दृष्टी [लघु कथा ]
दृष्टी [लघु कथा ]
अक्राळविक्राळ, काळाकुळकुळीत, एखाद्या फेंदारलेल्या झाडणीप्रमाणे मिश्या असलेल्या, तांबारलेले लाल डोळे, पायात नाल ठोकलेल्या जाड जाड वाहणा, खांद्यावर कुऱ्हाड घेतलेला परश्या बेरड सकाळी-सकाळीच दाणदाण पावलं टाकत चावडीवर आला. आणि कपबशा गोळा करून घेऊन हॉटेलकडे परतणाऱ्या मुलावर गरजला, ‘काय रे भडव्या, ’पोलीस पाटील कुटं हाय ?’
घाबरलेलं ते पोरगं आपली चड्डी सावरत कसंबसं उभं राहिलं आणि अजस्त्र आणि दैत्यासमान प्राण्याकडे बघत थरथरत म्हणाला, ’ही काय समोरच चावडी हाय’.
‘चावडीवर , च्या आणि पाव सांगितलंय, तो लवकर घेऊन ये’.
‘कुणी सांगितलाय म्हणून सांगू ?’
‘सांग तुझ्या बापाने सांगितलाय म्हणून. आता जातो की नाही.’ परश्या बेरड आपल्या अंगावर येतोय हे बघून ते पोरग जे धूम पळालं ते हॉटेलात पोचल्यावरच थांबल.
परश्या बेरडाने हातातील फरशी खाली ठेवली आणि घोंगड्याने बाक पुसून घेतला. मग त्या बाकावर ऐसपैस बसून तो पोलीस पाटलाला म्हणाला,’ इथं एकांदा खून-बिन झाला हाय कां?’
पोलीस पाटील शिंदे आणि त्यांचा विश्वासू उजवा हात शिरप्या निवांतपणे आपला वेळ घालवीत बसले होते. त्यांची नुकतीच न्याहरी झालेली होती. आभाळातनं पडल्यासारखा येउन परश्या बेरड एकदम खून-बिन बोलू लागताच पोलीस पाटील आणि शिरप्या दोघंही सटपटलेच. पोरसोरं आणि बायाबापड्या यांना दमदाटी करण्यात पाटलाचा हातखंडा होता. पण तो तसा हाडाचा गरीबच. अंगावरच आलं आणि नाईलाजाने हलायला लागलं तरच, नाहीतर आपण भलं आणी आपलं काम भलं असा त्याचा खाक्या होता.
‘तुम्हाला कसं कळलं खून झाल्याचं?’ उसने अवसान अंगात आणून शिरप्या म्हणाला.
परश्या बेरड हसला, आणि आपली बत्तीशी दाखवत म्हणाला, ‘तुम्हीच वळकां की कसं कळले असेल त्ये ? तुम्हाले बी ठावूक हाय कोंबडी शिवाय उरूस नाय , आणि भानगडी शिवाय पुरुष नाय. कसं?’
आता मात्र पोलीस पाटलाचा नाईलाज झाला आणि तो जड पावलाने उठला. नोंदवही काढून परश्या बेरडाला म्हणाला,’ हं सांगा बगू, खून कुनी केला. खून कुनाचा झाला आणि कशासाठी केला?’
परश्या बेरडाने आपला जबडा उघडून तोंडातील पानाची कोपऱ्यात जोरदार पिचकारी मारली, ’ वा ! हे तुमचं लई बेस हाये बघा, सगळं काही मी सांगायचं, मग तुमचं काय काम ? इथ बसून फक्त खुर्च्या तोडणार ! खून कुनी केला, कुनाचा झाला, आणि कशासाठी झाला ते तुमचं तुमी शोधून काढा. माझ्यापुरतं सांगयचं झाल तर मी कालच एका बाईचं मुंडक तोडून दिल बगा. तिच्याबरोबर एक बाप्या पण होता. त्यो भडवा पळून गेला, नाहीतर त्याचे बी तुकडे करून दरीत टाकले असते बघा. चाळीस–पंचेचाळीसची ती बाई असल बगा. अंगावर पांडरं लुगडं होतं. आता लाल झालं असलं म्हणा ! घ्या लिहून”. असं म्हणून परश्या बेरड खो खो हसला.
मायला हा परश्या बेरड येडाबिडा आहे काय, त्या पोलीस पाटलाला काहीच कळेना सरळ म्हणजे अगदी डायरेक्ट मुंडकं तोडलं म्हणून सांगतोय. तो बसल्या जागी उडालाच.
तेवढ्यात हॉटेलातून चहा आणि नाश्ता आला. परश्या बेरडाने हॉटेलातून आलेले वातड पाव कचाकचा चावले चांगला केटलीभर चहा ढोसला.
एव्हाना चावडीसमोर बऱ्यापैकी गर्दी जमायला सुरवात झाली होती. परश्या बेरड चावडीत आला आहे, आणि त्यानं एका बाईचं मुंडकं तोडून दरीत टाकून दिलंय ही बातमी वाऱ्याच्या वेगाने कर्णोपकर्णी झाली होती. त्या परश्या बेरडाला बघण्यासाठी हातातले कामधंदे सोडूंन गावातील लोकांचे लोंढे चावडीकडे लोटू लागले.
लोकांच्या त्या गर्दीतून वाट काढत गंगीची म्हातारी चावडीत घुसली, आणि पोलीस पाटलाच्या पुढे तिने मोठमोठ्याने गळे काढायला सुरवात केली.
‘पाटील सायेब, गंगीचा काही बी ठावठिकाणा नायि’. कुठं गुडूप झाली देवालाच ठाऊकं’. काल सकाळी मंदिराला म्हणून बाहेर पडली आणि पडली ती पडलीच की वो ! सारं गाव धुंडून झालं बगा. पण ती काही सापडेना’.
‘ कोण गंगी’?
‘आत्ता ?’ चेहऱ्यावर आश्चर्याचा दाखवत नवलानं म्हातारी म्हणाली,’अवो माही सून नाय काय माही? तुमी बी आलते ना तिच्या लग्नाले. अजून लग्नाले चार महिने बी उलटलं नसलं बगा’.
‘गंगी तीस-पस्तीसची असलं नव्ह ?’
तेवढी तर असलंच की, नाही कशाला ?’
‘पांडरं बिडंरं लुगडं होतं काय वो तिच्या अंगावर ?’
‘व्हय व्हाय पांडरंच लुगडं हुतं बगा. पन तुमाले कसं समजले?’
पोलीस पाटलाने एक रागाचा कटाक्ष परश्या बेरडाकडे टाकली.
‘काय भानगड वगेरे हुती काय वो ? नाय म्हणजे कुणी एखादा बाप्या बिप्या !”
‘असलं रे भाड्या,.’ संतापाने हात घासत म्हातारी म्हणाली, ‘त्याशिवाय का एवढी वर्षे नवऱ्याला सोडून राहिली असलं ?’
परश्या बेरड आपला मिशीतल्या मिशीत हसत होता. त्याला खाऊ की गिळू असं पोलीस पाटलाला झालं होतं. कुठून हा सुक्कळीचा सकाळी सकाळी उपटला?
पोलीस पाटलाने नंतर गंगीची करता येईल तेवढी माहिती गोळा केली. परश्या बेरडाला शिरप्याच्या ताब्यात सोपवला शिपाई बबनला आपल्या बुलेटवर मागे बसवून तपासासाठी तो निघून गेला. जाण्यापूर्वी पोलीस पाटलाच अन् शिरप्याच काही बोलणं झालं, आणि त्याने पन्नास रुपयाची एक नोट काढून शिरप्याच्या हवाली केली.
थोड्या वेळाने गर्दी ओसरली आणि परश्या बेरड आणि शिरप्या दोघंच चावडीत राहिले. जरा निवांत झाल्यावर परश्या बेरडाने पुन्हा एकदा आपला भला मोठा जबड उचकटून दीर्घ जांभई देत हात पाय झटकून आळस दिला आणि तो शिरप्याला म्हणाला. ’काड्याची पेटी हाय का म्हणायची ? शिरप्याने खिश्यात हात घालून काड्याची पेटी पुढे केली.
काडी पेटवित परश्या बेरड बोलला,’ मग बिडीबी असणारच जनू.’
कपाळावरील आठ्या दिसू न देता बिडी पण काढून दिली. ती बिडी पेटवून परश्या बेरड फसाफस धूर काढू लागला. चावडी बिडीच्या धुराने भरून टाकल्यावर तो शिरप्याला म्हणाला,’ आपन कोन म्हनायचं ? शिरपतराव हवालदार कां ?’
शिराप्याने आपली मान हलवली.
‘कुटलं राहणार?’
‘हाय इथलाच. रिकामखेड म्हणून जवळचं गावं हाय’.
‘ते खुनाचं रिकामखेड काय ? देशमुखाचा खून झाल्यालं ?’
‘तुमाला कसं माहित?’
‘घ्या , मंग कुनाला माहित असनार? इथली दऱ्याडोंगरं आपल्या पायाखालचीच की. त्ये खुनाचं काम आमच्या आबा बेरडाचाच बरं कां.’
‘अरे बापरे! ’ शिरप्या हबकून म्हणाला.
‘त्यात कसलं बापरे? खून –दरोडे आमची नेहमीचीच गस्त हाय की ! मे या धंद्याला लागून आता बगा दहा वर्स झालेत की हवालदार साहेब. पण माझेबी पंधरा-वीस देवाघरी पाठवून झाले बगा.’ परश्या बेरड मुंडकं तोडल्याचा अभिनय करीत म्हणाला.
‘आता हे बगा हवालदार साहेब मी एवढी माझी फरशी चालवितो. पन बगा माझ्या आज्याची सर माझ्या हाताला नाही’.
‘पंधरा-वीस खून ? अरे माझ्या देवा !’
‘पंधरा –विसाच काय घेऊन बसलात? माझ्या बानं तीस दरोडे आणि अठ्ठावीस मुंडकं उडवले असतील. तुमच्या डिपार्टमेंटनेच माझ्या बाला पकडण्यासाठी गावात लावलेल्या पोस्टरवर लिवलं होत. हे तर सरकारी दरबारी असलेले आकडे हायेत. खरं त्याला आणि देवालाच माहित’.
परश्या बेरडाचे बोलणे ऐकून हवालदार शिरप्याला दरदरून घाम सुटला होता.
त्याच्या कानाला खेटून परश्या बेरड कुजबुजला, ‘असं बगा हवालदार साहेब, मी काय करत नाही, पण तुमचा गळा कापायचा जर मी ठरवलं तर तुमचं तुमाला देखील गळा कापल्याचं कळणार न्हाई, एवढा आमचा हात हलका आहे.’
हवालदार शिरप्या एव्हाना राम-राम म्हणायला लागला होता. तेवढ्यात बाहेरून एक म्हातारं उसाची मोळी घेऊन चावडीकडे बघत पळून चालल होतं. त्याल हटकून परश्या बेरड म्हणाला,’ अहो ऊसवाले, काय द्याची कां मोळी?’
ते म्हातारं परश्या बेरडाकडे संशयाने पाहत म्हणाला, ‘सगळी घ्याची कां ?’
‘घ्याची म्हंजे ? अहो घ्याचीच की ! तुमी द्याची, आमी घ्याची.’
परश्या बेरड जवळ येऊ लागल्यावर म्हातारं थोडा सटपटलाच. हातात असलेल्या चार ऊसाच्या कांड्या तिथंच टाकून मागही वळून न बघता मोळी उचलून पळून गेलं.
परश्या बेरडाने ऊसाच्या म्हाताऱ्यानं टाकून दिलेल्या चार-पांच कांड्या उचलल्या. आपल्या तंगड्यात धरून कडाकड मोडली व त्यातली एक शिरप्याच्या समोर करून तो म्हणाला,
‘वाईच चावा की राव.’
‘न्हाई . तुमचं हुंद्या.’
रश्या बेरडाचं ऊस खाणे झाल्यावर तो म्हणाला ‘आपल्याला खायला जरा मजबूत लागतं बगा.
‘फुकट मिळालं तर शेण सुद्धा खाशील तू’. शिरप्या पुन्हा आपल्या मनातल्या मनात म्हणाला.
ऊस खावून झाल्यावर फेकलेल्या चोथ्याचा ढीग झाल्यावर, परश्या बेरडाने चावडीत ठेवलेली पिण्याच्या पाण्याची कळशी रिकामी केली. शिरप्या हवालदाराच्या जवळ असलेल्या डबीतून तंबाखू आणि चुना हातावर घेऊन मळला आणि आपल्या तोंडाची गुहा उघडत जिभेखाली ठेवला.
थोड्यावेळाने बसल्या जागेवरून कोपऱ्यात एक भली मोठी पिचकारी मारली, आणि बोलला, ‘अजून जेवायला लय टाईम असलं न्हाई ? मग मी तवर पडतो. जेवण आल्यावर उटवा बरं कां? झोप झाल्यावर मला भूक बरी लागती.’
परश्या बेरड झोपलेला बघून शिरप्याला जरा धीर आला. ढोरासारख्या निजलेल्या परश्या बेरडाकडे बघत तो म्हणाला,’ एवढे खून तुमी केले म्हंता, मंग एक दिवशी फाशी बी जाल’.
झोपता झोपता परश्या बेरड उठून बसला आणि म्हणाला,’ फाशीचा दर कुणाला ?’आमची तर फाशीची ही सातवी पिढी हाय. बेरड घरात झोपून मरत नसतो. माझा बा तर दोन किलो मटन खाऊन फाशीला हुबा राहिला होता. माजं म्हणाल तर मी पोलिसाला कशाला गावतोय? पोलीस कस्टडीतनं पळून गेल्याबद्धल किती हवालदारांची माज्यापायी नोकरी गेली त्याचा हिशोब मी माज्या तोंडातून कशापायी सांगू. तो तुमाले चांगलाच माहित आहे’.
थोडा वेळ थांबून परश्या बेरड शिरप्या हवालदाराला म्हणाला, ‘ तुमची बी बरीच नोकरी झाली असेल नाही ?’
‘भडवा साला, माज्या नोकरीवर उठलाय’. कधी याला पोलीस पाटलाच्या हवाली करतो असं त्याला झालं. हे म्हंजे कसं म्हणायचं,’ धरलं तर चावतं, आणि सोडलं तर पळतंय’.
इतकं बोलून परश्या बेरड परत झोपुंन गेला. आणि थोड्याच वेळात त्याने घोरायला सुरवात केला. इकडे दात-ओठ चावत शिरप्या बसून राहिला. तेवढ्यात उन्हातून भेलकांडत बबन आला. घामानं निथळत आणि लालबुंद तोंड घेऊन तो कसाबसा चावडीत येऊन टेकला आणि म्हणाला,’ मायला, वैताग आहे नुसता ! सकाळी कुनाच थोबाड बगितलं कुणास ठाऊक ? नुसतंच उन्हात तंगडे तोडतो आहे. बॉडीचा कायबी पत्त्या न्हाई.’
‘कसा पत्या लागलं म्हंतो मी? चवताळून शिरप्या हवालदार त्या ढाराढूर झोपलेल्या परश्या बेरडाकडे जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाला, ‘भडव्यानं तिला भूकेपोटी खावूनबी टाकली असंल ! गेल्या वर्षापासून जेवलं होतं का न्हाई? नुसता कसा हाणातुया बकासुरावाणी लेकाचा. तो जबडा काय, त्या दाढा काय, दिसंल त्याचं फकत भस्म करीत सुटलाय भाद्दर.’
‘पण आता याला नागझरीवर घेऊन यायला सांगितलय की पोलीस पाटलाने.’
‘हुं, त्यो बकासुर जेवल्याशिवाय इथून काय हलतोय? जेवन आल्यावर उटवा असं सांगून झोपलय. कदी नाई ते त्याचे चावडीत आल्यानंतर तोंड मिटल्यासारखं दिसतंय. आता उटला की काय खाऊ, कसं खाऊ करील बग. मले तर वाटलं जाळायला लाकडं तरी फोडून दिल. पन कसल काय आणि कसलं काय ? आपल्याच तोंडून जळण करतोय बगा ह्यो.’
शिरप्या हवालदाराच ऐकून घेतल्यावर चिडून बबन म्हणाला, ’नागझरीवर तशी काय कमी घोळ हाय काय ? काय लोकबी असत्यात. नुसती जत्राच फुललीय तिथं. हलवायांनी दुकानबी लावलीय. जो उठतोय तो तळ्यामंदी डुबकी मारतोय. कुनी बुडी मारली की पोरंसोरं वरडायला लागत्यात ,’आता सापडणार, सापडली, सापडली. अन् त्यो बुडी मारणारा मानुस पाण्याचं वरती आला की त्याची हुर्यो. पोलीस पाटील तर अगदी वाघासारका खवळलाय बगा.’
त्या दोघांच्या बोलण्यामुळे परश्या बेरड जागा झाला. आणि त्याला शिरप्या हवालदाराच्या मागे त्याची बायकू एक भली मोठी भाकऱ्यांची चळत आणि बादली भरून वरण घेऊन उभी हुती. तिच्याकडे लक्ष जाऊन परश्या बेरड म्हणाला, ‘अर्र तिच्या मारी, जेवन आलेलं दिसतंय् की, आणि मला कसं नाही उटवलं कुणी ऑं ?’
भाकऱ्यांचा चूरा करीत तो म्हणाला,’ मग गावली कां नाई त्या गंगीची बॉडी ?’
बबन म्हणाला,’ सगळं तळं धुंडाळून झालं बगा. पन कुठबी पत्या लागला नाई.’
इकडे परश्या बेरडाला भाकरी वाढायला गेलं की वरण संपत हुत, आणि वरण वाढायला गेलं की भाकरी. दोघांची म्हणजे भाकरी आणि वरण या दोघांची परश्या बेरड काही भेट होऊ देत नव्हता. बुक्कीने कांदा फोडत तो म्हनायचा.,’ बाकी इकडच्या कांद्याला कायीबी चव नाई बगा. आमच्याकडच कांद कसं तिखटजाळ असत्यात.’
भाकरी वाढायला गेलं की हा म्हनायचा, भाकरीच पीठ नव्यानं भिजवल्यावाणी दिसतुया?’
‘आता पुरे कर की रं बकासुरा. वैतागून शिरप्या हवालदार मनातल्या मनात चिडून म्हणाला, ‘च्या भणं, दरवेळेला भाकरी पानांत पडेतो हा आढंच न्याहळत बसतोय. देवा आता तूच सोडीव या बकासुराच्या तावडीतून.’ भाकऱ्या संपल्या तसा शिरप्या हवालदाराणे टमरेल उचललं आणि गावाबाहेर निघून गेला. त्याच्या पाठोपाठ बबन देखील निघून गेला.
‘कुटं बरं गेली बॉडी ? माशान खाल्ली की काय ? तळ्यात सुसरी वगेरे बसल्यात की काय वो ?’ असं म्हणत परश्या बेरडाने वरणाची बादली आपल्या तोंडाला लावली, आणि वरण खलास करून नाईलाजाने तोंड धुतलं.
परश्या बेरड तोंड धुऊन टेकतो तोच बाहेर मोठा गलका झाला. सगळ्यात पुढं दोन चार पोरं होती, आणि ती सुसाट धावत होती. धापा टाकत ती शिरप्या हवालदाराच्या जवळ येऊन उभी राहिली.
‘बोला की रे सुक्कळीच्यांनो, नुसतीची हुबी कायं राहिलंय शुंभासारखी ?’ संतापाने शिरप्या हवालदार म्हणाला.
एक पोरगं म्हणाल, ‘ ती गंगी.’
‘बोल बोल काय झालं ? उतावीळपणानं शिरप्या हवालदार म्हणाला, ‘गावली कां बॉडी त्या गंगीची ?’
‘बॉडी कसली गावतीया तिची ? तीच आलीय की जीत्ती जागती, आपल्या स्वतःच्या पायानं चालत.’
‘ऑं ? आर शुद्धीवर आहात काय रे सैतानांनो?’
‘तिकडनचं आलो नव्हं कां ? गंगीच हाय ती आणि त्यो बाप्या. तिच्या बानं आणून सासूकडं ठिवली न्हाई का? कुट पळून चालली हुती म्हणं.’
शिरप्या हवालदारान एवढं ऐकलं मात्र त्याच्या डोक्याचा पार भुगा झालता बगा. आयला सकाळपासून हा भडवा परश्या बेरड सकाळपासून डोस्क फिरवतुया, त्या बाईचं मुंडक तोडलं म्हणतंय, खांडोळी केली म्हणतंय. कुनाच नरडं कापलं यानं ? शिरप्या हवालदार संतापाने काळानिळा झाला. टेबलावरून त्यानं चक्क उडी मारून त्या परश्या बेरडाची गचांडी धरली.
परश्या बेरडाने ताकदीने शिरप्या हवालदाराचा हात बाजूला केला. अंगावरची धूळ झटकली आणि तो गुर्मीने बोलला,
‘मग काय करू चार दिवसापासून उपाशी होतो. मागुन कुनी बी भाकर तूकडा खाऊ घालेना. तसं बी आजकाल बेरडांना विचारतो कोण ? लपून-छपून पळणारी प्रेमवीरांची जोडी बघितली नी म्हटलं बगू काय डोकं वापरता येतयं का ! आणि बगा आजचा दिवस तर निभला.
अतिशय शांतपणे आपली फारशी त्याने उचलली आणि खांद्यावर टाकून तो चालायला लागला.
उन्हातानानं, उपासानं आणि बिनकामाच्या वैतागाने चवताळलेला पोलीस पाटील शिंदे आणि जमाव धुरळा उडवीत चावडीच्या रोखानं येत होते......!!!!!
