Tanuja Mulay

Others

4.3  

Tanuja Mulay

Others

वृंदावन

वृंदावन

4 mins
623


   आज सुमतीताईंच्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं वृंदाच लग्न होतं. मोत्याच्या मुंडावळ्या लावून अंतर पाटामागे लेक तिच्या भविष्याची गुलाबी स्वप्न रंगवीत होती आणि इकडे मात्र तुळशी ला पाणी घालता घालता आईचे डोळे भरून येत होते. २५ -३० वर्षपूर्वीचा भूतकाळ सुमतीताईंच्या मनपटलावरून झरझर सरकून जात होता. आज सुभाष राव असायला पाहिजे होते. किती स्वप्न रंगवली होती त्यांनी लेकीच्या लग्नाची... पण क्रूर नियतीने सारा डाव उधळला आणि त्यानंतर सुमतीताईना ज्या दिव्यातुन जावं लागलं होत ते नुसतं आठवलं तरी त्या काळ्या आठवणी त्यांना आज नको वाटत होत्या.

 

साधारण तीस वर्षांपूर्वी सुमतीताई लग्न होऊन या घरात आल्या तेव्हा त्यांच्या आईने त्यांना रुखवतात एक छोटंसं तुळशी वृंदावन दिलं होतं. तेव्हापासून या तुळशीला रोज पाणी घालण्याचा आणि संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावण्याचा नेम काही चुकला नव्हता. या तुळशीवर त्यांची नितांत श्रद्धा होती. सुरवातीच्या दिवसात सासरघरी कधी एकटेपणा वाटला की त्या या तुळशीवृंदावजवळ येऊन बसायच्या क्षणात त्यांना आई भेटल्यासारखं वाटायचं. संसारवेलीवर फुल उमलण्याची जेव्हा त्यांना पहिली चाहूल लागली तेव्हाही हे गुपित सर्वप्रथम त्यांनी या वृंदावनातल्या तुळशीलाच सांगितलं होतं. सुभाषराव नेहमी म्हणायचे आपल्याला पहिली मुलगीच झाली पाहिजे, तिचे नाव मी वृंदा ठेवणार. तुझी आवडती वृंदा. तिचं लग्न आपण खूप थाटामाटात करायचं. पण विधात्याच्या मनात काही वेगळंच असावंं. सुमतीताईना कन्यारत्न प्राप्त झाल्याची बातमी कळताच फॅक्टरीच्या कामासाठी बाहेर गावी गेलेले सुभाषराव घाईघाईने घरी यायला निघाले आणि त्यांच्या बसला अपघात झाला. पावसाळ्याचे दिवस होते, रात्रीचा प्रवास, चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली. कोणीच वाचलं नाही.


पदरात नुकतंच जन्मलेल लहान लेकरू आणि एकीकडे प्राणप्रिय पतीची चिता. सुमतीबाईंवर जणू आभाळच कोसळलं. जगण्याची इच्छाच उरली नाही पण त्या लेकरासाठी मन घट्ट केलं आणि पुन्हा उभ्या राहिल्या. त्या दिवशीपासून सासरच्या लोकांनी या मायलेकींशी संबंध तोडला. सासूबाई तर म्हणायच्या या पोरीने माझ्या लेकाचा बळी घेतला, अशी वाईट पायगुणाची पोर माझ्या घरात नकोच. 


माहेरच्या मदतीने सुमतीताई सावरल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. लेकीचं नाव नवऱ्याच्या इच्छे वरून च ठेवले वृंदा. सासरहून येताना त्यांनी कशावरच हक्क सांगितला नव्हता फक्त आईने दिलेलं तुळशी वृंदावन मात्र त्या बरोबर घेऊन आल्या होत्या. वृंदा शाळेत जायला लागली. नाकी डोळी नीटस, रेखीव असणाऱ्या वृंदाने रंग मात्र बापाचा घेतला होता, काळा सावळा. अत्यंत हुशार, तरतरीत आणि उत्साही असणाऱ्या वृंदाला केवळ तिच्या रंगामुळे दरवेळी डावलल जायचं तेव्हा मात्र सुमतीताईंना खूप वाईट वाटायचं. शेजार पाजारचे, सासरचे किंवा इतर नातेवाईक सतत आडून पाडून सुमतीताईंना जाणीव करून द्यायचे, जन्मतःच पितृछत्र हरपलेल्या या सावळ्या वृंदेशी कोण लग्न करणार? तेव्हा क्षणभर सुमतीताईंना खूप वाईट वाटायच आणि तेवढीच काळजीदेखील वाटायची कसं होणार माझ्या या सावळ्या रखुमाईचं?


पण त्यांनी आपल्या या दुःखाची सावली वृंदावर कधी पडू दिली नाही. मुळातच तल्लख बुद्धीची वृंदा शाळेत नेहमीच पहिली असायची त्यामुळे तर तिच्या मैत्रिणी तर तिचा अजूनच दुस्वास करायच्या. त्यामुळे वृंदाला फारशा मैत्रिणी कधीच नव्हत्या. पण याची खंत न करता हा वेळ वृंदाने अनेक नवनवीन कला शिकण्यात सत्कारणी लावला. ती उत्तम पेटी वाजवायची, सुंदर रांगोळ्या काढायची. रांगोळी स्पर्धेचं बक्षीस तिने कधीच हुकवल नव्हतं. तिला सुमतीताईंनी उत्तम स्वयंपाक, निवडणं टिपणं, घरगुती काम सगळं छान शिकवलं होतं. वृंदाही हे सगळं मनापासून करायची. सगळ्यांशी प्रेमाने वागायची. 


वृन्दाला लहानपणापासूनच इतरांना मदत करायला आवडायची त्यामुळे बी कॉम पूर्ण होताच तिने एक NGO सोबत काम करायला सुरुवात केली. त्यांचे आर्थिक व्यवहार ती सांभाळायची आणि त्याचबरोबर M. Com ला सुद्धा तिने प्रवेश घेतला होता. कॉलेज आणि ऑफिस या धावपळीत वृन्दा ला दुसरं काही सुचत नसे पण सुमतीताईंनी मात्र वर संशोधनाला सुरुवात केली होती. पण दिवसेंदिवस त्या अधिक निराश होत चालल्या होत्या कारण कोणतीही स्थळ पहा त्यांची अपेक्षा असायची वधू गोरी असावी. गोऱ्या रंगाच्या विनाकारण महत्त्व वाढवलेल्या या लग्नाच्या बाजारात मुलीच्या अंगी असलेले सगळे गुण दुय्यम ठरतात याच त्यांना खूप वाईट वाटायचं. शिवाय आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे हुंडा देऊन लग्न शक्यच नव्हतं आणि वृंदाला तर ते बिलकुल मान्य नव्हतं. त्यामुळे लग्नाचं वय वाढत चाललं, तसे आजपर्यत कधी या मायलेकींशी साधा संपर्क सुद्धा न ठेवलेले नातेवाईक नको नको अशी स्थळ सुचवायला लागले. तेव्हा तर सुमतीताई खूप दुःखी व्हायच्या आणि त्यांच्या जीवाभावाच्या तुळशीजवळ जाऊन आपलं दुःख हलकं करायच्या. कसं होईल माझ्या वृंदेच? तिला मनासारखा जोडीदार मिळेल का? तिलाच विचारायच्या. दरवर्षी न चुकता तुळशीच लग्न लावायच्या. 

  

यावर्षीदेखील दिवाळी झाली आणि तुळशी विवाहाच्या दिवशी सुमतीताई वृंदाची ऑफिसमधून येण्याची वाट पाहत होत्या, दिवे लागणीच्या वेळी वृंदा आली पण ती आज एकटी नव्हती तिच्याबरोबर होता एक उंचापुरा देखणा तरुण. वृंदाने ओळख करून दिली, "हे आहेत माधव राजवाडे, खूप मोठे व्यावसायिक आहेत. आमच्या NGO ला नेहमी देणगी देत असतात. अशाच एका कार्यक्रमात आमची ओळख झाली."


  वृंदाला मध्येच थांबवत माधवने पुढच्या संभाषणाची सूत्र आपल्या हातात घेतली, "आई तुमची वृंदा मला खूप आवडली आहे, आणि मला तिच्याशी लग्न करायचंय, अर्थात तुमची परवानगी असेल तर." माधवने एका दमात सांगून टाकलं. सुमतीताईना काय बोलावं सुचेचना त्यांनी वृंदाकडे पाहिले, आपल्या सावळ्या रुख्मिनीच्या गालावर आलेली लज्जेची लाली त्यांना सर्व काही सांगून गेली.

 

 तेवढ्यात माधवच म्हणाला माझ्या आईला सुद्धा वृंदा खूप आवडते तुम्ही माझ्या घरच्यांची काळजी करू नका.  मग काय राजवाडेंकडून रीतसर मागणी आली आणि लगेचच लग्नाचा बार उडवून द्यायचं ठरलं. सुमतीताईंनी मनोमन तुळशी मातेचे खूप खूप आभार मानले. 

  

आतासुद्धा एकीकडे मंगलाष्टके चालली होती आणि सुमतीताईंचे डोळे वरवर कृतज्ञतेने भरून येत होते. "आई आशीर्वाद द्या", जावयाच्या या शब्दांनी त्या भानावर आल्या, त्यांच्या डोळ्यातले पाणी माधवच्या नजरेतून सुटले नाही, तो म्हणाला, आई काळजी करू नका तुमच्या या प्राणप्रिय वृंदेला हा माधव कधीच अंतर देणार नाही. सुमतीताईंना अश्रू आवरेना पण ते होते आनंदाचे अश्रू. सासरी जाणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला द्यायला सुमतीताईंकडे काहीच नव्हते पण त्यांनी लेकीला सोबत दिला होता अनमोल ठेवा तो म्हणजे "संस्कारांची शिदोरी आणि *तुळशी* *वृंदावन*"


Rate this content
Log in