पहिला पाऊस
पहिला पाऊस
आज पाळणाघरी पोहोचायला तिला थोडा उशीरच झाला होता. पाळणाघराच्या मावशी तिच्या येण्याची वाटच बघत होत्या. आपल्या बाळाला मावशींच्या हवाली करताना तिने बाळाचे खूप मुके घेतले, कारण तिला गाडी पकडायची घाई होती. ती तशीच मागे वळली आणि चालू लागली. मागे वळून पाहायचा मोह तिला पुष्कळ वेळा झाला, पण तो तिने प्रयत्नपूर्वक टाळला. इतका वेळ दाबून ठेवलेला डोळ्यातील अश्रूंचा खारटपणा आत्ता तिच्या गळ्यात उतरला होता. आवंढा गिळणे कठीण झालं तेव्हा तिने आपल्या पर्समधली पाण्याची बाटली काढली आणि तोंडाला लावली. धापा टाकीतच ती स्टेशनवर पोहोचली तेव्हा कुठे ती एका जागी शांतपणे उभी राहिली. घामाने तिला अक्षरशः आंघोळ घातलेली होती. तिने आकाशाकडे बघितलं सकाळच्या नऊ वाजता दुपारच्या बारा वाजल्यासारखे आकाश दिसत होतं. कधी येणार हा नेहमीचा पहिला पाऊस? तिच्या मनात हा विचार यायला आणि ट्रेन यायला एकाच गाठ पडली.
लंच ब्रेक झाल्यावर ती आपल्या खुर्चीवर थोडी विसावली. टेबलवर नजर टाकली तर फक्त फायली आणि कागदांचा ढीग होता. त्यावर एक नाराजीचा कंटाळवाणा कटाक्ष टाकून तिने आपला मोबाईल पर्समधून बाहेर काढला. आलेले सगळे मॅसेज वाचून झाले तरी ती उगाचच मोबाईलशी खेळत राहिली. मग तिने दोन तीन फोन केले. एक नवऱ्याला, एक तिच्या आईला. पाय लांब करून मंगळसूत्राशी खेळत बराच वेळ ती बोलत राहिली. बोलून बोलून कंटाळा आला तेव्हा बोलणे संपवून तिने आपले लक्ष आपल्या ऑफिसच्या कामाकडे वळवले. बराच वेळ ती कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे बघत आणि मध्येच टेबलवरच्या कागदांकडे बघत बरंच काही काही टाईप करत होती. तेवढ्यात दुपारच चहा आला. तिने चहाचा पहिला घोट घेतला आणि तेवढ्यात फोन वाजला. फोनच्या स्क्रीनवर आलेला नंबर पूर्णपणे अनोळखी दिसत होता. तिने ‘हॅलो, कोण बोलतयं?’ असं म्हणताच पलीकडून तिला पुरुषाचा आवाज ऐकू आला.
‘हॅलो, हा शालिनी मॅडमचा नंबर आहे कां? आणि तुम्ही कोण आहात?’
शालिनी हे तिच्या माहेरचं नावं होतं? तिने आश्चर्याने तिने ’कोण?’ विचारलं.
‘माझं नावं अनिल. सगळे मला निल्या म्हणायचे आपल्या शाळेत.काही आठवलं का?’
‘नाही लक्षात आले अद्याप?’ टेबलपासून आपली खुर्ची थोडी दूर सरकवत ती म्हणाली.
‘अशोकचा भाऊ. त्याच्याकडूनच मला तुमचा नंबर मिळाला आहे.’
‘अच्छा अच्छा अशोक होय, आठवलं मला सगळं आता. कसा आहे तो? अमेरिकेत असतो ना तो? नुकतंच कोणीतरी म्हणालं होतं.’
‘हो बरोबर.’
‘बोला, माझ्याकडे काही काम होतं?’
‘अं...म्हटलं तर विशेष असं काही नाही, म्हटलं तर आहे.’
‘मला तुमचं म्हणणं कळलेलं नाही, नीट सविस्तर सांगाल कां?’
‘ठीक आहे, आज मी गाडीतून ऑफिसला जात होतो. रेडिओवर गाणं सुरु होतं. एका स्टेशनवर ‘परख” या सिनेमातलं ‘ओ सजना बरखा बहार आयी’ हे सुंदर गीत चालू होतं. ते ऐकता ऐकता मी शाळेच्या दिवसात कधी गेलो ते कळलचं नाही. हे गाणं तुम्ही एकदा शाळेच्या स्नेह-संमेलनाच्या वेळी गायलं होते.. त्यावेळी मी सातवीमध्ये असेन बहुतेक. पण अजूनही ते तुम्ही गायलेलं गाणे डोक्यातून गेलेलं नाही. फारच सुंदर गायले होतं. तुमच्यामुळे ते गाणं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं, आणि अजूनही त्या गाण्याने माझी पाठ सोडलेली नाही. घरी येऊन माझ्या बाबांना विचारलं. माझ्या नशिबाने त्या गाण्याची सीडी आमच्याकडे होती. शंभरवेळा ऐकूनदेखील, अजूनही मन भरलेलं नाही. इतकी जादू आहे त्या गाण्याची. तेव्हापासून हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो, तेव्हा तुमच्या त्या स्पर्धेतील गायलेल्या गाण्याची आठवण येते.’
‘हॅलो शालिनी, ऐकते आहे ना? असो, तुझं गाणं कुठवर आलंय? गाते ना अजून की झालं बंद?’
‘अं.. असं खास नाही. रियाझ वगैरे काही नाही. पण अधून मधून गाते मी.’
‘ओके, गाणं बंद करू नका. चालू ठेवा, असा आवाज फार कमी लोकांच्या वाट्याला येतो. बाकी कसं काय चालू आहे? कुठे असता तुम्ही आजकाल?’
रेस्टरूममधल्या बेसिनमध्ये जाऊन तिने चेहऱ्यावर पाणी मारलं. समोरच्या आरशात बघितलं तर डोळ्यातलं पाणी थांबण्याचे नावं घेत नव्हते. अशा रडक्या चेहऱ्याने बाहेर जाण्यापेक्षा ती बराचवेळ रेस्टरूममध्येच टंगळमंगळ करत राहिली.
घरी जाताना तिला ट्रेनमध्ये तिसरी सीट मिळाली. शेजारच्या बायका अधूनमधून गप्पा करीत होत्या. ती मात्र त्यांना एखाद्या रोबोप्रमाणे फक्त हो किंवा नाही अशी उत्तरे देत राहिली. तिचं मन मात्र भूतकाळातून बाहेर यायला तयार होत नव्हतं.
आपली गाण्याची आवड, गाण्याच्या क्लाससाठी धरलेला हट्ट, पैसे नाहीत म्हणून बाबांनी दिलेला नकार, आईची होणारी कुचंबणा, मोठ्या भावाचा मूक पाठिंबा, त्याने आणि आईने साठवलेल्या पैशातून घेऊन दिलेली ती गाण्याची पुस्तके, वेगवेगळ्या स्पर्धांसाठी आपल्याला ठिकठिकाणी घेऊन जाणाऱ्या शाळेतील देशमुख मॅडम, वह्या, पुस्तके ठेवण्याच्या कपाटाच्या दारावर चिकटवलेला लता मंगेशकरांचा फोटो, कधीच न परवडणारा दुकानातल्या काचेच्या शोरूममध्ये असलेला तो तंबोरा, बघायच्या किंवा चहा-पोहेच्या कार्यक्रमाच्या पुरतेच माझी गाण्याची आवड आणि शेवट लग्न, संसार, मुलं, धावपळ करत नोकरी. जीव कसा मेटाकुटीला आलेला आणि त्यातच आज त्या अनिलच्या फोनची भर.
तिचं स्टेशन आलं तसं, ती स्वत:ला कसंबसं सावरत स्टेशनच्या बाहेर पडली. भराभर पावलं उचलत तिने घर गाठलं. पाळणाघरातून बाळाला आणून नवरा सोफ्यावर लोळत टीव्ही बघत होता. बाळ पाळण्यात खेळण्याशी खेळत होतं. हातपाय धुवून ती बाहेर आली. बाळाला छातीशी कवटाळून तिने बाळाचा एक मोठ्ठा पापा घेतला. नवऱ्याच्या आणि बाळाच्या पोटातील भूक त्या दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. बाळाला पाळण्यात ठेवून ती स्वयंपाकघरात शिरली.
रात्री निजानीज झाल्यावर तिने तिचे कपड्यांचे कपाट हळूच उघडलं. काही साड्यांच्या खाली नीट जपून ठेवलेला लतादीदींचा तो फोटो काढला. त्यावरून हळुवारपणे हात फिरवला, आणि नीट दिसेल असा कपाटात ठेवला.
सकाळी पाच वाजताच गजर झाला. तिने यांत्रिकपणे उशीच्या बाजूला ठेवलेला मोबाईल उचलला आणि मिटलेल्या डोळ्यांनीच गजर बंद केला. अंगावरचे पांघरून बाजूला करून काही क्षण ती तशीच बसून राहिली. शेजारी झोपलेल्या बाळाचा तिने एक हलकासा पापा घेतला. अंधारातच आणि हवेतल्या हवेत तिने नेहमीच्या जागेवर असलेल्या देवाच्या तसबिरेकडे बघून नमस्कार केला, आणि ती पुढची तयारी करण्यासाठी आतल्या खोलीमध्ये निघून गेली. तिने एकवेळ स्वत:ला आरशात बघितलं, आणि कितीतरी वेळ स्वत:लाच बघत राहिली. केस विस्कटलेले, तर काही रुपेरी, तेलकट चेहरा, डोळ्याखाली काळी वर्तुळं. याआधी शेवटचं पार्लरमध्ये कधी गेलेलो? बहुतेक लग्नाच्या आधी. तेही सगळ्यांनी फारच आग्रह केला म्हणून.
कुकरच्या शिट्टया, फोडणीचे वास, भांड्यांचे होणारे आवाज, अशा विविध आवाजांनी थोड्या वेळापूर्वी शांत असलेले घर भरून गेलं. बेडरूम आणि किचन यामधला दरवाजा तिने लावून घेतला. डायनिंग टेबलवर ठेवलेला मोबाईल उचलून तिने त्यावर तिच्या आवडीची गाणी लावली. स्वयंपाक करताना घामाच्या धारा लागल्या होत्या. मधून मधून ती खिडकीतून बाहेर डोकवून बघत होती. आकाशात काळे ढग दिसतायत कां ते बघायला. आकाश भरून आलंय का ते बघण्यासाठी, का कुणास ठाऊक, परंतु तिने आज खिडकीतून बाहेर पाहिलं नाही.
तिने मोबाईल बंद केला. ’ओ सजना बरखा बहार आयी, रस की फुंहार, अखियों में प्यार लायी’ हे स्वर तिच्या गळ्यातून उमटले, आणि तिच्या अंगावर शहारा आला. ‘अखियों में रैना आ गयी’, या ओळीची जागा पूर्वीसारखी आली नाही पण तरीही ती गात राहिली.
कदाचित पहिल्या पावसात तिचं भिजून झालं होतं, म्हणून असेल.....!!!!!
