JAGDISH SANSARE

Comedy

3  

JAGDISH SANSARE

Comedy

बोई...बोई...

बोई...बोई...

3 mins
204


'नकर्त्याचा वार शनिवार' ही लोकोक्ती उत्तमला जराही मान्य नव्हती. सोमवार पासून शुक्रवार पर्यंतचे शनिवारी एका दिवसात हातावेगळे करण्याचा उत्तमचा हातखंडा होता. तसे याचे कारणही तसेच होते, शनिवारी सूर्यच मुळात उर्जेचा एक वेगळा स्त्रोत घेऊन उगवत असे. उत्तमसाठी शनिवार म्हणजे मंडणगडला आईला भेटायला जायचा दिवस! शनिवारी रात्री आईच्या हातचे गरमागरम जेवायचे, मुंबईत कामाला लागल्यापासून गेली दहा वर्षांची ही परंपरा उत्तमने बाराही महिने पाळत होता.संध्याकाळी बरोबर पाच वाजता कार्यालयातून उत्तम बाहेर पडून साडे पाचची मुंबई -मंडणगड गाडी पकडत असे. 

     

उत्तमला तसा लालपरीचा प्रवास आवडत नसे. कधीतरी एखादी लाल परी बाजुला येऊन बसेल अशी अपेक्षा बाळगून तो प्रवास करत असे आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे मंडणगडला जायला एस. टी. शिवाय पर्याय नाही. आपल्या बाजूला एखादी सुंदर, आकर्षक अर्थात वयाने कोवळी मुलगी येऊन बसावी, अशी जवळपास प्रत्येक पुरुषाची इच्छा असते. काही पुरुष सरळ सरळ मान्य करतात काहींना मात्र ताकाला जाऊन भांड लपविण्याची सवय असते. प्रत्येकाच्या कमीअधिक प्रमाणात असणारे हे भाव लपविण्याची उत्तमला कधीच गरज वाटली नाही. आपल्या बाजूला एखादी तरुणी बसावी, असे उत्तमला मनोमन वाटायचे! 

   

आसन आरक्षित करून मगच प्रवास करणे हाच शिरस्ता उत्तमने अनेक वर्षे पाळला होता. तसे यात फार काही कौतुक नव्हते. उत्तम एकटाच असून आरक्षण मात्र दोन आसनांचे! एक मंडणगड आणि एक रामवाडीपर्यंत! रामवाडीपर्यंत एकदा कोणी बसले की नंतर कोण कशाला उठवणार! शिवाय दोन्ही तिकिटे मंडणगडची काढल्यास जास्त पैसे खर्च करावे लागले असते. उत्तमचा व्यवहारी स्वभाव कधीकधी त्याला साथ देत असे. ही खरी गंमतीशीर घटना सलग दहा वर्षांपासून लालपरीच्या इतिहासात घडत होती. अर्थात त्या निर्जीव परीला याच्याशी काहीही देणेघेणे नव्हते. ती इमानेइतबारे उत्तमला बसवून आचकेबिचके देत दोनशे सहा हाडांचा खुळखुळा करून मंडणगडला पोचवत असे. उत्तमच्या बाजुला परी बसते की एखादा दाणगट येऊन बसतोय याचे त्या बिचाऱ्या परीला काय करायचे? लालपरीच्या वाहकाला मात्र उत्तम कधी येतो याची उत्सुकता शिगेला पोचलेली असायची! उत्तमला मुंबई सेंट्रल स्थानकात प्रत्येक चालकवाहक ओळखत असे. मुंबई -मंडणगड गाडीवर कर्तव्य बजावत असणाऱ्या चालकवाहक उत्तमने आणलेली सुकीभेळ खाल्ल्याशिवाय गाडीच सोडत नसतं! गाडीचा वाहक उत्तम गाडीकडे येताच, "या, या दानवीर कर्ण!" असे म्हणून स्वागत करीत असे. मग उत्तमसुद्धा एखाद्या कसलेल्या सावकारासारखा गाडीच्या पायऱ्या चढून रुबाबात आपल्या दुहेरी आसनावर आसनस्थ होत असे. दर शनिवारी लालपरीच्या खात्यात आरक्षित आसन करून रक्कम जमा करणारा उत्तम हा एकमेव दाता आहे. 


दर शनिवारी कोणत्या ना कोणत्या सहप्रवाशाबरोबर त्या रिकाम्या आसनावरून कडाक्याचे भांडण होत असे. पण विजय मात्र उत्तमचाच! त्याच्या हातात हुकूमाचा एक्का अर्थात आरक्षित तिकीट असे. चरफडणे, शिव्या शाप देणे, या पलीकडे जाऊन सहप्रवासी दुसरे काहीच करू शकत नसत. वाहक खाल्ल्या भेळेला जागून उत्तमच्या बाजूने कौल देत असे. काहीवेळा एखादा वृद्ध सहप्रवासी विनंती करत असे. "माझा मित्र पनवेलपर्यंत कुठेही चढला तर तुम्हाला उठावे लागेल." या बोलीवर बिचाऱ्या इसमाला जागा मिळत असे. 


    रिकामी जागा बघून प्रत्येक प्रवासी तेथे बसण्याचा विचार करत असे. आरक्षित आहे, असे सांगून उत्तम प्रत्येकाचा पोपट करत असे. अखेरीस उत्तमची प्रतिक्षा फळाला आली. शाल लपेटलेली एक नाजूक देखणी तरुणी गाडीत शिरली. गाडी पूर्ण भरलेली असल्याने ती आपल्या बाजूला बसणार याची उत्तमला खात्री पटली खात्री.तिच्या थोडे आधी चढलेल्या इसमाला पण त्याने सहज उडवून लावले होते. ती बसताच..... गाडी सुरू झाली. 


     आता हिला बोलते कसे करावे? उत्तम विचार करत असताना 'ती' मळमळल्यासारखे करू लागली. उत्तमला आयती संधी चालून आली. 'खिडकी जवळ बसताय का?' उत्तमच्या प्रश्नावर 'ती' मान हलवून हो म्हणाली. जागा बदलल्या. पुन्हा मळमळ! आता मात्र शेजारी उभा असलेला इसम उत्तमने प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी म्हणाला, "अहो, ती माझी बायको आहे. ती गरोदर आहे." पुढच्या विनंतीने तर उत्तम त्रिफळाचीत झाला.


"तिला बरे वाटे पर्यंत मी बसू का? "


संपूर्ण गाडीत हास्याचे कारंजे उडाले. मागून आवाज आला 'बोई बोई बम्ब बम्ब बोई...'


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy