Nilesh Bamne

Romance

2.8  

Nilesh Bamne

Romance

भाडेकरु

भाडेकरु

12 mins
2.6K


प्रतिभाच्या समोरच्या घरात आज कोणीतरी नवीन भाडेकरु राहायला येणार होता. त्या येणार्‍या भाडेकरुबद्दल प्रतिभासह सर्वांनाच उत्सुकता वाटत होती. लवकरच सर्वांची उत्सुकता संपली. आलेल्या भाडेकरुला पाहून तरूणांनी आपले हात झाडले आणि तरूणींनी तोंडे वाकडी केली. चाळीतील इतर व्यक्तींना इतक्यात काही प्रतिक्रिया देणे शक्यच नव्हते. प्रतिभा मात्र आलेल्या भाडेकरुला नीट न्याहाळत होती. तो एक तीस वर्षाचा मध्यम उंची असलेला सावळ्या रंगाचा दाढी मिशा वाढलेला आणि अंगावर पांढरा शुभ्र सदरा चढविलेला साधारणःत पत्रकार अथवा लेखकासारखा दिसणारा तरुण गृहस्थ होता. त्याचे हे रूप पाहून प्रतिभाने तो विवाहीत असावा असा तर्क लावला खरा ! पण त्या तर्काला काही आधार नव्हता कारण तो एकटाच होता त्याच्या सोबत त्याची बायको आली नव्हती. ती मागून येणार असावी अशी प्रतिभाने स्वतःच स्वतःची समजूत काढली होती. दहा – बारा दिवस झाले तरी समोरच्या घरात कोणी बाईमाणूस आले नाही हे पाहिल्यावर प्रतिभा स्वतःशीच म्ह्णू लागली हा भाडेकरु अविवाहीत असावा पण तो असा बैराग्यासारखा का बरं रहात असावा ? आता त्या भाडेकरुच घर आत जाऊन पाहण्याची उत्कंठा प्रतिभाच्या मनात निर्माण झाली. एक दिवस त्या भाडेकरूला काही कामानिमित्त घरातून लवकर बाहेर निघायच होत आणि चाळीतील नळाला अजून पाणी आलेले नव्हते. त्याने त्याच्या घराची चावी प्रतिभाच्या आईला दिली आणि त्याच्या घरात दोन हंडे पाणी भरून ठेवण्याची त्यांना विनंती केली. जी त्यांनी आनंदाने मान्य केली पण त्यांनी ही कामगिरी प्रतिभावर सोपवली. प्रतिभा ज्या संधीची इतके दिवस वाट पाहात होती ती संधी आज स्वतःहून चालत आली होती. चालत आलेले संधी सोडेल ती प्रतिभा कसली ? कुलूप खोलून भाडेकरुच्या घरात पाय ठेवताच प्रतिभा चक्रावली कारण त्या घरातील मोठे कपाट फक्त पुस्तकांनीच भरलेले होते. घर एकदम टापटीप होते, घरात नेमक्याच वस्तू आणि भांडी होती. प्रतिभा दोन हंडे पाणी भरून झाल्यावर त्या घराच्या मधोमध एका खूर्चीवर बसली आणि आपली नजर चोहीकडे फिरवत स्वतःशीच म्हणाली, ‘ याचा अर्थ हा माणूस पुस्तकाच्या जगात वावरणारा आहे, फक्त वाचन हा एकमेव छंद नव्हे व्यसन या माणसाला जडलेले असावे म्ह्णूनच याच्या अस्तित्वाची जाणिव शेजार्‍या - पाजार्‍यांना होत नसावी. बाह्य जगाशी याचे संबंध तुटलेले आहेत. पुस्तकांनी भरलेल्या या कपाटाकडे पाहताना या माणसाचा जीव कसा गुदमरत नाही ? मला तर ही पुस्तके पाहुन भोवळ यायला लागलेय ! असा कोणताही विषय नाही ज्या विषयाचे पुस्तक या कपाट दिसत नाही. आता माझ्या लक्षात येतयं त्याच्या वाढलेल्या दाढी - मिशांचे आणि केसांचे रहस्य ! हा माणूस नक्कीच एखादा वेडा लेखक, कवी किंवा शास्त्रज्ञ असावा. प्रतिभाने सहज एक प्रेम कथांच पुस्तक हातात घेतल ते वाचण्यासाठी चाळल असताना तिला आवडलं ते सोबत घेऊन त्या घराला कुलुप लावून ती आपल्या घरी गेली. संध्याकाळी हे महाशय माघारी आल्यावर ती त्याच्या घरी गेली आणि म्हणाली, ‘ माफ करा ! मी तुम्हाला न विचारता तुमचं पुस्तक वाचायला घेतल तेच दयायला आले होते. तिच्या हातातील पुस्तक हातात घेत तो म्हणाला, ‘ ये,ना ! बस ! मी कॉफी घेऊन येतो. त्याने दोन कप कॉफी आणून दोघांच्या मधोमध असणार्‍या टेबलावर ठेवली. प्रतिभा कॉफीचा कप तोंडाला लावताच तो म्हणाला, ‘ मझ्या घरात पाणी भरून ठेवल्याबद्दल धन्यवाद ! आणि हो ! एखाद पुस्तक नुसतं पडून राहिल की त्याची किंमत वाढत नाही. पण जे पुस्तक जितक्या अधिक लोकांच्या वाचनात येईल तितकी त्याची किंमत वाढते आणि आज तू माझ्या पुस्तकांची किंमतही वाढवलीस त्याबद्दलही धन्यवाद ! यापुढे माझ्या परवानगी शिवाय या कपाटातील कोणतेही पुस्तक नेऊन तू वाचू शकतेस फक्त वाचून झाल्यावर ते पुस्तक त्याच्या जागेवर यायला हवे ! मी माझ्या घराची एक चावी तुझ्या आईला देऊन ठेवली आहे. प्रतिभाने घाबरत - घाबरतच त्याला विचारले, ‘ तुम्ही या दाढी - मिशा आणि केस का वाढविले आहेत ? त्यावर तो हसून म्हणाला,’ मी एक वेडा आहे, लोकांना वेड्याला अशाच वेशातच पाहायला आवडते म्हणून ! तुमच लग्न झालं आहे का ? त्यावर तो प्रतिभाला म्हणाला, ‘नाही ! अजूनतरी नाही आणि माझ्यासारख्या अशा भकास दिसणार्‍यासोबत लग्न करायला कोणती तरूणी तयार होईल ? चुकून एखादी तयार झाली तर जग तिला वेडी म्हणेल कारण आपल्याकडे डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीण म्हणे बंद झालेले असले तरी आजही वेड्याच्या बायकोला जग वेडीच म्हणणार ! त्याचे बोलणे पूर्ण होते न होते तोच प्रतिभा म्हणाली, ‘तुम्ही इतके विनोदी स्वभावाचे आणि गप्पिष्ट असाल असे वाटले नव्हते. माझ्याबद्दल लोकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत जे सहजासहजी दूर होत नाहीत. असे तो हळू आवाजात म्हणाल. इतक्यात ! प्रतिभाच्या आईने तिला हाक मारल्यावर ती त्याला शुभरात्री करून घाईघाईत निघून गेली. रात्री झोपता - झोपता प्रतिभाच्या मनात एकच विचार येत होता. या भकास वाढलेल्या दाढी - मिशा आड लपलेला भाडेकरुचा खरा चेहरा कसा असेल ? सुंदर मनमोहक की काहीसा विद्रुप ? स्वतःच्या मेंदूवर थोडासा भार दिल्यावर तिला त्याचा आवाज कोठेतरी ऐकल्यासारखा वाटू लागला, कोठे ते मात्र काही केल्या तिला आठवत नव्हते.

काही महिन्यापूर्वी प्रतिभा एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. तो तरूण दिसायला बर्‍यापैकी सुंदर होता पण चंचल स्वभावाचा असल्यामुळे बर्‍याच तरुणींसोबत त्याची मैत्री होती. त्याच्या नजरेत काय जादू होती देव जाणे तो एखादया तरूणीसोबत एक शब्द जरी बोलला तरी ती तरुणी त्याच्याकडे आकर्षित व्हायची. त्याच्या दिसण्यापेक्षाही त्याच्या बोलण्यात एक जगावेगळी जादू होती. प्रतिभाला वाटत होत तो ही तिच्या प्रेमात पडलाय ! पण तिचा स्वतःचाच स्वतःवर विश्वास बसत नव्हता. कित्येक तरुणींच्या गराड्यात राहणारा कोणाच्या प्रेमात पडलेला नसेल हे तिला शक्यच वाटत नव्हते. शेवटी तिने त्याला विसरण्याचा निर्णय घेतला. त्या तरुणाचा आणि या भाडेकरूचा आवाज जवळ - जवळ सारखा आहे असं प्रतिभामा नराहून सारखे वाटत होते. दुसर्‍या दिवशी त्याच्या घरातील पुस्तके चाळत असताना प्रतिभाला एक कवितांची वही सापडली त्या वहीतील प्रेम कविता फारच छान होत्या. प्रियकराने आपल्या प्रेयसीला उद्देशून लिहलेल्या त्या कविता होत्या. ज्या वाचल्यावर प्रतिभा स्वतःशीच म्हणाली, ‘ जिच्यासाठी या कविता लिहिल्या गेल्या असतील ती स्वतःला किती भाग्यवान समजली असेल ? आश्चर्य म्हणजे त्या वहीवर त्या कविता लिहिणार्‍या कवीचे नावच लिहलेले नव्हते. प्रतिभाने त्या वहीतील प्रत्येक कविता मन लावून वाचली आणि ती वही आपल्या जागेवर ठेवली. संध्याकाळी ते महाशय माघारी आल्यावर प्रतिभाने त्याला विचारलं, ‘ तुमची पुस्तके चाळताना मला एक कवितांची वही सापडली पण त्या वहीवर त्या कविता लिहिणार्‍या कवीचे नावच नव्हते. त्यावर तो भाडेकरू मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, ‘ तू अजून मला माझे नाव विचारले नाहीस ? ते जर विचारले असतेस तर तुला हा प्रश्नच पडलाच नसता, बरं ! तु नाही विचारलेस तरी मी तुला माझी ओळख सांगतो ! माझे नाव विजय जाधव आहे मी एक कवी, लेखक आणि पत्रकार आहे. हे ऐकताच प्रतिभाच्या डोळ्यासमोर काजवे चमकले कारण काही दिवसापूर्वी प्रतिभाने मनलावून वाचलेला कथासंग्रह विजयचाच होता. आता इतक्या सुंदर प्रेमकथा लिहणारा हा तरूण लेखक असा सन्याशासारखा क बरं राहात असावा ? हे प्रतिभासाठी एक गूढ रहस्य होतं. पण आज त्याची ओळख कळ्ल्यामुळे प्रतिभाला आनंद झाला होता.

आज अचानक रस्त्यात प्रतिभाला तिची एक जिवलग मैत्रीण कविता जाधव भेटली. गप्पा मारता - मारता प्रतिभा म्हणाली, ‘अगं कविता ! आमच्या समोरच्या घरात एक नवीन भाडेकरू राहायला आला आहे. त्यात काय आश्चर्य ? कविता म्हणताच प्रतिभा म्हणाली, ‘ आश्चर्य आहे म्हणून तर सांगते तो भाडेकरू दुसरा तिसरा कोणी नसून सुप्रसिद्ध लेखक विजय जाधव आहे. त्यावर कविता म्हणाली,’ ‘अगं ! तो माझा नातेवाईक आहे. तो तुझ्या चाळीत राहायला आलाय ? बरेच दिवस झाले तो मला भेटला नाही की फोनही केला नाही. मागे एकदा आमच्या घरी आला होता तेव्हा आमची भेट झाली होती. बरं ! आज संध्याकाळी मी तुझ्या घरी येते तुझ्या आई - बाबांनाही बरेच दिवस भेटले नाही त्यांनाही भेटेन आणि आपल्या लेखक महाशयानाही भेटेन. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे कविता प्रतिभाच्या घरी तिला भेटायला आली असता ती प्रतिभाच्या आईसोबत गप्पांत रंगली असताना प्रतिभा तिच्या आईला म्हणाली,’ अग ! आई आपल्या समोरच्या घरात ते नवीन भाडेकरू राहायला आले आहेत ना ते आपल्या कविताचे नातेवाईक आहेत आता कविता त्यांना भेटणारच आहे त्यावर प्रतिभाची आई कविताला म्हणाली, ‘ तुझा हा नातेवाईक काही कामधंदा करतो की नाही ? की दिवसभर भटकत असतो ? घरी जेवण पण करीत नाही फक्त कॉफी तेवढी करतो चार-पाच वेळा ! जेवतो कोठे देव जाणे ? जात असेल कोणत्यातरी खाणावलीत ! अजून त्याचे लग्नही झालेले नाही अशा बेकार माणसाला मुलगी तरी कोण देणार म्हणा ? त्यावर कविता म्हणाली अहो ! मावशी तुमचा कहीतरी गैरसमज होतोय तुम्ही म्हणताय तसा तो बेकार वैगरे नाही. तो एका दैनिकात पत्रकार म्ह्णून कामाला आहे. त्यासोबतच तो एक चांगला कवी आणि उत्तम लेखकही आहे. त्याच्यासोबत लग्न करायला शेकडो पोरी हसत - हसत तयार आहेत पण त्याला अशा तरूणीसोबत लग्न करायच आहे जिच त्याच्यावर आणि त्याच्या साहित्यावर प्रेम असेल. तसं नसत तर तो कधीच लग्न करून मोकळा झाला असता. त्याला अशा मुलींची स्थळे सांगून आली होती की त्यातील कोणाशीही लग्न केले असते तर संपत्तीत लोळला असता. त्यावर प्रतिभाची आई म्हणाली, या सर्वाचा उपयोग काय ? शेवटी भाडयाच्या घरातच राहतोय ना ? त्यावर कविता म्हणाली, त्याच्या मालकीचे घर असताना तो या भाडयाच्या घरात का बोलल्यावरच कळेल.

प्रतिभा कवितासोबत विजयला भेटायला त्याच्या घरी गेली असता विजय काहीतरी लिहिण्यात व्यस्थ होता प्रतिभाने दरवाजा ठोठावताच विजयने दरवाजाकडे पाहिले आणि त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. कविताकडे पाहात तो म्हणाला,’ अग ! कविता तू इकडे कशी ? माझा पत्ता तुला कोणी दिला ? ही प्रतिभा माझी मैत्रीण आहे तिनेच दिला म्हणत कविता प्रतिभाला खूर्चीत बसण्याची सुचना करून सरळ स्वयंपाकघरात गेली आणि स्वयंपाकघरातून तिने तीन कप कॉफी तयार करून आणली आणि त्यासोबत बिस्किटेही आणली. प्रतिभाच्या हातात एक कप देत एक कप विजयच्या समोर ठेवला आणि तिसर्‍या कपात बिस्किटे बुडवून खाऊ लागली. प्रतिभा हे सार आ ! करून पाहात होती. तिला प्रतिभाच्या अशा विचित्र वागण्याचा काही अर्थच लागत नव्हता. सर्वांची कॉफी संपवल्यावर कविताने एक कप उचलला आणि न धुताच स्वयंपाकघरात नेऊन ठेवला. त्यानंतर तिने विजय लिहित असलेला कागद ओढून वाचायला सुरूवात केली. हे सारं पाहून प्रतिभा वैतागली आणि रागाच्या भरात म्हणाली,’ कविता तुला काही अक्कल वैगरे आहे की नाही ? आता ओढताना कागद फाटला असता म्हणजे? फाटला तर फाटला ! त्यात काय ऐवढ तो पुन्हा लिहिल ! असं कविता उद्धटपणे म्हणाली. विजय मात्र प्रतिभाला रागावताना पाहून गालातल्या – गालात हसत होता. त्याला हसताना पाहून प्रतिभा अधिकच रागावली आणि विजयला म्हणाली, हे काय ? कविता इतक्या उद्दटपणे वागतेय आणि तुम्ही काहीच बोलत तर नाही उलट हसताय ? त्यावर विजय म्हणाला,’ कविताने मी लिहिलेले पुर्ण पुस्तक जरी फाडले तरी मी तिच्यावर रागावणार नाही कारण या लेखकाची ती सर्वात पहिली वाचक आहे. मी लेखक होऊ शकतो याची जाणीव तिनेच मला करून दिली आहे. त्यामुळे माझ्या कोणत्याही वस्तुला हात लावण्यासाठी तिला कोणाचीच परवानगी काढावी लागत नाही. प्रतिभा गप्प बसल्यावर कविता तिला लाडीवाळ्पणे म्ह्णाली,’ प्रतिभा तू कशाला उगाच रागवतेस ? विजय सोबत मी लहानाची मोठी झालेय आणि आता पर्यत तो माझ्यावर एकदाही रागावल्याचे मला आठवत नाही. तुला आठवत काही महिन्यापुर्वी बसच्या प्रवासात तू एका तरुणाच्या प्रेमात पडली होतीस ? त्या तरुणाचही तुझ्यावर प्रेम असावं असं तुला वाटत होत. पण तो तरूण अनेक तरुणींच्या गोतावळ्यात राहात असल्यामुळे तो स्त्रिलंपट असावा असा तू गैरसमज करून घेतला होतास. असं तू मला एकदा त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाली होतीस. तुला माहीत आहे का तो तरुण कोण होता ? तो तरुण दुसरा – तिसरा कोणी नसून माझा सख्खा भाऊ होता. तू कधी त्याची माहीती काढण्याचा प्रयत्न केला नाहीस. डोळ्यांनी दिसणार्‍या सार्‍याच गोष्टी खर्‍या असतातच असे नाही त्यापलिकडेही काही असू शकते याचा तू विचारच केला नाहीस. पण त्याचा इथे काय संबंध ? या प्रतिभाच्या प्रश्नाला हसत उत्तर देत कविता विजयच्या खांद्यावर हसत प्रेमाने हात ठेवत म्हणाली,’ तो तरुण म्हणजे माझा भाऊ आणि सुप्रसिद्ध लेखक विजय जाधव आणि तुझा भाडेकरू ही एकच व्यक्ती आहे. कविताचे हे बोलणे एकताच प्रतिभाला क्षणभर भोवळच आली पण तिने स्वतःला सावरल. त्यापुढे कविता म्हणाली,’ विजय जेव्हा भाडेकरु म्हणून या चाळीत राहायला आला तेव्हा या चाळीतील तरुणींनी तोंडे वाकडी केली असतील नाही ? पण उद्या त्याच त्याच्या हात धुवून मागे लागतील ! तू त्याच्या प्रेमात पडली होतीस खरी ! पण तो तुला जसा स्त्रिलंपट वाटत होता तसा तो अजिबात नाही तू ज्या तरूणींना त्याच्या सोबत पाहिलेस त्या त्याच्या चाहत्या आहेत त्या त्याच्या साहित्याचा आदर करतात त्याच्या सोबत चार शब्द बोलता यावे म्ह्णून तडफडत असतात तू त्याला ओळ्खत नव्हतीस म्हणून नाहीतर तू ही त्यांच्यापैकी एक झाली असतीस. मी विजय सोबत तुझी मुद्दामच ओळख करून दिली नाही कारण विजयही तुझ्या प्रेमात पडला होता. मी तुझी विजय सोबत ओळख करून दिली असती तर कदाचित तू ही तुझ प्रेम त्याच्यासमोर व्यक्त करण्याची हिंमत करू शकली नसतीस आणि मलाही तू वहिनी म्हणून हवी होतीसच ! पण तू ही तुझं प्रेम त्याच्यासमोर व्यक्त तर केल नाहीस उलट त्याला टाळण्याचाच प्रयत्न करीत राहिलीस. मग ! शेवटचा प्रयत्न म्हणून मी विजयला तुझ्या समोरच्या घरात भाडेकरु बनवून राहायला पाठविले. त्यामुळे मला जे अपेक्षित होते तेच झाले थोडी का होईना तू विजयच्या जवळ आलीस मग ! आता आमच्या बंधुराजांबद्दल तुमचे काय मत आहे ? त्यावर भानावर आलेली प्रतिभा म्हणाली,’ कविता तुझ्यासारखी नणंद मिळणार असेल तर मला काय कोणीही कसाही नवरा चालेल ! त्यावर विजय प्रेमाने रागावून म्हणाला, मी कोणीही कसाही नाही हा ! मी एक प्रसिद्ध व्यक्ती आहे. पण कदाचित ! माझ्यासारखा बैरागी दिसणारा मुलगा तुझ्या आईला आवडणार नाही त्याचे काय ? त्यावर प्रतिभा म्हणाली ,’ मिया बीबी राजी तो क्या करेगा भैय्याजी ! त्यावर टाळ्या वाजवत कविता म्हणाली, आता शोभतेस खरी एका लेखकाची प्रेयसी ! त्यानंतर कविता विजयला म्हणाली,’ बंधुराज आता सोडा हा बैराग्याचा अवतार आणि आपल्या मुळ वेशात या आता कारण प्रतिभा देवी आता तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे हे ऐकुण विजय कविताला चापट मारण्याकरीता पुढे सरसावला पण त्याने कविताला प्रेमाने अलिंगण दिले. प्रतिभा तिच्या घरी गेली आणि विजय कवितासोबत आपल्या घरी ! त्या रात्री प्रतिभाने आपल्या आई - बाबांना तिचं त्या समोर राहणार्‍या भाडेकरुवर प्रेम असल्याचे सांगितले असता प्रतिभाची आई म्हणाली, ‘ प्रतिभा तुला प्रेमात पडायला का ते अस्वलच भेटल का ? त्यावर प्रतिभा रागाने म्हणाली,’ त्यांना अस्वल बोलू नकोस ! कसा ही असला तरी आता तुझा होणारा जावई आहे तो ! प्रतिभाचे बाबा मात्र शांत होते प्रतिभाची आई प्रतिभाच्या बाबांना म्हणाली, अहो ! तुम्ही काय असे गप्प बसला आहात ? काही तरी समजवा तिला ! त्यावर प्रतिभाचे बाबा म्हणाले, मी काय समजावू तुमच्या नजरेत मी ही अस्वलच आहे. शेवटी प्रत्येकाच्या पसंतीचा प्रश्न आहे काहींना अस्वलही आवडू शकतात होऊ द्या तिच्या मनासारखं ! त्यावर प्रतिभाची आई काहीच बोलली नाही. दुसर्‍या दिवशी विजयच्या दारात चाळीतील मुलींची ये - जा वाढली होती. ते पाहून प्रतिभाची आई प्रतिभाला म्हणाली,’ विजयच्या घरात कोणी आलं आहे का ? नाही आपल्या चाळीतील पोरी सारख्या डोकावून पाहता आहेत ? तुच बघ ना ! जाऊन ! प्रतिभाची आई विजयच्या घरी डोकावून परत आली आणि प्रतिभाला म्हणाली,’ विजयच्या घरी पाहुणा आलाय ! त्याला पाहण्यासाठी चाळीतील पोरी जीव देता आहेत. ते पाहून प्रतिभा जोर जोरात हसत म्हणाली, तो कोणी पाहुणा वैगरे नाही तो तोच आहे ज्याला तू काल अस्वल म्ह्णून हिणावत होतीस तुझा होणारा जावई ! ते ऐकुण प्रतिभाची आई भोवळ येऊन खूर्चीवर बसली असता प्रतिभाने तिला पाणी पाजले. शुद्धीवर येताच प्रतिभाची आई म्हणाली,’ तरी मी म्हणत होते एखाद्या राजकुमाराच स्वप्न पाहणारी, राजकुमारीसारखी दिसणारी माझी मुलगी एका अस्वलाच्या प्रेमात पडलीच कशी ? तू आजच विजयच्या आई - बाबांना आपल्या घरी बोलावून घे ! तुमच्या लग्नाची चर्चा करायला ! आता मला तुमचं लग्न झाल्यावरच शांत झोप लागेल. आईचे हे शब्द ऐकताच प्रतिभाने तिच्या आईला घट्ट मिठी मारली. त्याच संध्याकाळी कविता आपल्या आई - बाबासह प्रतिभाच्या घरी आली असता प्रतिभाची आई कविताच्या आईची मैत्रीण असल्यामुळे तिने त्यांना प्रश्न केला तुम्ही कसे काय आज अचानक आलात ? त्यावर विजयची आई म्हणाली , ‘अग ! तुच बोलावलस ना ! विजय आणि प्रतिभाच्या लग्नाची बोलणी करायला ? काही तरी गोंधळ होतोय हे पाहुन प्रतिभा तिच्या आईला म्हणाली , ‘अग ! आई ! विजय कविचा सख्खा भाऊ आहे. सॉरी ! मला तुला सरप्राईज द्यायचे होते. प्रतिभा आणि विजयच्या लग्नाची औपचारीक बोलणी पार पडल्यावर प्रतिभाची आई कविताला म्हणाली,’ काय मग ! कविता ? आता खूष ना ? शेवटी आपल्या प्रयत्नाना यश आले म्हणायचे ! त्यावर कविता हसून म्हणाली, हो ! मावशी ! त्यावर सार्‍यांनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिल्यावर कविता म्हणाली,’ असे काय पाहताय ? विजयने हे जे समोरचे घर भाडयाने घेतले आहे ते मिळवून द्यायला मावशीनेच मदत केली आहे आणि मावशीनी एका कार्यक्रमात माझ्यासोबत विजयला पाहिले होते तेंव्हाच तो त्यांना प्रतिभासाठी पसंत पडला होता. तो बर्‍याचदा बाहेरगावी असल्यामुळे प्रतिभाने त्याला कधी प्रत्यक्ष पाहिलेले नव्हते. त्यांची बसमधील भेट आणि त्यांचे एकमेकांच्या प्रेमात पडणे योगायोगाने झाले होते पण काही गैरसमज झाले आणि त्यांच्या प्रेमाच्या गाडीला ब्रेक लागला. मग ! मी आणि मावशीने त्यांची भेट घडवून आणण्यासाठी हे भाडेकरुचे नाट्य उभे केले जे आज यशस्वी झाले. त्यावर कविताची आई म्हणाली,’ त्यासाठी इतकी मेहनत करायची खरंच काही गरज नव्हती मला सांगितले असते तरी आपण त्यांचे लग्न कधीच ठरवून टाकले असते. त्यावर कविता म्हणाली,’ या दोघांची प्रेमविवाह करण्याची इच्छा होती ना ! त्याचे काय करणार होतो ? चला आता तरी ते निदान जगाला सांगू शकतील की आमचा प्रेमविवाह आहे म्हणून ! नाहीतर इतरांना आपल्या प्रेमकथांमधून प्रेमात पडायला लावणारा जर स्वतःच प्रेमात पडला नाही तर त्याच्या प्रेमकथा वाचणार कोण ? त्यावर सारेच मनमुराद हसले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance