दक्षिणा
दक्षिणा


गणपती हा मालवणी माणसाचा मोठा सण. एक घर एक गणपती. पण गावाला जायला तिकिट मिळत नसल्याने मुंबईतील नातेवाईक किंवा मित्रांच्या घरी जाणे हीच मोठी मजा. असाच माझा देशावरील एक मित्र, त्याचे आई आणि बाबा हे मला बऱ्याच वर्षांपासून ओळखायचे. त्यामुळे सणावाराला मित्राच्या घरी जायला कुठल्याही निमंत्रणाची गरज पडत नसे.
गणपतीत त्यांच्या घरी छान सजावट असायची. चौथ्या किंवा पाचव्या दिवशी गौरी आगमन व्हायचे. देशावरच्या गौरीचे मुखवटे हे तसे मोठेच असतात आणि त्याबरोबर जेष्ठा आणि कनिष्ठा गौरी आगमन व्हायचे. गौरीचे जेवण ही एक पर्वणी असते. काकी स्वतः त्यांच्या पुरण भरलेल्या जाडजूड पुरणपोळ्या गरमागरम बनवून वाढायच्या. मस्तपैकी गोड जेवण अंगावर येईपर्यंत जेवायचं आणि ताणून द्याचंच.
काका स्वभावने फारच साधे आणि सरळ होते. रोज आटोपती पूजा करायची आणि दर रविवारी सोवळ्यातली साग्रसंगीत पूजा असा त्यांचा नेम असायचा. त्यांचा गणपतीही सोवळ्यातला, प्रसाद दाखवताना आणि आरती करताना ते नेहमी सोवळं नेसायचे.
जेवणापूर्वी गणपती आणि गौरी आरती व्हायची. मग आम्ही जेवायला बसायचो. ताट वाढून ठेवले की मग काका ताटासमोर अकरा रुपये ठेवायचे आणि मग पाणी सोडून आम्ही
जेवायला सुरु करायचो.
पहिल्या वेळेस मी जेवून उठल्यावर हात धुवून जागेवर बसलो तेव्हा काकांनी मला ते पैसे घ्यायला सांगितले. मी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले की ती दक्षिणा आहे.
"पण मी ब्राह्मण नाही आहे मग मला दक्षिणा कशाला ?" असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर त्यांचे उत्तर ऐकून मला भरून आले, ते म्हणाले की "तू ब्राह्मण नाही आहे ते मला माहित आहे, पण माझ्या मुलाचा मित्र आहेस आणि मला माझ्या मुलासारखाच आहे." सोवळ्यातलं काकांचे ते उत्तर ऐकून मला काय बोलावे ते सुचलंच नाही.
रोजच आपण कित्येक लोकांना भेटतो, ते आजच्या २१ व्या शतकात देखील जात विचारून संबंध वाढवतात. पण सोवळ्यातल्या मोठ्या मनाच्या काकांसारखी माणसे विरळाच.
काका आज अस्तित्वात नाहीत पण त्यांनी दिलेली अकरा रुपये दक्षिणा मी आजही त्यांची आठवण म्हणून जपून ठेवले आहेत.
त्या दिवशी त्यांच्या घरून निघताना शांता शेळके यांच्या कवितेच्या ओळी मनात तरळून गेल्या.
पथ जात धर्म किंवा
नातेही ज्या न ठावे
ते जाणतात एक प्रेमास
प्रेम द्यावे
हृदयात जागणाऱ्या
अतिगूढ संभ्रमाचे
तुटतील ना कधीही
हे बंध रेशमाचे!