छळ
छळ


(शतशब्दकथा)
शेजारी प्रफुल्ला रडत होती आणि तिच्या रडण्यामुळे प्रसन्नाची झोप चाळवत होती.
यापूर्वी उलटं व्हायचं. मार खाल्ल्यावर तिचं रडणं सुरू झालं की त्याला शांत झोप लागायची...
प्रेग्नंसीत नोकरी गेली. आता पिनाकिन वर्षाचा झाला. नोकरी बघायला तयार नाही. डोक्यावर फ्लॅटचं, गाडीचं कर्ज आहे. राग नाही येणार? नोकरी करणारी म्हणून तर लग्न केलं!
आज त्याला दया आली.. जाऊदेत! महिनाभर हाॅस्पिटलमध्ये किती सोसलंय तिने...! झोपेतच त्याने तिला जवळ घेण्यासाठी हात लांब केला... बेड रिकामा होता..
तो दचकला. त्याने अंधारात डोळे ताणून पाहिलं. काही दिसेना. हळूहळू डोळे अंधाराला सरावले तेव्हा दिसलं. बेड रिकामा होता...
काळजात धस्स् झालं. एकदम आठवलं...
प्रफुल्लाला जाऊन आज तेरा दिवस झाले...