बंधन
बंधन
"राजू मला वाचव ! खूप आग होतीए रे साऱ्या अंगाची ,पाणी टाक ना अंगावर , नाही सहन होत रे , देवा , सोडव रे आता या नरकातून, राजू , राजू .... "
राजू धडपडून उठला. घड्याळ पाहिले , पहाटेचे ४ वाजत आले होते . सगळे अंग घामाने भिजले होते त्याचे . तो तसाच डोके धरून बसला . जरावेळ गेला मग उठला आणि ग्लासात पाणी घेवून घटघट पिला .परत येवून बेडवर आडवा झाला .
अधून मधून सतत पडणारे हे स्वप्न त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हते . मनात खोलवर रुजलेले हे भयानक सत्य तो स्वप्नातही सतत बघायचा .पहिल्यांदा तो घाबरायचा , पण आता त्याला भीती वाटेनाशी झाली होती .
म्हणतात ना , प्रत्येक गोष्ट सहजासहजी नाही विसरता येत , त्यासाठी काळ जाऊ द्यावा लागतो . काळासोबत त्या घटना हळूहळू पुसट होत जातात , त्या त्रासदायक गोष्टींचा विसर पडत जातो ,त्यातली ती जीवघेणी वेदना पण संपत जाते . पण आठवणींच्या रूपाने हृदयात खोलवर रुजली जाते आणि मग अधून मधून स्वप्नांमध्ये डोकावत राहते .अगदी तसंच राजूचे झाले होते .
सरूची आठवण येवून त्याचे डोळे भरून आले . तिने असे करायला नको होते , पण त्याच्या हातात काय होते ? तो काही निर्णय घेवू शकेन एवढा मोठा पण नव्हता . पण सरुला जर तिच्या मनाविरुद्ध सासरी पाठवले नसते तर आज कदाचित ती जिवंत राहिली असती. तिला साथ देवून आई बाबांना थोडंसं समजावलं असतं तर ही वेळ आली नसती .
त्यावेळी त्याचं वय लहान असल्याने , त्याचं कोणीही ऐकलं नसतं .
जे विधिलिखित होतं त्याप्रमाणे घडणारच होतं .
स्वतःला अथवा दुसऱ्याला दोष देवून काही उपयोग नसतो .घडणारी घटना घडून जाते अन् नंतर फक्त जर तर च्या चक्रव्यूहात मन गुरफटत राहते .
सरला , राजूची एकुलती एक मोठी विवाहित बहिण . स्वभावाने खुप साधी , सरळ अशी होती . दीडच वर्ष झाले होते लग्नाला .सासूचा मुलावर जरा जास्तच जीव . काही झालं की , दोघा नवरा बायको मध्ये त्या सतत हस्तक्षेप करायच्या .या कारणामुळे त्यांच्यात सतत भांडणे होत राहायची .
सासरी भांडणं झाली की सरू सारखी माहेरी यायची आणि परत जायचं नाही म्हणायची . मग दोन्ही घरातली मोठी माणसे एकत्र येवून , दोघांना समजावून सांगत परत सरुला सासरी नांदायला पाठवायचे .हे असे नेहमीच होत होते .दर वेळी सरू जायला नको म्हणायची . वैतागली होती ती या साऱ्या प्रकाराला पण घरचे तिला तिच्या मनाविरुद्ध बळच पाठवायचे .
नवऱ्याचे घर हेच , लग्न झालेल्या मुलीचे हक्काचे घर असते , लग्नानंतर माहेरची पाहुणी असते .चार दिवस माहेराला यायचे आणि पाहुणचार घेवून परतायचे .असा पगडा असलेला समाज मुलीच्या मनाचा मात्र विचार करत नव्हता .
राखी पौर्णिमेला राजू सरुकडे निघाला होता . सरूच्या घरी त्यादिवशी सकाळीच दोघा नवरा बायकोची खुप भांडणे झालेली . भांडणे झाल्यावर तिचे सासू सासरे वैतागून जवळ राहणाऱ्या मुलीकडे निघून गेले आणि नवरा पण रागाने बाहेर निघून गेला होता .राजू घरी पोहोेचेपर्यंत तिथे वेगळीच घटना घडली होती .
घरात एकट्या पडलेल्या सरूने रागात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते , जेव्हा तिला आगीने भाजायला लागले तशी ती जोरजोरात ओरडायला लागली . तिचा नवरा आणि सासू सासऱ्यांना कोणीतरी बोलावून आणले , राजुही तिथे नुकताच पोहोचला होता . . राजुसहीत ते सुध्दा घाबरले होते ह्या प्रकाराने .
आजूबाजूचे जमलेले लोक आणि सरूचा नवरा , सासरा बाहेरून दार तोडायचा प्रयत्न करत होते , सरूला आतून दार उघड म्हणून घाबरून आवाज देत होते .पण तिला काही कळत नव्हते , शेवटी दार तोडून सगळे आता गेले , नवऱ्याने घरातली रग घेवून तिच्या अंगावर झेप घेवून तिला मिठी मारली , त्याला इतरांनी बाजूला ओढला , तेवढ्याने सुध्दा तो जरासा भाजला .
बायकांचा आक्रोश आणि सगळ्यांचा आरडा ओरडा ,त्यामुळे कुणाला काही सुधरेना .
राजू आणि सरूचा नवरा , दोघांनी तिच्या अंगावर खुप चादरी टाकून तिची आग विझविण्यासाठी बरेच प्रयत्न केले . पण तोपर्यंत सरू खूपच भाजली होती . कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलावली .
सरू राजूला वेदनेने तरफडत म्हणत होती ,
" वाचव मला राजू , खुप आग होते आहे , पाणी टाक अंगावर , राजू मला वाचव ."
राजुला काय बोलू ? काय करू ? समजत नव्हते ,
तो तिला रडत रडत फक्त एवढंच बोलू शकला
" का असं केलंस सरू तू ? "
सरू ८५% भाजली होती . नाही वाचली त्यातून .दोन महिन्यांची गरोदर होती . असा प्रकार करताना तिने जन्माला येणाऱ्या कोवळ्या जीवाचा पण विचार नाही केला .स्वतःसोबत त्याचेही आयुष्य संपवले .
पोलिस केस झाली .तशीच मिटली सुध्दा.
आई वडील पार कोसळले या साऱ्या प्रकारामध्ये . एकुलती एक लेक अशी मध्येच जीवन संपवून गेली . हा धक्का सहन होण्या पलीकडे होता .ह्या घटनेला ४ वर्ष होवून गेले होते पण राजुला सतत पडणाऱ्या ह्या स्वप्नामुळे मात्र ते विसरणे अवघड झाले होते.
येणारा प्रत्येक जीव एक ना एक दिवस जाणार आहे, हे सत्य असेल तरी असे अवकाळी मरण सगळ्यांच्या जीवाला चटका लावून जाते .
जाणारा त्याचे आयुष्य संपवून निघून जातो. मागे उरलेले जवळचे मात्र त्याची उणीव नाही भरून काढू शकत.
