Dr.Gangaram Dhamake

Crime

3.5  

Dr.Gangaram Dhamake

Crime

पैसा झाला मोठा

पैसा झाला मोठा

7 mins
11.9K


काल शेजारच्या गावातील एका व्यक्तीच्या मयतावर गेलो होतो. खूप गर्दी होती माणसांची. एखाद्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला जमलेली गर्दी ही त्यांनी मिळवलेली खरी संपत्ती असते. कारण मृत व्यक्तीला कुठं ठावूक असणार किती आणि कोणकोण माणसं आलीत ते. तिच्या कायमच्या अनुपस्थितील जमलेली ही गर्दी त्या व्यक्तीच्या माणूसपणाची साक्ष ठरते. लोक हळहळ व्यक्त करत होते. काही ठिकाणी कुजबुजही चालू होती. काहीतरी चर्चा असावी.


कोणीतरी पुटपुटलं, “ती कशी येणार? नाक तरी आहे का तिला यायला?”


त्यावर एकजण उत्तरला, “हो ना, तिच्यापायीच तर बिचारा मेला.”


मी सहज एकाला प्रश्न केला, “हे बाबा आजारी होते का?”


“हो, दहा-पंधरा दिवसांपूर्वी ताणामुळं मेंदू फाटला असं म्हणतात. त्या दिवसापासून तो कोमातच होता. खूप खर्च झाला पण तो वाचला नाही. गेला बिचारा.”


मी पण कुतूहलापोटी विचारलं, “पण एवढा कसला ताण घेतला त्यांनी?” त्यावर त्या व्यक्तीनं केलेलं कथन मनाला क्लेश देऊन गेलं.


मृत व्यक्तीचं नाव होतं महादू. गावातले लोक त्यांना ‘म्हादबा’ म्हणायचे. म्हादबाला एक मोठी बहिण होती, जिचं नावं होतं बयाबाई. म्हादबाला दोन मुलं होती. अंकुश आणि रेश्मा. रेश्मा यावर्षी बारावीला होती. बयाबाईला एक मुलगा आणि मुलगी होती. त्यांची दोघांची लग्नं झाली होती. तिला नातवंडंही होती. म्हादबा आणि बयाबाई दोघांची परिस्थिती बेताचीच होती. म्हादबा पावसाळी शेती करून उन्हाळ्यात नदीच्या पाण्यावर भेंडी, काकडीची लागवड करायचा. तो जेमतेम लिहिता-वाचता येण्यापुरता शिकला होता. पण मुलांच्या शिक्षणासाठी काबाडकष्ट करत होता. बहिणीच्या प्रसंगाला वेळोवेळी धावून जायचा. यथाशक्ती मदत करायचा. बयाबाईही आपल्या भावाला खूप जीव लावायची. दिवस कसे आनंदात चालले होते. म्हादबाच्या वाट्याला नऊ-दहा एकर जमीन होती. मात्र, वडिलांच्या मृत्युनंतर वारस म्हणून बयाबाईचं नाव लागलं होतं. तिचा मुलगा जमीन खरेदी-विक्रीत दलालाचं काम करायचा. मधल्या काळात लोकांनी जमीन विक्रीचा सपाटा लावला होता. जमीन विकून आलेल्या पैशात घर बांधायचं, मुलाला गाडी घ्यायची, मुलीचं लग्न करायचं एवढाच उद्देश. पुढच्या पिढीचा विचारच नाही. वाडवडिलार्जीत जपून ठेवलेल्या मातीचा असा सौदा चालू होता. गावातील बहुतांशी कुडाची, मातीची घरं आता सिमेंट-काँक्रीटमध्ये रुपांतरीत झाली होती. घरासमोर जीपगाडी नाहीतर मोटरसायकल उभी केलेली. घरांजवळून जाताना टीव्हीचा आवाजही बऱ्यापैकी यायला लागला होता. पाहणाऱ्यांना गाव सधन झाल्याचा भास होत होता. हातात ऍन्ड्रोइड मोबाईल, गळ्यात वजनानं कमी पण ठळक दिसेल अशा डिझाईनची चैन, जिन्स आणि डोळ्यात भरेल असं मंडळाचं नाव असलेलं टी-शर्ट परिधान केलेली तरुण मंडळी संध्याकाळी नाक्यावर फिरताना पाहून गावाच्या श्रीमंतीची आणखीनच खात्री वाटायची. हा सारा बदल होण्यामागं जमिनीच्या व्यवहाराचा बराचसा वाटा असावा. काही बऱ्यापैकी नोकरी-धंदा करून मोठी झालेली माणसंही गावात होतीच. त्यात ही आणखी भर पडलेली.


म्हादबाचा मुलगा वाणिज्य शाखेचा पदवीधर होता. पण गेली दोन-तीन वर्षे त्याला नोकरी मिळत नव्हती. म्हादबाला त्याची चिंता सतावत होती. ओळखीच्या एका अधिकाऱ्यानं त्याच्या मुलाला भरती निघाली की बँकेत लावतो म्हणून सांगितलं होतं. त्यासाठी वीस लाख तरी लागतील असंही त्यानं सुचवून ठेवलं होतं. एवढा पैसा कुठून आणणार? शेतीतून निघणारं उत्पन्न तरी किती जेमतेम लाखाच्या आत. पण काहीतरी करून पैशाचा बंदोबस्त करायला हवा. मुलाच्या नोकरीसाठी काहीतरी करायला हवं ही खुणगाठ त्यानं मनाशी बांधली. त्यानं ही गोष्ट आपल्या बहिणीला बोलून दाखवली. तिनं त्याला नदीकाठचा सहा एकरचा माल विकायचा सल्ला दिला. चांगली किंमत येईल. जवळच बसलेल्या तिच्या मुलानंही या गोष्टीला दुजोरा दिला. “आहे एक पार्टी माझ्याकडं. तुमची तयारी असेल तर उद्याच विचारतो.” म्हादबानं मागचा पुढचा विचार न करता लगेच होकार दिला.


दुसऱ्या दिवशी पार्टी जमीन बघायला हजर. म्हादबाच्या मुलाचा या गोष्टीला विरोध होता. जमीन विकून नोकरीला पैसे भरायचे हे त्याला मान्य नव्हतं. पण वडिलांच्या निर्णयापुढं त्याचा नाईलाज झाला. शेवटी पार्टी जमीन पाहून गेली आणि पसंतही केली. आता राहिला होता प्रश्न किमतीचा. बयाबाई आणि तिच्या मुलावर म्हादबाच्या कुटुंबाचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळं ती सारी जबाबदारी त्यानं भाच्यावर सोपवली. पाच लाख एकरी भाव ठरला. मिळणाऱ्या एकूण रकमेपैकी बयाबाईनं तिचा अर्धा वाटा मागितला. पण म्हादबानं तिला समज दिली. एवढीच जमीन माझ्या वाट्याला आहे. माझ्या मुलाच्या भविष्यासाठी मी ती विकतो. तुला मी विसरणार नाही. तुला निम्मे नाही पण वीस टक्के रक्कम मी स्वखुशीनं देईन. पण ती ऐकायला तयार नव्हती. तिचा मुलगाही मानायला तयार नव्हता. शेवटी कसंबसं तीस टक्केवर ती सही करायला तयार झाली. ठरलेल्या दिवशी खरेदीखत करायला म्हादबा, त्याचा मुलगा बयाबाई आणि तिचा मुलगा असे चौघेजण गेले. खरेदीदार शेठही मुंबईहून आला होता. व्यवहार झाला. ठरल्याप्रमाणे नऊ लाख बयाबाईला आणि एकवीस लाख म्हादबाला. म्हादबानं आनंदानं पैसे स्वीकारले. प्रत्यक्ष खरेदी करताना खरेदीची रक्कम कमी दाखवली होती. एका हॉटेलमध्ये जेवण करून चौघे घरी परतले. म्हादबा आनंदात होता. कारण त्याच्या मुलाला पैसे भरून बँकेत नोकरी मिळणार होती. त्याला पुढील सुखाच्या दिवसांची स्वप्ने पडू लागली होती. 


महिन्यानंतर शेठनं जागा मोजून घेतली आणि कुंपण घालायला सुरुवात केली. म्हादबा शेतावर गेला होता तेव्हा शेठही आला होता. म्हादबा त्याच्याशी गप्पा मारत होता. गप्पा मारता मारता म्हादबानं व्यवहाराबद्दल आनंद व्यक्त केला. “माझ्या मुलाच्या नोकरीचं काम होईल. माझ्या वाट्याला आलेल्या रकमेतून मी माझ्या मुलाच्या नोकरीसाठी वीस लाख भरणार आहे. अन माझ्या बहिणीलाही तिचा तीस टक्के वाटा दिला. आपला व्यवहार घडवून आणणारा माझा भाचाच होता म्हणून बरं झालं. शेठ बरं झालं तुम्ही चांगला भाव दिलात आमच्या जमिनीला.” म्हादबानं एका दमात सहजपणे बोलून दाखवलं.


“हो, एकरी सात लाख भाव मिळाला तुमच्या जमिनीला. तसा हा सौदा मला महागच पडला. पण असू दे. मलाही नदीकाठची चांगली जमीन मिळाली.” म्हादबानं त्याला नमस्कार केला अन घरचा रस्ता पकडला. त्याला शेठचं वाक्य पुन्हा पुन्हा आठवायला लागलं.... ‘हो, एकरी सात लाख भाव मिळाला तुमच्या जमिनीला. तसा हा सौदा मला महागच पडला.’ असं कसं झाले आपल्याला तर बहिणीनं अन भाच्यानं पाच लाख एकरी भाव सांगितला. मग खोटं कोण बोलतं? बहीण-भाचा की शेठ? पण शेठ का खोटं बोलणार? त्याला तर जमीन मिळाली. त्यानं जितके पैसे मोजलेत तेवढंच तो सांगणार ना? आपल्याशी खोटं बोलून त्याला काय फायदा होणार आहे? मग बयाबाई आणि भाचा खोटं तर नाही बोलत ना? त्यांना खोटं बोलण्याचा फायदाच होणार. पण ही माणसं आपल्या रक्तामांसाची आहेत. आपली बहिण तरी नाही फसवणार. पण दुसरं मन त्याला पुन्हा पुन्हा सांगत होतं, ‘अरे पैशासाठी माणूस हल्ली काहीही करू शकतो. हे कलियुग आहे रे बाबा!’ पण म्हादबाचा विश्वास बसत नव्हता. त्या विचारांनी तो घरी कधी पोहोचला हे त्यालाच समजलं नाही. घरी आल्या आल्या तो अंगणातल्या कडूनिंबाच्या झाडाखालील बाजेवर आडवा झाला. तो घामाघूम झाला होता. पुन्हा पुन्हा बरळत होता. ‘खोटं कोण बोलतं? मला फसवलं.’ त्याचा आवाज ऐकून मुलं आणि बायको बाहेर आली. म्हादबाला पाणी दिलं. त्याच्या अंगावरचा घाम टॉवेलानं टिपून काढला. थोड्या वेळानं त्याला बरं वाटू लागलं. बाबांना असं का झालं? कोण खोटं बोलत? मला फसवलं असं का बडबडत होते?


थोडं स्थिर झाल्यावर त्यानं बाबांना विचारलं, “बाबा तुम्ही कुठे गेला होता आणि काय बडबडत होता. कोण खोटं बोललं तुमच्याशी? कोणी फसवलं तुम्हाला?” म्हादबानं शेतावर शेठचं आणि त्याचं झालेलं बोलणं सांगितलं. ते ऐकून घरातील सारेच हैराण झाले.


“बयाबाई अशी कशी वागली? ज्या भाच्याला एवढा जीव लावला तो असा भ्रष्ट झाला? ते काही नाही अंकुश तू आणि बाबा जा आत्याकडं आणि खरं-खोटं काय ते ठरवूनच या.” दोघेही बापलेक तापल्या पायानिशी बयाबाईकड निघाले. दोन किलोमीटर अंतरावर तिचं गाव होतं. या दोघा बापलेकांना पाहून बयाबाई आणि तिचा मुलगा जरा शंकित झाले. मायलेकाच्या कपाळावर आठ्या उमटल्या आणि चेहऱ्यावर घामही आला.


म्हादबानं थेट विषयालाच हात घातला, “बाई खरं सांग आपला जमिनीचा व्यवहार किती रुपयांना ठरला होता?”


“एकरी पाच लाख!”


“पुन्हा सांग.”


“एकरी पाच लाख.” मुलगाही तेच म्हणाला. पण त्यांच्या बोलण्यात डळमळीतपणा होता. म्हादबानं शेठशी त्याचं झालेलं बोलण सांगितलं. तरी देखील ती दोघं मानायला तयार नव्हती. शेवटी म्हादबाचा पारा चढला. तो मोठमोठ्यानं बोलायला लागला. त्याच्या आवाजानं शेजारी गोळा झाले.


“तू मला फसवलं. तुला आणखी पैसे हवे होते तर मला सांगायचे ना. मी आणि माझ्या कुटुंबानं तुझ्यावर विश्वास ठेवला; पण तू विश्वासघात केलास. तू व्यवहारात खोटी बोललीस. सख्ख्या भावाशी अशी का वागलीस? रक्ताच्या नात्याचा पैशापायी घात केलास.” बयाबाईही आता प्रत्युत्तर द्यायला लागली होती.


“मला माझा समान वाटा नको का? माझाही हक्क होता ना? मग मला निम्मे पैसे का नाही दिलेस?”


“तुझा वाटा ठरल्याप्रमाणं तुला दिला ना. अर्धा हिस्सा मागतेस पण हे विसरलीस की मुलीला माहेरच्या जमिनीला वारस लावण्यामागचा वाडवडिलांचा उद्देश काय होता तो. भावांनी आपल्या बहिणीला चोळीबांगडी करावी. तिला अडीअडचणीला मदत करावी. तिचं यथोचित माहेरपण करावं यासाठी ना. आता त्याला कायद्याचं बळ मिळालं म्हणून काय झालं? आजपर्यंत मी हे सारं करण्यात कुठे कमी पडलो सांग ना? मी माझं कर्तव्य केलं, जबाबदारी पार पाडली. मग तू काय केलेस? पैशाच्या लालसेपोटी आजपर्यंतच्या प्रेमाला मूठमाती दिलीस ना? कागदाच्या तुकड्यांसाठी काळजाचे तुकडे केलेस. आजपासून तुझं माझं नातं तुटलं. यापुढं मी कधीही तुझं तोंड पाहणार नाही. मेला तुझा भाऊ तुझ्यासाठी...”


आणि बोलता बोलता म्हादबा धाड्कन खाली कोसळला. शेजारच्या लोकांनी आणि त्याच्या मुलानं त्याला उचलून गाडीत टाकलं. सरकारी दवाखान्यात आणलं. पण तो बेशुद्ध अवस्थेत होता. डॉक्टरांनी त्याला पुढे न्यायला सांगितलं. तपासणीअंती असं निदान झालं की अतिताणामुळे त्याचं ब्रेन हॅमरेज झालं होतं. तो कोमात गेला होता. मुलानं उपचारासाठी खर्चाची तयारी दाखवली. मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. दहा-पंधरा दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं खर्चही खूप झाला होता. पण शेवटी त्याचा काहीही उपयोग झाला नव्हता. म्हादबा हे जग सोडून निघून गेला. जाताना पैशापायी तुटलेल्या नात्याची खंत उराशी बाळगून गेला. पैसा झाला मोठा आणि माणूस झाला छोटा हा आवाज कायमचा ठेवून गेला. मघाशी लोकांची जी चर्चा चालू होती त्याचा उलगडा झाला होता. पैशांपुढे माणूस छोटा झाला होता हेच खरं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime