Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Archu Patil

Others


3  

Archu Patil

Others


प्रेमाची फलश्रुती...

प्रेमाची फलश्रुती...

3 mins 54 3 mins 54

  "हॅलो... हॅलो....... अमित... अमित बोलतोय ना?..."

  " हो.. आपण कोण?"

   " मी स्नेहा.. स्नेहा पाटील.."

   " हां स्नेहा बोल."

    "अमित माझ लग्न ठरलय.... दोन दिवसांनी साखरपुडा आहे..."

    " काय ? आणि हे तू मला आता सांगतेस?"

    "मला पण नव्हतं माहित.. बाबांच्या मित्राचा मुलगा आहे.. नेहमीच्या पाहण्यातील आहे.. त्यांनी आज मागणी घातली आणि बाबांनी हो म्हणताच लगेच साखरपुडा ठरवूनही टाकला...

  मला कोणी विचारल पण नाही रे." स्नेहा रडायलाच लागली बोलता बोलता...

   "ओके ओके.. तू आधी शांत हो... मी करतो काहीतरी.... हॅलो, अग ऐकते आहेस ना?"

    "हो बोल तू. काय करायचं आपण..?"

     "काय करायचं म्हणजे? तू तयार आहेस का लग्नाला?"

   " हो.. पण त्याच्यासोबत नाही तुझ्यासोबत..."

     स्नेहाने रडवेल्या सूरात म्हटले... ते ऐकून हसायलाच लागला अमित...

    " अग वेडाबाई मी माझ्यासोबतच म्हणतोय...."

     "हो पण कसं? मी मनमाडला... तू कल्याणला...."

    " ऐक.. घरी कोणाला शंका आली का आपल्याबद्दल?"

    "नाही फक्त रमेशदादाला माहित आहे. पण तो कंपनीच्या ट्रेनिंगला गेलाय त्यामुळे तो पण नाही मदत करू शकणार... फक्त माझी बेस्ट फ्रेंड साधनाच आहे आपल्या मदतीसाठी..."

   "ठीक आहे. घाबरु नकोस.. आता कुठे आहेस तू?"

   "मी साधनाकडेच आलेय अभ्यासासाठी... तिच्याच फोनवरून बोलतेय तुझ्याशी..."

   "ऐक आता घरी जा तू... आणि नॉर्मल रहा. थोडेसे पैसे असतील ना तुझ्याकडे? नाहीतर साधनाकडून घे आपण परत देऊ तिला नंतर... उद्या नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी निघ.. आणि स्टेशनला ये. पावणेआठची ट्रेन आहे... तीने ये कल्याणला निघून...."

   "मी ?आणि एकटी? बरा आहेस ना तू?..."

   "अग एकटी काय? लहान आहेस का तू आता? चांगल्या बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला आहेस ना? तरी घाबरतेस? आणि हो... येतांना तुझी सगळी कागदपत्रं, मार्कलिस्टस् घेऊन ये..."

  "ह्म्म्..."

  "काय झाले?... येशील ना ग?.. बघ फक्त हीच संधी आहे.... आपल्या दोघांनाही माहिती आहे... तुझ्या घरचे आपले लग्न कधीच लावून देणार नाहीत..."

   "हो येईल... मला माहित आहे मी नाही आले तर मला माझे आयुष्य असे कोंडवाड्यातच काढावे लागेल.... बाबांचे मित्रही बाबांसारखेच आहेत..."

   "ठीक आहे. आता साधनाला सगळे समजावून सांग.. मदतीसाठी थँकयू म्हण... आणि घरी जा... उद्या कपडे वगैरे काही घेण्याच्या भानगडीत पडू नकोस... नाहीतर उगाच संशय येईल तुझ्या घरच्यांना... फक्त सर्व कागदपत्रं आवर्जून घे पुस्तकांमध्ये लपवून...."

   "हो ठिकाय..जाते मी आता घरी..."

    "सावकाश जा आणि नॉर्मल रहा."

   "हम्म"असे म्हणून स्नेहाने फोन कट करून साधनाला दिला आणि घरी आली...

   सर्वांसोबत नेहमीप्रमाणे संध्याकाळ घालवून रात्री ती झोपायला गेली. रात्रीच तिने सर्व कागदपत्रे पुस्तकांमध्ये ठेऊन पुस्तके सॅकमध्ये ठेऊन दिली...

आणि झोपेची आराधना करू लागली...

    सकाळी साडेपाचलाच जाग आली. आठचे कॉलेज असायचे तिचे.. सव्वासातला घराबाहेर पडली की ती व साधना पावणे आठपर्यंत कॉलेजला पोहचायच्या... एकला कॉलेज सुटले की चारपर्यंत लायब्ररीत अभ्यास करून पाचपर्यंत घरी यायच्या....

   नेहमीप्रमाणे स्नेहा सकाळी आईचा निरोप घेऊन सव्वासातला घरातून बाहेर पडली. साधना आणि ती रिक्षात बसून रेल्वेस्टेशनला आल्या... पावणेआठची जनशताब्दी होती... तिकीट काढून स्नेहा प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा ट्रेनची अनाउन्समेंट होत होती. तिने साधनाच्या मोबाईलवरून अमितला कॉल केला... त्याच्याशी बोलल्यावर ती जरा निवांत झाली.... ट्रेनमध्ये चढल्यावर तिने साधनाला थँक्यु म्हणून बाय केले. दोन्ही मैत्रिणींचे डोळे भरून आले होते.. तिला माहिती होते तिच्या जाण्याचा राग साधनाला झेलावा लागणार होता...

   ट्रेनबरोबरच स्नेहाच्या मनातील विचारही धावत होते...

'अमित' तिच्या चुलतभावाचा... रमेशचा मित्र... दोघेही नाशिकला एकत्र होते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये.... सुट्टीत तो घरी न जाता आधी काही दिवस रमेशसोबत यायचा मनमाडला... त्याच दरम्यान त्यांची ओळख झाली... ओळखीचे रुपांतर प्रेमात कधी झाले ते कळलेच नाही... अमितने आडून आडून आपल्या भावना पोहचवल्या होत्या तिच्यापर्यंत .. पण स्नेहाची हिंमतच नव्हती ते स्विकारायची... कारण तिचे बाबा... अतिशय कडक शिस्तीचे... त्यात स्त्रीने फक्त पुरुष सांगेल तसे ऐकायचे अशी विचारधारा असलेले... त्यामुळे स्नेहाला लहानपणापासून. कोणतेच स्वातंत्र्य नव्हते...

   आठवणींच्या साखळ्या उलगडता उलगडताच कल्याण आले आणि ती प्लॅटफॉर्मवर उतरली. तशी तिची एकटीने प्रवासाची पहिलीच वेळ.. ती बावरून इकडेतिकडे बघत होती... अमितने तिला उतरशील त्याच ठिकाणी थांबायला सांगितले होते... आणि... आणि तिचे हृदय जोरात धडधडू लागले. डोळे पाण्याने काठोकाठ भरले... समोरून अमित येऊन उभा राहिला....

   त्याने तिच्याकडे डोळे भरून पाहिले, आणि तिचा हात पकडून चालू लागला. स्टेशनपरिसराच्या बाहेर निघून ते रिक्षात बसले आणि रिक्षा निघाली. स्नेहा आल्यापासून अमित तिच्याशी काहीच बोलत नव्हता. साधारण पंधरा मिनिटांनी रिक्षा एका इमारतीसमोर थांबली.

   रिक्षाचे पैसे देऊन अमित तिला इमारतीतील आपल्या फ्लॅटमध्ये घेऊन आला... दरवाजा उघडल्यावर स्नेहा आत आली... पाहिले तर घर पाहुण्यांनी भरलेले होते.... तिला कळेच ना काही... तेवढ्यात शैलाताई.. अमितच्या आई समोर आल्या आणि म्हणाल्या,"काय मग सूनबाई..... आवडले का घर? आता इथेच रहायचंय तुम्हाला.... चला आतल्या रूममध्ये... तयार व्हा.... आणि या टेरेसवर लगेच.... दोनचा मुहूर्त आहे तुमच्या लग्नाचा....

  आपल्या प्रेमाची फलश्रुती लग्नात होण्याच्या आनंदात स्नेहा एकदा शैलाताईंकडे तर एकदा अमितकडे पाहत होती...  


Rate this content
Log in