आनंद लुटताना जबाबदारीने आणि कोणतेही सहास न करता पाहण्याचा आनंद घ्यावा लागतो. 

अशा या निसर्गरम्य शिवथर घळी जाण्याचा अनेक वेळा योग आल्याने या शिवथर घळीच्या पाठीमागे असणाऱ्या उंच उंच डोंगर रांगा मनाला भुलवत होत्या आणि याच डोंगररांगांमधून पायी मार्ग शोधून काढून या पायी मार्गे शिवथर घळीत उतरण्याचा मनामध्ये निश्चय पक्का होत होता. मी वन विभागात सेवा करत असल्याने भोर तालुक्यातील आमच्या वन विभागातील सहकाऱ्यांशी बोलून असे उतरण्याचे मार्ग आहेत का? याचा शोध घेऊन आपण त्यामार्गे उतरू असे त्यांना सांगितले. भोर तालुक्यातील गावांमधून काही गावकरी शिवथर घळ या ठिकाणी अशा अवघड मार्गे जात होते आणि असा मार्ग आम्हाला मिळाला. आम्ही एकूण सहा जण मित्रांनी यामार्गे उतरण्याचा निश्चय केला. धाडसाचा पण एक वेगळाच आनंद देऊन जाणारा प्रवास असल्याने सर्वच मित्रांनी होकार दर्शवला. सकाळी सकाळीच भोर येथून चारचाकीने प्रवास करून रमत-गमत वरंधा घाटातून धारमंडप येथून अतिदुर्गम शिळीम या गावात चारचाकी गाडी लावून शिळीम या गावातील माहीतगार व्यक्तीला संगती घेऊन राजेवाडी या छोट्या गावातून शिवथर घळीकडे पायी चालण्यास सुरुवात केली. थोडे अंतर चालून गेल्यानंतर रस्ता दिसेनासा झाला, छाती इतक उंच गवत सळसळ करत त्यामधून वाहणारा वारा, डोक्यावर उन असूनही अल्हाददायक असणारी वाऱ्याची झुळूक उन्हाचा त्रास जाणवू देत नव्हती. गवतामधून रस्ता दिसतच नव्हता अशातच आम्ही मार्ग काढत काढत अशा ठिकाणी पोहोचलो की तिथून पुढे मार्गच नव्हता. पुढे डोकावून पाहिलं तर खोल अशी दरी दिसत होती. सोबत घेतलेल्या व्यक्तीलाही उंच गवतामुळे रस्ता न कळल्याने आम्ही रस्ता भरकटलो होतो. परंतु याच रस्त्याने अवघड असा रस्ता पार करून शिवथर घळ गाठण्याचा आमचा निश्चय कमी झाला नाही. आम्ही मार्ग काढत पुढे चालत होतो. उंच गवतामध्ये आजगर, साप असे प्राणी असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती किंवा पाय घसरून दरीमध्ये पडण्याचा धोकाही दिसत होता. अशा अनेक धोकादायक बाबी बाजूला सारून आम्ही आमचा मार्ग पुढे चालूच ठेवला होता. आमचा निश्चय पक्का असल्याने चालत असतानाच आम्हाला पुन्हा पायवाट दिसली. या पाऊलवाटा वरून चालत चालत पुढे जात असताना गवताचा भाग संपून जंगलाचा भाग आणि अति उताराचा भाग सुरु झाला. या पाऊलवाटेवर घनदाट कारवीचे जंगल, उंच उंच जंगली झाडे, यामधून छोटीसी जाणारी पाऊल वाट, अति उताराचे डोंगरकडे घसरणारे रस्ता असा अनुभव आम्ही घेत चालत चालत पुढे मार्गक्रमण करत होतो. राजेवाडी या गावातून याच पाऊलवाटेवरून स्थानिक व्यक्ती शिवथर घळी कडे येताना आम्हाला दिसली.

स्थानिक असल्यामुळे त्यांना या पाउलवाटेचा अंदाज असल्याने ते झपाट्याने चालत होते. आम्ही या मार्गे शिवथर घळी कडे जात असल्याचं त्यांना सांगितलं आणि त्यांनी आम्हाला म्हणाले आमच्या बरोबर चला आम्ही तुम्हाला शिवतर घळी पर्यंत पोचवतो. अति उताराचा रस्ता, छोटीशी पाऊलवाट, दोन्ही बाजूला दर्‍या अशा रस्त्याने आम्ही उतरत असताना अत्यंत धोकादायक पाऊल वाटेवरून चालण्याचा आनंद आम्ही घेत होतो. अत्यंत अवघड पाऊलवाट असण्याचा अंदाज आम्हाला येत होता. एक वेळेस माझ्या बुटा खालील दगडावरून घसरून मी पडलो किमान एक दोन मीटर घसरुन खाली गेलो. परंतु कारवीचे जंगल असल्याने त्याला धरून परत उठलो. आमचे मित्र ही असेच एक दोन ठिकाणी घसरून पडले. असा थरारक अनुभव घेत स्थानिक व्यक्तीबरोबर आम्ही खाली उतरण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या जवळ असलेलं पाणी, आणलेले खाद्य मधी मधी थांबून त्याचा आस्वाद घेत हसत-खेळत रमत-गमत आम्ही पाऊल वाट चालत होतो. मध्यंतरी गेल्यानंतर खाली पाहिल असता चालून आलेल अंतर आणि खाली उतरण्याच अंतर तेवढेच असल्याचं जाणवू लागलं. पुढे ही असाच अति उतार कड्याचा रस्ता दिसत होता. आमच्या सोबत असलेले काही मित्र घाबरून आता पुढे नको रे बाबा असं म्हणू लागले. कोणत्या ही कार्यात सोबत असणाऱ्या व्यक्तींचा नकार येत राहिल्यास हिम्मत हरली जाते आणि या ठिकाणी आमचं ही असंच झालं. त्यात जवळ आणलेल पाणी ही संपत आल होत. आमच्या बरोबर उतरत असलेल्या स्थानिक व्यक्ती आमचं मनोधर्य वाढवण्याचा प्रयत्न करत होते. थोडं अंतर राहिले खाली उतरल्यानंतर पाणी स्वच्छ आणि थंड आहे, तुम्ही आमच्या बरोबर चला तुम्हाला आम्ही शिवथर घळी पर्यंत पोचवतो. असे म्हणत होती. परंतु आमची टीम मनामध्ये हारली होती आणि आम्हाला परत फिरण्या शिवाय मार्ग नव्हता. अर्ध्या वाटेतून परत फिरणं मनाला पटत नव्हतं. परंतु मित्रांमुळे परत माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही आल्या त्या वाटेने परत माघारी निघालो. परत माघारी निघताना आमच्या जवळच असलेले पाणी संपलं होतं म्हणून दरीमध्ये पाणी मिळतं का याचा अंदाज घेत आम्ही वर चढत होतो. अशातच आम्हाला दरीमध्ये पाण्याचं ठिकाण दिसले. आमच्या जवळ असलेल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि पाण्याच्या बाटलीने पाणी न पिता जुन्या पद्धतीने पाण्याच्या झरा-यावर पालथ पडून पाणी पिण्याचा मनसोक्त आनंद घेतला. परत पुन्हा शिळीम मध्ये आलो आणि त्याठिकाणी नियोजनाप्रमाणे जेवणाचा बेत केलेला होता त्या बेतावर ताव मारुन समाधानी होउन परत भोर कडे रवाना झालो. 

    असा शिवथर घळी जाण्याचा दुर्गम, अवघड, अति उताराचा, दरा-मधून, जंगलांमधून जाण्याचा आमचा अर्धवट राहिलेला प्रवास. परंतु अल्हाददायक, आनंददायक, आणि कायमस्वरूपी लक्षात राहणारा असा हा आमचा झालेला प्रवास खूपच सुंदर होता. असा अनोळखी मार्गाने केलेला प्रवास खरच सुंदर असा होता.



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror