DINK
DINK
नंदाताई कंबर धरतच उभ्या राहिल्या. अलिकडे त्यांना खूप थकवा जाणवत होता. ओम, त्यांचा नातू, खूप मस्तीखोर झाला होता. परवाच त्याचा तिसरा वाढदिवस साजरा केला. त्याचं वयच आहे आता मस्ती करण्याचं. लाघवी तर इतका आहे की त्याच्यावर रागावणं पण कठिणच. आताशा नंदाताईंना आरडाओरडा, आदळआपट, उड्या मारणं वगैरे सहन होत नव्हतं. आता त्या पण ६८ वर्षांच्या झाल्या होत्या. सगळी कामं करायला बायका होत्या. पण तरीही घरातल्या बाईला सगळीकडे लक्ष ठेवावंच लागतं. म्हणून त्यांना पाहिजे तेवढी विश्रांती मिळत नव्हती. पण सांगणार कोणाला? त्यांचाच आग्रह होता नातवंड पाहिजे म्हणून. मग आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. ओम नुकताच गाढ झोपला होता. त्याच्या निरागस चेहऱ्याकडे बघत असताना नंदाताईंच्या डोळ्यांसमोरून आत्तापर्यंतचा त्यांचा जीवनपट झराझर उलगडू लागला.
नंदाताई आणि अशोकराव, एक उच्चमध्यमवर्गी कुटुंब. अजय आणि अनघा, अत्यंत गुणी मुलं. अशोकराव प्रथितयश बॅंकेतून डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झाले होते. नंदाताई शाळेत शिक्षिका होत्या. लग्नानंतर तब्बल ८ वर्षांनी पण पाठोपाठ दोन मुलं झाल्यावर त्यांनी नोकरी सोडली होती. मुलं मोठी झाल्यावर त्या घरीच शिकवण्या घ्यायच्या. अजय आणि अनघा, दोघेही अत्यंत देखणे आणि हुशारही. दहावी, बारावी दोन्ही परीक्षांमध्ये मेरीटलिस्टहोल्डर. अजय VJTI मधून M.Tech आणि अहमदाबाद IIM झाला. एका मोठ्या नावाजलेल्या मल्टीनॅशनल कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता. अनघा आर्किटेक्ट झाली. उच्चशिक्षणासाठी कॅनडाला गेली आणि जोडीदार शोधून तिथेच settle झाली. करीयर महत्त्वाची म्हणून लग्नानंतर लगेच दिवस गेले तर ऍबॉर्शन केलं. आता लग्नाला सहा वर्ष झाली. मूल हवं म्हणून आता डॉक्टरी इलाज चालू आहेत. पण काही यश मिळत नव्हतं. नंदाताईंचेसुद्धा इथे उपासतापास चालू होते. पण अजूनही आजी होण्याचं भाग्य त्यांना लाभलं नव्हतं.
अजय आता छान मार्गी लागला होता. खूप बिझी असायचा. प्रोजेक्टची कामं, मिटींग्ज, सेमिनार, फाॅरेन व्हिजीट्स, सारखं काहीतरी चालू असायचं. नंदाताईंचा त्याच्यामागे 'आता तुला ३३वं वर्ष लागेल. लवकर लग्न कर' असा सतत धोशा चालू असायचा. आणि त्याचं मात्र 'थांब गं. सध्या मला अजिबातच वेळ नाही' असं ठरलेलं उत्तर असायचं. अशोकराव नेहमीप्रमाणे तटस्थ असायचे.
पण आता मात्र नंदाताईंनी अजयच्या लग्नाची मोहीमच उघडली. सगळ्या नातेवाईकांना सांगून ठेवले. अनेक विवाहसंस्थांमध्ये नाव नोंदवून झाले. या वर्षी लग्नाचा योग जुळून आलाच पाहिजे असा त्यांनी चंगच बांधला. खूप प्रपोजल्स आली. कुठे उंची कमी तर कुठे शिक्षण कमी. कुठे मुलीला मुलाचे आई-वडील अजिबात जवळ नको होते तर कुठे मुलीला फॉरेनलाच कायम राहायचं होतं. एक ना दोन शंभर गोष्टी. चार पाच महिने झाले मोहीम सुरु करुन. पण गोष्टी जशा होत्या तशाच राहिल्या. गाडी काही पुढे सरकत नव्हती. नंदाताईंची अखंड बडबड चालू असायची. अशोकराव मात्र शांतपणे म्हणायचे, 'योग आल्याशिवाय काही होणार नाही. एकदा त्यांच्या मनात आलं की चुटकीसरशी सगळं जमून येईल बघ. काही काळजी करु नकोस.'
आणि अखेर योग आला. अमिता देशपांडेची प्रोफाइल मॅट्रिमोनिवर आली. अजयसाठी अगदी अनुरुप. नंदाताईंना अमिताची सगळी माहिती आणि तिचा फोटोही खूप आवडला. रंग, रुप, उंची, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी सगळं सगळं अगदी अजयला अनुरुप. अजय कामासाठी दोन दिवस दिल्लीला गेला होता. शनिवारी आल्याबरोबर त्याला अमिताबद्दल सांगायचं असं नंदाताईंनी ठरवलं. ठरल्याप्रमाणे अजय शनिवारी आला. काम लवकर आटोपलं म्हणून आधीच्या फ्लाईटने तो दुपारीच आला. त्याची झोप वगैरे झाले की संध्याकाळी चहा पितानाच विषय काढायचा असं नंदाताईंनी ठरवलं.
अजयच्या आवडीचा आलं घातलेल्या वाफाळलेल्या चहाचा कप घेऊन नंदाताई डायनिंग टेबलजवळ आल्या. त्याला चहा आणि चिवडा देऊन त्या त्याच्यासमोरच्याच खुर्चीत लॅपटॉप घेऊन बसल्या. चहापाणी झाल्यावर त्यांनी अजयला अमिताची प्रोफाईल दाखवली. 'कशी वाटते तुला ही मुलगी?' नंदाताईंनी उत्सुकतेने विचारलं. कधी नव्हे ते अजयनेही इंटरेस्ट घेऊन प्रोफाईल पाहिली. त्याच्या डोळ्यातले पसंतीचे भाव नंदाताईंच्या चाणाक्ष नजरेने लगेच टिपले. 'मग जायचं का पुढे?'
नंदाताईंनी मिष्किलपणे विचारले. अजयने होकारार्थी मान हलवली. नंदाताईंना हायसं वाटलं.
दुसऱ्या दिवसापासून नंदाताईंची धावपळ सुरु झाली. त्यांनी प्रोफाईलमधील फोन नंबरवर कॉन्टॅक्ट केला. तिच्या आईनेच फोन घेतला. जुजबी बोलणं झाल्यावर नंदाताईंनी अजयची आणि आपल्या कुटुंबाची सगळी माहिती सांगितली आणि त्याची प्रोफाईल अमिताच्या मेलवर फॉरवर्ड केली. दोनच दिवसात अमिताकडूनही होकाराचा मेसेज आला. नंदाताई एकदम खुश झाल्या. आता त्यांनी अशोकरावांना अमिताच्या घरी फोन करायला सांगितलं आणि येत्या रविवारीच आपल्याच घरी देशपांडे कुटुंबियांना बोलवायला सांगितले. फोन झाला आणि रविवारची संध्याकाळची पाचची वेळ पक्की झाली.
रविवार उजाडला. नंदाताईंची सकाळपासूनच लगबग सुरु झाली. रखमाकडून सगळे पडदे, सोफ्याची कव्हर्स, बेडच्या चादरी, फ्लॉवरपॉटमधली फुलं सगळं बदलून घेतलं. ठेवणीतली काचेची भांडी साफ करुन टेबलवर ठेवून घेतली. त्यांना घर नीटनेटके, स्वच्छ आणि आकर्षक ठेवण्याची खूप आवड होती. आदल्या दिवशीच त्यांनी आशाकडून (पोळीवाली बाई) रव्याचे लाडू आणि चिवडा करुन घेतला होता. संध्याकाळी चार वाजताच आपलं चहापाणी उरकून त्यांची आवडती हिरव्या रंगाची बांधणी साडी नेसून नंदाताई तयार होऊन बसल्या. अजय आणि अशोकरावही लेंगा झब्बा परिधान करुन हाॅलमध्ये सोफ्यावर बसले.
बरोबर पाच वाजून पाच मिनिटांनी बेल वाजली. देशपांडे कुटुंबीय आले. मिस्टर आणि मिसेस देशपांडे, अमिता आणि तिची लहान बहिण अंतरा. हवापाण्याच्या, राजकारणाच्या गप्पा मारुन झाल्यावर नंदाताईंनी लाडू चिवडा आणि चहा आणला. सगळ्यांचं खाणं पिणं झालं. नंदाताईंच्या घराचं, त्यांच्या नीटनेटकेपणाचं कौतुक झालं. मग अजय आणि अमिता गप्पा मारायला गच्चीत गेले. तासाभरानी घरात आले. दोघेही खुश दिसत होते. 'दोन दिवसांनी फोन करतो' अशोकराव म्हणाले. सात वाजता देशपांडे कुटुंबीय गेले. अजयने ताबडतोब आपली पसंती आईकडे व्यक्त केली. नंदाताई आणि अशोकरावही अमिता व पूर्ण देशपांडे फॅमिलीवर मनापासून खुश होते.
दुसऱ्याच दिवशी दुपारी मिस्टर देशपांडेंच्या घरुन फोन आला. अमिताला अजय मनापासून आवडल्याचं त्यांनी सांगितलं. अशोकरावांनीही अजयचा होकार सांगितला. पुढची बोलणी कधी करायची म्हणून विचारत होते. शनिवारी देशपांडेंच्या घरी संध्याकाळी पाच वाजता मिटिंग ठरली. पूर्ण आठवड्यात अजय आणि अमिता दोन-तीन वेळा एकमेकांना भेटले. दोघेही एकमेकांवर बेहद्द खुश होते. शनिवारी ठरल्याप्रमाणे मिटिंग झाली. पंधरा दिवसांनी साखरपुडा आणि दोन महिन्यांनी लग्न पक्क झालं.
दिवस पटापट जात होते. नंदाताईंची धावपळ सुरु झाली. साड्यांची, दागिन्यांची खरेदी, जेवणाचा मेनू, हॉलचं डेकोरेशन, आमंत्रण, पाहुण्यांची व्यवस्था कामांची यादी काही संपत नव्हती. लग्नाच्या आधी आठच दिवस अनघा आणि अतुल आले. मग त्यांची गडबड. सगळं व्यवस्थित पार पाडण्यासाठी नंदाताई धडपडत होत्या. अशोकरावांचीही त्यांना तेवढीच साथ होती. शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. ठरवल्याप्रमाणे सगळं सुरळीत पार पडलं. अतिशय झोकात कार्य झालं. त्या दोघांचेही सगळ्यांशीच चांगले संबंध असल्यामुळे बोलाविलेली सगळी मंडळी आवर्जून लग्नाला आली होती. सोनपावलांनी अमिताचा गृहप्रवेश झाला. अनघासकट सगळी पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली. अजय अमिताही हनिमूनला मॉरीशसला गेले. घरात फक्त नंदाताई आणि अशोकरावच उरले. तेव्हा अशोकराव नंदाताईंना म्हणाले, 'बघ मी सांगत होतो तसंच झालं. एकदा त्यांनी ठरवलं की कसं सगळं पटापट सुरळीत पार पडलं.' नंदाताईंनीही कृतार्थतेने मान डोलावली.
हनिमूनहून आल्यावर रजा संपली आणि अजय, अमिता दोघेही ऑफिसला जाऊ लागले. नव्यानवलाईचा अजयचा संसार सुरु झाला. नंदाताई काहीही काम अमिताच्या नावाने ठेवत नव्हत्या. दुपारी ती ऑफिसच्या कॅंटिनमध्येच जेवायची. रात्री बऱ्याचदा तिला घरी यायला उशीर व्हायचा. तिने नंदाताईना सांगून ठेवले होते की माझ्यासाठी जेवायचं कोणी थांबू नका. मग नंदाताई आणि अशोकराव जेवून घ्यायचे. अजय मात्र तिच्यासाठी थांबायचा. दोघे छान गप्पा मारत जेवायचे. मागचं सगळं दोघे मिळून आवरायचे. त्या दोघांचं छान जमायचं. एकंदर सगळं छान सुरळीत चालू होतं.
पहिलाच सण दसरा आला. अमिताला नंदाताईंनी छानसे सोन्याचे हॅंगिंग इयरिंग्ज घेतले. पण ते तिला बिलकूल आवडले नाहीत. 'मी फक्त डायमंडचेच इयरिंग्ज घालते. आणि हॅंगिग तर मला अजिबातच आवडत नाहीत.' अमिताने फटकन सांगितले. नंदाताईंचा चेहरा खर्रकन उतरला. अजय समजूतीच्या स्वरात म्हणाला, 'अगं आई यापुढे तू तिला विचारुनच तिच्यासाठी काही आणायचं असेल तर आण. उगाचच तुला वाईट वाटायला नको.' नंदाताईंनी कानाला खडा लावला. उगाचच आपली आवड अमितावर लादायची नाही.
दिवस भराभर पुढे सरकत होते. कुठलाही सण म्हणजे दिवाळी, संक्रांतीचं हळदीकुंकू, पाडवा, मंगळागौर, नवरात्र उत्सव साजरा करायला अमिताने स्पष्टपणे नकार दिला. तिला सण साजरा करणं म्हणजे पैसा आणि वेळेचा अपव्यय वाटत होता. ती अतिशय स्पष्टवक्ती होती. तिच्या विचारांवर ती अतिशय ठाम असायची. तिला जे पटत नव्हतं ते ती लगेच बोलून दाखवायची. मग समोर कोण आहे याचा ती जराही विचार करायची नाही. नंदाताईंना अमिताच्या अशा स्वभावाचा खूप त्रास होत होता. अजय आणि अशोकराव त्यांना वेळोवेळी समजावत होते. हळूहळू नंदाताई आपला स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करत होत्या. अनघा परदेशी असल्यामुळे तिचे कुठलेही सणवार साजरे करता आले नव्हते. आता अमिताला आवडतं नव्हतं म्हणून आताही त्यांना त्यांची हौस भागवता येत नव्हती.
आज अजयच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली. Anniversary साजरी करायला सगळेजण मोठ्या हाॅटेलमध्ये जेवायला गेले. हे असं सेलिब्रेशन अमिताला आवडायचं. विकेंड म्हणजे माॅल, शाॅपिंग, हाॅटेलिंग असं तिचं गणित होतं. घरकामाची तिला फारशी आवड नव्हती. ती फार करियर माईंडेड होती. सारख्या मिटिंग्ज, सेमिनार, प्रेझेंटेशन, डेटा अपडेशन. अमिता जात्याच हुशार होती. संभाषणकला उत्तम अवगत होती. पर्सनॅलिटीही आकर्षक होती. राहायचीही अपटूडेट. कायम वेस्टर्न आउटफिटमधेच ऑफिसला जायची. तीही टेलीकम्युनिकेशन इंजिनियर आणि MBA Finance होती. त्यामुळेच तिला ऑफिसमधे चांगलाच मान होता. ऑफिसमधे सारखं पुढेपुढे कसं जायचं याचाच विचार तिच्या मनात चालू असायचा. घरात सगळी कामं करायला बायका होत्या. पण नंदाताईंना वाटायचं कधीतरी सुट्टीच्या दिवशी एखादा पदार्थ अमिताने आवडीने करुन सगळ्यांना खाऊ घालावा. कधी सगळ्या घराची सजावट बदलावी. नवीन चादरी, पडदे, सोफ्याची कव्हर्स मला बरोबर घेऊन आणावीत. पण हे सगळे त्यांच्या मनाचेच मांडे होते. यातील काहीच घडत नव्हतं. नंदाताईंनी हल्ली हे सगळं मनाला लावून घेण्याचं सोडून दिलं होतं. उगाच वादविवाद आणि बोलाचाली वाढायला नको. घर आनंदी ठेवायचं म्हणजे कोणीतरी पडतं घेणं भागच असतं हे त्यांना पक्क माहिती होतं.
दिवस, महिने पुढेपुढे जातं होते. आता नंदाताईंना नातवंडाची ओढ लागली होती. आजी होण्याचं स्वप्न अजून स्वप्नच राहिलं होतं. अनघाकडून काहीच गोड बातमी येत नव्हती. आता अमिताच्या पाठीस लागायलाच पाहिजे, ती काहीही बोलली तरी. उद्याच शनिवार आहे. विषय काढायचाच अशी खूणगाठ मनाशी पक्की बांधून त्या झोपायला आपल्या बेडरूममध्ये गेल्या.
शनिवार असल्यामुळे आज अमिता सकाळी दहा वाजता उठली. मग मोबाईल, सगळ्या सोशल साईट्सवर व्हिजीट. सावकाश आंघोळ. नशीब आज कुठे आउटींगला जायचं नव्हतं. सोमवारी महत्त्वाची मिटिंग होती त्याची तिला PPT बनवायची होती. चहाच्या वेळेस सगळे जण एकत्र डायनिंग टेबलवर जमले होते. हीच योग्य वेळ आहे असा विचार करत नंदाताईंनी विषयालाच हात घातला. त्या म्हणाल्या, 'अजय, अमिता आता पुरे झालं तुमचं प्लॅनिंग. आता मला नातवंड हवं. तुमची आणि आमची दोघांचीही वय वाढत चाललीत. हल्ली एकच मूल असतं. पण ते वेळेवर होऊन जाऊ दे.'
'आई, मला अजिबात मूल नको आहे. मूल म्हणजे आपणच आपल्या जबाबदाऱ्या उगाचच वाढवायच्या. ते गरोदरपण, बाळंतपण, मुलाला मोठं करायचं, त्याची शाळा, क्लासेस, मार्क, परीक्षा, आजारपणं मी. छे. छे मला हे काहीही नको आहे. एका मुलाच्यापाठी माझ्या पूर्ण करीयरचं वाटोळं. आता तर पुढच्याच वर्षी माझं प्रमोशन आहे. रिजनल हेडचे मला फुल चान्सेस आहेत. माझा ट्रॅक रेकॉर्ड छान आहे. माझी सगळी टार्गेट्स पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता सध्या तर मूल वगैरे तुम्ही काही बोलूच नका. आणि असंही DINK म्हणजे डबल इन्कम नो किड्स ही विचारधारा मला मनोमन पटते. मस्त कमवायचं आणि मस्त एंजॉय करायचं. उगाचच मुलांमुळे आपलं पर्सनल लाईफ वाया कशाला घालवायचं?'
नंदाताईंनी अवाक् होऊन अमिताचे बोलणं ऐकून घेतलं. पण त्या पण आता ईरेला पेटल्या होत्या. त्या म्हणाल्या, 'अगं हे तुझे विचार झाले. अजयशी बोललीस का तू या बाबतीत? त्याला तर मुलांची खूप आवड आहे. लहानपणी बिल्डींगमधल्या सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना सुट्टीच्या दिवशी गोळा करुन खेळायचा. ते काही नाही. मी प्रत्येक बाबतीत भांडण नकोत म्हणून तुझ्याशी तडजोड करत आले. पण नातवंडाच्या बाबतीत तुम्हाला माझं ऐकावंच लागेल.' असं म्हणत नंदाताईंनी आपली बेडरुम गाठली.
शनिवार आणि रविवारची अख्खी रात्र अजयने अमिताची समजूत घालण्यात घालवली. योग्य वेळी मूल होणं किती गरजेचं आहे हे तिला नानापरीने समजावून सांगितले. तसा अलिकडे तो वारंवार मुलाचा विषय तिच्याकडे काढायचा. पण अमिता त्याला कायम धुडकावून लावत असे. आता आईनेच सांगितल्यावर त्याला पण ते पटलं. असंच आणखी एक वर्ष उलटलं. अमिता काहीही मनावर घेत नव्हती. तिच्या आईकडूनही सांगून झालं. पण तिचं मात्र एकच उत्तर 'मला मूल नको.' ह्याच एकाच गोष्टीवरून घरात वाद वाढायला लागले. अबोला, रागावणं हे नेहमीचंच झालं. पण परिस्थितीत काहीच फरक पडत नव्हता. शेवटी नंदाताईंनी बायकांचं जालीम अस्त्र उगारलं. त्यांनी अजय, अमिताला निक्षून की जर तिनं यापुढे मूलं नको म्हटलं तर त्या जीवाचं काहीतरी बरंवाईट करुन घेतील. ही मात्रा मात्र लागू पडली. अमिता आई होण्यास तयार झाली. पण तिने नंदाताईंना ठामपणे सांगितले की मी फक्त मुलाला जन्म देईन. बाकी त्याला वाढवायची सगळी जबाबदारी तुमची सगळ्यांची असेल. माझ्याकडून कुठलीही अपेक्षा तुम्ही ठेवू नका. रात्रीची जागरणं, त्याचं आजारपण, शाळा, अभ्यास या कुठल्याच बाबतीत माझा सक्रिय सहभाग नसेल. बघा. अजूनही विचार करा. तुमच्या उतारवयात हे तुम्हाला सगळं झेपणार आहे का? नंतर मला बोलू नका. मला माझं ऑफिस, करीयर हेच जास्ती महत्त्वाचं आहे आणि कायमचं राहील. माझी महत्त्वाची मिटिंग, सेमिनार,फाॅरेन व्हिजीट असली तरी मूल आजारी आहे म्हणून मी कॅन्सल करणार नाही. मी सगळं आताच स्पष्टपणे बोलते. तुम्हाला ते खूप जहाल वाटेल पण माझे विचार माझे आहेत आणि त्यात काहीही तडजोड मी करणार नाही.' नंदाताईंनी अमिताच्या सगळ्या बोलण्याला मान डोलावली. तिचा होकारच त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता.
सह महिन्यांतच गोड बातमी आली. ती पण अजयनेच सांगितली. दीड महिनाच झाला होता. डाॅक्टरांकडे जाऊन कन्फर्म करुन झाले. नंदाताईंना स्वर्ग दोन बोटं उरला. सगळ्यांना फोन करुन झाले. हेही अमिताला आजिबात आवडलं नाही. ती म्हणाली, 'आई, एवढी कशाला दवंडी पिटत सगळीकडे सांगायला पाहिजे? त्यात काय जगावेगळं आहे? जीवशास्त्राच्या नियमाप्रमाणे हे होतंच. त्यात आमचं काय कर्तृत्व?' नंदाताई हिरमुसल्या. पण लगेच त्यांनी स्वतःची समजूत घातली. चोरओटी, पाच महिन्यांची ओटी, डोहाळजेवणं या सगळ्या समारंभांना अमिताने आपल्या नेहमीच्या स्वभावानुसार नकार दिला. तिचे डोहाळे पुरवावे असं नंदाताईंना सारखं वाटायचं. पण तो सुद्धा आनंद अमिताने त्यांना लाभू दिला नाही. 'कसले डोहाळे. मला तर हे असले चोचले पुरवणे मुळीच पटत नाही. गरोदरपण ही एक नैसर्गिक अवस्था आहे. ते काही आजारपण नाही. त्या शेतमजूर बायका बघा. बाळंत व्हायच्या शेवटच्या क्षणापर्यंत शेतात काम करतात. त्यांचे कोण डोहाळे पुरवतं? हे तुमचेचं काहीतरी नसते लाड करणं आहे. मला नाही कसले डोहाळे लागलेत. मी अगदी नाॅर्मल आहे. मला तुम्ही असं सारखं सारखं विचारु पण नका. मला जे पटत नाही ते मला आवड नाही.' नंदाताईंना अमिताच्या या अशा जगावेगळ्या वागण्याचे आश्चर्यच वाटायचं. ही स्त्री असूनही एवढी कोरडी कशी? आई होण्यातला कणाएवढाही आनंद हिला होत नाही? स्त्रीच्या नैसर्गिक कोणत्याही भावना हिच्याजवळ कशा नाहीत? ते लाजणं, नटणं, मिरवणं, नखरे करणं, लाड, कौतुक करुन घेणं. ती कोमलता, ते ममत्व, ते वात्सल्य काहीच नाही? ही बनले तरी कुठल्या मुशीतून? नंदाताई खरंच चक्रावून गेल्या होत्या. आपण धरलेला नातवंडाचा हट्ट आपल्यावर पश्चात्तापाची वेळ तर आणणार नाही ना? अशा अनेक शंकांनी त्यांना खरोखर रडकुंडीला आणले होते. पण अमिता एकदा बाळंतीण झाली, मुलाला पाहिलं की ती नक्कीच बदलेल. अशी त्या स्वतःची समजूत घालायच्या. अजय आणि अशोकरावही त्यांना 'काळजी करु नकोस' असं वारंवार बजावत असत.
बाळंतपणासाठी अमिता पद्धतीप्रमाणे आईकडे जायला हवी होती. पण तीही प्रथा तिने मोडली. केवळ तुमच्या आग्रहामुळे मी माझ्या मनाविरुद्ध आई होण्यास तयार झाले. आता बाळंतपण तुम्हीच करायचं. नंदाताईंना हो म्हणण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. डाॅक्टरांनी अमिताला आठवा महिना लागल्यावरच रजा घ्यायला सांगितले. पण कामाचं खूपच प्रेशर असल्याने तिनं due dateच्या फक्त आठ दिवस आधीपासून रजा घेतली. अमिता घरी राहिल्यावरसुद्धा अजिबात आराम करत नव्हती. सारखी लॅपटॉपच्या समोर बसून ऑफिसमधल्या तिच्या हाताखालील माणसांना सूचना देत होती. बरं काही सुचवायची, सांगायची तर सोयच नव्हती. लगेच ती चवताळूनच अंगावरच यायची. 'हे सगळे नाॅर्मल आहे. मी हाॅस्पिटलला ऍडमिट होईपर्यंत ऑफिसचे काम करणार.' शेवटी हाॅस्पिटलला जायची वेळ आली. शनिवार असल्यामुळे अजय घरीच होता. पटकन त्यांनी गाडी काढली आणि सगळेजण हाॅस्पिटलला पोहोचले. डाॅक्टरना तिने आधीच सिझरिअनच करायला सांगितलं होतं. 'मी काही कळा वगैरे सहन करणार नाही.' सिझरीन झालं. गोरापान, गुटगुटीत, रेखीव, सुरेख जावळ असलेला मुलगा झाला होता. शुद्धीवर आल्यावर तिने फक्त एकदाच बाळाकडे पाहिलं आणि 'मुलगा आहे वाटतं' असं रुक्षपणे म्हटलं आणि ती झोपली.
नंदाताई खूप खुश झाल्या. सगळ्यांना कळवून झाले. सोसायटीत अशोकरावांनी पेढे वाटले. पाच दिवसांनी अमिता बाळाला घेऊन घरी आली. आल्याबरोबर तिनं सांगितलं, 'आई बाळ तुमच्याच जवळ झोपेल. मी त्याला दूध वगैरे पाजणार नाही. सिझरमुळे माझी पाठ आणि कंबर प्रचंड दुखते आहे. तुमची इच्छा मी पूर्ण केली. मी आधीच सांगितल्याप्रमाणे मी फक्त जन्म देण्याचं काम केलं. आता त्याचं संपूर्ण संगोपन तुम्ही करायचं. मी त्याच्याबाबतीत तुम्ही घेतलेल्या कुठल्याही निर्णयाच्या आड येणार नाही. दीड महिन्यानंतर मी ऑफिस जॉइन करेन. तीन महिन्यांतच माझं रिजनल हेडचं प्रमोशन ड्यू आहे. मला तिथे concentrate करायला हवं.
नंदाताई त्या क्षणापासून बाळाचे आईपण निभावत आहेत. कुठलीही तक्रार न करता. आपल्या हट्टाची किंमत चुकवण्यासाठी.