चित्री
चित्री


फुलपांदी .., महाराष्ट्रातील एक छोटसं गावखेडं, घड्याळामागे धावणार्या शहरापासून कोसो दूर असल्याकारणाने अजून गावात सुधारणेचे वारे पोहोचायला खूप अवकाश असलेल व बहुतांशी प्रमाणात मागासवर्गीयांचीच वस्ती असलेलं एक गावं. मागासवर्गीय कष्टकरी जमात असल्यामुळे शिक्षणाची तशी वानवाच. गावात चौथी पर्यंत आठवड्यातील चार दिवस बंद असणारी एकशिक्षकी एकमेव शाळा. गावाशेजारून वाहणार्या बारमाही नदीमध्येही आता फ़क़्त नावालाच पाणी शिल्लक राहिलेल. अर्धा जून संपत आला तरी पावसाचं अजून कसलंच निशाण नसल्यामुळे संपूर्ण गावालाच काहीशी मरगळ आलेली. दुबार पेरणीच संकट उभ ठाकल्यामुळे वडीलधार्यांच्या तोंडच पाणीच पळाल होत, दुबार पेरणी करायची म्हणजे त्यासाठी पुन्हा पाच दहा हजार रुपयांची सोय करावी लागणार होती. विचार करून करून हनम्या चं टाळकं फुटायला आल होत. गपगुमान तो आपल्या बैलांना ओंजारत गोंजारत पाच दहा हजार कसे उभे करायचे ह्याचा जम बसवत होता. बिनकामाच्या उडानटप्पुंच्या पारावर गप्पा रंगल्या होत्या, पोराबाळांची शाळा अजून सुरु न झाल्यामुळे ती पिल्ल आपापल्या दुनियेत मश्गुल होऊन वेगवेगळे खेळ खेळण्यात दंग होती, आणि घरातील स्त्रियांची, पोरीबाळींची पाणी भरण्याची व स्वयंपाक उरकण्यासाठी लगबग सुरु होती.
ह्या सगळ्या गडबडीतच चित्री आपली दुड उचलून विहिरीकडे निघाली होती. ‘हिरीत पाणी साटलं असल की नाय’ ह्या गणगणीत असतानाच तिला तो दिसला. क्षणभर ती गोंधळलीच, त्याने बघण्याआधीच सीतामाई सारखी धरणी माय पोटात घेईल तर बर होईल, असच तिच्या मनात डोकावून गेल. अन ती तडक माघारी फिरली. घरात शिरताच कसाबसा रोखून ठेवलेला हुंदका तिने फोडला. कितीतरी मुश्किलीने ती जे विसरू पाहत होती, आज तिचं जुनी जखम पुन्हा भळभळ वाहू लागली होती.
मोहित.... मोहित नाव होत त्याचं. काही वर्षांपूर्वी तिच्यासाठी काहीही करायला तयार असणारा मोहित. अगदी नावाप्रमाणेच समोरच्याला मोहित करणार व्यक्तिमत्व, शहरी लहेजा असलेलं लाघवी बोलण्याने समोरच्याला अगदीच मंत्रमुग्ध करून सोडणारा त्याचबरोबर आसपासच्या घटना बर्यापैकी जाणून घेण्याच्या उत्सुकतेमुळे वयाच्या मानाने विपुल माहिती असलेला एक आशावादी तरुण. त्याची मावशी राधाबाई राहायची ह्या गावी. राधाबाई गावातीलच नाही तर पंचक्रोशीतील सगळ्यांचीच पैश्यापाण्याची गरज पुरवणारी सावकार. त्यामुळे संपूर्ण गावावर राधाबाईचा एक भीतीयुक्त दरारा. पैश्याच्या बदल्यात गावकर्यांचे घरदार, जमिनीचे तुकडे राधाबाईकडे गहाण असत. त्यामुळे राधाबाईच्या विरोधात गेला की तुमचे दिवस भरलेच म्हणून समजा. लहानपणा पासून शाळेला सुट्ट्या असल्या की मोहित इकडेच पडलेला असायचा. शहरासारख्या काहीही सोयी व सुख सुविधा नसतानाही व संपूर्ण गावात कसलंच काही करमणुकीची साधन नसतानाही तो इथे कसा रमायचा हे त्याचं त्यालाच ठाऊक.
सुमारे सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट असेल जेव्हा तो पंधरावी ची परीक्षा देवून मावशीकडे आला होता, जवळ जवळ महिनाभर मुक्काम होता त्याचा. इतकी वर्ष चित्रीला बघून मनातल्या मनात खुश होणारा, तिला बघताच कळत नकळतपणे मनातल्या मनात तिच्या सोबत फिरण्याची स्वप्नं बघणा-या मोहितने ह्यावेळेस मात्र मुद्दामहूनच तिच्या सोबत ओळख वाढवली होती. चित्री होती ही अगदी तशीच. कोणीही तिच्याकडे आकर्षिला जावा अशी. एखाद्या पट्टीच्या चित्रकाराने काढलेल्या चित्रासारखीच नाकी तोंडी अगदी सणसणीत, आखीव रेखीव व शिडशिडीत बांधा. गावकरी तर कित्येकदा हनम्याला डिवचण्यासाठी विचारायचे, ‘लेका हनम्या, ही नक्की तुझीच हाय ना रे?’ आणि हनम्या ही त्यावर मोठ्या तावात मिशीला पीळ देत मिथुन स्टाईल मध्ये ‘कोई शक?’ म्हणून उत्तर द्यायचा. पण तो ही मनातल्या मनात जरा दुःखी व्हायचाच. ‘कसलं पाप म्हणून माझ्या घरात जलमाला आली ही अप्सरा. भट, बामण नायतर सावकाराच्या घरी जल्मली असतीस तर सोन्याहून पिवळं नशीब असत माह्या लेकीचं.’ अश्या ह्या चित्रीकडे मोहित अनाहूतपणे आकर्षिला गेला होता. उगाचच काहीबाही कारण काढून तिच्याशी बोलणं, तिच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करणं, तिच्या मागेपुढे करायची एकही संधी काही हा सोडत नव्हता. नाही म्हणायला त्याचं पुढेपुढे करणं तिच्याही लक्षात आलचं होत पण इतरांसारखा हा ही एक टाईमपास करतोय की खरेच ह्याच्या मनात आपल्याबद्दल काही आहे ह्याचा अंदाज बांधायचा टी प्रयत्न करत होती.
आजवर खूप जणांनी तिला प्रेमाच्या नावाखाली भुलवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या प्रेमात खरेपणा किती आणि तिच्या सौंदर्याच आकर्षण किती ह्याची तिला चांगलीच जाण असल्यामुळे तिने आजवर कोणालाच जवळही उभं नव्हत केलं. पण ह्या वेळेस मात्र ती ही जरा बावरलीच होती, तिला ही हळूहळू त्याचं मागेपुढे करणं आवडू लागलं होतं. दिवस सुरु झाला की घरातील काम पटापट उरकून कपडे धुण्याच्या नावाने कधी एकदा नदीकडे जाते असं तिला झालेलं असायचं. आणि मोहित ही उठला की आंघोळीच्या नावाने नदीकडे धूम ठोकायचा. एकमेकांना बघून गोडगोड हसणं असो की हळूहळू काहीबाही कारणांवरून एकमेकांशी बोलणं असो, चांगलीच गट्टी जमली होती दोघांची. तिची क्षणोक्षणी काळजी घेणं, तिला आवडणा-या गोष्टी करून दाखवणं, जमेल तितकं तिच्या आजूबाजूला राहायचा प्रयत्न करणं इतकंच सुचत होत त्याला फक्त.
गुलाबी स्वप्ने बघता बघताच मोहित एकांतात विचार करायचा की, आपल्या प्रेमाबद्दल कोणाला सांगावं का? की नेमकं काय करावं. गावातील मित्रांना सांगावं तर ह्या तोंडातून त्या तोंडात अश्या प्रकाराने तिची बदनामीच होईल, आणि मावशीला सांगाव तर मावशी गाव डोक्यावर घेईल. एक अनामिक भीतीने त्याचा ताबा घेतला होता. शेवटी ‘बघू येईल त्या परिस्थितीला समोर जावूयात’ असं ठरवून एक दिवस मोहितने चित्रीच्या मनाचा अंदाज घेवून विचारलं “चित्रा, इतके दिवस आपण एकमेकांच्या मागे पुढे करतोय, असं किती दिवस चालत राहणार ग? तुझ्याशिवाय तर हल्ली काही दुसरं सुचतही नाही की तुझ्याशिवाय एक मिनिट ही जात नाही. बहुतेक पुढच्या आठवड्यात मला घरी जावे लागेल, पण मला ह्यावेळेस नेहमी सारखं एकट्याने नाही जायचं आहे, ह्यावेळेस मला तुझा होकार सोबत घेवून जायचं आहे. करशील का ग माझ्या प्रेमाचा स्विकार? माझ्या घरच्यांना कसं समजवायचं हे मला चांगलंच माहित आहे, प्रश्न राहिला मावशीचा तर मी आईला सांगून मावशीला घेईन तयार करून. आणि पुढच्या वेळेस परत इकडे येईन तर ते तुला घेऊन जाण्यासाठीच. चित्रा, करूयात ना ग आपण लग्न???” त्याच्या प्रत्येक वाक्यागणिक ती मोहरत जात होती, खूप खूप खुश होत होती ती. आणखी काय हवं होत तिला? मोहित सारख्या मुलाशी लग्न करून सर्वस्वाने त्याची व्हायची ह्यापेक्षा अजून काही मोठं सुख जीवनात असेल असे तिला वाटतं नव्हते. पण नेमकी तेव्हाच कोणाचीतरी चाहूल लागल्यामुळे भीतीने तिने घरी पळ काढला. मोहीतचा जीव अगदी टांगणीला लागला होता, पुन्हा भेटण्यासाठी, तिच्या उत्तरासाठी आता उद्यापर्यंत वाट पहावी लागणार होती.
उद्याच्या सुखाची स्वप्ने रंगवत रंगवत त्या रंगातच रंगून चित्री घरी आली. घरी हनम्या डोक्याला हात लावून एका कोप-यात भकास चेह-याने बसला होता. त्याच्याकडे बघताच काहीतरी बिनसल्याची जाणीव तिला झाली. खोदून खोदून विचारल्यावर त्याने सांगितले, “राधाबाई कडून दोन वर्षांपूर्वी घेतलेलं पैक आजवर परत कराला जमल न्हाईत, म्हणून राधाबाईनी आपल्या जमिनीवर तिची मालकी सांगितली हाय, आणि जवर तिचं पैक देत न्हाय तवर जमीनवर कायबी लावाचा नाय.. आता जमीनच लावली नाय, दोन चार पैकं येतील तरी कुठून? आणि पैकं आलंच नाय तर देऊ कुठून? आता काय आपल्याला जमीन परत मिळणार नाय. काय करू काय कळत नाय बघ, तिचं पैक कुढून देवू नं तुम्हाला खायला कसा देवू?” त्याचं ऐकून चित्री मुस्कुटात मारल्यागत झाली. काही मिनिटांपूर्वीच उद्याची स्वप्ने रंगवणारी चित्री खडकन जागेवर आली. प्रेमाच्या गुलाबी स्वप्नांच्या नादात तर तिने अश्या परिस्थितीचा काही विचारच केला नव्हता. जरी मोहित कितीही आशावादी असला तरी राधाबाईच्या रागाची तिला कल्पना होती. राधाबाईला कुणकुण जरी लागली तरी तिच्यासकट तिच्या घरच्यांनाही गावात रहाणं मुश्कील होऊन जाईल, मोहितला जितकं वाटत होत तितकं सोप्पं नव्हतचं हे सर्व. एक तर दोघांच्या जातीमधला फरक, त्याच्या मावशीला असलेला जातीचा अभिमान आणि संपत्तीची घमेंड.. बापरे!! आता कुठे तिचे पाय जमिनीवर टेकत होते. अडकित्त्यात सुपारी अडकावी तशी अवस्था झाली होती तिची.
दुस-या दिवशी सकाळीच मोहित नदीवर आला होता, उन डोक्यावर आलं तरी अजून चित्रीचा पत्ता नव्हता, ‘काय झालं, काय चुकलं का? आपल्याकडून जरा घाईच झाली का? असे अनेक प्रश्न त्याला पडत होते. अगदी दुपार टळून गेल्यावर आता काय चित्री येणं शक्य नाही ह्याची खात्री झाल्यावर मोठ्या जड पावलांनी तो घराकडे परतला. नेमकं काय चुकलं ह्याच उत्तर त्याला हवं होत आणि त्यासाठी अजून एक दिवसाची वाट बघण्यावाचून त्याच्याकडे काही पर्याय नव्हता.
रंग्या, खरं नाव माहित नाही पण रंगेल स्वभावामुळे सगळीकडे रंग्या म्हणूनच फेमस असलेला बाजूच्या गावातील वीस एकर शेतीचा मालक. त्याचा चित्रीवर नेहमीच डोळा. प्यायला बसला की नेहमीच तो हनम्याला म्हणायचा की ‘मला तुझा जावय करून घे, पाच एकर शेती तुझ्या नाववर करीन.’ आज ही पेताना त्याने तेच पालुपद सुरु केलं “ आरं हनम्या, कसल्या एवढ्या इचारात हायेस, एकदा माझं लगीन चित्री बरबर लावून दे, मग बघ, रोज मच्छी मटान खाशील.”
शेवटी रंग्या कितीही गेलेला असला तरी ‘एकदा घरात चित्रीसारखी बायको आली की आपुआपच ताळ्यावर येईल’ असा विचार करून त्याने चित्रीचं रंग्याबरोबर लग्न लावून द्यायचं ठरवलं. चित्रीला विचारायचा प्रश्नच नव्हता. असाच एक रविवार बघून दहा पंधरा माणसांच्या उपस्थितीत त्याने चित्रीला रंग्याच्या गळ्यात बांधून टाकली. पोरीच्या बदल्यात थोडीशी जमिन आणि राधाबाईचं कर्ज फेडण्याइतक्या पैश्यांच्या बदल्यात त्याने तिच्या आरस्पानी सौंदर्याचा लिलाव केला होता.
अनं आज इतक्या वर्षानंतर तोच मोहित अचानकपणे तिच्या समोर उभा ठाकला होता. त्याला बघताच सारा भूतकाळ सरसर तिच्या डोळ्यासमोरून गेला. बापाच्या भीतीमुळे, त्याच्या कर्जामुळे तिने तिचं बलिदान दिलं होतं, तिने तिची स्वप्ने उधळवली होती आणि त्याबद्द्ल काय मोल मिळालं होत तिला त्यांच्याकडून?
रंग्याचा रंगेलपणा शेवटपर्यत काही कमी झाला नाही. चार वर्षांत दोनदा पाळणं हाललं पण दोन्ही वेळा मुलीचं झाल्यामुळे रंग्या चार चार दिवस घराबाहेर राहू लागला. कोणालाही पैश्याच्या तालावर नाचवायचं, कुठेही दारू पिऊन पडायचं, कसलंच आणि कोणाचंच काहीही बंधन राहील नव्हतं त्याला. असाच एके दिवशी दारूच्या नशेत नदीत पडून मेल्याची खबर आली. चित्रीला तर काही संवेदनाच शिल्लक नव्हत्या, ‘दारुड्याच्या जाचातून सुटका झाली म्हणून आनंद साजरा करू की कपाळाचं कुंकू इतक्या तरुणपणात पुसलं म्हणून आकांत करू’ तिचं तिलाही समजत नव्हतं.
पण तिची फरफट अजूनही थांबली नव्हती. त्याच्या मृत्युनंतर ‘घराण्याला वारस नाही दिला म्हणून रंग्या जीवानी गेला’ असे सासरच्या लोकांचे उठसुठ टोमणे आणि ‘विधवा झाल्यामुळे आता आयती संधी आहे’ असं म्हणून घरातच टपून बसलेल्या वासनांध लांडग्यांच्या नजरेला कंटाळून तिने दोन पोरींसहित कायमचं सासर सोडलं. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरं जात ती एक एक दिवस ढकलत होती, पण आज तो दिसल्यावर मात्र ती बावरलीच, सर्व काही चुकल्याची जाणिव आज तिला होत होती. ‘होता ना हा सोबत. जे झालं असत ते बघितलं असतं, पण मी असं खचून जायला नको होतं.’ हे आणि हेच तिच्या मनात येत होतं. पण आता खूप उशीर झाला होता, नशिबाला दूषणं देण्यापेक्षा चुकीच्या निर्णयाचा पस्तावा करण्या वाचून तिच्या हातात काहीच शिल्लक नव्हते. बापाला त्रास नको, घरच्यांना त्रास नको म्हणून तिने निमुटपणे बापाचं ऐकून ह्याच्या प्रेमाला ठोकर मारली होती, बापाने जे जे सांगितलं ते तिने निमुटपणे ऐकलं होतं, पण आता त्याच ठोकरीमुळे, तिच्या निमुटपणामुळे तिला आयुष्यभर त्रास होणार होता... शिखंडीच्या जखमेप्रमाणे तो त्रास कधीच बरा होणारा नव्हता की विसरण्याजोगा ही नव्हता. प्रत्येकाला आयुष्यात एकदा का होईना परिस्थितीच्या वरचढ होण्याची संधी मिळत असते, चित्रीने ती संधीच गमावली नव्हती तर गमावलं होत एक गुलाबी जीवन जीवन... तिच्यासाठी सर्व काही करायला तयार असणा-याला तिने गमावलं होतं. त्याच्यासोबत चित्री पैश्यापाण्यात लोळली असती की नाही ते माहित नाही, पण त्याच्यासोबत सुखी मात्र नक्कीच राहिली असती. तेच सुखी जिवन तिने गमावलं होतं. माहित नाही आता त्याचं काय चालू होतं, पण तो निश्चितच तिच्यापासून कायमचा दूर, खूप खूप दूर गेला होता. अन ती मात्र अडकून पडली होती, होती तिथेच, होती त्या पेक्षाही वाईट परिस्थितीत... परिस्थिती तिला नाचवत होती आणि ती नाचत होती निरंतर........ निरंतर.................