वाटाड्या
वाटाड्या


खरं तर ह्याच्याबद्दल खूप आधीच लिहायला हवं होतं,
पण कधी लक्षातच नाही आलं, काखेत कळसा नि गावाला वळसा म्हणतात ते काय उगीच काय?
हा माझ्या आयुष्यातील एक खूप महत्त्वाचा आधार. सुख असो की दुःख, ह्याच्या शिवाय सर्व काही अपूर्णच.
आणि म्हणूनच ह्याच्याबद्दल खूप आधी लिहायला हवं होतं असं वाटतं, आणि जरी लिहायचं म्हटलं तरी पहिला प्रश्न पडतो की नक्की काय लिहावं, आणि नक्की कुठून सुरू करावं? अनुभवाचा, ज्ञानाचा सागरच तो जणू.
एक बिलंदर अवलिया, एक खराखुरा मार्गदर्शक, प्रत्येक वेळी गरज असताना आवाज देण्याच्या आधी हजर असणारा कृष्णसखाच जणू.
माझी जन्मभूमी जरी कसारा असली तरी प्राथमिक शिक्षण मामाकडे झालं, नंतर पुन्हा आठवीला कसाऱ्याला शाळेत आलो तेव्हा इतक्या काही ओळखी नव्हत्याच की कोणी मित्र ही नव्हते.
मितेश, रमेश, प्रताप अश्या मोजून दोन चार जणांशी मैत्री, काही महिन्यांच्या अंतराने ह्या अवलियाच्या संपर्कात आलो आणि जन्मोजन्मीची ओळख असल्याप्रमाणे त्याच्याशी नाळ जुळली ती कायमचीच.
विनोद... विनोद शंकर जागले, मध्यम चणीचा आणि सतत चेहऱ्यावर हसू असलेला वर्गातला एक मित्र...
राहायला अगदीच शाळेच्या बाजूला असल्याने कधी पाणी प्यायला तर कधी वह्या घ्यायला किंवा काही कारण नसलं तरी सहजच त्याच्यासोबत चक्कर मारण्याच्या नादात त्याच्या घरी येणं जाणं व्हायला लागलेलं, प्रत्येक वेळी त्याच्या स्वभावाचे नवनवीन पैलू समोर यायचे. इतक्या लहान वयातही तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं त्याच्याकडून तुमचं समाधान होईल असं उत्तर नेहमीच तयार असायचं.. काहीही विचारा, त्याला काही माहीत नाही किंवा तो गडबडून निरुत्तर झालाय असं चित्र आजपर्यंत तरी कधी दिसलं नाही. वयाच्या मानाने प्रचंड प्रमाणात असलेली प्रगल्भता, चालू घडामोडी लक्षात ठेवण्याची त्याची हातोटी ह्यामुळे मित्रमंडळीमध्येही नेहमीच कौतुकाचा आणि लाडाचा विषय.
शाळा संपवून कॉलेज लाईफ सुरू झाली..
दहावीचे मार्क्स, इंग्रजीशी दुष्मनी आणि इतिहास, साहित्याची आवड ह्या सर्व गोष्टींमुळे त्याने कलाशाखेत प्रवेश घेतला आणि मी वाणिज्य शाखेत. वेगवेगळे वर्ग, लेक्चर्सच्या वेगवेगळ्या वेळा..तरीही जोपर्यंत त्याची भेट होत नसायची तोवर काही दिवस पूर्ण झाल्याचं समाधान काही मिळत नसायचं. अभ्यास असो की ईतर टवाळक्या, काही ही असो, एकमेकांच्या गोष्टी आता न सांगताही बरोबर कळायला लागल्या होत्या.
मधल्या वेळात त्याच्या कुटुंबाने आसनगाव येथे बस्तान बसवल्यामुळे सोबत येणं जाणं बंद झालं, तरी मात्र कधी दोन दिवस आमची गाठभेट झाली नाही असं कधी झालंच नाही. कितीही काम असोत की अभ्यासाचं टेंशन, एकमेकांसाठी वेळ राखून ठेवलेलाच असायचा. आज संसारात, स्वतःच्या दुनियेत कितीही मश्गुल झालो असलो तरी त्या भेटींची नशा कणभर ही उतरायला तयार नाही. लोकल्स सोडून विन्याच्या घरी बसून राहणे, त्याच्याच हातात स्पेशल मलाईदार चहा आणि फरसाण अध्येमध्ये मावशीच्या हातचं गरमगरम जेवण...
आजही आठवलं की उगाचंच मोठं झाल्यासारखं वाटतं.
यथावकाश कॉलेज संपलं.. पोटापाण्यासाठी नोकरीचा शोध सुरू झाला, घरची परिस्थिती बेताची असल्याने मला मिळेल ती नोकरी करण्यावाचून पर्याय नव्हता, त्यामुळे भेटणंगाठणं, उगाचंच तासंतास बसून राहणं, टवाळक्या करत फिरत राहणं बंद झालं. त्याला मात्र उगाचच इकडेतिकडे काम करीत राहणं कधी पटलंच नाही, त्याने नेहम
ीच खूप मोठमोठी स्वप्ने बघितली आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी तितकं स्वतःलाही तयार केलं. त्याचा नेहमीच स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास होता, आणि त्याच म्हणणं ही असायचं की "भाई, मोठं व्हायचं असेल तर त्यासाठी अमाप कष्टांसोबत दुनियेच्या विरोधात जायची धमक ही अंगात ठेवायला हवी, आपण जे करतो, त्याविरोधात दुनियेने कितीही कोल्हेकुई उठवली तरी स्वतःवरचा विश्वास कायम ठाम असायला हवा."
पोलीस अधिकारी होऊन देशाची सेवा करण्याचं लहानपणापासूनच त्याचं स्वप्न, त्यासाठी त्याने ग्राऊंडमध्ये आणि अभ्यासामध्येही दिवसरात्र मेहनत घेतली, परंतु जे प्रारब्धात आहे त्या शिवाय जास्त काही मिळत नाही, त्यामुळे फक्त एक सेमी. उंचीच्या कमतरतेमुळे त्याला ह्या स्वप्नांवर पाणी सोडावं लागलं, परंतु विनोद अश्या गोष्टींनी खचून जाणारा किंवा निराश होणारा प्राणी नक्कीच नव्हता, पोलीस अधिकारी म्हणून देशसेवा करण्याची संधी हातून गेली असली तरी शासनाच्या महसूल विभागातून समाजाची सेवा करण्याचे व्रत अखंड चालू ठेवले आहे.
फक्त मी आणि माझं काम भलं अशी हल्लीच्या सरकारी बाबूंची वृत्ती, पण हा अवलिया मात्र निश्चितच ह्या नियमालाही अपवाद आहे. आपलं काम फक्त आपल्या टेबलपुरतेच मर्यादित न ठेवता अडल्या नडलेल्यांना त्यांचे काम जबाबदारीने पूर्ण करून देत असतो, त्यामुळे ऑफिसमध्ये छोट्या छोट्या कामासाठी फेऱ्या मारायला लावण्याच्या मानसिकतेमध्ये बदल झालेला दिसून येत आहे.
कोणत्याही गोष्टींच्या बदलाची सुरुवात स्वतःपासून करायची असते हे केवळ तोंडानेच न सांगता कृतीतून ही दाखवून देणाऱ्या ह्या अवलियामुळे अनेक आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू दिसून आले आहे.
जरी ह्याचे पोलिसदलात जायचे स्वप्न अधुरे राहिले असले तरी ह्याची अर्धांगिनी मात्र पोलीस सेवेतच आहे. कॉलेज पासूनची प्रेमकहाणी घरच्यांचा कठोर विरोध असूनही दोघे आपल्या मतावर ठाम राहिल्यामुळे एका यशस्वी लग्नामध्ये बदलू शकली. त्यामुळे साहेबांचे स्वप्न अर्ध्या प्रमाणात का होईना साकार झालं असं म्हटलं तरी ते काही चुकीचं ठरणार नाही.
हल्ली कामाचा व्याप, त्यानिमित्ताचा प्रवास, वाढत्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अश्या अनेकविध कारणांमुळे भेटीगाठी होत नसल्या, फोनवरही हवा तसा संवाद साधता येत नसला तरी ही अजून ही कोणतीही गोष्ट सांगायची असल्यास मनात विनोदचंच नाव सर्वप्रथम येतं, कसला प्रॉब्लेम असो की कोणत्या गोष्टींसाठी कसला सल्ला, विनोदला फोन करा, फोन ठेवल्यानंतर निश्चितच त्याच्याशी बोलल्यानंतर तुमचं समाधान झालेलं असतं.
पापपुण्य, पुनर्जन्म वगैरे गोष्टींवर मी कधीच इतका विश्वास ठेवला नाही, परंतु विनोद आणि माझ्या मैत्रीच्या नात्यापलीकडे बघताना नेहमीच मागील जन्मात नक्कीच काहीतरी चांगलं काम केलं असावं, आणि त्यामुळेच ह्या जन्मात ह्याच्यासारखा बिलंदर अवलिया, कलेची चांगलीच जाण असलेला आणि नेमका योग्य वेळेवर कोणाही गरजवंतांसाठी धावून जाणारा विनोद मित्र म्हणून लाभला हाच विचार डोक्यात पिंगा घालत राहतो. आणि आठवतं राहतं त्याचं एक वाक्य... "मिल्याभाई, जश्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, तसंच मैत्रीच्याही बाबतीत असतं रे.. हे देखील जन्मोजन्मीचे बंध असतात, आपली स्वप्ने, इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एक वाटाड्या जन्मोजन्मी आपल्या सोबत असतो, त्यालाच दुनिया 'मित्र' म्हणून ओळखते." आणि नकळतपणे हात जोडले जातात माझ्या ह्या वाटाड्याला.