Sandhya Yadwadkar

Horror

3  

Sandhya Yadwadkar

Horror

भास आभास

भास आभास

6 mins
302


सुबोध संध्याकाळचे ६.०० वाजण्याची आतुरतेने वाट पहात होता. आज सकाळी १० वाजताच अजयचा फोन आला होता की आज तो एका लग्नासाठी मुंबईला आलेला आहे.रात्री नाशीकला परत जाणार आहे.संध्याकाळ मोकळीच आहे.तर नक्की घरी येतो असं म्हणाला.सुबोधलाही आज संध्याकाळी काहीच काम नव्हतं त्यामुळे तोही 'अवश्य ये. वाट पहातोय ' असं म्हणाला.  


सुबोध एकदम खुशीत होता. अजय आज तब्बल सहा वर्षांनी भेटणार होता.सुबोधला त्यांचं लहानपण आठवलं.शाळेत असताना एकमेकांना भेटल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नव्हता. एकाच बेंचवर बसायचे ते दोघं.शाळा संपली आणि काॅलेजसाठी सुबोधने मुंबई गाठली.अजय तिथेच तालुक्यातील काॅलेजमध्येच गेला.घरची शेतीवाडी असल्यामुळे त्याला B.Sc ( Agri ) व्हायचं होतं.तेव्हां अधूनमधून ते संपर्कात असायचे, कधीतरी ठरवून भेटायचेही.पण सुबोध इंजिनिअरिंग नंतर MS करण्यासाठी US ला गेला.तीन वर्ष जाॅब करुन मागच्याच महिन्यात तर इथं परत आला. आई-बाबा दोघंही आजारी होते म्हणून.आणि आता तर आई-बाबा US ला परत जाऊच नको असंच सांगत आहेत.  


बरोबर सहाला पाच मिनिटे बाकी असतानाच दारावरची बेल वाजली. सुबोधने दारं उघडलं. दारात अजयच उभा होता. सुबोधने दारातच त्याला मिठी मारली.' अरे, हो हो.मला आत तर येऊ दे.' अजय म्हणाला.' साॅरी.तुला पाहून मला एव्हढा आनंद झालाय ना की माझ्या लक्षातच आलं नाही तू दारातच उभा आहेस ते.ये ये.आधी आत ये' सुबोधने त्याचा हात घट्ट पकडून त्याला आत घेतला. सोफ्यावर बसवला.ए.सी. चालू केला.त्याला आवडतं तसं अगदी थंडगार पाणी त्याला दिलं.


'अरे, सुबोध घरात कोणीच नाही? तू एकटाच आहेस? काका,काकू, वहिनी कुठे गेले सगळे?' अजयने विचारलं.


'आई-बाबा दोघंही गेलेत पुण्याला एका लग्नासाठी. दोन दिवसांनी परत येतील. आणि सुनीता गेली आहे तिच्या मावशीकडे.तिच्या मावसबहिणीचं डोहाळजेवण आहे म्हणून.रात्री येईल परत.बरं ते जाऊ दे सगळं. तू कसा आहेस? कसे चालले आहेत तुझे शेतीतले नवीन प्रयोग? खूप पसारा वाढवला आहेस असं ऐकलं.छान वाटलं ऐकून.काहीतरी वेगळं करतोस.' सुबोध म्हणाला.


' हो चालू असतं काहीतरी माझं.तू कसा आहेस? एव्हढी वर्षं US ला राहूनही जराही बदलला नाहीस.तसाच आहेस प्रेमळ.प्रत्येक चांगल्या गोष्टीचं मनापासून कौतुक करणारा.' अजय म्हणाला.


' बरं. मी आता आपल्यासाठी मस्त चहा करतो आणि मग आपण बाहेर जाऊ.गप्पा मारु.छानशा हॉटेलमध्ये जेवू.तुला किती वाजेपर्यंत निघायचं आहे?' सुबोधने विचारले.


' मी ९.३० ची ओला बुक केली आहे माटुंग्याहून. माझ्या मामांच्या घरुन.त्यांच्याच मुलीचं लग्न होतं ना.' अजय म्हणाला.


' ठीक आहे.चल तर मग .चहा पिऊ.मी तयार होतो.आणि लगेचच निघू.' सुबोध म्हणाला.


चहापाणी उरकून दोघेही घराबाहेर पडले.घराबाहेर पडण्यापूर्वी सुबोधने आपलं वॅलेट चेक केलं.त्यात दोन हजाराची एक नोट आणि बाकी सगळ्या पाचशे आणि दोनशेच्या नोटा होत्या.त्यांनी बाहेरच जेवायचं ठरवलं होतं.चौपाटीवर फिरुन दोघेही जेवणासाठी छानशा हॉटेलमध्ये गेले. अजयच्या आवडीचे सगळे पदार्थ मागवले.१९३४ रुपये बिल झालं.सुबोधने बिलासाठी दोन हजाराची नोट ठेवली.उरलेले सगळे पैसे टीप म्हणून ठेवले. दोघेही

हॉटेलच्या बाहेर पडले.परत लवकरच नाशीकला अजयच्या शेतावर भेटण्याचे ठरवून दोघेही आपापल्या घरी निघून गेले.


सुबोध एकदम खुशीत शीळ वाजवत घरी आला. बेल वाजवली.दार सुनीताने उघडले. घरात गेल्यागेल्या सुबोधने अजय आल्याचा सगळा वृत्तांत आपल्या नेहमीच्या स्टाईलने हातवारे करत सांगितला.सुनीतानेही मावशीच्या घरातल्या समारंभांचं साग्रसंगीत वर्णन केले. दोघांनाही जेवायचं नव्हतं.त्यामुळे थोडावेळ टी.व्ही.पाहून दोघंही झोपली.


दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सुबोध आपलं सगळं आवरून पेपर वाचण्यासाठी सोफ्यावर बसला.पेपर वाचता वाचता त्याचं लक्ष समोरच्या टी-पाॅयकडे गेलं.तिथे त्याला घड्याळ दिसलं.जवळ जाऊन पाहिले तर ते अजयचेच असल्याचं त्याच्या लक्षात आलं.अजयला वेगवेगळ्या ब्रॅंडची महाग घड्याळं वापरायचा फार शौक होता.हे घड्याळसुध्दा असचं महागडं होतं.गोल्ड प्लेटेड डायमंड स्टडेड.अजयच्या घरी फोन करून त्याला सांगू.नाहीतर उगाचच तो शोधत बसेल.वेळेवर घरी पोचला की नाही ते पण विचारु.असा विचार करत सुबोधने अजयच्या घरचाच फोन लावला.त्याच्या घरचा नंबर लक्षात ठेवायला अगदी सोप्पा असल्यामुळे सुबोधच्या पक्का लक्षात होता.त्याने फोन लावला.


' हॅलो.कोण बोलतंय?' पलीकडून आवाज आला.


' मी सुबोध बोलतोय.अजयचा मित्र.आपण कोण बोलताय?' सुबोधने विचारले.


' मी विजय.अजयचा भाऊ.'


' विजय का? ओळखलं का मला? अरे काल अजय आला होता माझ्याकडे.रात्रीच लगेच परत गेला नाशीकला. त्याचं घड्याळ इथेच विसरला. म्हटलं फोन करुन सांगावं. '


'काय म्हणालास सुबोध? अजय आला होता? कसं शक्य आहे?' विजय पलिकडून आश्र्चर्यचकित आवाजात म्हणाला.


' अरे.कसं शक्य आहे म्हणजे? तो इथे लग्नासाठी आला होता.मला त्यानेच फोन केला आणि आमच्या घरी आला.मग आम्ही बाहेरच जेवलो आणि तो नाशीकला परत गेला.' सुबोध म्हणाला.


'सुबोध तुला बहुतेक काहीच माहीत नाही असं दिसतंय.अरे अजय दोन वर्षांपूर्वीच एका रोड ॲक्सिडेंटमधे गेला.आई घरातच पडली आणि पायाला फ्रॅक्चर झालं.तिलाच हाॅस्पिटलमधे अॅडमिट करून घरी येत होता.एक सळ्यांनी भरलेला ट्रक भरधाव वेगानं आला आणि त्याच्या गाडीवर आदळला.एका मिनिटांत सगळा खेळ खलास. बाबांनी तेव्हापासून अंथरुणच धरलाय. आमच्या घरातला सगळा आनंदच नाहीसा झाला रे.' विजय आवंढा गिळत बोलत होता.


सुबोध एकदम सुन्न झाला.त्याला दरदरून घाम फुटला.फोन त्याच्या हातातून कधी गळून पडला हे त्याला कळलेच नाही.त्याचे लक्ष टी-पाॅयकडे गेलं.आता तिथे घड्याळ दिसतं नव्हतं.तो आणखीनच घाबरला.सोफ्याच्या शेजारीच असलेल्या साईड टेबलवरच त्याचं वॅलेट पडलेलं होतं.ते त्यानं सहज उघडलं.आता तर त्याची पाचावरच बसली.वॅलेटमधे दोन हजाराची नोट जशीच्या तशीच असलेली त्याला दिसली.त्याला पक्क आठवतं होतं की आपण फक्त एकच दोन हजाराची नोट आपल्या पाकीटात ठेवली होती जी आपण हाॅटेलमधे खर्च केली.मग ही नोट आता कुठुन आली.तो अगदी बधीर झाला.एकापाठोपाठ हे सगळं काय चाललंय त्याला काहीच कळतं नव्हतं.पण हे सगळं काहीतरी विचित्र आहे अशी त्याची मात्र आता खात्री पटली. आणि त्याने जोरात 'सुनीता' अशी किंकाळी फोडली.आवाज एव्हढा मोठा होता की सुनीता धावतच किचनमधून बाहेर आली.'अरे, सुबोध, काय झालं? एव्हढा का तू घाबरला आहेस? तुला घाम बघ किती आलाय. काय होताय तुला?'


' भूत.भूत आहे नक्कीच.' सुबोध लटपटत म्हणाला.


' अरे, कसलं भूत? कुठून आलं हे भूत?


' अग, आत्ता मी अजयच्या घरी फोन केला होता.आणि त्याच्या भावाने,विजयने, अजय दोन वर्षांपूर्वीच रोड ॲक्सिडेंटमधे गेला असं सांगितलं.मग काल कोण आलं होतं? आम्ही हाॅटेलमध्ये गेलो.खूप गप्पा मारल्या.तो नाशिकला रात्रीच परत गेला आणि मी घरी आलो.'


'काहीतरीच काय? काल रात्री तू कुठे बाहेर गेला होतास? मी मावशीकडून दहा वाजता आले तर तू ढाराढूर झोपला होतास.बेल वाजवून दारसुध्दा उघडलं नाहीस.मी माझ्याकडच्या चावीने लॅच उघडलं'.


'नाही सुनीता.अगं असं काय करतेस? मी तुला रात्री घरी आल्यावर अजय आला होता ते सगळं सांगितलं नाही का?मला खात्री आहे काहीतरी गडबड आहे.सगळंच कसं एकाएकी गायब होतंय? आधी घड्याळ.खर्च केलेली दोन हजाराची नोट परत पाकीटात जशीच्या तशी.आणि आता विजय तर सांगतोय अजय दोन वर्षांपूर्वीच गेला म्हणून. नक्कीच भुताटकी आहे.मला काही सुचतच नाही.'सुबोध घाम पुसत म्हणाला.


'अरे, सुबोध काय हा वेडेपणा.भूत वगैरे काहीही नसतं.हे सगळे आपल्या मनाचेच खेळ असतात. तुला काहीतरी भास होत असतील.' सुनीता त्याला धीर देत म्हणाली.


' काहीतरी भुताटकीच आहे.काल अजयपण खूप वेळा भूताचे त्याला गावात आलेले अनुभव सांग जोत होता.भूत ,पिशाच्च योनी नक्की असते.मला तर आता खात्रीच पटली आहे. भूत आहे.तेच हे सगळं घडवून आणतयं. भूत.भूत.' सुबोधच किंचाळणं काही थांबत नव्हतं.'


आता मात्र सुनीताही थोडीशी घाबरली. नेमके आई बाबा घरात नव्हते. सुबोधच काहीतरी खरचं बिघडलंय हे तिच्या लक्षात आलं.त्यांच्या लग्नाला आता दोन वर्षं होऊन गेली होती.पण ह्यापूर्वी सुबोधला असा कधीच कसलाही भास झाला नव्हता.आता डॉक्टरांना बोलावलंच पाहिजे असा सुनीताने विचार केला.त्यांच्या फॅमिली डॉक्टरना, डॉ. सान्यांना बोलवायचं तिनं ठरवलं. डाॅक्टर येईपर्यंत तिनं सुबोधला हाॅलमधल्या दिवाणावर झोपवलं. 


डॉ. साने आधी त्यांच्याच बिल्डिंग मध्ये दुसऱ्या मजल्यावर रहात होते.पण मागच्याच महिन्यात शेजारीच झालेल्या नवीन टाॅवरमध्ये अकराव्या मजल्यावर ते शिफ्ट झाले होते. सुनीता डॉक्टरांना बोलवायला त्यांच्या घरी गेली.


डॉ साने आले.आल्याआल्या सुबोधच्या खांद्यावर थोपटत म्हणाले,'हं काय झालं सुबोध? तुला म्हणे भूत दिसलं. अरे वेड्या,एव्हढा तू शिकलास . फाॅरेनला चार पाच वर्षं राहून आलास.आणि तूही भूत पिशाच्च अशा गोष्टींवर विश्वास ठेवतोस.कमाल आहे.भूत वगैरे काहीही नसतं.हे सगळे आपल्या मनाचेच खेळ आहेत.ती एक प्रकारची मानसिक अवस्था आहे. आपल्या अंतर्मनात दडलेल्या गोष्टी कधी कधी असे काहीतरी भास निर्माण करतात. कधीकधी जागेपणीच आपण स्वप्न बघतो.आणि ते स्वप्न एव्हढं लांबत की सगळं प्रत्यक्ष घडतंय असंच वाटू लागतं.तसचं काहीसं झालंय तुझ्या बाबतीत.' डॉक्टर त्याला तपासत म्हणाले.'काही घाबरु नकोस.मी तुला औषध देतो.तुला जरा जास्त झोप येईल.उद्यापर्यंत तू एकदम ठणठणीत होशील.ह्या दोन दोन गोळ्या जेवणानंतर घे.तू जास्तीच झोपशील. पण काळजी करु नकोस. काही वाटलं तर मला तसं कळवं.' गोळ्या छोट्या कागदी पाकिटात घालून ते पाकीट टीपॉयवर ठेवून परत सुबोधच्या खांद्यावर थोपटत डॉक्टर निघून जातात.


पाचच मिनिटांनी सुनीता चेहरा पाडून घरी आली.लगेचच ती सुबोधला म्हणाली.'अरे, खूप वाईट बातमी आहे.आज सकाळीच डॉक्टर साने हार्ट अटॅकनी गेले.'


सुबोध ताडकन उठून उभा राहतो आणि जोरात ओरडतो ' मग मला आत्ता तपासून गेले ते कोण होते?'


Rate this content
Log in

More marathi story from Sandhya Yadwadkar

Similar marathi story from Horror