अस्वस्थ रात्र!
अस्वस्थ रात्र!
“आपण ज्या व्यक्तीला कॉल करू इच्छिता ती व्यक्ती उत्तर देत नाही.”
पाचव्यांदा हे उत्तर ऐकल्यावर संजयनं वैतागून फोन ठेवून दिला. ‘कदाचित ती कामात असेल म्हणून तिनं फोन उचलला नसेल. मिस्ड कॉल्स पाहून ती करेन नंतर कॉल. आपण एवढं अधीर का होतो?’ संजयनं स्वतःला समजावलं. दुसऱ्या दिवशी कामावर गेल्यावर त्यानं तिला फोन केला. दुसऱ्यांदा केलेल्या कॉलचं उत्तर म्हणून समोरून आवाज आला.
“हॅलो! बोला!”
“कशी आहेस?”
“मी बरी आहे.”
“मघाशी फोन नाही उचललास? कामात होतीस का?”
“ऑफिसमध्ये होते. समोर सुर्वे सर होते.”
“अच्छा! कालचे मिस्ड कॉल तरी पाहिलेस का?”
“अहो, तुम्हाला समजत कसं नाही! घरी नवरा नाही का?”
“ठीक आहे! आधी व्हाटसअपवर बोलणं नको म्हणून नंबर ब्लॉक केलास. आता फोनवरपण बोलायला नको!”
“तुम्ही फोन नका करू. वेळ मिळेल तेव्हा मी करेन. उगाच संशय नको.”
“सुर्वे सरांचे फोन चालतात का?”
“हो! आम्ही आता एकाच केंद्रात आहोत ना!”
“म्हणजे तुला आता माझी गरज नाहीय.”
“चला, ठेवते फोन. सर हाक मारतात.”
......आणि कॉल संपला. संजय मोबाईलच्या स्क्रीनकडं पाहतच राहिला.
सीमा परिचारिका आणि संजय मलेरिया सेवक म्हणून एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करत होते. आरोग्य केंद्रापासून दहा किलोमीटर अंतरावरील शहरात ते राहायचे. हे केंद्र दुर्गम आणि डोंगराळ भागात होतं. दोघं सोबतच कामावर जायचे. सततच्या सहवासानं सहा महिन्यातच ते एकमेकांच्या खासगी जीवनाशी परिचित झाले होते.
सीमाचा नवरा आश्रमशाळेत लिपिक होता. दोघांच्या वयात दहा वर्षांचं अंतर होतं. लग्नाला पाच वर्षे होऊनही पाळणा हलला नव्हता. एके दिवशी गप्पा मारता मारता तिनं संजयला सगळं सांगून टाकलं. लग्नानंतर पहिल्याच रात्री नवऱ्याची लैंगिक संबंधातील अडचण तिच्या लक्षात आली होती. त्यानं स्वतःहून जवळ घेतलं नाही; म्हणून तीच त्याला बिलगली. पण थोड्याच वेळात त्यानं तिला दूर लोटलं होतं. त्याला दरदरून घाम फुटला होता. डोकं दुखायला लागलं होतं. तेव्हापासून ती अस्वस्थ रात्रींशी सोबत करत होती. तिच्या या वेदनेनं संजय व्यथित झाला होता. हळूहळू त्याला तिच्याविषयी कणव वाटू लागली होती. तीही त्याची काळजी घ्यायची. त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून आणायची. त्यांच्या या वागण्यानं सहकारी त्यांच्याकडे शंकित नजरेनं पाहायला लागले होते. त्याच्या बायकोपर्यंत हे सगळं पोहोचलं होतं; पण तिचा आपल्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास होता. सीमाची सलगी वाढतच होती.
एके संध्याकाळी घरी परतत असताना पाऊस आल्यामुळं दोघं एकाच छत्रीत झाडाच्या आडोशाला उभी राहिली. अचानक वीज चमकली आणि सीमा त्याला घट्ट बिलगली. काही क्षण ते एकमेकांच्या मिठीत होते. तिनं त्याच्या ओठांवर ओठ कधी टेकवले हे समजलंच नाही. संजयनं स्वतःला सावरलं. पाऊस थांबला होता. पुन्हा प्रवास सुरु झाला. पण मुक्यानं. दोघांनाही काय बोलावं हे सुचेना. शेवटी सीमानं कोंडी फोडली.
“सॉरी, तुम्हाला राग आला का? नाही म्हणजे...... परिस्थिती तशी होती.”
“ठीक आहे. तुझा नाईलाज होता.”
संजयला त्या स्पर्शात तिच्या आसुसलेल्या मनाची जाणीव झाली होती. दोन दिवसांनी सीमानं त्याला घरी बोलावलं. तिचा नवरा रात्री उशिरा घरी येणार होता. बाजारात जाऊन येतो असं सांगून संजय तिच्या रूमवर गेला. एक तास त्यांनी परस्परांना प्रेमानं न्हाऊ घातलं होतं. सर्वकाही सीमाच्या मनासारखं झालं होतं. कधी नव्हतं ते स्वर्गसुख आज तिला संजयकडून मिळालं होतं. ती पुन्हा पुन्हा त्याला बिलगत होती. त्यानं जाऊच नये असं तिला वाटत होतं; पण त्यालाही मर्यादा होत्या. अधूनमधून हे असं होऊ लागलं.
वर्ष वाऱ्यासारखं निघून गेलं. जिल्हा विभाजन झाल्यामुळं सीमा आणि तिच्या नवऱ्यानं स्व जिल्ह्यात बदली करून घेतली. सीमा आता तालुक्याच्या गावी राहत होती. नवीन ठिकाणी ती चांगलीच रमली होती. सुरुवातीचे काही महिने संजयचं आणि तिचं रोज मेसेज आणि फोनवर बोलणं व्हायचं. हळूहळू ते कमी होत गेलं. आता तिला त्याचं बोलणं नकोसं वाटायला लागलं होतं. बहाणे सांगून त्याला टाळायचा प्रयत्न करत होती. शेवटी त्याच्या आठवणींसह त्याचा नंबरही ब्लॉक केला. कॅलेंडरची पानं उलटावी तशी नऊ-दहा वर्षे उलटून गेली.
मुंबईच्या धरणे आंदोलनात दोघं अचानक एकमेकांच्या समोर आले. दोघांनीही वरवर हसण्याचा अभिनय केला. तिला दिवस गेलेले पाहून कुतूहलापोटी त्यानं चौकशी केली. दोन वर्षे उपचारानंतर तिला पहिला मुलगा झाला होता आणि आता सहावा महिना आहे. पुढचं काही विचारायच्या आतचं “सुर्वे सर वाट पाहतात.” असं सांगून ती निघूनही गेली.
‘केवढी स्वार्थी आणि विश्वासघातकी बाई आहे ही! जाईन तिथं खाईन हीच तिची खरी ओळख आहे. खरंच तिच्या नवऱ्याचा प्रोब्लेम होता की नवरा तंदुरुस्त होता; पण तीच समाधानी नव्हती? ती जाईल तिथं आपली हौस तर भागवून घेत नाही ना? आपण आपल्या बायकोला फसवलं. तिचा विश्वासघात केला. आपण सहानुभूती म्हणून सीमाला भावनिक आधार दिला. तोही अनैतिकपणानं आणि ती......? आणखी किती माशांना जाळ्यात अडकवणार होती? आता कोणती नवीन कहाणी सांगणार होती? आपण तिच्या गोड बोलण्याला बळी पडलो. आपणही क्षणिक सुखाच्या लालसेपोटी गुन्हाच केला ना?’ आज त्याला खूप पश्चात्ताप झाला होता. डोकं पूर्ण भणाणून गेलं होतं. पावलंही जड झाली होती. त्याचा कडेलोट झाला होता.