Yashodhan Kelkar

Others

4.5  

Yashodhan Kelkar

Others

फॉरवर्ड

फॉरवर्ड

4 mins
665रघु थोडा वेळ त्याच्या मोबाइलमधल्या त्या फोटोकडे पहातच राहिला. फोटोतला तो लहान मुलगा... त्याचं नाव कल्पेश. दोन-अडीच वर्षाचा तो मुलगा आपली अनिमिष नेत्र विस्फारून कॅमेराकडे बघत होता. त्याची ती निरागस नजर बघणार्‍याच्या काळजाचा ठाव घेत होती. 

कोणी काढला असेल तो फोटो? त्याच्या बाबांनी की आईने? का ज्या मेसेजबरोबर तो फोटो आला होता त्या मेसेजमध्ये ज्यांचं नाव होता त्या लोकांनी? त्या मुलाला कल्पना सुद्धा नसणार त्याच्याबरोबर काय घडलय याची. तो पोरका झालाय याची. नसणारच कल्पना. त्या फोटोबरोबर आलेल्या मेसेजमध्ये तर उल्लेख होता की कल्पेश अजूनही आपल्या आईवडिलांना हाका मारतो, वाट बघतो की ते येतील, त्याला जवळ घेतील, उचलून कडेवर घेतील, त्याचे लाड करतील...  

रघुचं मन क्षणभर अगदी हेलावून गेलं. त्याने विचार केला की आपण काहीतरी केलंच पाहिजे.

त्याने एक सुस्कारा सोडला आणि बसल्या जागेवरून हात लांबवून खिडकीत ठेवलेली काडेपेटी आणि सिगरेटचं पाकीट उचललं, एक सिगरेट शिलगावली. रघुने एक दीर्घ श्वास घेतला, सिगरेटचा धूर छातीत खोलवर कोंडला आणि हळूहळू बाहेर सोडला. एक-दोन झुरके घेताच त्याला तरतरी आली, आणि त्याच्या विचारांना स्टार्टर बसला. सिगरेट ओढत तो पुन्हा एकदा तो मेसेज वाचायला लागला.

‘एका कोवळ्या जीवाला पोरकेपणाची झळ लागू नये म्हणून माणुसकीला साद...’

चहा करून, तो पिऊन होईपर्यंत रघुच्या डोक्यात पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरली होती. त्याला माहीत होतं की आपल्याला अधिक माहितीची गरज आहे आणि ती कुठून मिळवायची हेही त्याला माहिती होतं. त्या मेसेजमध्ये खाली लिहिलं होतं की कलपेशच्या आईवडिलांचा मित्रपरिवार सध्या त्याची काळजी घेत आहे, आणि ज्यांना कल्पेशला काही मदत करायची असेल, त्यांना अधिक माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधण्यासाठी मेसेजमध्ये तीन नावं नमूद केली होती, आणि त्यांचे मोबाइल नंबर सोबत होते. त्यांच्यापैकी कोणाला फोन करायचा याबाबतीत रघु आता विचार करत होता.

आबा रेणुसे या नावावरून रघुने अंदाज बांधला की हा माणूस पन्नाशीच्या पुढचा असावा. अश्याबाबतीत रघुचे अंदाज सहसा चुकीचे ठरायचे नाहीत. माणसांबद्दल अटकळी बांधणे हा तर रघुच्या रोजच्या कामाचा अविभाज्य घटक. त्याशिवाय त्याचं गाडं चालणं अशक्य.

 तर आबा रेणुसे... त्यांना फोन करून माहिती मागितली, तर ते जेष्ठ नागरिक नाहीतर समाजसेवक अश्या भूमिकेमध्ये घुसून ठोकळेबाज माहिती देणार, आणि आपलं काम होणार नाही असं रघुचं मत पडलं. दुसरं नाव होतं राणी कदम. बायका उगाच पाल्हाळिक बोलून वेळ घालवतात असं रघुचा अनुभव असल्याने त्याने ते नाव टाळून शेवटी उरलेल्या अरविंद जगतापला फोन लावला.

‘हॅलो, अरविंद जगताप का? नमस्कार… मी संजय देशमुख बोलतोय दैनिक जनजागरणच्या ऑफिसातून. वार्ताहर आहे मी. आत्ताच मला एक मेसेज मिळाला ... हो तोच, कल्पेशविषयीचा... फारच वाईट झालं हो त्याच्या बाबतीत... फार वाईट. मला असं वाटलं की त्याच्याविषयी एक लेख आमच्या पेपरात छापावा. तुमची काही हरकत नाही ना? मला थोडी माहिती हवी...’

फोनवर बोलता बोलता रघु समोर ठेवलेल्या पाठकोर्‍या कागदांवर झरझर नोट्स काढत होता, काही गोष्टी अंडरलाईन करत होता, खोलात जाऊन प्रश्न विचारत होता.

‘लवकरच ही बातमी छापून आणतो मी. अहो, माझे कसले आभार? कल्पेशसाठी तुम्ही जे करताय त्यात थोडा जरी हातभार लागला माझा तर जन्मभराचं पुण्य लाभेल मला.’

कल्पेशविषयी पुन्हा एकदा सहानुभूती दाखवत रघुने कॉल कट केला आणि काढलेल्या टिपणांवर एक नजर फिरवली.

थोड्याच वेळात त्याचा सगळा गोतावळा त्याच्यासमोर हजर होता. विशल्याने येताना कोपर्‍यावरुन भेळ आणली होती, आणि सकाळी सकाळी भेळ कसली खायची अशी कुरबुर करणार्‍या अजयनेच त्यातली अर्धीअधिक संपवली. आता तो खारवलेले दाणे तोंडात टाकत एका मोबाइलमध्ये सिम टाकत होता. विशल्या शेजारीच बसून दूसरा मोबाइल उचकटत होता, त्याच्याशेजारी एक नवीन सिमकार्डचं पाकीट पडलेलं होतं.

रघुने सगळ्यांना कल्पेशबद्दलचा मेसेज फॉरवर्ड केला होता, पण नेहमीप्रमाणे बेन्द्रेबाईंनी तो न वाचल्याने रघुला त्यांना सगळी हकीकत सांगायला लागली होती, पण त्या निमित्ताने सगळ्यांचीच चांगली उजळणी झाल्याने रघुला फारसं वाईट वाटलं नाही. कल्पेशवर ओढवलेला प्रसंग ऐकून बेन्द्रेबाई चांगल्याच हळहळल्या.

‘बिचारा... आईबापाविना पोर’

‘हो ना... आणि घरून विरोध असताना आईवडिलांनी पळून जाऊन लग्न केलं त्यामुळे घरचे तुटलेले. कसं होणार त्या पोराचं देव जाणे. मित्रमंडळी तरी किती आणि कसा सांभाळ करणार त्याचा? ’

रघु फोनवर काहीतरी टाईप करता करता बेन्द्रेबाईंशी बोलत होता.

‘खरंच’ – इति बेन्द्रेबाई.

‘हा मेसेज वाचणार्‍या सगळ्यांना हाच प्रश्न पडणारे, आणि त्याचं उत्तर आपण द्यायचं. तुम्हाला सगळी माहिती आहे, सो कोणी काही प्रश्न विचारले तर योग्य ती उत्तरं द्यायची आणि शेवटी त्यांना कल्पेशला आर्थिक मदत करायची असेल तर...’

रघुने एक कागद बेन्द्रेबाईंपुढे सरकावला.

 ‘बोला गणपति बाप्पा...’

सगळ्यांनी मोरया अशी घोषणा केली, आणि रघुने त्याच्या हातातल्या मोबाईलचं सेंड बटण दाबलं. एव्हाना अजय आणि विशल्याने आठ-दहा फोनमध्ये सिम घालून ते चालू केले होते. ते सगळे किणकिणले. सगळ्यांनी एक-एक फोन उचलला. त्यात तोच मेसेज आला होता.

‘एका कोवळ्या जीवाला पोरकेपणाची झळ लागू नये म्हणून माणुसकीला साद...’

या मेसेजमधल्या मजकुरात आणि रघुला सकाळी आलेल्या मेसेजमधल्या मजकुरात फक्त शेवटच्या तीन नावांसमोर दिलेल्या नंबरांमध्येच काय तो फरक होता. तो मेसेज वाचून आता माणसं हेलावून जाणार होती, आणि हा सगळं माणुसकीला फुटलेला पान्हा रघुच्या अकाऊंटमध्ये जमा होणार होता. सगळ्यांनी सेंडचं बटन दाबलं आणि तो मेसेज फॉरवर्ड झाला.  Rate this content
Log in