The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Archu Patil

Tragedy

3.5  

Archu Patil

Tragedy

मैत्री... विश्वास की घात?

मैत्री... विश्वास की घात?

3 mins
380


  आज विशाल दिनेशकडे होता जेवायला. दिनेशच्या बायकोने सीमाने छान वरणभात, बटाट्याची भाजी, पुरी असा साधाच बेत बनवला होता जेवणात. दिनेश आणि विशालची छान मैत्री होती....

        

     जेवतांना सारे शांतच होते. विशालला तर घास घशाखाली उतरेना... पण मित्राचे मन कसे मोडायचे म्हणून त्याने कसेबसे चार घास पोटात ढकलले आणि तो सोफ्यावर येऊन बसला....


   सीमा भांडी आवरायला किचनमध्ये गेली आणि दिनेशही विशालला बाजूला येऊन त्याला धीर देऊ लागला. विशालचे सारखे डोळे भरून येत होते..


    "रडू नकोस विशाल... अरे एक नोकरी गेली तर काय झाले? आपण दुसरीकडे पाहू."दिनेश विशालच्या खांद्यावर थोपटत म्हणाला..


    "नाही दिनेश, मला खूप आशा होती इथे.. शाळा चांगली... संस्था चांगली... म्हणून तर केवळ दोन हजार रुपये पगारावर मी गेली तीन वर्षे काम करतोय इथे.."


   "हो.. पण आपण काय करू शकतो आता? संस्थाचालकांच्या विरुध्द तर जाऊ शकत नाही ना...?"


    "अरे पण म्हणून काय गप्प बसायचं का? परवा वीस टक्के ग्रँट आली शाळेला.... केवढा खूश होतो मी काल..... मिठाई घेऊन गेलो घरी.... आईला तर केवढा आनंद झालेला...... आणि आज मुख्याध्यापक सांगतायत की तुम्ही बसत नाहीत ग्रँटमध्ये...."

..विशाल रडत रडत म्हणाला.


     "शांत हो विशाल, हे बघ... आपण भेटूया संस्थाचालकांना.. आणि नाही झाले तर दुसऱ्या शाळेत प्रयत्न करू.."


   "अरे, कशावरून दुसऱ्या शाळेत पण असे होणार नाही? इथं तर सर्व चांगले होते. सर्वांची कामे झाली... तू माझ्या नंतर लागलास... तुझही काम झालं आणि माझेच का नाही..."


    दिनेश त्याच्या पाठीवर थोपटून त्याला धीर देत होता....


    विशालच्या डोळ्यासमोर आईचा चेहरा आला... किती आनंदात होती काल ती माऊली.... विशालची नोकरी आणि संसार एवढी साधी स्वप्न होती तिची... बाबा साधे तापाचे निमित्त होऊन लवकरच गेले... त्यांच्या मागे आईने शिवणकाम करून विशालला शिकवले. बी एड नंतर विशाल या शाळेत लागला.... संस्थाचालक पवारसरांनी विश्वास दिलेला की तुझे काम होईल म्हणून... त्यासाठी विशालने थोडेफार पैसे भरण्याचीही तयारी दाखवली होती ...


  विशालची हुशारी, प्रेमळ स्वभाव, शिकविण्याची हातोटी, मुलांमध्ये मूल होऊन रमणे या सर्वांमुळे तो अल्पावधीतच विद्यार्थीप्रिय झाला....


   "हे बघ विशाल.... दोन दिवस जाऊ दे... तू सुट्टी टाक दोन दिवस.... असेही शाळेत आल्यावर तुला भरून येईल.. दोन दिवसांनी पवारसरांकडे जाऊन बोलूया आपण... काही होऊ शकते का? कदाचित पुढे वाढीव तुकडीवर तुझे काम करतील ते...."


   दिनेश त्याची समजूत काढत होता... पण विशाल? त्याला तर काही सुचतच नव्हते.... डोळे सारखे पाझरत होते....


   थोड्या वेळाने शांत होऊन विशाल घरी आला.  दोन दिवस त्याने विचार करण्यातच घालवले.  शाळेत जाऊन तरी काय करणार? सारेच आनंदात असणार आणि आपल्याकडे दयेच्या नजरेने बघणार ... त्यापेक्षा घरीच बरे...


   दोन दिवसानंतर त्याने पवारसरांना भेटायला जायचे म्हणून दिनेशला फोन लावला तर मोबाईल स्विचऑफ येत होता.... घरचा फोनही लागत नव्हता.... शेवटी जाऊ दे... आपला प्रश्न आहे आपणच सोडवू असा विचार करून तो एकटाच भेटायला सरांच्या घरी निघाला .....


    बेल वाजवल्यावर सरांनीच दार उघडून त्याला आत घेतले आणि खुर्चीवर बसायला सांगितले.... ते स्वतः समोर सोफ्यावर बसले....


   "बोला विशालसर..... मला कल्पना होतीच तुम्ही भेटायला येणार म्हणून....."


    विशाल सरांकडे पाहत कसनुसा हसला.....

    

   "असे का केलेत सर तुम्ही? माझ्यानंतर लागलेल्या दिनेशचे काम केलेत आणि माझे नाही.,.. आमची कास्टही एकच आहे..... तो बसत होता ग्रँटमध्ये.... मग मी का नाही?"विशाल अश्रू थोपवत म्हणाला...


    "विशाल सर,... दिनेश सर आणि तुमच्यात चांगली मैत्री आहे हे माहिती आहे मला.... मला दोघेही सारखेच.... तुम्हा दोघांपैकी एकाचेच काम होऊ शकत होते.."


   "मग सर मला का डावलले तुम्ही? मी तुम्हाला जमतील तसे पैसेही द्यायला तयार होतो.... तरी तुम्ही माझा पत्ता कट करून दिनेशचे काम केलेत?"


    "काय बोलता विशाल सर तुम्ही? तुम्हाला तुमच्या मित्राने काहीच सांगितलेले दिसत नाही?"


    "सर त्यांचा काय संबंध इथे?"


    "विशाल सर, तुम्ही फार साधे आहात. लगेच विश्वास ठेवता कुणावरही.. .. अहो, तुमचे मित्र दिनेश सर कितीतरी वेळा भेटले मला...... मी त्यांचे काम करावे म्हणून..... मी त्यांना स्पष्ट सांगितले होते की दोघांपैकी एकाचेचं काम करू शकतो मी... कारण तुमच्या कास्टची एकच जागा आहे... त्यावर त्यांनी मला सांगितले की विशाल सर देतील त्यापेक्षा एक लाख रुपये जास्त देईल मी शाळेसाठी..... शिवाय साहेबांनाही खूश करीन.... त्यांनी तर साहेबांना भेटूनही सांगितले होते तसे..... आता तुम्हीच सांगा सर.... प्रत्येकजण स्वतःचा फायदा बघत असतो... मी ही पाहिला....."


    विशाल सुन्न होऊन ऐकत होता.... त्याचा तर विश्र्वासच बसत नव्हता, ज्याला तो आपला चांगला मित्र म्हणत होता... आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगत होता.... त्यानेच त्याचा घात केला होता..... पाठीत सूरा खुपसला होता अगदी गोड बोलून..... त्याला कळूही न देता....


    देवाने पृथ्वीवर तयार केलेलं सुंदर नात म्हणजे मैत्री..... नितळ, निस्वार्थ, निर्व्याज, निरपेक्ष... पण जर कोणी त्याच मैत्रीच्या आडून दगा दिला तर ते दुःख जगातल्या साऱ्या दुःखापेक्षा असह्य असतं...

   अशा वेळी विश्वास तरी कुणावर ठेवावा????


Rate this content
Log in

More marathi story from Archu Patil

Similar marathi story from Tragedy