govind kadam

Horror

3.6  

govind kadam

Horror

अमावस्या - एक काळरात्र

अमावस्या - एक काळरात्र

9 mins
1.4K


मी मूळचा कोकणातला. पांग्रड गावातील चिंचेच्या वाडीतच लहानाचा मोठा झालो. घरी आई-बाबा आणि मी तिघेच असायचो. गावच्याच ग्रामपंचायत शाळेत माझे शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि गावात कॉलेज नसल्याने पुढील उच्च शिक्षणासाठी जिल्ह्याला जावं लागलं आणि तिथेच मी एम. कॉम पूर्ण केलं. एम. कॉम पूर्ण होताच घरच्यांनी आमच्या लग्नाचा तगादा लावला आणि माझं अमृताशी लग्न झालं. अमृता माझी कॉलेजची मैत्रीण. कॉलेजला असतानाच आमच्यात प्रेम जुळलं. आणि तशी आम्ही आमच्या घरच्यांना कबुलीही दिली. लोकं काय म्हणतील, नावे ठेवतील या अशा असंख्य शंका-कुशंकामुळे घरच्यांनी आमच्या लग्नाचा आग्रह केला होता. आणि त्यांच्या आग्रहास्तव आम्ही लग्नाच्या बेडीत अडकलो. आमचं गाव तसं निसर्गाच्या सौंदर्याने खुलून आलेलं. परंतु नोकरीच्या तशा फारशा संधी उपलब्ध नव्हत्या. म्हणून आम्ही मुंबईला शिफ्ट व्हायचं ठरवलं. कॉलेजदरम्यान घराबाहेर राहायची सवय झालेली असल्याने घरच्यांनीही विरोध केला नाही. अमृता आणि मी थोडे फार पैसे व कपडे घेऊन निघालो मुंबई दर्शनाला.


त्यावेळी विरारला माझा मामेभाऊ राहत होता. त्याने वसईला माझी राहण्याची व्यवस्था करून दिली. आणि सुरु झालं मिशन नोकरी. वेस्टर्न लाईनपासून सेंट्रल लाईनपर्यंत ते अगदी पनवेलपर्यंत वाऱ्या करून झाल्या. पण मनाजोगी नोकरी काही मिळेना. काही नोकऱ्या माझ्या एम. कॉमच्या स्टेटसला साजेशा नव्हत्या तर काहींना गावाचं शिक्षण झालेला उमेदवार नको होता. अशा अनेक कारणांमुळे माझी आणि नोकरीची गट्टी काही जमत नव्हती. मुलाखती देऊन देऊन चप्पला झिजल्या पण नोकरी काही मिळत नव्हती. त्यातच गावी खर्चाला पैसे पाठवायचं तर राहीलं दूर गावावरून येताना आणलेले पैसेही संपत आले होते. माझी अवस्था अमृतालाही बघवत नव्हती. म्हणून तिनेही नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु नवरा असताना बायकोने नोकरी करावी हा पुरुषी अहंकार आडवा आला आणि मी तिला नोकरी करण्यास नकार दिला.


दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने उलटले पण चांगली नोकरी काही केल्या मिळत नव्हती. हौस मौज तर सोडा दोन वेळचं जेवायलाही पैसे उरले नव्हते. मी माझा आत्मविश्वास गमावत चाललो होतो. अशाही परिस्थितीत अमृता माझ्या पाठीशी खंबीर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर दुःखाची कधी एक रेघही तिने दिसू दिली नाही. मुंबईत काय आपली डाळ शिजणार नाही, हे एव्हाना पुरते कळून चुकले. म्हणून पुन्हा गावचा रस्ता धरण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि निरोपाची तयारी सुरु केली. इतक्यात आमचे शेजारचे रहीम काकांनी मला एका नवीन व्यवसायाबद्दल सुचवलं. बुडत्याला काठीचा आधार मिळावा, तसा काकांनी सुचवलेल्या मार्गांनी आमच्या आशा पुनर्जीवित केल्या आणि क्षणाचाही विचार न करता मी भाड्याने रिक्षा चालवू लागलो. सकाळी नशीब आजमावायचं आणि संध्याकाळी रिक्षा चालवायची हा रोजचा दिनक्रम झाला होता. कधी मुलाखती नसल्या की दोन्ही पाळींना रिक्षा चालवत होतो. हळूहळू चांगला दम बसू लागला होता. कधी कधी तर दिवसाचे 600-700 रुपये सुटाय लागले. आतापर्यंत जवळपास सर्व मोठ्या कंपन्या पिंजून काढल्या होत्या पण नोकरी काही मिळत नव्हती. मेहनतीला कसली आली लाज म्हणून स्टेटस जपत बसण्यापेक्षा फुल टाइम रिक्षा चालवण्याचा मी निर्णय घेतला. आणि नेहमीप्रमाणे अमृता याहीवेळी माझ्या पाठीशी उभी राहिली. लाखात एक असलेल्या माझ्या अमृताच्या नशिबी हा कसला सासुरवास लिहिलेला होता काय माहित? पण अमृता नेहमी हसत राहायची. कधीच तिने कोणत्याही गोष्टीची तक्रार केली नाही ना अवाजवी मागण्या. माहीत नाही कोणत्या दगडाची बनली आहे ती. तिच्याकडे पाहून जगण्याची नवी स्फूर्ती मिळत होती मला.


मुंबईत येऊन एव्हाना वर्ष होऊन गेले. आता नोकरीचा नाद सोडून फुल टाइम रिक्षाच चालवू लागलो होतो. त्यामुळे चांगली कमाईसुद्धा होऊ लागली होती. आता असे किती दिवस दुसऱ्याची रिक्षा भाड्याने चालवायची, म्हणून स्वतःची रिक्षा घ्यायची असं आम्ही ठरवलं. म्हणून दिवस-रात्र रिक्षा चालवू लागलो. असाच एके  दिवशी एका प्रवाशाला सोडून घरी जायला निघालो होतो. दिवस तर सर्वसाधारण होता पण ती रात्र मात्र अजब होती. रात्रीचे १२.४५ वाजत आले होते. मुसळधार पाऊस पडत होता. मी घरी आल्याशिवाय अमृता कधीच एकटी जेवायला बसत नसे. अमृता घरी माझी वाट पाहत असणार, म्हणून मी सुद्धा जमेल तसे रिक्षा थोड्या जास्तच वेगाने पळवण्याचा प्रयत्न करीत होतो. जवळपास वसई गावात पोहोचलो होतो, दुतर्फा जंगल असल्याने रात्रीचे सहसा या रस्त्यावरून कोणी कधीच प्रवास करण्याचे धाडस करीत नसे. त्यातच रात्रीचे १.१० वाजले होते आणि त्यात मुसळधार पाऊस त्यामुळे रस्ता तसा क्लिअर होता. म्हणून वेगाने रिक्षा पळवत होतो. अजून घरी पोहोचण्यास अर्धा तास लागणार होता. तेवढ्यात अचानक एक माणूस रिक्षासमोर आला आणि रिक्षा थांबवायला लागला. मी रिक्षा थांबवली. पावसामुळे तो पूर्ण भिजला होता, हाताला आणि काही ठिकाणी कपडे फाटलेले होते, डोक्यापासून तोंडापर्यंत टॉवेल त्यांनी गुंडाळले होते. कदाचित ते मजूर असावेत. आणि मला काहीही समजायच्या आत तो माणूस सरळ रिक्षात येऊन बसला. त्याने फक्त 'गावदेवी चला' असं सांगितलं. इतक्या रात्री त्यांना या जंगलात दुसरी रिक्षा कुठे मिळणार म्हणून मीही त्यांना विरोध न करता रिक्षा चालू केली. अमृता घरी वाट पाहत असेल म्हणून त्याना बोललो की, साहेब घरी बायको वाट बघत असेल तर तिला कळवतो आणि निघू, असं सांगून अमृताला फोन करून निरोप दिला आणि निघालो.


रस्त्यात तर दूरवर कोणी नव्हतं, मग हा माणूस अचानक कुठून समोर आला? हा प्रश्न सतत डोक्यात रेंगाळत होता. अशातच कधी २.३० वाजत आले समजलेच नाही. एव्हाना आम्ही गावदेवीला पोहोचायला हवे होतो. वास्तविक पाहता वसई गाव ते गावदेवीला पोहोचायला ३० मिनिटेच लागतात. पण त्या रात्री चकवा लागल्याप्रमाणे आम्ही तिथेच गोल गोल फिरत होतो. ४ वाजत आले तरी गावदेवीचा रस्ता काही दिसत नव्हता. काय चाललंय काहीच समाजत नव्हते. आणि इतका वेळ होऊनही आपण पोहोचत नाही तरी ते प्रवाशी काहीच बोलत नव्हते. ना मी काही बोललो तर त्याला उत्तर देत होते. म्हणून आरशातून पाहिलं तर अजूनही तोंडाला बांधलेला रुमाल त्यांनी सोडला नव्हता. तसेच त्या ओल्या रुमालाने एक टक माझ्याकडे बघत होते. डोळ्यांची पापणीही लवत नव्हती. मलाही आता थोडी भीती वाटू लागली होती. आतापर्यंत अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्यात काहूर माजलं होतं. सोसाट्याचा वारा सुटूनही मला घामाच्या धारा निघत होत्या. छातीत धड धड सुरु झाली होती. पावसाच्या आवाजातही हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते. ज्या वेगाने मी रिक्षा पळवीत होतो, त्याच वेगाने हृदयाचे ठोके पडत होते. पहाटेची पहिली किरण पडताच मला गावदेवी गावाचा बोर्ड दिसला आणि जिवात जीव आला. मी मागे वळीत त्यांना विचारलं की, 'साहेब गावदेवी आलं, कुठे सोडू तुम्हाला?'


'मागे वळू नकोस, आलं की मी सांगेन,' असं तो इसम मोठ्याने ओरडला, मी लगेच पुढे पाहून रिक्षा चालवू लागलो. काही अंतरावर गेल्यावर त्यांनी रिक्षा थांबवायला सांगितली. मी रिक्षा थांबवताच, 'मागे पाहू नकोस, तुझे पैसे सीटवर ठेवले आहेत, आणि उद्याही सेम ठिकाणी सेम टाइमला मला घ्यायला ये' असं सांगत तो रिक्षातून उतरून गेला . मी सीटवर बघितले तर त्याने १००० रुपये ठेवले होते आणि त्यांचं भाडं ७०० रुपये झालं होतं. ती नोट बघून मला धक्काच बसला, केसांपासून पायाच्या नखापर्यंत भिजलेल्या माणसाकडची नोट जराही ओली नव्हती. उरलेले ३०० रुपये देण्यासाठी मी क्षणाचाही विलंब न करता रिक्षातून उतरलो तर तो इसम तिथे कुठेच नव्हता. माझा थरकाप उडाला. पायात मुंग्या आल्याने जसा पाय सुन्न पडतो तसं डोकं सुन्न पडलं होतं. पुढे अजून काही घडण्याआधी मी लगेच रिक्षा चालू करून घरी निघून आलो.


घरी पोहोचण्यास ६ वाजले होते. अमृता माझी वाट बघीत बघीत उपाशीच झोपली होती. रात्रभर घडलेल्या प्रकाराने खूप थकायला झालं होतं. म्हणून तिला न उठवता मी पण झोपायला गेलो. रात्रभर घडलेल्या घटनांनी डोक्यात अनेक प्रश्नांनी थैमान माजवलं होतं. पण त्या प्रश्नांची उत्तरं काही सापडत नव्हती, तो माणूस पुन्हा पुन्हा मागे वळू नको का सांगत होता? ती नोट पूर्णपणे सुकी कशी? त्याने रिक्षामध्ये बसूनही टॉवेल का सोडले नाही?, तो गायब कुठे झाला? चकवा लागला होता का? अशा अनेक प्रश्नांनी डोक्याला भांबावून सोडलं. प्रत्येक प्रश्नांची आपल्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत होतो. पण तरीही काही प्रश्न अनुत्तरीतच होते. काही केल्या झोप लागतच नव्हती. अस्वस्थ वाटत होतं. सकाळी झाला सर्व प्रकार मी अमृताला सांगितला. तर तीसुद्धा घाबरली. भूत वगैरे असेल, पुन्हा तिथे जाऊ नको म्हणून तिने सांगितलं. भूत असतं तर त्याने मला इजा पोहोचवली असती, असं काही नाही, असतो कोणाकोणाचा असा स्वभाव, त्यांचे उरलेले पैसेही द्यायचे आहेत, अशाप्रकारे तिची समजूत काढली. भीती मलाही वाटत होती पण असं मोठं भाडं सोडून चालणार नव्हतं. अमृता ऐकायला तयारच नव्हती पण कसं बसं तिला मनवलं.


आणि दुसऱ्या दिवशीही त्यांना त्याच ठिकाणाहून त्याच वेळी पिक अप केलं. पाऊस नव्हता तरी त्यांनी तेच फाटलेले कपडे आणि तोंडाला टॉवेल गुंडाळलं होत. आजही ३ वाजत आले तरी आम्ही गावदेवीला पोहोचत नव्हतो. बहुतेक आजही चकवाच लागला असावा. कालच्या प्रकारांमुळे अनेक प्रश्न मला भेडसावत होते, आणि त्यांची मी शोधलेली उत्तरेही फोल ठरत होती. काही केल्या राहवत नव्हतं. म्हणून मी थोडा धीर केला आणि त्यांना विचारलं की, ' साहेब या रस्त्यात कोणतीही कंपनी नाही, मग इतक्या रात्री तुम्ही एकटे इथे काय करता?' यावर एवढंच उत्तर मिळालं की, 'नको ते प्रश्न विचारू नकोस, फक्त पुढे बघून गाडी चालवं त्यातच तुझं भलं आहे.' एवढंच बोलून तो इसम शांत झाला. आता आम्ही दोघेही गप्प बसलो होतो. सर्वत्र भयाण शांतता होती. फक्त इंजिनाचा आवाज थरकाप उडवीत होता. मी कालच्याच ठिकाणी रिक्षा नेऊन थांबवली आणि म्हणालो, साहेब काल तुम्ही ३०० रुपये एक्सट्रा दिले होते. त्यावर 'तुझे पैसे सीटवर ठेवलेत आणि रोज येत जा. फक्त मागे पाहू नकोस त्यातच तुझं भलं आहे' असं बोलून तो माणूस तिथून निघून गेला. खाली उतरून पाहतो तर पुन्हा तो माणूस गायब. मी घाबरलो आणि तिथून लगेच पळ काढला आणि घरी पोहोचलो. पुन्हा रात्रभर तेच तेच विचारांनी झोप लागत नव्हती. मीही घाबरू लागलो होतो. उद्यापासून त्यांना सोडाय नको जायला असे वाटत होते. परंतु दिवसभराची कमाई एका रात्रीत होत होती. आणि तो इसम आपल्याला इजाही पोहोचवत नाही म्हणून घाबरत का होईना रोज जात होतो. अमृतानेही शेजारच्या देवळातून एक दोरा आणून माझ्या गळ्यात बांधला होता. संपूर्ण प्रवासात हनुमान चालीसा बोलत असायचो.


नेहमी तेच घडत होतं. असे करीत करीत काही दिवस गेले. एके दिवशी अशाच त्या नोटा पाहिल्या तर काळजाचा ठोकाचं चुकला. सर्व नोटांचे सिरीयल नंबर सारखेच होते. अमृताला सांगितलं तर ती अजून घाबरेल आणि आपल्याला पाठवणार नाही म्हणून तिला काही सांगत नव्हतो.

आज अमावस्याची रात्र होती. अमृताही खूप घाबरली होती. कारण तिला शेजारच्या काकूंनी सांगितलं होतं की, त्या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत, आणि तिथे त्यांची आत्मा अजूनही फिरत असते. म्हणून ती रडकुंडीला येऊन मला जाऊ नको म्हणून विनवणी करीत होती. तेवढ्यात कोणी तरी शिंकलं. त्यामुळे मी ही थोडा थबकलो. मलाही आता जाण्याची भीती वाटू लागली होती. सतत ते अपघाताचे आणि नोटांचे डोक्यात घोळत होते. पण ते आपली वाट पाहत असतील. म्हणून मी त्यांना घेण्यासाठी निघालो. मनात सतत धाकधूक लागली होती. त्यांना काही ना काही तरी कारण सांगून उद्यापासून हा सर्व जिवाचा खेळ थांबवायच्या शब्दावर अमृताने मला जाण्यास परवानगी दिली होती. मी सतत हनुमान चालीसा मनातल्या मनात म्हणत होतो. त्यांना नेहमीप्रमाणे मी पिक अप केलं आणि गावदेवीच्या दिशेने निघालो. मनात सतत वेगवेगळे विचार येत होते. आज हनुमान चालीसाही म्हणण्यात लक्ष लागत नव्हतं. आजही मुसळधार पाऊस पडत होता. रिक्षाच्या छतावर पडणाऱ्या टपोऱ्या थेंबांचा आवाज काळजावर पेनाने कोणीतरी छातीवर टोचत असल्याप्रमाणे घाव करीत होते. हात पाय गार पडू लागले होते. कापरी भरू लागली होती. पण मी अजिबात मागे वळून पाहण्याची हिंमत करीत नव्हतो. प्रत्येक मिनिट हा एक एक तासाप्रमाणे वाटत होता. घशाला कोरड पडली होती. तरी हिंमत करून साहेब गावी चाललोय, त्यामुळे उद्यापासून मला यायला नाही जमणार, असे त्यांना सांगितले आणि तेवढ्यात बाहेरून जोरात एक दगड माझ्या दिशेने येताना दिसला. मी घाबरलो आणि खाली वाकलो. आणि या गडबडीत काहीही लक्षात न येता मी त्यांना दगड लागला तर नाही ना हे पाहण्यासाठी मागे वळून पाहिलं आणि ............... आणि माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. 


माझे डोळे उघडले तर मी हॉस्पिटलमध्ये होतो. मी उठून दरवाजाजवळ चालत चालत आलो आणि पाहतो तर माझे आई-वडील दोघेही जोर जोरात रडत होते, सर्व नातेवाईक त्यांना शांत करीत होते. अमृता तर एका कोपऱ्यात दगडा प्रमाणे बसली होती. जणू तिच्या शरीरातून प्राणच निघून गेला होता. काय चाललंय मला काहीच समजत नव्हतं. तेवढ्यात माझी नजर समोरच्या टि. व्ही. वर गेली. बातम्यांमध्ये रिक्षाचा अपघात झाल्याचे दाखवीत होते. म्हणून मागे वळून पाहतो तर मी त्या पलंगावरच डोळे मिटून शांत झोपलेलो. मानेपर्यंत पांढऱ्या चादरीने ढाकलेले ते माझे पार्थिव शरीर त्या बेडवर तसेच पडलेले होते. तेव्हा मला आठवलं की, मागे वळून पाहिलं तेव्हा मागून काहीतरी जोरात डोक्यावर आघात झाला होता आणि त्यामुळेच मी चक्कर येऊन पडलो. भयावह प्रतिमा होती ती.

   

(सदर कथा आणि स्थळ काल्पनिक असून वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसा आढल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror