Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Archu Patil

Drama Romance Tragedy

3  

Archu Patil

Drama Romance Tragedy

बोलून मोकळे व्हावे...

बोलून मोकळे व्हावे...

5 mins
11.8K


"मधुरा ए मधुरा..... झोपलीस का गं... उठ आलं बघ नाशिक...."


जयंत.. मधुराचा नवरा.. कार चालवताना म्हणाला.... शेजारच्या सीटवर झोपलेली मधुरा जागी झाली व खिडकीबाहेर पाहू लागली. कारने नाशिकमध्ये प्रवेश केला होता..

तिने हळूच मागे पाहिले तर पार्थ... तिचे सहा वर्षाचे पिल्लू मागच्या सीटवर गाढ झोपले होते... आताशी नऊ वाजले होते.. सकाळी लवकर उठल्यामुळे मधुरा अजूनही थोडी झोपेतच होती....


काही वेळातच गाडी जयंतच्या मामाच्या... सदाशिवरावांच्या घरासमोर थांबली... गाडीचा आवाज ऐकून मामी लगबगीने बाहेर आल्या.... जयंत, मधुरा आणि अर्धवट झोपेत असलेल्या पार्थला आत घेतले...


सदाशिवरावांना.. दोन दिवसांपूर्वी माईल्ड अटॅक आला होता... जवळच्याच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते... त्यांचा मुलगा विपुल होता त्यांच्याजवळ.... 


चहा-नाश्ता झाल्यावर मामींसोबत तिघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले.... मामांची तब्येत बरी होती आता.... मामांशी थोडा वेळ बोलून जयंत पार्थला घेऊन विपुलसोबत घरी निघून गेला.... ती थांबली मामी सोबत...


थोड्याच वेळात डॉक्टर राऊंडला येणार म्हणून सिस्टरने तिला बाहेर बसायला सांगितले.... एकेका पेशन्टला तपासत डॉक्टर मामांच्या वार्डमध्ये जायला निघाले आणि मधुराला पाहून थबकले....


डॉक्टर राणे - "अगं मधुरा तू इथे?"


मधुरा -  "तू... विजय... इथे काय करतोस....?"


डॉक्टर राणे - "अगं.. मी या हॉस्पिटलमध्ये हार्ट सर्जन आहे.... पेशंटला तपासायला आलोय... पण तू कशी...?"


मधुरा - "अरे या वाॅर्डमध्ये आहेत ना ते सदाशिवराव सावंत... ते चुलत सासरे आहेत माझे... त्यांनाच बघायला आलेय..."


डॉक्टर राणे - "ओके ... त्यांनाच चेक करून येतो मी... तू थांब इथेच मग माझ्या केबिनमध्ये बोलू आपण...."


मधुरा - "ओके. ठीक आहे..."

   

विजय वाॅर्डमध्ये गेला आणि मधुरा आपल्या कॉलेज लाईफच्या आठवणींमध्ये गुंग झाली....

   

मधुरा आणि विजय एकाच गावात, एकाच परिसरात राहायचे... लहानपणासूनच एकत्र खेळायचे.... विजय एक वर्ष सिनिअर होता तिला शाळेत... विजयला लहान बहिण होती नीता.... ती मधुरापेक्षा एक वर्षांनी लहान होती.... तिघेही एकमेकांची पुस्तके वापरूनच बारावीपर्यंत शिकली....


विजयची पुस्तके मधुराला... मधुरानंतर तीच नीताला..... दोघांच्या घरच्यांमधेही घरोब्याचे संबंध होते...

   

दहावीपर्यंत अभ्यास करताना नेहमी विजयची मदत लागायची मधुराला.... एक निखळ मैत्री होती त्यांच्यात..... पण बारावीनंतर विजय शिकण्यासाठी पुण्याला गेला. मधुराही बारावीच्या अभ्यासात व्यस्त झाली.... नीताही तिच्या मैत्रिणींमध्ये रमली.....

   

तसा विजय सुट्टीत यायचा... दिवाळी आणि होळीसाठी तो यायचाच... तेव्हा बोलणे व्हायचे त्यांच्यात..... पण ती पूर्वीची निखळता कोठे तरी हरवली होती.... एकमेकांशी बोलताना नजर चोरली जात होती.... वयानुसार येणारे अवघडलेपण जाणवत होते.... 

   

विजय मात्र सुट्टी संपल्यावर परत जाताना तिची भेट घेतल्याशिवाय जात नसे....

    

असेच चार वर्ष गेले.... मधुरा बीएससीच्या शेवटच्या वर्षाला होती आणि तिच्या लग्नाचे बोलणे घरी सुरू झाले....

  

शिमग्यानंतर चांगलं स्थळ बघून लग्न पक्कं करायचं आणि परीक्षा संपली की उडवून द्यायचा बार लग्नाचा.... ती वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हतीच.... आणि दिसायला सुंदर.. लाघवी आणि मनमिळाऊ असल्यामुळे तिच्या लग्नाचे काही टेन्शनही नव्हते....

   

या होळीलाही विजय सुट्टी काढून आला होता.... पण प्रत्येक वेळी दिसायचा तसा आनंद नाही दिसला तिला त्याच्या चेहऱ्यावर.... नेहमी तिच्याशी बोलायची संधी शोधणारा तो ती दिसताच अबोल होत होता.... डोळ्यात कुठलीशी सल दिसत होती त्याच्या..... मधुराला अस्वस्थ वाटत होते त्याला असे बघून.... पण त्याला विचारणार कसं... तो तर नेहमीप्रमाणे बोलतही नव्हता तिच्या सोबत....

    

तीन दिवसांची सुट्टी संपवून विजय पुण्याला जायला निघणार होता आज रात्री.... या तीन दिवसात तो मधुराशी एकदाही बोलला नव्हता....

   

संध्याकाळी तो अचानक घरी आला मधुराच्या आणि काकूंना विचारून तिला पारावर घेऊन गेला.... मधुराच्या घराच्या थोड्या पुढेच एक मोठे वडाचे झाड होते.... लहानपणापासून यांची गप्पा मारायची ती आवडती जागा.... पण आज पारावर बसून दहा मिनिटे झाली तरी कोणीच बोलत नव्हते.... शेवटी विजयला असह्य झाला हा अबोला....


विजय - "अभिनंदन मधुरा!... लग्न करतेय ना तू..."

 

मधुरा - " हो अरे... बाबा म्हणतात या सुट्टीत करून टाकू.... तसेही शिक्षण झालेय माझे.... आणि पुढे शिकायचं असेल तर लग्नानंतरही शिकता येईलच ना...."

 

विजय - "ह्म्म... तू ना माझ्यापेक्षा चार-पाच वर्षांनी लहान हवी होतीस मधुरा...."


मधुरा - " का रे...."


विजय - "अगं मग अजून चार वर्षांनी झाले असते ना तुझे लग्न...."


मधुरा - "आणि त्यानी काय झाले असते? वेडाच आहेस तू....."


विजय - " हो गं खरंच वेडाच आहे मी... बर चल.... उशीर झालाय.... मला निघायचंही आहे..."


मधुरा - "चल आणि लग्न जमलं की कळवेनच मी तुला... चार दिवस आधीच ये..."


विजय - "नाही हां मधुरा ते मात्र सांगू नकोस मला.... मी तुझ्या लग्नाला येणार नाही....."

  

आणि डोळ्यातलं पाणी लपवत पटकन वळून निघालासुद्धा तो.... मधुरा मागे येतेय की नाही हे देखील पाहिले नाही त्याने....

  

मधुराला काही कळलेच नाही तो असा का बोलला... तीही आली घरी....

 

आणि सांगितल्याप्रमाणे खरंच तो आला नाही लग्नाला.... आणि त्यानंतर कधी भेटलाही नाही तिला... आणि आज असा अचानक....


विजय - "मधुरा कुठे हरवलीस.... चल केबिनमध्ये कॉफी घेऊ..."

  

मधुरा मामींना सांगून विजयसोबत गेली.... कॉफी पिता पिता जुन्या गप्पा सुरू झाल्या त्यांच्या... मधला काळ जणू पुसूनच गेला....

  

मधुराच्या मनात अजूनही काही तरी खटकत होतं.... 'तू माझ्यापेक्षा चार-पाच वर्षांनी लहान हवी होतीस मधुरा....' हे त्याचे वाक्य सारखे मनात घोळत होते तिच्या.... त्याच्या वागण्याविषयी आलेली शंका तिला स्वस्थ बसू देईना....

  

आणि तिने विचारलेच त्याला....


मधुरा - " विजय माझ्या एका प्रश्नाचे उत्तर देशील..... तू त्या दिवशी असं का म्हणालास की मी तुझ्यापेक्षा चार-पाच वर्षांनी लहान हवी होते.... तू लग्नालाही आला नाहीस माझ्या..."

 

विजय - "तुला अजूनही कळले नाही मधुरा.? की तू प्रयत्नच केला नाहीस कळून घेण्याचा....?"

  

मधुरा - "नाही म्हणजे विचार केला खूप... पण नंतर घाईघाईतच लग्न ठरले.... त्या गोंधळात मी विसरुनही गेले.... आज तुला भेटले आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या.... "


विजय - "अगं सोड तो विषय.... आता तू सुखी आहेस तुझ्या संसारात.. आणि मी गेल्या वर्षीच लग्न केले... आता विचार करून काय उपयोग.... आणि तसेही आयुष्यात काही गोष्टी अपूर्णच राहतात...."

  

मधुराला आधी काही कळलेच नाही... पण अचानक ती म्हणाली...


मधुरा - "म्हणजे विजय....... माझी शंका खरी आहे.... तुला..... तुला लग्न करायचे होते माझ्यासोबत.....?"

    

विजय - "खरं तर आता कबूल करायला काहीच हरकत नाही.... हो जसं समजायला लागले तेव्हापासून प्रेम करायचो मी तुझ्यावर... पण बोलण्याची हिंमत नाही झाली... आपल्याबरोबर घरच्यांचेही संबंध दुरावतील या भीतीने मी बोललोच नाही.... खूप वर्ष झाले ओझे होते मनावर... आता मोकळे वाटतेय....."


मधुरा - "तुला मोकळे वाटतेय पण आता माझे मन जड झालेय.... बोलून मोकळे व्हायचे ना रे..... एकदा मला, आपल्या घरच्यांना सांगायचे तरी.... इतकी वर्ष मनावर असलेले दडपण कमी झाले असते दोघांच्याही...."

     

विजय - "सोडून दे मधुरा तो विषय..... बोलल्याने काहीच झाले नसते.... तुझे बाबा नसते थांबले इतकी वर्षे आणि मी सांगितल्याने आपल्या दोन्ही घरात बिनसले असते कदाचित.... म्हणून मीच निघून गेलो तुझ्यापासून दूर... आणि तशीही तू खूप सुखी आहेस तुझ्या संसारात.... बरं चल मला आता ओपीडी आहे..."

 

असं म्हणून विजय निघून गेला केबिनमधून..... मधुराही निघाली त्याच्या मागोमाग.... स्वतःतच हरवल्यासारखी.... विजय मोकळा झाला होता बोलून.... पण आता मधुरा निघाली होती मनावर ओझे घेऊन.... अबोलपणे.....


Rate this content
Log in

More marathi story from Archu Patil

Similar marathi story from Drama