अश्रू !
अश्रू !
शामला पहिला मुलगा आणि आता दुसरी मुलगी झाली . आपले चौकोनी कुटुंब पूर्ण झाल्याचे समाधान दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होते .
दोन दिवसांनी दवाखान्यातच सारिकाला अचानक रक्ताची उलटी झाली आणि तीने तिथेच जीव सोडला .
शामला काही कळेना असे कसे काय झाले ? पण मुलांकडे बघत त्याने आपले अश्रू पुसले आणि स्वतः सावरला . मुलगा होता चार वर्षाचा आणि आता हे दोन दिवसांचे पिल्लू घेवून त्याने बायकोचे सारे क्रिया कर्म दगड होवून पार पाडले .
नातेवाईकांनी दुसऱ्या लग्नाचा सल्ला दिला पण त्याचे मन तयार झाले नाही . अशातच त्याची मेव्हणी मुलीला न्यायला तयार झाली .तिला एक मुलगा होता .तिच्या नवऱ्याने सुध्दा शामला आश्वासन दिले की तो ह्या मुलीला हवे तेव्हा त्याच्याकडे घेवून येईल आणि ती शेवटपर्यंत शामचेच नाव लावेल . मुलीची हेळसांड नको म्हणून शाम हा दोन दिवसांचा गोळा त्यांच्या ताब्यात द्यायला तयार झाला .
मेव्हणी त्याच्या घरापासून जवळच राहायला होती त्यामुळे शाम कधीही जाऊ शकत होता .
शामची नोकरी चांगली होती , स्वतःचे घर होते , बऱ्यापैकी बचत केलेली होती . त्याला आर्थिक अडचण अशी काहीच नव्हती . पण बायकोच्या अचानक जाण्याने वरवर पाहता दाखवत नसला तरी मनातून पार खचून गेला होता .
मुलगा अभ्यासात खुप हुशार होता . त्याचे शिक्षण व्यवस्थित व्हावे म्हणून शामने त्याला तो पाचवीत गेल्यावर एका चांगल्या बोर्डिंग स्कूल मध्ये टाकले . मुलाला एकटे नको वाटायला म्हणून तो दर शनिवार रविवार त्याला भेटायला जायचा .
बघता बघता १५ वर्ष सरली . मुलगी आता शाम सोबत रहात होती .तिचेही पुढचे शिक्षण चालू होते .तिला इंजिनिअर व्हायचे होते आणि मुलाला डॉक्टर व्हायचे होते .
वडिलांच्या ओढीने मुलगी बाबासोबत राहायला आली .मलाला मात्र घरी राहायला आवडत नव्हते .तो सतत बाहेरगावी राहुनच पुढचे शिक्षण घेत राहिला .त्याच्यातली हुशारी त्याला आता परदेशाचे स्वप्न दाखवू लागली .शामला कौतुक होते पण मुलाने इथेच राहून डॉक्टरी करावी असे त्याला वाटत होते . नानाप्रकारे समजावूनही मुलगा काही ऐकायला तयार नव्हता . शेवटी मुलाच्या हट्टाने एक बाप हतबल झाला . बापाचे स्वप्न अपूर्ण ठेवून मुलगा मात्र स्वतःचे स्वप्न पूर्ण करायला परदेशात निघून गेला .
त्या दिवशी मात्र शामला आपले दुःख लपवणे अशक्य झाले . बायको गेल्यावर आपले अश्रू लपवणारा बाप आज मात्र मुलाच्या परदेशात जाण्याने खुप खुप रडला .
मुलांसाठी ज्याने आपल्या सहचरणीच्या जाण्याचे दुःख मनामधे दडपून टाकले होते , तो मुलगा बापाच्या त्यागाचा जराही विचार न करता खूप सहजतेने खुप दुर निघुन गेला .
शामला त्याची मुलगी आईच्या मायेने समजावत होती की ती कायम त्याच्या जवळ राहील , त्याला सोडून कधीच कुठे जाणार नाही .
शाम मात्र एका डोळ्यामध्ये मुलाच्या जाण्याचे दुःख तर दुसऱ्या डोळ्यामध्ये मुलीच्या रूपाने मायेचा आधार देणारं कोणीतरी आहे याचे वाटणारे सुख , अश्या दोन्ही भावनेने मुक होवून फक्त अश्रू ढाळत राहिला .
