Savita Tupe

Tragedy

4  

Savita Tupe

Tragedy

बंधन !

बंधन !

5 mins
353


  " माझं नाव रुपाली धनाजी पाटील . मी आटपाडी गावाची आहे . शिक्षण १२ वी . वय २३ . आई वडील छोटा भाऊ . असं छोटंसं कुटुंब , पण ...... " ती जरावेळ शांत झाली .चेहऱ्यावर दुःखी वेदना तरळून गेली .  

   एक दिर्घ उसासा सोडून , शून्यात नजर लावून परत बोलू लागली ......

" पण आता एकटीच ...."

 राजू तिच्याकडे काही न कळून आश्चर्याने बघत राहिला .

    " घरची दोन एकर शेती .शेतातून थोडेफार निघायचे तेही ह्या अवकाळी पावसाने बऱ्याच वेळा हिरावून घेतले .घर खर्च आणि शेतासाठी अधून मधून पाटलांकडून मग वडील वरचेवर व्याजाने पैसे घ्यायचे .व्याज भरून भरूनच वडील थकून जायचे . वडील पार कर्जबाजारी झालेले .कर्ज फिटेना तेव्हा गावच्या पाटलाने फसवून अंगठा घेतला आणि सगळी जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली .पण तो तेवढ्यावर समाधानी नव्हता त्याची नजर माझ्यावर होती . वडिलांना म्हणाला ,  

 " पोरीला पाठव मग तुझं तुला सगळं परत करतो . वडील रागाने त्यांच्यावर थुंकले आणि बाहेरचा रस्ता दाखवत त्यांना म्हणाले ,   

     "जीव गेला तरी तूझ्या पुढे भिक नाही मागणार . "

 दोघांमध्ये खुप बाचाबाची झाली .गावकरी मध्ये पडले तेव्हा हे भांडण थांबले . सगळ्यांसमोर अपमान झाला म्हणून पाटील अजून चिडला .

   त्याने त्याच रात्री सगळीकडे सामसूम झाल्यावर घरी तगडी माणसे पाठवली .आम्हाला काही कळायच्या आत त्यांनी घरात घुसून आई वडील आणि भावाला हातपाय आणि तोंड बांधून एका घरात बंद केले , बाहेरून कडी लावून घेतली . माझे पण हात पण बांधून तोंडाला कसला तरी वास देवून मला बेशुध्द केलं ."

  " मी शुध्दीवर आले तेव्हा मला लक्षात आले की पाटलानेच त्याचा डाव साधला आहे . त्याच्या माणसांनी मला त्याच्याच शेतातल्या घरात आणून ठेवले होते . हे घर गावापासून खुप एकांती असे होते .त्या बाजूला सहसा कोणी फिरकत नव्हते ."

   " बांधल्यामुळे मला काही हालचाल करता येईना .मी तशीच प्रयत्न करत राहिले स्वतःला सोडवण्यासाठी .एक दोन दिवस तिकडे कोणी फिरकल नव्हतं .मला बाहेर कोणाचाही आवाज येत नव्हता की कोणाची हालचाल जाणवत नव्हती ."

    अखेर शेवटी माझ्या प्रयत्नांना यश आले आणि मी स्वतःला सोडवले . बाहेरचा अंदाज घेत रात्र होईपर्यंत तिथेच थांबले ."

   " रात्र झाल्यावर मी तिथून खिडकीतून बाहेर पडले . शेतातून लपत छपत मी घराजवळ पोहोचले . तिथे घर नव्हते , जाळून खाक झालेला राखेचा ठिगारा तेवढा शिल्लक होता . मला समोरच दृश्य बघून चक्कर आली , आधीच तीन दिवस पोटात काहीच नव्हते आणि त्यात हे असं सामोरं आलं होतं ."

   मी जरावेळ तिथे थांबून पुन्हा कोणाच्या नजरेसमोर न येता , तशीच लपत दुसऱ्या गल्लीतल्या वडीलांच्या मित्राच्या घरी गेले . "

   " मला बघून ते पहिले घाबरले , मग मला आत घेत त्यांनी दार बंद करून घेत ,आतल्या घरात घेवून गेले . "

    " रूपा अग तू इथ कशी काय ? " त्यांना मी सांगितलं आणि आई वडिलांची चौकशी केली .त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून माझ्यातले अवसान गळून गेले , "

  " घराला आग लावून घेत सगळ्यांनी त्यात आत्महत्या केली . त्यात मी सुध्दा जळाले असाच सगळ्यांचा समज होता .पण मला पाहून काका आणि काकू घाबरले होते .त्यांनाही सगळा प्रकार लक्षात आला .पण मला आता तिथे थांबणे शक्य नव्हते .पाटील उद्या परवा शेतातल्या घरी गेला असता आणि मी नाही असे लक्षात आल्यावर त्याने पहिले काकांचेच घर गाठले असते . माझ्यामुळे आता त्यांना त्रास नको म्हणून मी त्याच रात्री गाव सोडले .स्वतःला लपविण्यासाठी मग ह्या काळया रंगाची मदत झाली . कॉलेज मध्ये नाटकात भाग घेताना त्यातली काही पात्र रंगवताना असा रंग आम्ही साऱ्या अंगाला लावून घ्यायचो . मला ते आठवले . गावात माझ्या मैत्रिणीकडे जावून , तिला सगळ सांगून मी तो रंग घेतला आणि इथे या शहरात आले . बरेच अनुभव आले ह्या ८ दिवसात . " 

  माणसांची नियत सुध्दा अनुभवली .त्यातलाच आजचा एक प्रकार .कातडी कशीही असुदे पण आपला कार्यभाग साधायला माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो हे मी खूपदा अनुभवलं ह्या दिवसात . अनुभवातून शहाणी होत गेले . "

  " स्त्रीला जोवर कोणाचा आधार मिळत नाही तोवर तिचं एकटीने जगणं अगदी अशक्यच आहे ह्या वासनाधिन जगात . तुमच्या सारखी देवमाणसं भेटायला खरंच नशीबच लागतं ."

राजू तिला थांबवत म्हणाला , " असे काही नाही . कोणा असहाय व्यक्तीला मदत करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे .मी काही वेगळं केलं नाही मग त्याला देवपण कसे काय म्हणता ? "

 रूपा हसली , म्हणाली , " ज्याच्यावर वेळ येते ना त्यालाच कळते . माझ्यासाठी तर तुम्ही देव माणूस आहात . "

     ती पुढे सांगू लागली ," इथे आले आणि रोज फक्त हाच विचार करत राहिले , पुढे काय करू ? कुठे जाऊ ? देवाला प्रार्थना करत होते काहीतरी मार्ग दाखव .!"

  " देव आहे आणि तो कोणत्या ना कोणत्या रूपात येवून तुम्हाला नक्की मदत करतो याची मला खात्री होती . तो माझा बाप्पा आज मला तुमच्या रूपाने भेटला ."

   " मला आता फक्त योग्य मार्ग दाखवा .कुठे महिलांसाठी वसतिगृह असेल तर मला तिथे नेऊन सोडा . माझ्यावर अजून एवढेच उपकार करा . मी कायम तुमची खुप खूप ऋणी राहीन ."

   राजू निःशब्द होवून सारं काही ऐकत होता . त्याला काय बोलू कळेना . 

 " कुठलं दिव्य पार पाडून आली आहे ही ? " 

त्याच्याही नकळत त्याचे डोळे भरून आले .

  " ही नियती कोणाला काय भोगायला लावेल सांगू शकत नाही . काय करावं अश्या निरागस मुलीने अशी वेळ आल्यावर ? जर दैवच असे एखाद्याला निराधार करून ठेवत असेल , तर कोणाचा आधार घ्यावा अश्या अभागी माणसांनी ? "

  राजू तिला म्हणाला ," ठीक आहे , बघू आपण काहीतरी मार्ग काढू . आत्ता तू जरा आराम कर , संध्याकाळी माझे आईबाबा येतील , मग आपण ठरवू काय ते ."

   रूपा त्याला म्हणाली , " म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात तर ! "

" नाही , आई बाबा सुध्दा आहेत . ते आजच गावाला गेले आहेत आणि संध्याकाळ पर्यंत येतील परत ." राजू तिला म्हणाला .

   ती घराचे निरीक्षण करत होती तेव्हा तिला भिंतीवर सरूचा हार घातलेला फोटो दिसला .

 तिने घाबरतच राजुला विचारले , 

" एक विचारू ? ह्या कोण आहेत ? "

 राजुला काय वाटले कोणास ठाऊक पण त्याला तिच्यापासून काही लपवावंस वाटलं नाही , अश्या अनोळखी मुलीला काही सांगायची गरज नव्हती पण त्याला तिच्याबद्दल तो परकेपणा जाणवलाच नाही . त्याच्याही नकळत तो तिला सारं काही घडलेलं सांगून मोकळा झाला .....

   दोन अभागी अन् काही ना काही गमावलेले जीव . सुख दुःखाच्या वाटेवर नकळत एकत्र आले .....

    हा निव्वळ योगायोग होता की नियतीच्या मनाने जोडणारे कुठले नवे बंधन घेवून एकत्र आले होते ???

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy