Yashodhan Kelkar

Horror Fantasy Thriller

4  

Yashodhan Kelkar

Horror Fantasy Thriller

भरदुपारी एकाएकी

भरदुपारी एकाएकी

6 mins
500


ईशाने तिच्या खोलीच्या बंद दाराकडे एक त्रासिक नजर टाकली आणि बाहेरच्या खोलीतून येणारे हसण्या-खिदळण्याचे आवाज एकदम बंद पडले. गडबड गोंधळ करणार्‍या वर्गात शिक्षकांनी पाऊल टाकलं आणि डोळे वटारले की जशी शांतता पसरते तशी शांतता काही काळ तिथे नांदू लागली. बाहेर बहुधा आईने डोळे वटारले असावेत. किंवा थोरल्या काकुने. धाकट्या काकुकडून ईशाला एवढ्या मॅच्युरिटीची अपेक्षाच नव्हती.


तिने आपली नजर पुन्हा टेबलावरच्या पुस्तकाकडे वळवली. पानावरची इंटिग्रेशनची गणित आ वासून तिला भिववत होती. तिने त्यातल्या त्यात निरुपद्रवी वाटणारं एक उदाहरण निवडलं, पण तोवर बाहेरच्या खोलीतल्या संभाषणाने पुन्हा उचल खाल्ली होती. ईशा वैतागली. दार-खिडक्या बंद करून बसली असली तरी बाहेरचे आवाज तिच्या खोलीत झिरपतच होते.   


तशी ती फार मोठी शांततेची भोक्ती होती अश्यातला भाग नव्हता, पण अभ्यास करताना मात्र तिला शांतता लागायची. शेजारच्या कॉलनीतून अधूनमधून ऐकू येणार्‍या ड्रिलच्या आवाजाची तिला एव्हाना सवय झाली होती, आणि बाजुच्या सुनसान रस्त्यावरून अधूनमधून फर्रर्रर्रर्र करत ये-जा करणार्‍या एखाद्या चुकार बाइक किंवा रिक्शाबद्दलही तिची काही तक्रार नव्हती. प्रश्न होता तो घरात चालू असलेल्या गदारोळाचा.


तिच्या घरी सहसा तीनच माणसं असायची – ईशा, आई आणि बाबा. आज मात्र ईशाचे दोन्ही काका सहकुटुंब सहपरिवार तिथे अवतरल्याने ही परिस्थिती उद्भवली होती. घरातली आवाजाची डेसिबल पातळी धोक्याची मर्यादा पार करून नवे उच्चांक गाठत होती. तरी अजून तिची भाचेकंपनी यायची बाकी होती. एक कार्टा आला होता, तो सध्या शांत होता. बहुधा मोबाइल मध्ये डोकं खुपसून बसला असावा.


अर्थात ही परिस्थिति अचानक उद्भवली नव्हती. हा कार्यक्रम मागच्या महिन्यातच ठरला होता, आणि सहसा ईशासुद्धा बाहेरच्या मैफिलीत खुशीने सहभागी झाली असती, पण... दोन दिवसापूर्वी तिच्या क्लासमध्ये अचानक घोषणा करण्यात आली होती की येत्या शनिवारी इंटिग्रेशन ची टेस्ट होणार आहे. त्यामुळे मारून मुटकून ईशा पुस्तकात डोकं घालून ऊजळणी करत बसली होती, ज्यात हे भोवतालचे आवाज व्यत्यय आणत होते.


क्षणभर तिने विचार केला की कानात कापसाचे बोळे घालून बसावं, पण मग तिच्या लक्षात आलं की कापूस आई-बाबांच्या बेडरूम मध्ये ठेवलाय. तो आणायला बाहेर जाणं आलं. म्हणजे काकू-काकांच्या नसत्या चौकश्या, कौतुक-मिश्रित टोमणे किंवा टोमणे-मिश्रित कौतुकाला तोंड द्यावं लागणार. तिने तो प्लॅन कॅन्सल केला.


तिला एकदम मुग्धाची आठवण आली. तिची मैत्रीण मुग्धा ऐटीत गाणी ऐकत अभ्यास करायची. ईशाने आत्तापर्यंत कधी असा प्रयत्न केला नव्हता, पण तिने ठरवलं हीच ती वेळ, हाच तो क्षण. हात लांब करून तिने मोबाईल उचलला. मेसेजेसमध्ये थोडं स्क्रोल केल्यावर तिने मुग्धाने कधीकाळी शेअर केलेली "मुग्धाज प्ले-लिस्ट' सापडली.  


ईशाने इयरफोनचे बड्स कानात दाबून बसवले, गाणी सुरू केली, आणि पुन्हा आपला मोर्चा इंटिग्रेशनकडे वळवला, पण छे! तिचं लक्ष लागेना.

तिने रागारागाने इयरफोन्स काढून टेबलावर फेकले आणि धाडकन पुस्तक मिटलं. डोळे बंद करून ती काही काळ तशीच बसून राहिली. तिच्या मनात एकाच विचार चालू होता, की देव करो आणि थोड्या वेळासाठी हे सगळे आवाज बंद होवोत. मग तिला जाणवलं की याला काही अर्थ नाही. असं कधी काही होतं नसतं. एक सुस्कारा सोडून तिने डोळे उघडले. पुस्तक उघडून ती सुरुवात करणार तोच दारावर टकटक झाली.

'काये?'

'चहा ओतून ठेवलाय, घेऊन जा.' आईने मऊ आवाजात उत्तर दिलं.


चहा घ्यायला बाहेर आल्याआल्या दार आणि भिंतींमुळे आत्तापर्यंत दडपला गेलेला कोलाहल सर्व सामर्थ्यानिशी ईशावर चालून आला. हॉलच्या एका बाजूला असलेल्या सोफ्यावर बसून तिची आई आणि दोन्ही काक्या त्यांच्या मते कुजबुज्या आवाजात गप्पा मारत चहाचा आस्वाद घेत होत्या. आई-बाबांच्या बेडरूमच्या बंद दारातून टीव्हीवर चाललेल्या कुठल्यातरी चर्चेचा, आणि त्या चर्चेतल्या मुद्द्यांबद्दल दोन्ही काकांमध्ये चाललेल्या चर्चेचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. बाबा मात्र एकटे शांतपणे डायनिंग टेबलवर पेपर वाचत बसले होते. छोटा संजीव तिथेच मोबाईलवर काहीतरी खेळत बसला होता.

ईशाने जाऊन टेबलावरचा वाफाळता चहाचा कप उचलला. आल्याचा उग्र वास नाकात गेल्यावर तिला जराशी तरतरी आली. तिचा मूड सुधारला.

'कसा चाललाय अभ्यास?' थोरल्या काकूने विचारलं.

'मस्त' तिने उत्तर दिलं.

'आमच्या आवाजाने डिस्टर्ब तर नाही होते ना?' धाकट्या काकूने विचारलं.

 'नाही, नाही.'


ईशाने बळेच गोड हसून दाखवलं आणि ती तडक आपल्या खोलीकडे वळाली. खोलीचं दार लोटून घेतल्यावर सगळे आवाज एकदम दबले. फुंकर मारत तिने चहाचा एक घोट घेतला आणि कप टेबलावर ठेवला. तिची नजर तिथे पडलेल्या ईयरफोन्स कडे गेली आणि तिच्या डोक्यात एक कल्पना चमकली. तिने ते ईयरफोन्स कानात घातले. आवाज अजून कमी झाले. ईयरफोन्स काढल्यावर ते पूर्ववत झाले. एकदोनदा अशीच काढघाल केल्यावर तिने स्वतःलाच एक टप्पल मारून घेतली. अगदी घोर शांतता नसली तरी हे बरंच बरं होतं. एवढी साधी युक्ति तिला एवढ्या उशिरा सुचली याच तिला आश्चर्यच वाटलं.   


तिने सहज चाळा म्हणून पुन्हा एकदा ईयरफोन्सची काढघाल केली, आणि चहाचा एक घोट घेणार तोच ती थबकली. तिला कसलाच आवाज येत नव्हता. तिने तिचे कान चाचपून पहिले. ईयरफोन्स तर तिच्या गळ्यात लटकत होते, पण सगळीकडे शांतता होती. बाहेरच्या खोलीतले, कॉलनीतले, रस्त्यावरचे सगळे आवाज एकाएकी बंद झाले होते. ईशाला काही कळेना. तिने कानोसा घेतला. हूं नाही की चू नाही. तिने आपलं सगळं लक्ष बाहेर एकवटलं. कुठलाच आवाज ऐकू येत नव्हता. ती काही क्षण थांबली. 

'आई!'

तिला काहीच उत्तर मिळालं नाही. ती अजून थोडा वेळ थांबली.

'आई? काकू?'


काही म्हणता काही आवाज नाही. ना घरात, ना घराबाहेर. ना पानांची सळसळ, ना कुत्र्याचं केकाटणं, ना कुठल्या पक्ष्याचं चिरकणं. कोणाच्या हाका नाहीत, गाड्यांचे आवाज नाहीत, ड्रिल नाही, काही नाही. सगळीकडे शुकशुकाट. खोलीत फक्त तिच्या श्वासांचा लयदार आवाज.

असे सगळे आवाज एकदम कसे बंद झाले? तिला विचित्र वाटायला लागलं. भीतीची एक थंड लहर तिच्या मणक्यातून डोक्यापर्यंत चढत गेली. किती वेळ ती तशीच उभी होती कोण जाणे.


सगळं एवढं शांत झालं होतं की तिला तिच्या हृदयाचे वाढलेले ठोके ऐकू येत होते. मग ती दारापाशी गेली. तिने कडी काढायला हात पुढे केला, पण का कोण जाणे, तिला दार उघडायची थोडीशी भीतीच वाटायला लागली. आत्तापर्यंत हवीहवीशी शांतता आता भयाण वाटत होती. तिने हिय्या करून हलकेच दार उघडलं.

फर्रर्रर्रर्र...


ती दचकून जागच्याजागी तीनताड उडाली. मग तिच्या लक्षात आलं की दार उघडल्यावर आलेल्या वार्‍याच्या झुळुकीने गणिताच्या पुस्तकाची पानं फडफडली त्याचा तो आवाज होता. तिने आपल्या धडधडणार्‍या छातीवर हात ठेवला. स्वतःच्या मूर्खपणावर तिला थोडं हसूच आलं. तिच्या मनात दाटून आलेलं भीतीचा मळभ काहीसं हलकं झालं. तिने दार उघडून बाहेर पाऊल ठेवलं. बाहेरच्या खोलीत कोणीच नव्हतं.


टेबलावर बाबांचा पेपर पडलेला होता, शेजारीच त्यांचा चहाचा कप होतं, त्यातून अजूनही वाफा येत होत्या, संजीवचा मोबाईल तिथेच होतं, सोफ्याजवळच्या टिपोयवर आई आणि दोन्ही काक्यांचे असे तिन्ही कप होते. सगळ्या वस्तु जिथल्या तिथे होत्या, पण माणसांचा पत्ता नव्हता.

छतावरचा पंखा संथपणे फिरत होता, त्याचा वेग हळूहळू मंदावत होता. बेडरूममधला टीव्हीसुद्धा बंद झाला होता.


ती भयाण शांतता ईशाच्या अंगावर यायला लागली. तिच्या मनातली भीती पुन्हा उसळी मारून वर आली. तिने आई-बाबांना हाका मारायला तोंड उघडलं, पण तिच्या घशाला कोरड पडली होती, तिच्या तोंडातून शब्द फुटेना. तिच्या भीतीला जणू प्रतिसाद द्यावा तसं एकदम अंधारून आलं.

पंखा फिरायचा थांबला.


थरथरत्या हाताने ईशाने तिच्या कपाळावरचा घाम पुसला. थोडा विचार केला. तिला वाटलं की सगळे तिची मस्करी करत असावेत. शिरीषकाका आणि धाकट्या काकुचा सेन्स ऑफ ह्यूमर जरा विचत्र होताच.

पण मग घराबाहेरचे आवाज? ते का बंद झाले?

दुपारी इकडे तसेही फारसे आवाज नसतातच... तिने स्वतःची समजूत घातली आणि सगळा धीर एकवटुन घरच्यांना हाका मारल्या.

'आई... बाबा... शिरीषकाका'


तिच्या हाका भिंतीवर आपटून विरल्या. तिला थोडा थोडा राग यायला लागला. एखाद्याची मस्करी तरी किती करावी याला काही लिमिट? ती तडक आईबाबांच्या बेडरूमकडे निघाली. त्या नीरव शांततेत फरशीवर तिच्या पावलांचा फसकफसक आवाज येत होता.

बेडरूममध्ये कोणीच नव्हतं. तिची पावलं लटपटली. तिने दाराचा आधार घेत चौफेर नजर फिरवली खरी, पण तिला माहिती होतं की त्या खोलीत एवढ्या जणांना लपायला जागाच नव्हती. तिला दरदरून घाम फुटला, तिचं ऊर धपापायला लागलं.

संपूर्ण घरात ती एकटीच होती. काय झालं होतं? अचानक सगळे कुठे आणि कसे गायब झाले होते? का तिला शांतता हवी होती म्हणून हे सगळं झालं होतं? ह्या, काहीही काय? असं कधी होतं नसतं... नसतं ना होत? तिला काय करावं काही सुचेना. बाहेर जाऊन बघावं असा विचार करून ती दाराकडे निघाली, पण मग ती पुन्हा थांबली.

बाहेरसुद्धा कसलाच आवाज नव्हता. तिने खिडकीतून डोकावून पहिलं. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. सारं शहर, कदाचित सारं जगदेखील एकाएकी ओसं पडलं होतं. म्हणजे सगळ्या जगात ती एकटीच उरली होती? या विचाराने तिला भडभडून आलं. तिला रडूच फुटलं, पण ऐकायला कोण होतं तिथे? तिच्या हुंदक्यांनी ती नीरव शांतता भंग पावली. किती का ती अशी एकटीच रडत उभी होती कोण जाणे. मग तिने स्वतःला सावरलं, स्वतःचे डोळे पुसले. खोलीत पुन्हा शांतता प्रस्थापित झाली. तिला तो शुकशुकाट सहन होईना. तिने कुठेतरी वाचलं होतं की माणूस असं एकटं राहिलं तर त्याला हळूहळू वेड लागतं. तिला वाटलं लागू दे वेड... विचारांचा त्रास नाही होणार म्हणजे. पण हळूहळू म्हणजे किती वेळ? असा किती काळ तिला या भकास, रिकाम्या जगात एकट्याने काढावा लागणार होता?

 'ईशा!'

आईचा आवाज.

ती गर्र्कन वळली.

'आई? तू कुठेस?' कापर्‍या आवाजात तिने विचारलं.

'अगं इकडे ये'

ईशा तिकडे जायला निघाली आणि अचानक जागीच थिजली.

आईचा आवाज तिच्या खोलीतून येत होता. तिच्या रिकाम्या खोलीतून. ज्या खोलीतून ती आत्ता थोड्या वेळापूर्वी बाहेर आली होती. तिच्या अंगावर सर्र्कन काटा उभा राहिला.

'अगं ये ना... सगळे इकडेच आहेत. तू एकटीच राहिलीयेस तिकडे'

तिच्या खोलीच्या किलकिल्या दाराआडून तिच्या आईचा किंचित घोगरा, एखाद्या खोल डोहातून येतोय असं वाटणारा आवाज येत होता आणि ईशा जागीच खिळून भयचकित नजरेने तिच्या खोलीच्या दाराकडे बघत उभी होती.

बाकी कसलाच आवाज येत नव्हता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror