kanchan chabukswar

Tragedy

4.0  

kanchan chabukswar

Tragedy

भास-आभास

भास-आभास

4 mins
269


सकाळपासूनच निलोफरचा मूड एकदमच खराब होता, आज तिच्या डोक्यातून कळा येत होत्या, नवीन असलेला प्रोजेक्ट, तिला भयंकर टेन्शन आलं होतं. आमिर तिची समजूत काढत होता, ”सगळं व्यवस्थित होईल थोडंसं शांततेने घे.“

नीलोफरला परत साईट विजिट करायची होती. त्यांच्या कंपनीचं बरंच मोठं काम चालू होतं, आणि तिच्या वरती प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून भरपूर मोठी जबाबदारी होती.

वेळी-अवेळी प्रोजेक्टवरती जाणं हे आमिरला बिलकुल पटत नव्हतं.


प्रोजेक्ट फायनल लेवलवरती आलेला होता, काही मोठ्या कंपन्यांचे ऑफिस त्यांच्या बिल्डींगमध्ये येणार होते आणि त्यांना काही त्यांच्या सोयीकरता व्यवस्था करून हव्या होत्या. हस्तांतरण करण्यासाठी फक्त आठ दिवसाचा अवकाश होता आणि त्याच्या आत निलोफरला प्रत्यक्ष साईटवरती जाऊन मोठ्या कंपन्यांची काम झालेली आहेत की नाहीत हे स्वतः बघायचे होते.


आमीर आणि नीलोफर जसे बिझनेस पार्टनर होते तसे लाइफ पार्टनरदेखील होते. त्यांच्या सहजीवनाला दोन वर्ष पूर्ण झाले होते. एकमेकांचा स्वभाव अतिशय पूरक असल्यामुळे दोघांचेही दृष्ट लागण्याइतके गूळपीठ झाले होते.

पण निलोफरचा आग्रही स्वभाव कधीकधी आमिरला त्रासदायक ठरत होता.


काम असले की नीलोफर रात्र बघायची नाही किती दिवस! नीलोफर म्हणत असे,"आपली कंपनी नवीन आहे आपल्याला सचोटीने काम करणे भाग आहे, आणि वेळेवर तयार करणेदेखील जरुरीचे आहे."


सकाळपासूनच नीलोफर नि अतिशय टेंशन घेतले होते आणि आता संध्याकाळ झाली असतानादेखील निलोफर साईटवरती जायला निघाली होती.

अबोटाबादमधली परिस्थिती स्त्रियांसाठी फारशी चांगली नव्हती त्याच्यामुळे आमिर पण नाईलाजास्तव तिच्याबरोबर निघाला.

हा प्रोजेक्ट संपल्यानंतर त्यांना युरोपमध्ये एक प्रोजेक्टचं आमंत्रण आलेलं होतं आणि दोघांचाही विसा त्याच्यासाठी तयार झालेला होता.

पुढच्याच महिन्यात होते निलोफर आणि आमिर तीन वर्षासाठी युरोपमध्ये जाणार होते.


उशीर झालेला होता, साईट वरून परत यायला, आमिर अतिशय थकलेला होता, त्याच्यामुळे निलोफर गाडी चालवत होती. रात्रीचा दीड वाजून गेला होता. आणि तेवढ्यात...........


नुकत्याच गुलाबाच्या पाकळ्यांनी शाकारलेल्या कबरीवरती हात फिरवत निलोफर रडवेल्या चेहऱ्याने बसलेली होती. तिच्या कपाळाला जखम झालेली होती आणि डावा हात प्लास्टरमध्ये होता. उजव्या हाताने गुलाबाच्या पाकळ्या सारख्या करत तिला रडू आवरत नव्हते, परत परत म्हणत होती,"सगळं माझ्यामुळे झालं, माझाच गुन्हा." काळे कपडे घातलेली निलोफर काळी शाल पांघरून कबरीशेजारी विमनस्क मनस्थितीमध्ये बसलेली असताना आमिरने तिच्या खांद्यावर हात ठेवला,"पुरे आता, स्वतःला कितीही दोष देशील, यामध्ये तुझी काहीही चूक नाही. कोणीही तुला जबाबदार धरत नाही. उठ आता घरी चल."

कब्रस्तानच्या व्यवस्थापकाशी बोलून निलोफर गाडीमध्ये येईपर्यंत आमीर आपल्या जागेवर येऊन बसला होता. निलोफरने ड्रायव्हरला घराकडे गाडी घेण्यास सांगितले.


सकाळचा चहा देखील निलोफरला कडू लागत होता, तिचं अन्न पाणी सुटलं होतं. प्रोजेक्ट कम्प्लीट होऊन त्याच्या हस्तांतरणावरती तिने शेवटच्या सह्या केल्या. आता युरोपकडे जायचं होतं.

दहा दिवसानंतर कब्रस्तानमधले व्यवस्थापक आणि मशिदीचे इमाम तिच्या घरी आले.


नीलोफर म्हणाली,"आपल्या प्रियजनांचे आत्मे आपल्या भोवती किती दिवस असतात? जर आपल्याला गेलेल्या माणसाची रूह संदेश देत असेल किंवा काही बोलत असेल तर काय समजायचे? आपल्याला जाणून घेता येते का हे गेलेल्या माणसांनी आपल्याला माफी दिली आहे की नाही? माझा एक्सीडेंट झाल्याची जबाबदार मीच आहे आणि मी स्वतःला माफ नाही करू शकत."


तिचं बोलणं मधेच तोडून आमिर तिला म्हणाला,"अगं किती वेळा तू स्वतःला गुन्हेगार समजत असशील? तुझी काही चूक नाही, समोरून येऊन जर ट्रक आपल्यावर धडकला तर त्याच्यामध्ये तुझी काय चूक? तू परत परत स्वतःला त्रास करून घेऊ नकोस."

विषण्णपणाने नीलोफर हसली, इमाम साहेबांना म्हणाली,

 "कबरीवरती संगमरमर लावायचे आहे आणि उत्तम अशी संगमरवरी पाटी पण लावायची आहे."


अमीर हसला आणि म्हणाला,"कशाला, गेलेल्या माणसावरती कशाला पैशाची उधळपट्टी करतेस? याच्यापेक्षा गरीब अनाथ मुलांना ते पैसे वाटून टाक."

नीलोफर म्हणाली,"नाही नाही, कबर संगमरवरी होणार, नाहीतर काही महिन्यातच कबर खणून ही जागा दुसऱ्या माणसांना देण्यात येते आणि प्रियजनांची कबर त्याच्या नंतर आपल्याला दिसतच नाही. मी मजकूर देते तो त्याच्या दगडावर जरूर लिहा आणि आवडणारी नक्षी देखील करा, लागतील ते पैसे माझ्या कडून घेऊन जा."


इमाम म्हणाले,"बेटी, कबर जर उत्तम बांधली असेल तर माणसाचा आत्मा पण तिथेच राहतो बाहेर येऊन त्रास देत नाही आणि जर नुसतंच दगड मातीने बंद केली असेल तर गेलेल्या माणसालादेखील सुकून मिळत नाही, तू जो विचार केला तो योग्यच आहे आपल्या प्रियजनांची कबर नेहमी चांगलीच असली पाहिजे म्हणजे त्यांना पुढील वाटचालीसाठी शक्ती येते. गेलेल्या माणसालादेखील वाटत राहते की तो त्याच्या प्रियजनांसाठी महत्त्वाचा, आणि प्रिय होता. नुसत्या मातीने झाकलेली कबर कुत्री देखील येऊन उकरतात आणि मग प्रेताची विल्हेवाट लावतात, पण असे जर झाले तर गेलेल्या माणसाचा आत्मा फार दुखी होतो."


आमीरने डोक्याला हात लावला पण तो काहीच बोलला नाही.

कब्रस्तानाचे व्यवस्थापक म्हणाले,"ठरलं तर मग अजून पाच दिवसात तुमचं काम पूर्ण होईल आणि तुम्ही युरोपला जायच्या अगोदर एकदा येऊन बघून जाऊ शकाल."


दुसऱ्या दिवशी बॅग लावताना आणि ऑफिस आवरताना निलोफरला रडू आवरत नव्हते, ठिक-ठिकाणी विखुरलेल्या आठवणी तिने गोळा करून व्यवस्थित बॉक्समध्ये बंद केल्या, तेवढ्यात आमिर तिला म्हणाला,"तुला युरोपला एकटीला जायचं आहे आपल्यात असं ठरलं होतं ना, विसा तुझा लागलाय माझा नाही. माझा विसा दुसरीकडचाच लागलाय ना."


नीलोफर नाराजीने हसली,"सगळा दोष माझाच आहे, माझी किस्मत खराब आहे, नको तिथे केलेला हट्ट आणि अट्टाहास मला केवढा तरी भारी पडला आहे हे मला आता जाणवतंय." आमीर तिला परत परत समजावत राहिला.


कब्रस्तानतून संगमरवरी काम पूर्ण झाल्याची खबर आल्यानंतर निलोफर कब्रस्तानकडे निघाली. गाडीत बसल्यावरती आमिर आधीच येऊन बसलेला तिने पाहिला,"तुझ्याबरोबर शेवटची फेरी" आमिर म्हणाला.

"गाडी मार्केट कडून घे, गुलाबाचे फुल घ्यायचे आहेत आणि निशिगंधाची पण फुलं घ्यायची आहेत..." निलोफरने ड्रायव्हरला सूचना केली.

फुलबाजाराच्या बाजूला असलेल्या मिठाईच्या दुकानातून निलोफरने सुतरफेणी विकत घेतली.


कब्रस्तानात पोहोचल्यावरती तिच्या नजरेवर तिला विश्वासच बसला नाही, कबर एवढी सुंदर सजवलेली होती, पांढऱ्या संगमरवरावर  पिवळ्या आणि  गुलाबी रंगाने पर्शियन फुलांची नक्षी काढलेली होती, तिने आणलेली गुलाबाची फुलं निशिगंधाचे फूल आणि सुतरफेणी कबरीवरती व्यवस्थित मांडली, आपल्या ओढणीने सगळा संगमरवर परत पुसून स्वच्छ केला, बरोबर आणलेल्या उदबत्या आणि धूप त्याच्यापाशी लावला.

निलोफरने कबरीच्या माथ्यापासला उंच दगड आपल्या ओढणीने पुसून साफ केला ज्याच्यावरती लिहिलेलं होतं     


"माझा प्रिय पती, परममित्र, सखा, आमिर शहा."


आमिरच्या चेहऱ्यावरती प्रसन्न हास्य होते...


"इंजिनीयर साहेबा हा प्रोजेक्ट मात्र आपण एकदम उत्तम तयार केलात!"


"मी आता येथेच राहीन, मला आवडलं."


वाऱ्यावरती विरून जाणारे आमिरचे खळखळणार हास्य, त्याला आवडणारा गुलाबाचा आणि निशिगंधाचा सुगंध, सुतरफेणीचा येणारा गोड वास या सगळ्यामुळे निलोफर एकदम भानावर आली. तिच्या अंगावर सरसरून काटा आला.

निलोफर नि जेव्हा वळून बघितले तेव्हा कबर-स्थानांमध्ये तिच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते, आता पुढचा प्रवास तिला एकटीनेच करायचा होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy