धुंदला' जाए जो मंजिले....©®
धुंदला' जाए जो मंजिले....©®
" गेल्या वर्षभरात मी तुला वीकेंडला बाहेर फिरायला माझ्या मित्रांकडे नेतोय तरी तुझी 'इथे माझे मन रमत नाही' ही सतत तक्रार असते सई ! मी देखील वैतागलो आहे आता. आठवडाभर मी मोठ्या टीम सोबत काम करतो, तिथे कोणालाच माझ्या बाबतीत काही इश्यू नाही पण घरी तुला मात्र मी तुझ्याशी 'कनेक्ट नाही' असे वाटत असेल तर तो कदाचित तुझ्या विचार करण्याचा दोष आहे, माझा नाही. सतत घरात एकटे राहण्याचा कंटाळा आला असेल तरी त्यासाठी इतका कांगावा करायची आणि तुझ्या आई बाबांना सांगायची काय गरज होती तुला? ते येणार आहेत का दादरहून अमेरिकेत तूझा एकटेपणा घालवायला? काल तर तू माझ्या मम्मालाही सांगितलं ना, की मी तुला वेळ देत नाही!...सतत स्वत:च्याच विश्वात असतो म्हणून? मला हे अजिबात आवडलेलं नाहीए...."
हे ऐकून तर अधिकच धीर सुटलेल्या सईला रडू आवरणे कठीण झाले. ज्याच्यासाठी साता समुद्रापार आपण आपली मोठ्या फर्म मधली सी.ए. ची नोकरी सोडून लग्नानंतर लगेचच अमेरिकेत आलो तो सागर आता खूप बदलला आहे हे तिच्या लक्षात आलं होत तरी, ती नेटाने प्रयत्न करत होती जुळवून घेण्याचा!
एक तर 'नोकरी नसल्याने आपण कुणावर तरी अवलंबून आहोत' शिवाय दोघेच भारताबाहेर आहोत त्यामूळे मानसिक आधारासाठी घरी देखील सांगायचे नाही तर कुणाला आपल्या मनातल्या भावना बोलव्यात? हे तिला समजेना. शेवटी ज्याच्यावर अजुनही प्रेम आहे आणि हे नात टिकवण्याची इच्छा आहे त्या सागरशीच एकदा आपणं आपल्या मनातले परत बोलावे असा विचार करुन सईने सुरुवात केली.
"कबूल आहे सागर, नसेल आवडलं तुला, माझं माझ्या आई बाबा किंवा तुझ्या मम्मीला मी आपल्या बद्दल काही सांगण कारण तू आजवर तुझे सगळे निर्णय एकट्याने घेतले. त्यात तुला कधी कोणी अडवले नाही की रोखले नाही. त्यामूळे काही ठरवताना तुला ईतरांचा विचार घेणे, त्यांना सामावून घेणे हे सुचतच नाही. आपल्या घरच्यांनाही तू परक्यांप्रमाणे समजतो आणि काही शेअर करत नाही. मी सुद्धा कोणाला काही शेअर करु नये असं तुला वाटतं. ते आपले पालक आहेत त्यामूळे त्यांच्याशी तर मी हक्काने बोलणार ना? आणि मी त्यांच्याशी यातून मार्ग काढण्यासाठी बोलले, तुझी तक्रार करायला नाही...."
स्वतंत्र विचाराच्या व प्रैक्टिकल राहणे पसंत असलेल्या सागरला तिचे रडणे आवडले नाही आणि तिच्या दू:खाचे नेमके कारणही समजले नाही. त्याच्या मते आठवडाभर मी घरी नसलो तरी किंवा घरी आल्यावर हिच्याशी जुजबी बोललो तरी भागले पाहिजे. त्याशिवाय एकमेकांना स्वत:ची स्पेस कशी मिळेल? त्याच हे बोलणं ऐकल्यावर त्याच्या प्रश्नाला सईने उत्तर देणे गरजेचे होते, जे तिने दिले.....
"गेली वर्षभर मी हे सहन करतीय पण आता माझाही जीव गुदमरल्यासारखा होतोय या नात्यात! कधी शॉपिंगसाठी किंवा सहज बाहेर पडले तरी तू सोबत नसल्यावर मला कशात रस वाटत नाही की घरातही खुप वेगवेगळ्या कामात, फोनवर किंवा टीव्ही बघण्यात माझा वेळ जात नाही. खरं तर या सगळ्याचा वीट आलाय मला! सर्वसामान्य मुलींप्रमाणे माझी आणि माझ्या घरच्यांची स्वप्न तुझ्याशी धूमधडाक्यात माझे लग्नं झाले त्यावेळी पुर्ण झाली असेच मलाही वाटत होते. लग्नं जुळवताना आपल्या वीडियो कॉलवर झालेल्या गप्पा, ठरवलेल्या गोष्टी आणि भारतात येवून लग्नानंतर मला अमेरिकेत घेवून आल्यावर मी तुझ्या सोबत फिरण्याची, वेळ घालवण्याची पाहिलेली स्वप्न सुरुवातीच्या दीड दोन महिन्यातच संपली. तुझ्या सुट्टीच्या दिवशी आपण काय करायचे, कुठल्या मित्रांना भेटायचे हे तुझे प्लान ठरवूनच तू मला सांगतो. कधी विचारत नाहीस की, मला काय हवंय? मला तू हवास...तुझा वेळ हवाय! जो आपला वेळ असेल फक्त दोघांचा !!..."
सईचा हाही प्रयन्त यशस्वी होईल असे तिला चिन्ह दिसेना तेंव्हा तिने बोलणे थांबवले आणि आत गेली. त्या दोघांचा आणखी एक वीकेंड भांडणात संपला.
"धुंदला जाए जो मंजिले, एक पल को तू ठ्हर जरा...झुक जाये सर जहां...वही मिलता हैं रब का रास्ता...तेरी किस्मत तू बदल दे...रख हिंमत, बस चलदे...."
रुम मधे आल्यावर तिने मन शांत करण्यासाठी लावलेल्या गाण्यांच्या ओळी तिला खूप काही सुचवून गेल्या. सईने मोठ्या हिमतीने तिच्यासाठी 'रब' बनून तिला यातून बाहेर काढून तिचा सुखी संसार, प्रेम मिळवून देईल अशा आशेने भारतातील एका उत्तम 'Marriage Coach' चा शोध घ्यायला सुरुवात केली. जेणेकरून तिला तिची नेमकी मनोव्यथा समजून घेवून योग्य दिशा दाखवणारे कोणी एक्सपर्ट सोबत मिळेल असे मनात आले. सागरला कळू न देता तिने शोधाशोध सुरु केली आणि ती मदत तिला सापडली.
"एकदा एखादी केस हाती घेतली आणि त्यात आपले प्राण ओतून काम केले की आपल्याला सकारात्मक परिणाम मिळतातच फक्त त्यासाठी मदत करणारा आणि घेणारा दोघे प्रयत्नशील असावेत. जे स्वत:ची मदत करायला तयार आहेत आणि त्यासाठी सुचवलेले करुन बघायला मनापासून प्रयन्त करणारे लोक असतील अशाच लोकांसोबत मला काम करायला आवडते आणि मी त्यांना निश्चीत यश मिळवून देते" हा आत्मविश्वास आणि आपलेपणा जाणवल्याने सईने कोचसोबत तिचा विचारांचा आणि नात्याचा झालेला गुंता सोडवून देण्याची विनंंती केली.
मनापासून नातं टिकवायचे आहे या ध्येयाने प्रयत्न करत, अवघ्या 'तीन महिन्याच्या' कालावधीत सईने स्वत:च्या आयुष्यात परत नुसते प्रेमाचे रंगच भरले नाहीत तर ते नातंही फुलवलं. मित्रांमधे आणि स्वत:च्या जगात खुश असलेल्या सागरला तिने या नात्याला टिकवण्यासाठी पुढाकार घेवून जिंकले. शेवटी नातं आणि खास करुन नवरा बायकोचे नातं हे एकमेकांवर भावनिक दृष्ट्या अवलंबून असण्यात जास्त फुलत आणि काळजी सोबत प्रेम दाखवल्याने खूलत जातं हे त्याला तिच्या कृतीतून पटलं. आज आठ महिन्याच्या मुलाची आई असलेली सई वर्क फ्रॉम होम पर्याय निवडून जॉबही करतेय आणि सागर सोबत तिच्या स्वप्नात थाटलेला संसारही !
* सदर विचारांच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत.
*आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास माझ्या नावासह जरूर करावी.
*आपला अभिप्राय खुप महत्वाचा, तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समधे आपले मत जरूर कळवा.
