भोग
भोग
गजा किती आशेने मुंबईत आला होता, आपल्याला मनासारखं काम मिळेल. मनासारखं काम म्हणण्यापेक्षा चार पैसे खिशात खुळखुळतील, हे खरं गणित होतं.
तसं त्याला गावाला जेवायला मिळत नव्हतं असं नाही. परंतु, बाप सारखा खेकसायचा अंगावर... "अरे शाला शिकायची नाय, तर निदान कामाला तरी लाग. इथे किती लोकं कामावर बोलावतायत. पन तुला जाया नको..." असं सारखं बोलत असे. त्याचंही खरंच होतं ना!! त्याचा बाप व आई दोघंही दिवसभर मरमर करीत होते, तेव्हा कुठे सर्वांना जेवायला मिळत होतं.
पण मग एक दिवस गजाचा मित्र त्याला म्हणाला की, मी मुंबईत जाणार आहे. तू येतोस का माझ्या बरोबर? वाॅचमनची नोकरी आहे... ऐकताच गजा लगेच तयार झाला. आणि वडिलांकडून थोडे पैसे घेऊन मुंबईला यायला निघाला. वडील आधी नकोच म्हणत होते... पण पोरगं ऐकायलाच तयार नाही म्हटल्यावर... बापाने परवानगी देऊन टाकली.
अशा तर्हेने गजाचे मुंबईत आगमन झाले. आल्यासारखी नोकरीही लागली... दोन महिने होतायत तोच... क
ोरोनाची साथ आली... आणि मालकाला कंपनी बंद ठेवायची वेळ आली. जुने दोन वाॅचमन होते तेवढ्यांनाच कामावर ठेवून, बाकीच्यांना कामावर येऊ नका म्हणून मालकाने सांगितले.
झालं... आता आली का पंचाईत!! म्हणून मग तो गावी येण्यासाठी निघाला... तर कोणतेही वाहन नाही... धडाडीने चालत येण्यास निघाले... विचार असा की दिवसभर चालायचे... आणि रात्री रस्त्यावर कुठेतरी झोपून जायचं... पण बाहेर पडल्या पडल्याच पोलिसांनी अडवलं... आणि परत पाठवलं...
हातात काम नाही, पैसा नाही... खायला अन्न नाही... आता करायचं काय!! आता मात्र घरची आठवण यायला लागली व रडू कोसळलं...
घरी चांगलं जेवायला तरी मिळत होतं... तेही आज दुरावले... आई-वडील नको जाऊ सांगत होते... ते आपण ऐकायला हवं होतं... याची जाणीव हळूहळू होऊ लागली... कुणीतरी जेवायला दिलं तर जेवायचं... नाहीतर उपाशीपोटी पाणी पिऊन झोपून जायचं...
हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागण्याचे फळ मिळणे... याला नियतीचे खेळच म्हणावे लागेल ना!!