अनोखं प्रेम
अनोखं प्रेम
जुनचा पहिला आठवडा सुरू झाला की, शाळा-महाविद्यालये साऱ्यांचे दरवाजे उघडतात. महिनाभर आनंद उपभोगून आता साऱ्यांनाच ओढ लागली होती शाळेची. अडमिशन्स मिळवणं, शालोपयोगी वस्तूंची खरेदी करणं हे सारं आटोपून शाळा उघडण्याची सारेच वाट पाहत होते. शाळेच्या पहिल्या दिवशी लवकरात लवकर कसं पोहचता येईल याचा सारेच प्रयत्न करतात.
आज शाळेचा पहिला दिवस होता.नवीन एडमिशन्स झालेली होती. गेटसमोर पालक आणि पाल्य यांची गर्दी झालेली होती. सारेजण गेट उघडण्याची वाट पाहत होते. मीही घाईघाईनं गेटमध्ये शिरत होतो. दोन्ही बाजूनं जुने विद्यार्थी "गुड मॉर्निंग सर" म्हणून सुहास्य वदनानं अभिवादन करत होते. तेवढ्यात 'सर s s s s' हाक ऐकू आली. मागे वळून पाहिले तर मध्यम वयाची स्त्री. काळ्या पंजाबी ड्रेसमध्ये उभी होती. तिच्या हातात पहिल्या वर्गात असावा असा एक गोंडस मुलगा होता. मला चेहरा ओळखीचा वाटला. नक्की कुठेतरी पाहिल्यासारखा चेहरा होता; पण सारखं आठवत नव्हतं. "सर, तुम्ही सारवते सर हाय ना?" "पण तुम्ही मला कसं ओळखलं?" मी आश्चर्यचकित होऊन विचारलं. "अहो, तुम्ही प्रशिक्षण घेत असतांना आपण शेजारी राहत होतो." क्षणात वीज चमकून जावी आणि लख्ख प्रकाश पडावा तसं मी चमकलो.ओठांवर शब्द उमटले,"सलमा भाभी!" पाच-सात वर्षे उलटली होती. त्यामुळं विस्मरण झालेलं होतं. फुंकर मारल्यानंतर निखाऱ्यावरची राखाडी निघून जावी आणि पुन्हा उजळल्यासारखं व्हावं तसंच माझं झालं. "तुम्ही इथे sss आणिह मुलगा sss?" प्रश्न विचारतो न विचारतो तोच बेल वाजली. गेटचे दरवाजे उघडले आणि सर्वांनी एकदाच गर्दी केली. त्या गर्दीतून मीही ऑफिसमध्ये गेलो. त्यानंतर सलमाभाभी आणि माझी मुलाखत त्या दिवसापुरती तेवढ्यावरच थांबली.
पहिला दिवस संपला. मी परतीच्या प्रवासाला लागलो.दिवसभर माझ्यासमोर एक कोडं होतं ते म्हणजे 'सलमाभाभी आणि तिचा मुलगा.' त्या विचारात मला आमचे ते प्रशिक्षणातील दिवस आठवले. मी आणि माझा मित्र डी.एड कॉलेजला असताना भाड्याच्या रूममध्ये राहत होतो. कौलारू माडीवर दोन खोल्या होत्या. त्यापैकी पहिल्या खोलीत आमचा संसार आणि दुसऱ्या खोलीत कासम आणि सलमा हे जोडपं राहत होतं. सलमाच्या घरात चालू असलेला टेपरेकॉर्डर आणि त्यावर चालू असलेलं गीत 'कोरा कागज था यह मन मेरा' एकच कॅसेट चालू असायची. त्यामुळं हे गीत जवळजवळ आमचं तोंडपाठ झालं होतं.
मध्यम वयाचं हे जोडपं. लग्नाला बरेच वर्षे होऊनही घरात पाळणं हाललं नव्हतं. ते परस्परांवर इतकं प्रेम करायचे की, मूल न होण्यासंदर्भात ते एकमेकांवर कधीच दोषारोप करत नसत. कासम कुशल गवंडी होता. रोज कल्याणला शिवाजी चौकात उभा राहिला की त्याला दोनशे-तीनशे रुपयांचं काम मिळायचंच. कासम तसा तब्येतीनं बेताचाच होता. सलमाही अंगकाठीनं किरकोळच होती. ज्या दिवशी कासम घरी असायचा त्या दिवशी सलमा घरात आहे की नाही हे समजायचंही नाही. टेपरेकॉर्डर तेवढा चालू असायचा.
रविवारी आमची सुट्टी आणि कासमही सुट्टी घ्यायचा. त्या दिवशी दोघांचा आवाज आम्हाला ऐकायला यायचा. कधी संसाराच्या गप्पा, कधी शब्दांची बाचाबाची तर कधी टेपरेकॉर्डरच्या स्वरात स्वर मिसळून गायचेही. जणू ते स्वतःच गात आहेत.प्रसंगी प्र
ेमाचं पाश तोडून कासम सलमावर हात टाकायचा. सलमाच्या रडण्याचा आवाज ऐकून आम्ही त्यांच्या रंगभूमीवर प्रवेश करायचो; पण तिथं सारं काही व्यवस्थित. दरवाजा उघडण्यापूर्वी काही क्षणापूर्वी चाललेल्या प्रयोगावर पडदा पडायचा. जणू काहीच झालं नाही. हसतमुखानं आमचं स्वागत व्हायचं. "या भाऊ या" कासम आम्हाला आत बोलवायचा. "तुमची भाभी खूप अच्छी आहे. खुप प्रेमळ आहे. मी मात्र तिला त्रास देतो. ती बहुत अच्छी है।" अचानक कासम सलमाची स्तुती करताना पाहून आम्हाला आश्चर्य वाटायचं. सलमाही कासमच्या गुणांची वाहवा करायची. "बरं का भाऊ ,जरी हे मला ओरडत असले तरी ह्यांचा माझ्यावर खूप जीव आहे. खूप जपतात ते मला." ह्या साऱ्या स्तुती सुमनांनी आम्हीही त्यांचं काही क्षणापूर्वी झालेलं भांडण विसरून जायचो. कासम स्वतःच्या उणिवा संगायला सुरुवात करायचा. " बरं का भाऊ, तुम्ही माझे छोटे भाई आहात. खूप शिका.अच्छी पढाई करा. तुम्हाला मोठा साहब व्हायचं आहे. बडा इसम बनना है. पण माझ्यासारखं व्यसनांच्या नादी लागू नका. मला गांजा, दारू,बिडी ह्यांची आदत पडली आहे. त्याहीपेक्षा मला लवकरच जे खतम करणार आहे ते म्हणजे गर्दचं व्यसन. जिंदगीमे कभी ह्या गोष्टींच्या वाट्याला जाऊ नका. माझं आयुष्य बरबाद झालं. पण तुम्ही माझे हे शब्द कधीही विसरू नका." हे सारं मराठी-हिंदी भाषण नव्हे तर आत्म्याचे बोल ऐकून आम्ही सर्द व्हायचो. सलमाच्याही डोळ्यात अश्रू उभे राहायचे.
कासमच्या ह्या व्यसनांमुळं आर्थिक चणचण भासायची. त्यामुळं त्या दोघांमध्ये भांडणं व्हायची. ही भांडणं म्हणजे रंगमंचावरील नाटुकलीच असायची.त्यांना मूल न होण्यामागे कासमची व्यसनाधीनता असावी. अशी ही डळमळणारी नाव किनारा गाठील याची शाश्वती नव्हती.तरीही ते एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते ; जणू ते एकमेकांना सांगत होते, ' लाख चुका असतील केल्या,पण केली खरी प्रीती.'
आमचं प्रशिक्षण संपण्यापूर्वीच हे जोडपं खोली सोडून गेलं होतं. त्यानंतर भेट झालीच नाही. चार-पाच वर्षांचा कालावधी लोटला होता. आज त्या आठवणी सलमाभाभीच्या भेटीनं पुन्हा जागृत झाल्या होत्या. प्रश्न मात्र सारखा सतावत होता. 'सलमाभाभीचा मुलगा'?म्हणजे कासमभाऊ असणार! आता कसा असेल तो? रात्रभर ह्या विचारांनी डोकं चक्रावून गेलं होतं. मी उद्याच्या उजाडण्याची वाट पाहत होतो. एकदाची सलमाभाभीची भेट झाली. मला माझ्या मनातील गोंधळ संपवायचा होता. मी उतावीळपणे सलमाभाभीला विचारलं," भाभी, कासमभाऊ कसे आहेत?" त्यावर तिच्या चेहऱ्यावरचं भाव मला काहीतरी सुखद धक्का देणारे वाटत होते. सलमाने सर्व हकीकत कथन केली. गर्द पितांना कासमला पोलिसांनी पकडलं. व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं. त्याच्या शरीरातील अल्कोहोल प्रमाण हळूहळू कमी करून त्याला व्यसनातून मुक्त केलं. 'आणि हा मुलगा ?" " तो आम्ही दत्तक घेतला आहे."
एकंदरीत सलमा आणि कासमचं आयुष्य एका नवीन मार्गावर रुळलं होतं. त्यांच्या प्रेमाचं फूल आज माझ्याच शाळेत फुलणार होतं. ह्या गोष्टीनं मी मनोमनी सुखावलो. सलमा आणि कासमच्या 'कोऱ्या कागदावर' ह्या मुलाचं नाव लिहिलं होतं. तेवढ्यात बेल वाजली. सलमा घरी येण्याचं आमंत्रण देऊन निघून गेली. तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडं मी बराच वेळ पाहतच राहिलो.