भयभीत भाग -३ (अंतिम भाग )
भयभीत भाग -३ (अंतिम भाग )
शेवटचा भाग -
प्रवीण . . प्रवीण हाच तो. . !"
प्रवीण ने शर्टच्या बाह्या वर केल्या , मीनल ला मागे होण्याचा इशारा केला आणि त्या माणसाकडे तत्परतेने
वळला.
क्रमशः
कथा पुढे -
भाग ५
"काय रे काय लावलंय? काय
बोललास आत्ता?"
" नवा यार का ? असं बोललो ! हो बोललो ना ! भीss त नाही मी कुणाला ! रोज एकाबरोबर फिरती ही पोरगी. कधी गाडीवर कधी मोटारीतून !
मी बोलन, जे खरंय ते ! तुला काय रं !"
"ए ss ए ss " प्रवीण जोरात ओरडला
आणि त्याची कॉलर धरली.
"हात काढ आधी! तुमचे चाळे बघायलो ना तेव्हापासून . तुमचं जुनं लफडं हाय केव्हापासून ! मी काढली ना माहिती सगळी!" तो गलिच्छ स्वरात बोलला.
आता मात्र प्रवीणचा तोल सुटला. आणि त्याने माणसाला एक लगावली.
त्या माणसाने प्रवीणला झापड मारण्याचा प्रयत्न केला पण तो चपळतेने दूर सरकला.
"आता कारे यार . . . हात उचलतो. तिला बोललो तर तुला का झोंबलं ? कोण रे तू तिचा?"
मीनल मात्र रडायलाच लागली.
" तसं काही नाही हो काका. ते मित्र आहेत माझे! त्यांच लग्न ठरलंय !"
"चुप गं मीनल !. . . या फाल्तु माणसाला काय काका- काका बोलतीयस?" प्रवीण वैतागला.
"बोल रे तू ? का त्रास देतोयस हिला? बोल !" प्रवीण पुन्हा धावून गेला त्याच्यावर. तो सावधच होता.
त्याने प्रवीणचा हात घट्ट धरला आणि मीनलकडे बघून म्हणाला-
- " त्याचं ठरलं असन गं लगीन पण तुझं कसं होऊ देईन मी ? मी हाय ना बघतोच ! त्या बेर्डेची भाची ना गं तू. . ? नाई साल्याला चार चौघात मान खाली घालायला लावली तर नावाचा लकडे नाय?"
प्रवीण ला जोरात मागे लोटून त्याने सायकल हातात पकडली. आणि प्रवीण कडे बोट दाखवून म्हणाला-
" यारा थप्पड लई महाग पडन बरं तुला अन् तिला बी. . . . दोघाल बी बघून घेईन!"
"जा रे! बघून घे! तुझ्यासारखे छप्पन्न बघितलेत . जा काय करायचं कर जा!"
" प्रवीण प्लीज!" मीनल त्याला थांबवत होती.
" भेटू लवकरच! घरी कधी यायचं सांग!"
असं मीनल ला म्हणून त्यांने घंटी वाजवली आणि सायकला टांग मारून निघून गेला .
अदृश्य झाला ,अंधारात !
आता मात्र मीनल खूपच घाबरली , ती प्रवीणला बिलगून रडायलाच लागली.
" अरे हे काय झालं ? आता घरी कसं जाऊ मी ? तो माणूस घरी जाऊन काहीही सांगेल ?! प्रवीण मला खूप भीती वाटतेय!"
प्रवीण ने तिला धीर दिला, " हे बघ काही झालं नाही तू काय भीतेस. असले धमकी देणारे लांडगे खूप पाहिलेत मी ! तू शांत हो पाहू ! मी येतोय घरी . चला, मामांशी बोलतो आणि सगळं स्पष्ट सांगतो! अगं हे तुझ्याशी संबंधित नाहीच आहे .
याचा संबंध मामांच्या ऑफिसात आहे.
मला लक्षात आलंय, ही काहीतरी दुश्मनी आहे त्याची! तू काळजी करू नकोस!"
"नाही प्रवीण तू घरी येऊ नकोस, तो तुझ्याबद्दल काहीही बोलतोय आणि अशी मी आहे कारे ? याच्या भीतीपोटीच मी या दरम्यान कधी रोहन, अनिकेत, सुकेश नाही तर आमच्या सरांसोबत घरी येत होते रे ! तो काय- काय बोलतोय माझ्या चारित्र्याबद्दल?!"
"मीनल प्लीज़ शांत हो . चल."
प्रवीण मीनलला सोडायला घरी आला पण मामा - मामींशी इकडचा तिकडचा विषय काढून बोलत राहिला.
मीनल मात्र मनात भयभीत असूनही वरून काही दाखवत नव्हती .
दुसऱ्या दिवशी मीनलने सुट्टी टाकली!
ती ऑफिसला व क्लासला गेली नाही.
पुन्हा जोडून दोन-तीन दिवस सुट्टया होत्या म्हणून ती गावी आई -बाबांकडे गेली.
तिथे छान रिलॅक्स झाली आणि फ्रेश मूडमध्ये परत आली .
गावाहून परतल्यावर पहिल्या दिवशी ऑफिसातून ती मैत्रिणीबरोबर घरी आली , त्यामुळे हे सर्व विसरली .
घरी मामांशी बोलताना मीनल म्हणाली, " मामा ऐकना . आज एक क्लायंट आले होते आमच्या सरांकडे, ऑफिसला! तुला ओळखतात ते. तुझी खूप तारीफ़ करत होते अरे! "
"हो कागं कोण? काय नाव त्यांचं ?"
"मांजरेकर म्हणे , रियल इस्टेटचं काम बघतात." मीनल खूप निवांत गप्पा मारत बसली होती आज.
"अजून काय बोलले गं ते ? चांगला माणूस गं "
"बरं मामा, आता आठवलं! लकडे नावाचा कुणी माणुस आहे का रे तुझ्या ऑफिसला?"
मामाचा चेहरा कसला कडवट झाला. "काय फालतू माणसाचं नाव घेतलंस गं मीनल ! तुला कोण बोललं त्याच्याबद्दल ?"
"अरे मामा ते मांजरेकर सरच काहीतरी सांगत होते आमच्या बॉसला, त्यावेळी उगीचच नाव कानावर पडलं."
मामी उभी राहून गप्पा ऐकत होती,
" कोण हो कोण फालतू माणूस? अगं तो नाही का मागे सांगितलं होतं तुला. लकडे नावाचा इतका नीच माणूस .
तो स्टोअर चा इंचार्ज होता ना! सरकारी सामान विकून खाल्लं, पैसे जमवले! मी गेलो ऑडिटला तेव्हा पकडला गेला."
"हो का मामा ?. . मग. . ?" मीनल ला वाटलं प्रवीणचा अंदाज बरोबर होता.
" कितीतरी कमीशन खात होता तो खरेदीमध्ये. महा लाचखोर मनुष्य! मी रिपोर्ट दिल्यावर चौकशी झाली आणि त्याची बदली झाली . टेबलवर्क मिळालं. पैसा मिळणं बंद झालं .
कसा कोण जाणे, पुन्हा माझ्या डिपार्टमेंटला परत आला वशिल्याने!
पुन्हा एकदा काय झालं कि उशिरापर्यंत ऑफिसमधलं काम करणाऱ्या जोशी मॅडम शी त्याने मिस बिहेव केलं.
मग काय ? त्यांनी माझ्याकडे तक्रार केली, मी वर कळवलं. तर त्याला सस्पेंड केलं मग !"
"हो आठवलं हो. तुम्ही सांगितलं होतं एकदा " मामी म्हणाल्या .
"महिना -दोन महिन्यापासून घरी पडून आहे ! "
"असच पाहिजे अशा लोकांना!" मीनल बोलली पण तिला कळाले की लकडेचा नेमका प्रॉब्लेम काय आहे .
मामी म्हणाल्या" अहो या कामामुळे तुम्ही किती शत्रू बनवलेत. असली नीच माणसं सुधरत नाहित, मनात राग धरून राहतात. जपून रहा तुम्ही ! "
"नाही ग ! तो काय करणार आता , त्याला चांगलं ठेचलंय आता. पडला असेल गार होऊन! "
रात्रीपर्यंत विचार केल्यानंतर मीनलने हे सगळं प्रवीणला कळवले .
प्रवीणच्या लक्षात सर्व प्रकार आला. त्यांनी एक योजना आखली.
तो आपल्या मैत्रिणीची भयभीत अवस्था पाहू शकत नव्हता .
मीनल रोजच्याप्रमाणे क्लासमध्ये पुन्हा मग्न झाली.
तीन-चार दिवस गेले. तिने पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित केले .
पाचव्या दिवशी संध्याकाळी पुन्हा दर्ग्याच्या पुढे अंधार आणि एक सावली तिला समांतर चालतीय.
आणि पुन्हा ती सायकलची घंटी वाजली.
मीनल जणु झोपेतून खाड्कन जागी झाली.
आता छाती धडधडू लागली.
घर किती लांब आहे असं वाटायला लागलं .
ती झपाझप पावले टाकत राहिली
आणि घशाला कोरड पडली.
" काय गं, तुझा यार नाही का संगतीला आज? बोलाव कि त्याला. माझी कॉलर धरतो काय ? " ती सावली बोलली.
"काका का मला त्रास देताय तुम्ही? तुमचं काय नुकसान केलंय मी? " ती उगीचच वेळ दवडण्यासाठी बोलली.
"घरी कधी यायचं बोल तुझे लफडे सांगायला?"
"कसले लफडे काका?" ती खरंच घाबरली होती. आसपासही कुणी नव्हतं.
"घरी नाही सांगायचं तर काय देशील? बोल !बोल ना ! तोंड बंद ठेवतो. पण मला काय मिळेल?"
आपसूकच तिची नजर त्याच्याकडे वळली तो खूप लगटपणे आणि आशाळभूत गलिच्छ नजरेने तिच्याकडे पाहत होता .
मीनलला शिसारी आली .
इतका वेळ ती खाली मान घालून झपाझप चालत होती त्यामुळे त्याची नजर तुला कळली नाही .
"एक दिवस वेळ द्या! मी तुम्हाला उद्या सांगते . तोपर्यंत तिच्या कॉलनीचं वळण आलं आणि ती कॉलनीत आली.
पण मागे दोन डोळे होते जे त्याला पाहत होते.
तो तिथेच घंटी वाजवत उभा होता, तिला ती ऐकू येत होती.
* * * * * * *
आज आज मीनल छान मूड मध्ये होती. गुणगुणत तयार होत होती .
एक वेगळाच आत्मविश्वास चेहऱ्यावरती होता .
ऑफिसमध्येही ती हसत खेळत वागत होती .
अगदी महिन्याभरानंतर मीनलचं मूळ रूप दिसत होतं .
फोनवर सतत कॉल चालले होते.
ऑफिस झाले .
क्लासमधला प्रॅक्टिस पेपर ही वेळेच्या अगोदर सुटला आणि ती परत निघाली.
नेहमीच्या बस स्टॉपजवळ उतरली.
भूक लागली म्हणून मस्त पाणीपुरी खाल्ली .
रोहनने फोन केला, "ताई घ्यायला येवू का?"
" नाही रे नको ! घ्यायला येऊ नकोस . आज मैत्रिणी सोबत आहेत. तू काळजी करू नकोस . ओक."
ती पायी चालत निघाली .
अंधार पडला होता .
आजही तो मर्क्युरी लाईट चालू बंद होत होता किंवा बंदच होता.
दर्गा ओलांडली आणि अंधारात एक सावली निघाली, सायकलवरून खाली उतरली.
सावली सायकल घेऊन रोडच्या कडेला आली.
पुन्हा घंटीचा आवाज आला.
पण मीनल आता सावध होती.
तो खूप जवळ आला.
" काय मग यायचं का मॅडम डबल सीट?"
तिने रागाने त्याच्याकडे पाहिले.
" काय देणार मग? ठरलं का नाही? का घरी यायचं ? "
"ठीक आहे ,या घरी! केव्हा येता? आता का? चला आणि मी भीत नाही तुमच्या धमक्यांना. मी सगळं सांगितले घरी. माझ्या मामाला सगळं माहीत झालय. आता माझ्यासोबत चला आणि सांगा मामांना!"
आता मात्र त्याची जिरली.
शिकार हातातून जाते कि काय असे वाटले .
"तुझी ही हिम्मत? कुठून आली गं ही हिम्मत ? यारानं का ?" दात खाऊन बोलत त्याने पटकन तिचा हात धरला .
"काकाs s s सोडा मला! सोडा, म्हणते ना!"
" काय करशील? कोण वाचवतं तुला, आता बघतो ना ! "असे म्हणत त्याने सायकल सोडून दिली व तिच्या गळ्याची ओढणी घट्ट धरली आणि ओढली.
ती ओरडणार इतक्यात एक जोराचा हात त्याच्या खांद्यावर पडला आणि त्याच्या डोक्यात झिणझिण्या आल्या.
कुणीतरी त्याला घट्ट धरले आणि तिला सोडवले.
तिला बाजूला घेतले.
सुदैवाने मर्क्युरी लाईट पूर्णपणे चमकली .
पाहते तर साध्या वेषातील पोलीस इन्स्पेक्टर व हवालदार त्याच्या मुसक्या आवळत होते.
दामिनी पथकाच्या नेहा मॅडम बुरख्यात उभ्या होत्या.
त्याला पकडून नेले गेले.
प्रवीणच्या मदतीने दामिनी पथकाकडे तक्रार केली होती
ते दोन दिवसांपासून पाळतीवरती होते.
लकडेचे पूर्ण जुने रेकॉर्ड तपासून त्याच्यावर कसली कसली कलमे लावण्यात आली .
मीनल आज भयमुक्त झाली.
घरी आल्यावर मीनलने मामांना व मामीला सर्व हकीकत सांगितली. इत्यंभूत महिनाभराच्या सर्व घटना ही सांगितल्या .
मामींना तिचे खूप कौतुक वाटले पण मामांना भारी वाईट वाटले.
त्यावेळी सांगितलं नाही म्हणून मामाला व रोहनला राग आला पण तिने त्यांना समजावले.
मीनलच्या मनात प्रवीण बद्दल आदराची भावना जोपासली गेली होतीच , ती आता बळकट झाली .
तिने प्रवीणला लगेच मेसेज टाकला. "प्रिय मित्रा धन्यवाद !🙏
मित्रा मिशन सक्सेसफुल👍. रात्रि निवात कॉल करते."
मीनल सारखी सामान्य मुलगी भयभीत झाली होती ती आता भयमुक्त झाली होती.
कथा समाप्त 🙏