चेटकी....... भयकथा
चेटकी....... भयकथा


चंद्रमौळीच्या अरण्या शेजारी आसलेल्या आदिवासी पाड्यात एका नवशिक्या पोलिस पाटलाची नियुक्ती झाली. इतकी वर्षे या पाड्यावरचा पोलिस ठाण्याचा बंद दरवाजा आज काय तो उघडला. पाड्यावरची दोन चार मंडळी पोलीसाच्या सोबतीला आले. मनावरची आणि ठाण्यातली सगळी जाळीजळमटं काढून पोलिस नव्या उमेदीनं कामाला लागला. गावक-यांना भेटून काही तक्रार तगादा आहे का? ते तपासू लागला. अचानक एक दिवस "जित्या सापडेना व्हं....!!" असं म्हणत चार-एक गावकरी अचानक ठाण्यात आले. त्या नंतर लगेच दुसऱ्याच दिवशी गावक-यांना उघड्या पठारावर स्मशानाशेजारी मानवी खोपडी आणि हाडं सापडली. या घटनेने पाड्यावर एकच खळबळ उडाली, काल रात्री पासून पाड्यावरचा जित्या गायब होतो काय....., आन् आज ही हाडंकुडं सापडतात काय....., यात सगळ्या गावक-यांचे एकच म्हणणे पडले, "या गावात जे काही वाईट वंगाळ व्हतं ते त्या चंद्रमौळी अरण्यातल्या टेकाड्यावरल्या चेटकीणीमुळं." पोलीसाला तर सगळ्या गावक-यांनी चेटकीणीबद्दल सारं सांगून सांगून हैराण केलं होतं.
त्या रात्री ठाण्यातून बाहेर पडताना पोलिसाला एका झोपडीबाहेर चारपाईवर एक हाडकूळा माणूस झोपलेला दिसला. अंगावर चिखलाचा हा रापलेला थर, केस त्या चिखलाच्याच लगद्याने सुकून घट्ट झालेले. पोलिसाला चर्रर्र..... चर्रर्र.... पाचोळ्यात पावलांचा आवाज आला, हा प्रकार काहीतरी विचित्र वाटला, तो तिथेच एका झाडापाठी लपून राहीला. तेवढ्यात एक साधारण ३-४ फुटाची काळीकुट्ट, केसं विस्फारलेली बाई त्या माणसाभोवती आली. तिला पाहताच झोपलेला माणूस दचकला, ती म्हणाली, "चल संग .... तुझा बळी द्यायचाय.... तुझा देव बोकड मागतू.....आन् माझा मानूस" काहीच क्षणात तिथे एक कोल्ह्यासारखं दिसणारं काळंबेरं मोठ्ठालं कुत्र आलं. त्या बाईने काहीबाही मंत्र पुटपुटला आणि झटक्यात तिने आणि त्या माणसाने आपला आकार सुक्ष्म केला आणि त्या कुत्र्याच्या पाठीवर बसून अरण्याच्या दिशेने धाव घेतली, त्यांच्या पाठोपाठ पोलिसही धावला. आपल्यापाठी कुणीतरी धावतयं हे त्या चेटकीणीला दिसलं असावं, ती जागीच थबकली, तिला पाहून पोलीसही डचमळला, तेवढ्यात त्या चेटकीणीने ... एक टोकधार चाकू गपकन पोलीसाच्या दिशेने फेकला......... सर्रर्रर्रकन...... तो आवाज ऐकून पोलिस दचकून उठला, सगळ्या अंगाला डबडबून घाम आला होता, त्या स्टेशनातल्या काळ्याकुट्ट अंधारात छताला फक्त पंखा गरगरत होता, पोलिस भानावर आला तेव्हा त्याला समजलं ...... हे सगळं स्वप्न होतं तर.....
रात्रीचे किती वाजले होते कुणाच ठावूक, चहूकडे किर्रर्रsssss अंधार दाटून भरला होता. ठाण्यातून घराकडे निघायला पोलिसाला बराच उशिर झाला होता. पोलिस हातात टरी धरुन वाट शोघत जात राहीला, तरी ते स्वप्न काही केल्या पाठलाग सोडीना..... सारखा तो फेकलेला चाकू कुठुनही सर्रर्रकन येईल असं वाटत राहीलं........मनात एक प्रकारची भिती दाटून राहीली......नदीकिना-यावरुन चालताना काळोखात ठेच लागून धाबकन पडला, तोच तळपायातून कंबरेत जोरदार कळ गेली, सगळा चिखलगाळ अंगभर लागला. कसाबसा उठला पाय मोडत चालून एका घराचा आडोसा घेतला. घराबाहेरच्या चारपाईवर बसला. एक थंड वा-याची झुळूक चिखलाने माखलेल्या अंगावरुन सळसळून गेली. डोळे आपसूक मिटले गेले, अंग चारपाई स्वाधिन झालं. आता उठायची इच्छा असूनही उठता येईना इवढं शरीर पार थकून गेलं...........तेवढ्यात वा-याच्या वेगात ती आली, काळीकुट्ट, केस वा-यावर भुरभूरत टाकून समोर उभी राहीली आणि म्हणाली, " चल संग ..... तुझा बळी द्यायचाय....." हे शब्द पोलिसाच्या कानात कुणीतरी गरम तेल घातल्यासारखे घूसले.......काही करायच्या आत त्या विचित्र दिसणाऱ्या बाईने मंत्र शक्तीने आपला आणि पोलीसाचा आकार सुक्ष्म केला, जवळच उभ्या, कोल्ह्यासारख्या दिसणा-या काळ्याकुट्ट कुत्र्यावर बसून दोघं अरण्यात शिरली. अरण्यात दूर कुठेतरी एक शेकोटी पेटताना दिसली. शेकोटी जवळ जाताच कुत्रा थांबला, त्या बाईने आपले खरे चेटकीणीचे रुप धारण केले. साधारण आठ दहा फूट उंच, घुबडासारखं बाकदार नाक, अर्धे-अधिक लालेलाल डोळे खोबणीतून बाहेर आलेले, पायापर्यंत सुळसुळणारे पांढरे केस....... हे रुप पाहूनच पोलीसाचा थरकाप उडाला, तोंडाचा आ... वासला, घसा अगदी गळ्यापर्यंत सुकला... तोंडातून शब्द फुटेनासा झाला, अंगातून सगळीच शक्ती गळून पडली...... अंग गपगार पडलं.....पायाची कळ ठणकावून मस्तकात जाऊ लागली. कुत्रा पोलिसाकडे नजर रोखून पाहू लागला. बळी द्यायचा म्हणून चेटकीणीने धारधार चाकू काढला. कुत्रा आणि चेटकीणीची नजरानजर झाली, कुत्र्याच्या तोंडून लाळ गळू लागली. पोलीसाचा बळी घेण्यासाठी कुत्रा आणि चेटकीणीत चुरस निर्माण झाली. शेकोटीच्या बाजूला पडलेल्या पोलीसाचा बळी देण्यासाठी चेटकीन चाकू घेऊन पुढे सरसावली, चाकूने ती सपकन गळा चिरणार हे दिसताच कुत्राने पोलीसावर झडप घातली, वारा जोरात सरसरला.... पोलीस क्षणभर भानवर आला..... अंगात बळ आणून हाताच्या कोपराला हिसका देऊन शेकोटीपासून चार हात दूर सरकला..... वा-याचा प्रचंड वेगात शेकोटी भडकली..... त्याची झळ चेटकीणीच्या विस्कटलेल्या केसाला लागली... केसांनी पेट घेतला......पोलिस जागचा सरकल्याने कुत्र्याची झडप चुकली.... तो थेट चेटकीणीवर जाऊन जोराचा आदळला......चेटकीणीचा तोल गेला... ती कुत्र्याला घेवून शेकोटीत पडली.....ज्वाला आभाळभर पसरल्या..... आसमंतात एक जोरदार -हृदयद्रावक किंकाळी आणि कुईईssकुईईsss कुत्र्याच्या रडण्याचा आवाज..........कर्कश्य..... . . . दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात भेदरलेल्या नजरेने काही गावकरी आले, "पाटील... ते तिथं पठारावर स्मशानाशेजारी चांगली आठ-दहा फुट लांब हाडं पडल्याती.... हे बी त्या अरण्यातल्या चेटकीचंच काम हाय......." . . पोलीसाने नजर उचलून वर पाहीलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर फक्त एक बारीक हास्यरेषा...........