आम्रसुंदरी
आम्रसुंदरी


पाच सहा वाट्या आंब्याचा रस पोटात रिचवल्यामुळे बाबुरावांचे डोळे जड होऊ लागले होते. हापूस आंबा म्हणजे बाबुरावांचा जीव की प्राण, त्यात रत्नागिरी हापूस असेल तर सोने पे सुहागा, म्हणून बाजारात पहिला आंबा दिसला रे दिसला की बाबुरावांच्या घरात आंबा आलाच पाहिजे असा शिरस्ता होता. नाही म्हणायला कोकणातून दरवर्षी हापूसच्या पेट्या एव्हाना येऊन पडलेल्या असायच्या त्यामुळे दररोज ताटात सकाळ संध्याकाळ आमरस स्थानापन्न व्हायचा. कोणाला दारूचं व्यसन असत, कोणाला गायछाप लागते, कोणाला तंबाखू शिवाय होत नाही तस बाबूला हे आंब्याचं व्यसनच होत म्हणाना. आंबा कोणत्याही स्वरूपात त्याला आवडायचा म्हणूनच तर आंब्याचे दिवस म्हणजे बाबूसाठी पर्वणीच असायची.
पण या वर्षी या लॉकडाउनमुळे आंबा बाजारात यायला अंमळ उशीरच झाला. पेटी तर जणू स्वप्नंच ठरलं होत, पण शेवटी एकदाचा बाबूरावाना आंबा मिळाला. मग काय विचारता ताबडतोब पत्नीने आमरस पुरीचा बेत केला. आमरस ताटात असला की बाबूला दुसरं काहीच नको असायचं, त्यामुळे पाच सहा वाट्या आमरस आणि पुऱ्यांवर बाबूने आडवा हात मारला, पोट टूमम भरलं पण मन भरलं नव्हतं, शिवाय रस काढताना देखील बाबूने अर्धा रस कोयांना मुद्दामून ठेवून त्याचाही समाचार घेतलाच होता. आता मात्र अजून एक वाटी पोटात ढकलली तर पोट फुटेल या भीतीने शेवटी नाईलाजाने बाबू ताटावरून उठला. हात धुवायचा सुद्धा त्याला कंटाळा आला होता, हापूस आंब्याचा तो धुंद सुगंध असाच दरवळत रहावा असच त्याला वाटत होत, पण पोर पाहतायेत हे पाहून नाईलाजाने त्याने हातावर पाणी घेतलं, आणि सोफ्यावर बसला, क्षणात बसलेल्याचा आडवा झाला आणि घोरू लागला, आमरस पुरीचं जेवण, शांत दुपार, मऊ मऊ गादी वर फॅनची हवा, अहाहा सुख सुख काय म्हणतात ते हेच, क्षणार्धात बाबुरावांची ब्रम्हानंदी टाळी लागली.
जरा डोळा लागला पण तेवढ्यात जोरात दारावरची बेल वाजली.
टिंग टॉंग...
टिंग टॉंग.... टिंग टॉंग .....
बाबूने बऱ्याच वेळ दुर्लक्ष केले, कोणीतरी उघडेल दार म्हणून, पण हे काय कुठे गेले सगळे? बेल अजून वाजतेच आहे. चरफडत बाबू दरवाज्याजवळ गेला, आणि या वेळेला कोण तडमडलय म्हणून एक शिवी घालत दरवाजा उघडला, आणि डोळे चोळतच समोर पाहिले,आणि उडालाच, त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना, चार चार वेळा डोळे चोळले, स्वतःला चिमटा घेऊन पहिला, हे खरं आहे का, मी स्वप्नात तर नाही ना?
तेवढ्यात समोरच्या तिने पुन्हा नाजूक स्वरात विचारलं
"आम्ही आत यावं का ?" आता मात्र बाबू पुरताच गांगरला, सर्वात प्रथम त्याला भान आलं, हाफ बर्म्युडा आणि बनियन वर आपलं ध्यान फारच बावळट दिसतंय. डोळे पण झोपेने लाल झाले आहेत, पण आता काही इलाज नव्हता, " हो हो या ना" बाबू अनाहूत पणे म्हणून गेला, तेव्हढ्याही गडबडीत तिच्यावर सॅनिटायझर चा फवारा मारायला तो विसरला नाही. तोंडाला मास्क असल्यामुळे ती कोण आहे हे त्याला ओळखता येईना, मात्र तिच्या हातातल्या दोन डझनाच्या आंब्याच्या पेटीने मात्र त्याचे लक्ष वेधून घेतले.
सॅनिटायझर चे सोपस्कार उरकल्यावर ती आत आली आणि डायरेक्ट सोफ्यावर येऊन बसली. "इश्य काही पाणी बिनी विचारशील की नाही? "डायरेक्ट अरे तुरे? आता मात्र बाबू घाबरला, क्षणार्धात त्याची नजर आतल्या खोलीकडे गेली, अरेच्या चक्क घरात कुणीच नाही, बाबूने एकदम सुटकेचा निःश्वास टाकला. लगोलग माजघरात जाऊन माठातल थंड पाणी घेऊन आला, तोवर ती हातातल्या रुमालाने हवा घेत बसली होती, तिने साडी पण नेसली होती आंबा कलरची.गोरा रंग, घारे डोळे, लांब केस त्यात मोगऱ्याचा गजरा माळलेली आणि आंबा कलरची साडी, बाबूला ती तर आम्रसुंदरीच भासली. अनिमिष नेत्रांनी बाबू एकदा तिच्याकडे आणि एकदा तिने आणलेल्या आंब्याच्या पेटीकडे पाहत राहिला, तेवढ्यात तिने तोंडावरचा मास्क बाजूला केला, आणि बाबू चित्कारलाच " कोण, सुकन्या प्रधान?"
हो तीच ती शाळेतली मैत्रीण. नववीत असताना त्यांच्या गावातल्या शाळेत ती आली होती, तिचे बाबा पोस्टमास्तर होते, रत्नागिरीला बदली झाल्यामुळे ते कुटुंब या गावात आले होते, मुंबईची हुशार पोरगी पण रत्नागिरीत तेव्हा एकमेव शाळा असल्यामुळे तीला आमच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला होता. वर्गात सर्वात पुढे बसायची, प्रत्येक प्रश्नाला हीचा हात सर्वात आधी वर, शाळेतली सर्व पोर हिच्यावर मरायची आणि पोरी तर जळून जळून कोळसा. पण ही मात्र फारसा कोणाला भाव द्यायची नाही, शाळा ते घर आणि घर ते शाळा, एवढाच हीचा मार्ग. बाबूला तर ही पोरगी पाहता क्षणीच आवडली होती, म्हणजे आजकाल पोरांच्या भाषेत म्हणतात ना, क्रश का काय ते? ती पाहताच बाला कलीजा खलास झाला, पाहताक्षणीच प्रेम वगैरे तसं.
पण ही कोणाला भीक घालील तर कसली, पण एकदा मात्र बाबूने हिम्मत केलीच, घरच्या बागेतले दोन डझन आंबे पिशवीत घातले आणि तिच्या वाटेवर आंब्याच्या झाडाजवळ उभा राहिला, ती घरी निघाली होती शाळेतून, जाड काळ्याभोर केसांच्या दोन वेण्या पाठीवर रुळत होत्या, एक बट मात्र गालावर रेंगाळत होती, ती मात्र तिने मुद्दामूनच ठेवली असावी असच त्याला वाटलं, तिला पाहताच आपला शाळेचा गणवेश ठीक ठाक करून बाबू तिच्या समोर आला, नमस्कार करावा की हाय करावं या गडबडीत तीच म्हणाली "काय बाबुराव इकडे कसा आज ?"
"अग काही नाही हे आमच्या बागेतले आंबे आहेत, प्युअर हापूस खास तुझ्यासाठी आणलेत , घे ना . " अस म्हणून तिच्या हातात पिशवी दिली, खरतर त्या पिशवीबरोबरच आय लव्ह यु लिहिलेली चिट्ठी पण त्याला द्यावीशी वाटत होती, पण तिच्या पायातल्या सँडलकडे लक्ष जाताच ती इच्छा त्याने मनातच गिळून टाकली, तिने मात्र ते आंबे घेतले आणि झपाझप निघून गेली, कोण आनंद झाला बाबूला? पण त्याच्यापुढे काही कधी बाबूची मजल गेली नाही आणि तिनेही खाल्ल्या आंब्याला जागून परत कधी बाबुकडे ढुंकूनही पाहिल नाही. दहावीच वर्ष संपलं आणि ती निघून गेली ती कायमचीच.
आणि आज आता अशा अवेळी , ही अचानक कुठून आली? बाबू विचारात पडला, तेवढ्यात तीच म्हणाली,
"बाबूराव आंबे खूप आवडतात ना तुम्हाला ? माहितीये मला, म्हणून खास रत्नागिरी हापूस घेऊन आलेय तुमच्यासाठी. पोटभर खा , आणि हो आंबावडी सुद्धा आणली आहे, मी स्वतः बनवून."
आणि पर्समधला छोटा डबा काढून आंबावडी भरवू लागली. आता मात्र बाबुराव स्वर्गात तरंगू लागले, आमरसाने तुडुंब भरलेलं पोट, समोर आम्रतरु प्रमाणे भासणारी ललना, जिच्याशी बोलण्यासाठी एकेकाळी मित्रांमध्ये पैजा लागायच्या, तिने आणलेली आंब्याची पेटी आणि ती स्वतःच्या नाजूक हाताने आंबावडीचा घास भरवतेय, आणि घरात कोणीच नाही. अत्यानंदाने बाबू हवेत तरंगू लागला, आणि पुन्हा तेवढ्यात कर्कश्य बेल वाजली बाबुचे धाबे दणाणले , आता कोण? त्याने तशीच बेल वाजू दिली, या स्वर्गसुखात हा काय व्यत्यय आला म्हणून तो अस्वस्थ झाला, जाऊदे असू दे कोणीही दार उघडायचेच नाही,
पण आता मात्र दारावर जोर जोरात धडका बसू लागल्या, सोबत पोरांचा आवाज, "बाबा दार उघडा लवकर"
तसा बाबू खाडकन उठला, पाहतो तर काय दारावर पोर धडका देत होती, सोबत बायकोचा आवाज, "अहो हे काय मेलं झोपणं की काय कुंभकर्णासारखं? केव्हाचं दार वाजवतोय आम्ही, उघडा लवकर. बाबुराव पुरते गोंधळले,
मग ते काय होतं? ती आम्रसुंदरी? ती आंब्याची पेटी?
स्वप्न ????
हो स्वप्नंच होत ते सगळं!
आणि हे सत्य दारावर धडका मारतय ते.
आता आठवलं बाबूला, मगाशी झोपेच्या नादात बायको सांगून गेली होती, " मी पापड लाटायला चाललेय समोर, दार लावून घ्या." आणि तिच्यामागे पोरही पळाली होती. अन् आपण मात्र... कसतरी गडबडीत स्वतःला सावरून बाबूने दार उघडलं, दार उघडताच समोरून तोफेचा मारा सुरू झाला, धाड धाड धाड... पण बाबूराव मात्र आज भलत्याच खुशीत होते. त्या तोफेकडे साफ दुर्लक्ष करून पुन्हा सोफ्यावर जाऊन आडवे पडले, न जाणो स्वप्नातली आम्रसुंदरी कदाचित अजून वाट बघत बसली असेल, हातात मँगो सरबताचा प्याला घेऊन...