चिंब भिजलेली पॅन्ट
चिंब भिजलेली पॅन्ट
माझ्या सालीचं लग्न ठरल्याचा निरोप आल्याबरोबर माझ्या बायकोचा आनंद गगनात मावेनासा झाला. निरोप आल्याच्या पुढच्याच क्षणापासून तिची माहेरी जाण्याची तयारी सुरु झाली. मला, एखाद्याला मनापासून होणारा आनंद समजू शकतो पण एव्हढा आनंद. म्हणजे स्वतः भोवती गाणे म्हणतं म्हणतं गिरक्या म्हणजे टू मच. तिने प्लॅनिंग पण डिक्लेअर करून टाकलं.
हे बघा गडे, माहेरी जाण्याच्या नुसत्या कल्पनेने तिची भाषा पण अशी गोड झाली होती तिची. आणि ती अशी गडेबीडे असं काही गोड गोड बोलली की हा गडी लगेच विरघळतो आणि पाघळतो आणि तिची प्रत्येक गोष्ट मान्य करून टाकतो. आणि न मानुन पण सांगतोय कोणाला.
हे बघा मी आठ दिवस आधी मी तुमच्या पुढे माहेरी राहायला जाईल. त्या मुळे माझं थोडं राहणं पण होईल आईकडे आणि लग्नाच्या तयारीलाही मदत होईल. तुम्ही नंतर वेळेवर या, म्हणजे तुमच्या सुट्या पण वाया जाणार नाहीत.
असं एकदा तिनं काही ठरवलं तर मी शक्यतो त्यात बदल करत नाही.उलट हो ला हो म्हटलं की संसार कसा सुरळीत चालू राहतो.
ती गावाला गेल्यावर काय काय मजा करायची असा मी विचार करत असतांनाच, ती ओरडली. अहो, लक्ष कुठे आहे तुमचं. हे बघा मी माहेरी गेली की ऑफिस सुटल्यावर सरळ घरी यायचं. ऑफिसात पत्ते कुटत बसायचं नाही. पार्ट्या वगैरेची स्वप्न पाहू नका. आणि हो, शेजारणींना जास्त घरात येवू देऊ नका. मागच्या वेळी मी गावी गेले होते तेंव्हा ताट, वाट्या, चमचे, डब्बे, सांडशी अशा अनेक वस्तू शेजारणी कडे सापडल्या होत्या बर. या वेळी असं होऊ देऊ नका. अगदी सरळ घरी यायचं आणि नीट राहायचं. स्वतः स्वयंपाक करायचा. कारण मोलकरणीला मी पगारी सुट्टी देणार आहे. समजलं ना. मोकाट सुटायचं नाही. चांगलं वागून दाखवायचं.
नंतर तिने मला वस्तू सापडायला त्रास होऊ नये म्हणून तिने प्रत्येक डब्यावर लेबल लावली. स्वयंपाक करायची सवय व्हावी म्हणून कणिक मळण्या पासून पोळ्या करण्या पर्यंत सगळी प्रॅक्टिस करवून घेतली. कणिक किती घ्यावी, पाणी किती घालावे.
पोळ्या गोल कशा बनवाव्या. कशा भाजाव्या, या गोष्टी तिने स्वतः जातीने लक्ष घालून शिकवल्या. सकाळ संध्याकाळ पोळ्या करून करून मी एकदम एक्स्पर्ट होऊन गेलो. स्वयंपाक कला साधनेत मी इतका मग्न असायचो की बऱ्याच वेळा ऑफिस मध्येही माझ्या चर्चा स्वयंपाका बद्दलची माहिती मिळवण्या बद्दलच्याच असायच्या. एकदा तर चुकून मी साहेबांना, साहेब तुम्ही कणिक मळताना मोहन किती टाकता हो असं डब्बा खाता खाता प्रश्न विचारला, तेंव्हा साहेब, कावरे बावरे झाले आणि तुम्हाला हे कसं कळलं की मी पोळ्या करतो म्हणून असं हळूच विचारू लागले.
असा मी स्वयंपाक करण्यात परिपूर्ण होता होता, भाज्या बिज्या बनवायलाही शिकलो. बायकोने मला असं स्वयंपूर्ण बनवल्यावर तिच पूर्ण समाधान झालं.
मग बॅग भरून झाली. हे बघा, लग्नात घालण्याचे आणि वापरण्याचे तुमचे पण कपडे मी घेऊन जाणार आहे. कारण तुम्ही कोणतेचे कपडे घेऊन याल. एकतर तुम्हाला आपल्याला काय शोभून दिसतं यातलं काही समजत नाही. तुम्ही फक्त व्यवस्थित दरवाजे खिडक्या लावून या. काळजी घ्या हं स्वतःची. असं प्रेमाने निरोप घेऊन बायको माहेरी रवाना झाली.
आणि मग काय, ती माहेरी गेल्यावर माझे दिवस सकाळ संध्याकाळ कामाच्या रगाड्यात संपू लागले आणि बघता बघता गावी जाण्याचा दिवस आला पण माझा. माझे कपडे वगैरे सगळे बायकोने पुढे नेले होते त्या मुळे मी मस्त रिकाम्या हाताने सासुरवाडीला पोहोचलो.
मी पोहोचलो तेंव्हा लग्नघर एकदम उत्साहात होते. संध्याकाळचं लग्न होतं. मी गेलो तेंव्हा हळद लावण्याची तयारी सुरु होती. नवऱ्या मुलीला हळद लावून झाल्या नंतर सगळ्यांनी एकमेकांना हळद लावायला सुरवात केली. त्यात मी जावाई. मला पाहिल्यावर तर बाकीचे साले, साल्या जाम पिसाळल्या सारखे माझ्या अंगावर चाल करून आले. जमेल तशी जो तो हळद लावत होता. मी एकदम जेजुरीच्या खंडोबा सारखा पिवळा धम्मक दिसायला लागलो. त्यात अजून एकमेकांवर पाणी उडवणं सुरु झालं. माझ्यावर तर म्हैस धुतांना टाकतात तसं बादल्या बादल्यांनी धो धो सगळ्यांनी पाणी ओतून ओतून मला चिंब भिजवून टाकलं.
नुकताच मी गावावरून आलेलो. चहा पाणी काहीच नाही. आल्या आल्या हा गोंधळ झाला. अंगावरच्या कपड्यानिशी सगळा ओलाचिंब झालेला मी, बायकोला केविलवाण्या आवाजात हाका मारत म्हटलं, अग मला अंग पुसायला टॉवेल दे, माझे कपडे दे.
आलेच, म्हणतं ती आत गेली. बराच वेळ बाहेर आलीच नाही. मी आपला ओल्या कपड्यांवर उभाच. पाणी निथळतय सगळ्या बाजूने.
अग बाई, अहो, ऐकाना गडे.अजिबात रागवायचं नाही हं. तुमचे कपडे आणायला चुकून विसरून गेले हो मी.
मला तर क्षणभर ती काय बोलते आहे हेच कळेना. जेंव्हा लक्षात आलं तेंव्हा मी कोणत्या संकटात सापडलो आहे हे मला कळलं. अग आता काय करू.
अहो, असं काय करता, अगोदर तुम्ही टॉवेल ने अंग पुसून घ्या, डोकं पुसून घ्या. आजारी पडाल ना नाहीतर.
मग मी डोकं पुसलं, अंग पुसलं आणि नुसता टॉवेल गुंडाळून उभा राहिलो.
माझ्या जवळ कपडेच नव्हते.सगळे जणं नवनवीन कपडे घालायच्या तयारीला लागले होते आणि मी एकटाच लग्न घरात टॉवेल गुंडाळून फिरत होतो.
अग मी काय करू. मी काकुळतिने बायकोला विचारले.
अहो, थांबा ना थोडावेळ. अजून दुकान उघडली नसतील. आपण नवीन शर्ट पॅन्ट घेऊन येवू तोपर्यंत तुम्ही नाश्ता वगैरे आटोपून घ्या. थोडं ऍडजेस्ट करायला शिका हो, लग्न घर आहे हे, बायको माझीच समजूत घालत म्हणाली.
तेव्हढयात माझा मोठा साला म्हणाला, ताई आज गुरुवार आहे, मार्केट बंद असते.
बापरे, अरे मग मी काय करू. मी धस्स होऊन विचारल. आज संध्याकाळी लग्नात काय घालू मी.
एव्हढी काय काळजी करता गडे. आपण असं करू या. माझ्या भावाचे कपडे तुम्हाला होतात का बघा. बायकोच्या डोक्यात आयडियांची कमी नसते.
मला तर काय बोलावे या बोलण्यावर तेच समजेना. आम्हा दोघांमध्ये खूप मोठा फरक होता. त्याचे कपडे मला बुजगावण्या सारखे दिसत होते. बायकोच्या दृष्टीने किंचित ढगळ होते पण इतके काही वाईट दिसत नव्हते. आणि लग्न घरात माझ्या कडे नाहीतरी कोण ढुंकून पाहणार होतं.
पॅन्ट मोकळी सोडली की खाली घसरून पडायची. बेल्ट घट्ट बांधून पॅन्ट कंबरेवर बांधली तरी घसरून जाऊ नये म्हणून अधून मधून मी दोन्ही हाताने वर ओढून घ्यायचो.
वरातीत नाचतांना एका साल्याला माझी आठवण झाली. दोन्ही हातांनी पॅन्ट सांभाळत मी कसा डान्स केला माझे मलाच माहित.
लग्न लागल्या नंतर हिच्या सोबत फोटो काढतांनाही मी पॅन्ट वर ओढायला आणि फोटोग्राफरने फोटो काढायला एकच वेळ झाली.
सख्ख्या बहिणीच्या लग्नात पूर्ण वऱ्हाडात मीच एकटा जावाई असून बावळट दिसत होतो म्हणून ही बरेच दिवस माझ्याशी बोलत नव्हती. याला म्हणतात चोराच्या....
