बंधन
बंधन
आई बाबांना आज आत्याकडे जायचे होते , ते सकाळी जावून रात्रीपर्यंत परत येणार होते . त्यांना सकाळी सात वाजता स्टेशन वर सोडून राजू ऑफिसला जायला निघाला .
चौकामध्ये सिग्नल लागला तसा तो थांबला . दुसऱ्या कोपऱ्यावर कसली तरी गडबड चालू होती ते त्याने पाहिले .एक माणूस एका भिकारी बाईला मारत होता , ती जोरजोरात मदतीसाठी ओरडत होती . बघणारे फक्त बघ्याची भूमिका निभावत होते , कोणीही मदतीला जायला धजावत नव्हते , तोपर्यंत सिग्नल सुटला तसा राजू निघाला .थोडे पुढे गेला पण त्याच्या मनात आलं , हा माणूस त्या बाईला मारून निघून जाईन , तिचे पुढे काय होईल , कोण बघणार ? त्याच्या मनाला हे असं फक्त बघून निघून जाणं पटेना .आपण काहीतरी करायला हवं आहे असं त्याला मनापासुन वाटायला लागलं .
आज एका असहाय स्त्रीला कोणाच्या तरी मदतीची गरज होती आणि आजही काही केलं नाही तर पुन्हा भूतकाळाची पुनरावृत्ती होणार या विचाराने तो अस्वस्थ झाला ,
त्याला जाणवले सरुला आपण न्याय नाही देवू शकलो कारण तेव्हा आपल्या हातात काही नव्हते पण आज मी हतबल नाही .आज मी जर त्या स्त्रीला मदत केली तर माझ्या सरुला माझा नक्कीच अभिमान वाटेल .तिचा आत्मा नक्कीच शांत होईल .
या विचारात राजू तसाच गाडी वळवून जिथे ही सगळी गडबड चालू होती तिथे आला .तो माणूस अजूनही त्या भिकरणीला मारतच होता .राजुने त्याचा हात पकडला आणि त्याला मागे ढकलले , तसा तो अजून जोरात राजुच्या अंगावर धावून आला , आता मात्र बघणारे मध्ये पडले आणि त्यांनी त्या माणसाला पकडले .
"तू कोण मध्ये पडणारा ? तुझी कोण लागते ही म्हणून तुला एवढा पाघळ येतोय हीचा ? भिकारी *** ! माजोरी आहे ही .मदत म्हणून हिला पैसे दिले तर फेकले माझ्या अंगावर ." तो माणूस स्वतःला त्या माणसाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत बोलत होता .
राजू आणि इतर लोकांना काय झाले असेल त्याचा अंदाज आला . मग त्यांनी तिथेच खाली पडलेल्या १००/- च्या दोन नोटा उचलून त्याच्या खिशात कोंबल्या आणि त्याला जायला सांगितले . ती बाई भेदरून , अंग चोरुन एका बाजूला रडत बसलेली . तो माणूस तिला शिव्या देत , तिच्याकडे रागाने बघत तिथून निघून गेला तसा तिथे जमलेल्या इतर माणसांचा जमाव पण पांगला .
राजू तिला म्हणाला , " चल माझ्या सोबत . "
ती अंग चोरून घेत अजून घाबरून मानेनेच नाही म्हणाली .
राजू तिला म्हणाला , " ताई , घाबरु नको , चल माझ्या सोबत . मी तुला काही करणार नाही , विश्वास ठेव माझ्यावर ."
राजुने तिला ताई म्हणल्यावर तिची भीती जरा कमी झाली . ती त्याच्यासोबत निघाली . गाडीत बसवून राजू तिला घेवून घरी आला . घरात आल्यावर ती तिथेच काही न बोलता खाली बसली . राजुने तिला पाणी आणून दिले .
पाणी पिऊन ती घर न्याहाळत होती . तिच्या मनात विचार आला , " घरात तर कोणी दिसत नाही , गोड बोलून हा पण मला फसवणार असच वाटतंय , सावध राहायला हवं . ह्या लोकांचा काही भरवसा नाही . " तेवढ्यात राजू चहाचा कप आणि बिस्कीट घेवून आला . तिला चहा आणि बिस्कीट खायला लावले त्याने आणि तो तिथेच सोफ्यावर तिचे निरीक्षण करत होता .
ती रडताना जेव्हा डोळे पुसत होती तेव्हा अश्रूंनी तिच्या चेहऱ्यावरचा काळा कळप पुसून काढला होता .जागजागी तिचा मूळचा गोरा रंग उघडा पडला होता . तिचं वय २५-३० च्या आसपास वाटत होतं .शरीराने पण बऱ्यापैकी ठीकठाक दिसत होती . का असा काळा रंग लावून घेतला असावा हिने ?
ती अशी सहज बोलणार नाही , असे त्याला वाटले .म्हणून मग तो म्हणाला , " ताई जा आतल्या रूममध्ये आणि गरम पाण्याने अंघोळ कर , म्हणजे तुला कुठे मार लागला असेल तर गरम पाण्याने जरा शेक मिळेल ."
ती मानेनेच नकार देत ,उठून बाहेर जायला लागली . तसे तिला थांबवत राजू म्हणाला ," ताई जायचंच असेल तर जा , तुला माझीही भीती वाटत असेल .बरोबरच आहे ! तुला माझा विश्वास का वाटावं ? पण फक्त एकदा आरश्यात स्वतःचा चेहरा बघ आणि तुझा गोरा रंग झाकायला तू जे काही लावतेस ना, ते जरा तोंडाला परत एकदा नीट लावून घे आणि मग जा ." ती घाबरली . समोर आरश्यात स्वतःला बघत तिने चेहरा झाकून घेतला . परत रडायला लागली .
राजुने तिला समोरच्या रुमकडे बोट दाखवत तिकडे जायला सांगितले . ती उठून मागे वळून बघत रुमकडे जायला निघाली . चेहऱ्यावरची भीती अजून गडद होत होती . आता ह्याचे ऐकण्याशिवाय दुसरा मार्ग नाही असे तिच्या मनात आले . पण स्वतःला कसे जपायचे हे तिला अनुभवाने चांगले अवगत झाले होते . " आता जाऊ दे , जे होईल ते होईल ." असा विचार करून ती आत गेली तसा राजू तिला म्हणाला ,
" ताई दाराला आतून कडी लावून घे म्हणजे तुला काळजी नाही आणि आत कपाटात वरच्या बाजूला एक निळ्या रंगाची साडी आहे त्यासोबत त्याच्यावरचे कपडे आहेत ते घे . आवरलं की ये बाहेर ."
तिला जरा हायसे वाटले पण मनातली भीती अजूनही होतीच .तिलाही कळेना की हा अनोळखी माणूस माझी एवढी का काळजी करतोय ? राजू तिला मागच्या आठ दिवसांपासून त्याचं सिग्नलच्या जवळपास बसलेली बघत होता. शेजारीच असलेल्या झाडाच्या सावलीत ती दिवसभर बसून राहायची . भिरभिरती नजर आणि तोंडाने हळूहळू चालणारी असंबंध बडबड तिच्या वेडसर पणाची कल्पना देत होती . ती बसलेल्या जागी कोणी खायला टाकून जायचे तर कोणी पैसे टाकायचे . खायला टाकलेलं ती रस्त्यावर जनावर दिसलं की देवून टाकायची पण पैसे मात्र घ्यायची .बहुतेक कुठेतरी जावून काही खात असावी .
तो विचारातच होता तोवर ती दार उघडून बाहेर आली .राजू तिच्याकडे बघतच राहिला . तिचा तो मघाशी दिसणारा काळा कलप आता सर्वांगावरून पार धुवून निघाला होता . ती खरंच खूप सुंदर दिसत होती . धुतलेले मोकळे केस तिच्या पाठीवर खालपर्यंत रुळत होते .स्वतःला सावरुन राजू तिच्या साठी जेवणाचे ताट घेवून आला . सकाळी आई बनवून गेली होती त्याच्यासाठी .
आता मात्र तिची भीती जावून ती जरा विश्वासाने सावरली .जेवण करून मनोमन समाधानी झाली . किती महिन्याने ती असं घरचं जेवण करत होती. तिचा अंदाज घेत राजू तिला म्हणाला , " आता कसं वाटतं आहे तुला ? "
ती हात जोडत म्हणाली ," काय बोलू मी ? एवढं कोणी करत नाही कोणासाठी . तुमचे खुप उपकार राहतील माझ्यावर कायम ."
राजू तिचा आवाज ऐकून चकित झाला , ती ज्या ठामपणे बोलत होती त्यावरून ती वेडी नक्कीच नव्हती .
त्याची विस्मयचकित अवस्था बघून तिच्या लक्षात आले .ती स्वतःहून म्हणाली , " मी वेडी नाही ."
राजू तिला म्हणाला , " एवढं सगळं नीट असताना हे नाटक का करत आहात ?"
ती हसली . म्हणाली ," नाटक नाही करणार तर अजून काय करणार ? एकट्या स्त्रीला स्वतःची अब्रू जपून जगणं शक्य आहे का या जगात ?"
राजू तिला म्हणाला ," पण हे सगळं नाटक कश्यासाठी ? कोण आहात तुम्ही ? इथे कश्या ?"
" सांगते सारं काही . तुम्ही खरंच खूप चांगले आहात . माझ्या असहायतेचा फायदा नाही घेतला तुम्ही . त्यामुळे मला आता आशा वाटते आहे की तुम्ही मला काहीतरी आधार आणि काम मिळवून द्याल ! " ती राजूकडे बघत निर्धाराने म्हणाली.
(क्रमशः)