आम्ही सारे खादाड !!!
आम्ही सारे खादाड !!!
- खादाड आणि बडबड्या राजाभाऊंची फारचं पंचायत झालेली होती .पोट वाढत चाललं होतं . सगळ्याच पेंट्सची दर दोन महिन्यात कंबर वाढवून , दुरुस्ती करवावी लागे. चष्म्याचे नंबर वाढतात तसे बनियानीचे नंबर वाढत जात होते . शर्ट्स
दरवेळेस सैल विकत घ्यावे लागे . पण पोट सुटणं काही कमी होईना. मग हे प्रकरण इतकं वाढलं की राजाभाऊंची बायको राजाभाऊंचे नवे कपडे देऊन भांडी देखील विकत घेऊ लागली .तरीही राजाभाऊंच्या पोटाचा फुगारा काही
कमी होत नव्हता, आणि सौ राजाभाऊंचा संसार ही वाढतच गेला . सगळं घर नव्या भांड्यांनी भरलं . बेडरूम झालं , ड्राइंगरूम झालं , पोरांच्या खोल्या झाल्या , चारीकडे भांडेच भांडे . येणाऱ्या जाणाऱ्यांच्या प्रश्नांनी सौ राजाभाऊंना भंडावून सोडलं . शेवटी त्यांनी भांड्यांच दुकानच काढलं .
- सौ.
राजाभाऊंचे दुकान आणि राजाभाऊंचे पोट दोन्ही भरभराटीवर होते . पोटामुळे राजाभाऊंना नाटकांचे प्रयोगही कमी करावे लागले.
- खादाड वृत्तीमुळे राजाभाऊंना , ' आम्ही सारे खादाड ' चे सवांद पटकन पाठ व्हायचे , पण नाटकाचे सवांद मात्र ते विसरायचे . बरं विसरायचे तर विसरायचे , पण नाटकांमध्ये आम्ही सारे खादाडचे सवांदही मिसळू लागले . त्यामुळे नाटकांमध्ये गोंधळ होऊ लागला .
- एका
नाटकात नायिकेचा सवांद होता , ' तुझी ही गोष्ट माझ्या डोक्यात शिरली नाही .' त्यावर राजाभाऊंचा सवांद होता , ' कशी शिरणार , तुझ्या डोक्यात गैरसमज भरेलेले आहे .' पण प्रयोगाच्या वेळेस राजाभाऊ म्हणाले , ' कशी शिरणार तुझ्या डोक्यात बटाटे भरलेले
आहेत .' मग काय एकच गोंधळ झाला . नायिका खूपच वैतागली . तिला शांत करण्यासाठी निर्मात्याला आणखीन एका प्रयोगात दुसऱ्या नायकाबरोबर घेतो असा शब्द द्यावा लागला , तेव्हाच ती या नाटकाचे इतर प्रयोग करायला तयार झाली .
- एका
दुसऱ्या नाटकाच्या प्रयोगात राजाभाऊंना नायिकेला म्हणायचं होतं , ' माझ्या हातात तुझा हात दे ' राजाभाऊ म्हणाले , ' माझ्या हातात लाडवांचा डबा दे .' मंचावर लाडवाचा डबा नव्हताच . मग प्रेक्षक खूप हसले अर्थात नायिकेचा राग यावेळी देखील अनावरच झाला होता . पण राजाभाऊंवर याचा काहीच परिणाम झाला नव्हता .
- अशा प्रकारे दरवेळेस गोंधळ होऊ लागला . पोट वाढण्याचा त्रास , दर वेळेस नवे कापडं शिवण्याचा त्रास , भांड्याच्या दुकानीचा वाढता त्रास , प्रयोगातला गोंधळ , या सर्वाना राजाभाऊंची बायको कंटाळली . तिला असं लक्षात आलं की हा सर्व गोंधळ ' आम्ही
सारे खादाड ' या कार्यक्रमामुळे होत आहे . न राजाभाऊ जास्त खातील आणि न राजाभाऊंचे शरीर अवाढव्य होईल . या सर्वांवर ती गंभीरतेने तोडगा शोधू लागली . ती सरळ गेली चॅनल वाल्यांकडे . रडतं रडतं तिनं आपली सर्व व्यथा
त्यांना सांगितल. राजाभाऊंच्या खादाडपणावर कसा आळा घालता येईल याचा विचार करण्यासाठी तिनं त्यांना विनवणी केली .
-चॅनलच्या सीईओ बाईंनी तिचे डोळे पुसले आणि बऱ्याच विचारानंतर म्हणाली , ' आमच्या कार्यक्रमाची टीआरपी खूप आहे . आणि
रेसिपीचाच कार्यक्रम असतो . आता राजाभाऊंना स्वतः:च आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवायला हवं . हरकत नाही आपण असं करू की ' नांदा सौख्य भरे ' या मालिकेतल्या आजींना बोलवू . त्या आमची टीआरपी देखील कमी होऊ देणार नाही
आणि राजाभाऊंच्या खाण्यावर बारकाईने लक्ष ठेवतील . अरे ज्यांनी ललिताबाईं सारख्या
पैशाचा हव्यास असणाऱ्या बाईला चुटकी सरशी ठीक केलं तिथं त्या राजाभाऊंचे पोट चुटकी सरशी कमी करू शकतील . '
- चॅनलच्या त्या सीईओ बाईंचा हा सल्ला सौ. राजाभाऊंना आवडला . तिनं सरळ प्रोडक्शन विभागात फोनचं लावला . राजाभाऊंच्या बायकोचा फोन येताच सर्व घाबरले .
-एक तर 'नांदा सौख्य भरेची ' आजी खाष्ट , त्यात रागीष्ट , लहानपणी खट्याळ राजाभाऊ त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेले . आणि त्यांच्या हातून बरेच धपाटे ही खाल्लेले . राजाभाऊ सहजासहजी तयार होणार नव्हते . तरी प्रोड्युसरने मुकाट्याने हा सल्ला मान्य केला . नाही तरी राजूभाऊंच्या वाढत्या पोटामुळे त्यांचा हा कार्यक्रमच एक दिवस बंद व्हायचा ही त्यांना भीती होतीच .
- ठरल्याप्रमाणे सौ . राजाभाऊं , राजाभाऊंना तयार करणार होत्या . राजाभाऊंना थोडं अवघडच होतं पण बायकोला नाही
म्हणून जातात कुठे ? शेवटी नाईलाजाने ते तयार झाले .
-ठरल्याप्रमाणे चित्रीकरणाची तयारी सुरु झाली . 'नांदा सौख्य भरे ' च्या आजी तयार होत्या . आपलं काही खरं नाही हा
विचार करत राजाभाऊ देखील 'नांदा सौख्य भरे ' च्या आजी समोर येऊन उभे राहिले . पण आजीच्या भेदक नजरेमुळे ते चपापलेले होते . राजाभाऊंनी सर्व प्रेक्षकांना नमस्कार केला , ' आज
आपल्यासोबत प्रसिध्द खडूस ललिताबाईच्या , विहीणबाईंची सासू काही नवीन पदार्थ सांगणार आहेत .'
- 'बरं मला सांगा आजी ,आज तुम्ही सर्वाना काय सांगणार आहात आणि काय दाखविणार आहात .?"
- 'विसरला वाटत . '
-' काय ? 'राजाभाऊंनी विचारले .
- ' अरे मोठ्यांना अगोदर वाकून नमस्कार करायचा असतो . ' आजी ओरडल्या तसं राजाभाऊ घाबरले आणि लगेच
वाकयाचा प्रयत्न करू लागले पण त्यांना वाकता येईना .
- ' राहू राहू दे , देखल्या देवा दंडवत नको . तुला वाकवता यावं यासाठीच मी इथं आले आहेत ना ? "
- ' नाही हो .' राजाभाऊंनी रुमालाने घाम पुसला , ' आम्ही सारे खादाड 'या कार्यक्रमात आपल्याला एकादी रेसिपी
दाखवायची आहे . तुम्ही आज काय दाखविणार आहात ? '
- आज ना मी तुझ्याच आवडीची रेसिपी दाखविण्याचे ठरविले आहे .' आजीबाईनी मुक्त हस्ताने प्रसन्न होत एकादा वर द्यावा तसा हात वर केला .
- राजाभाऊंना परत घाम फुटला . त्यांना आश्चर्य वाटलं . स्क्रिप्टमध्ये असं काही नव्हतंच .
-' अहो पाहुण्यांची आवडती रेसिपी आम्ही दाखवितो . हा हक्क पाहुण्यांचा असतो . '
- ' असू दे रे एकाद वेळा तू आपली आवड सांगितली तर काही कार्यक्रम बंद होणार नाही .'
राजाभाऊंना काही सुचेना , त्यांनी प्रोग्राम डायरेक्टरला मोबाईल लावायचा विचार केला व म्हणाला , ' आपण असं
करू एक कमर्शियल ब्रेक घेऊ , तो पावेतो तुम्ही ठरवा .'
- ' कशाला ? ' आजीबाई परत जोराने ओरडल्या , 'दोन मिनिटं झाली नाहीत तर ब्रेक कशाला हवा ? प्रेक्षकांना किती मनस्ताप होतो ठाऊक आहे का तुला ? त्यांचा वेळ किती फुकुट जातो त्यांची भरपाई तुझे च्यानलवाले करणार आहेत काय ? काही ब्रेक वगैरे नाही घ्यायचा .'
- आता राजाभाऊंची बोबडीच वळली .
- लवकर सांग . नाही तर प्रेक्षक च्यानल बदलतील . ' आजीबाई परत ओरडल्या .
- ' सांगतो . सांगतो . ' राजाभा डोकं खाजवू लागले . समोर केमरे तयारच होते .
- ' लवकर सांग तुला काय आवडतं ?' आजीबाईंनी परत राजाभाऊंना खडसावलं .
- ' बटाट्याचे समोसे .' त्यांना काही सुचेना पण काही तरी सांगायचं म्हणून त्यांच्या तोंडातून निघालं . त्यांना स्वत:चंच आश्चर्य वाटलं , कारण बटाट्याचे समोसे हा त्यांचा सर्वात आवडता पदार्थ होता , पण आज पावेतोच्या कार्यक्रमात कुणी हा पदार्थ दाखविलाच नव्हता . आज आपल्याला बटाट्याचे समोसे खायला मिळणार या विचाराने आता हळूहळू राजाभाऊं आनंदित होऊ लागले .
- ' बरं , मला सांगा बटाट्याच्या समोस्यांसाठी आपल्याला काय काय सामग्री लागेल ?' राजाभाऊ म्हणाले .
- आपल्याला नाही . तुला .' आजी म्हणाल्या .
- राजाभाऊंना आश्चर्य वाटलं . पण ते काही बोलले नाही फक्त एवढचं म्हणाले , ' बरं मला तर मला . पण सामग्री तर सांगा .'
- " तू माझ्यावर हुकुम सोडायचा नाही . मी येथे गेस्ट म्हणून आलेली आहे . " आजीने राजाभाऊंना दम दिला .
- आता राजाभाऊं वैतागले . आजीबाईना बरं वाटाव म्हणून उगाच ते म्हणाले , ' नाही बटाट्याचे समोसे मलाही खूप आवडतातच . जेव्हा पासून मी पुलंची बटाट्याची चाळ वाचली आहेत तेव्हा पासून मला बटाट्याचं भारी आकर्षण . '
-' जास्त मध्येमध्ये बडबड करायचं काम नाही . बटाट्याच्या चाळीचा आणि बटाट्याच्या समोस्यांचा काय संबध ? '
- चुकलं माझं . ' राजाभाऊंना परत घाम आला . त्यांनी आपला घाम पुसला.
- असाच घाम येत राहिला तर पोट लवकर कमी होईल . ' आजी म्हणाल्या .
-" तुम्ही वाचली आहे का बटाट्याची चाळ . ?" राजाभाऊंनी विचारले .
-" होय . वाचली देखील आहे आणि बघितली देखील आहे . "
-" म्हणजे ? " राजाभाऊंना गमंत वाटली .
- " अरे बाबा आपण मंडईत नाही का जात ? " आजी जोराने म्हणाल्या .
-राजाभाऊ ओशाळले . मनात विचार केला , ' आजी काही कमी नाही .
color: rgb(34, 34, 34);">- स्टुडियोमध्ये चित्रीकरण सुरू होते . सर्वांबरोबर सौ राजाभाऊ देखील बसल्या होत्या . चॅनलच्या सीईओ बाई सौ
राजाभाऊंना लगेच म्हणाल्या , ' पहा मी म्हटलं नव्हतं ' नांदा सौख्य भरे ' च्या आजी राजाभाऊंना ठीक करू शकतात . असाच घाम येत राहिला तर त्यांचं पोट लवकरच कमी होईल . '
-" तुमचं बरोबर आहे . " सौ . राजाभाऊंना आनंद झाला
- ' आपण रेसिपी बद्दल बोलू का . अहो अशाने माझ कंट्रक्ट रद्द होईल .'
-तिकडे राजाभाऊं आजींना विनवणी करीत होते .
- ' हं , आता कसं ? तर आता ठरलं तुला बटाट्याचे समोसे बनवायचे आहेत .' आजी म्हणाल्या .
- राजाभाऊ काहीच बोलले नाही .
- 'तर आता सामग्री .' आजी सांगू लागल्या , 'सर्वात अगोदर म्हणजे हे तुमचं किचन चालणार नाही . मातीची चूल आणि लाकडं लागतील . ही व्यवस्था होत असेल तर पुढे वाढते '
-झालं . राजाभाऊ तर हुशः करत खालीच बसले . पण लगेच भानावर आले .
- 'अहो तुम्ही काय म्हणता . लाकडं आणि चूल ? '
- ' होय .' आजी ठामपणे म्हणाल्या .
- प्रोग्राम डायरेक्टर ओरडला , ' अर्ध्यातासाचा कमर्शियल ब्रेक .'
- स्टुडियोमध्ये एकच धावाधाव . कोणी एक बाहेर जाऊन नऊ विटा घेऊन आलं . एक जण बाजारात जाऊन
थोडे लाकडं घेऊन आलं . एकाने काही गोवऱ्या आणल्या . खुल्या जागेतच विटांची चूल बनली .
-' आता काय करायचे ? ' राजाभाऊंनी विचारले .
- ' अगोदर चूल पेटवायची आहे . लाकडं घे .' आजी म्हणाल्या .
- 'ते तर मला ठाऊकच आहे .' राजाभाऊ हुशारीनं म्हणाले .
- ' मग पेटव . ' आजी तेव्हड्याच तोऱ्याने म्हणल्या .
राजाभाऊ ती पेटवून फुंकर मारू लागले . चारीकडे धुरच धूर होता . शेवटी राजाभाऊंचा चेहरा काळा झाला पण चूल मात्र पेटली .
- 'आता काय करायचं ? ' राजाभाऊंनी विचारले .
- 'एका मोठ्या भांड्यात थोडं पाणी चुलीवर ठेव .' आजी म्हणाल्या .
- 'ते तर मला ठाऊक आहे . ' राजाभाऊंनी भांड्यात पाणी टाकून भांडं चुलीवर ठेवले . '
- 'आता भांड्यात एक किलो बटाटे टाकून वर झाकण ठेव .'
- ' ते तर मला ठाऊक आहे .' राजाभाऊ म्हणाले व बटाटे शिजायला ठेवले . -
- ' आता थोडे वाटाणे सोलून घे .'
- ' ते तर मला ठाऊक आहे .' राजाभाऊं
म्हणाले व ते वाटाणे सोलू लागले .
- ' आता थोडे कांदे , मिरची, कोथमिर , बारीक चिरून घे .'
- ' ते तर मला ठाऊक आहे .' म्हणतं राजाभाऊंनी कांदे सोलायला घेतले .
- आता परातीत हा मैदा मळून घे . '
- ते तर मला ठाऊक आहे .' म्हटल्यावर राजाभाऊंनी मैदा मळून ठेवला .
- आता बटाटे शिजले असतील . त्यांना सोलून घे आणि मग चिरून त्यांचे काप कर '
-' ते तर मला ठाऊक आहे ,' म्हणत राजाभाऊंनी बटाटे सोलायला घेतले . नंतर काप ही करून ठेवले .
- 'आता आपल्याला सारण करायचे आहे , म्हणजे बटाट्याची भाजी , त्यासाठी चुलीवर कढई ठेवून त्यात फोडणीसाठी थोडं गोडं तेल टाक . '
- ते तर मला ठाऊक आहे . म्हणत राजाभाऊंनी चुलीवर कढई ठेवली , त्यात थोडे गोडं तेल ओतलं , व नंतर आजींकडे बघितले .
- हं , आता तेल गरम झाल्यावर थोडीशी मोहरी टाक , थोड्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या , व कांदे टाक . आणि नीट परतून घे . नंतर
त्यात वाटणे टाकून , नीट मिसळून थोड्यावेळ झाकण ठेऊन वाफवून घे . म्हणजे वाटाणे शिजतील . '
- ते तर मला ठाऊक आहे .' म्हणत राजाभाऊंनी सांगितल्या प्रमाणे केलं .
-' आता त्या बटाट्याचे काप टाक ,थोडं तिखट , मीठ , थोडं अमचुराचे पावडर , थोडी कोथमिर , थोडे वाळलेले धणे , टाक .'
- ते तर मला ठाऊक आहे .' म्हणत राजाभाऊंनी मिश्रण तयार केले .
- आता हे मिश्रण वेगळं भांड्यात काढून ठेव , अगोदर लाट्या तयार करून घे .'
- ते तर मला ठाऊक आहे , म्हण राजाभाऊंनी लाट्या तयार केल्या .
- ' आता यात मिश्रण भरून समोसे तयार कर .'
-' ते तर मला ठाऊक आहे हो , ' म्हणत राजाभाऊंनी सर्व सामोसे तयार करून ठेवले . '
' आता कढई चुलीवर ठेवून त्यात तळणासाठी तेल टाक .'
- ते तर मला ठाऊक आहे म्हणत राजाभाऊंनी कढई चुलीवर ठेऊन त्यात तळणासाठी तेल ओतले .
- ' आता तेल चांगले गरम झालेले आहे . कढईत मावतील असे थोडे थोडे समोसे कढईत टाकून अगदी हलके लालसर होवोस्तोवर तळून घे . अधूनमधून हलवत राहा . वर खाली करत राहा . नंतर काढून घे . '
- ते तर मला ठाऊक आहे .' म्हणत राजाभाऊंनी सर्व समोसे तळून घेतले .राजाभाऊ फार खुश झाले . खरं तर आज ' ते तर मला ठाऊक आहे ' म्हणत म्हणत बडबड्या राजाभाऊंनी पहिल्यांदाच समोसे स्वत : बनविले होते . आणि आता हे आवडीचे समोसे
त्यांना पोट भरून खायला मिळणार , म्हणून ते जास्तच खुश होते . इकडे स्टुडियोमध्ये राजाभाऊंची बायको आणि इतर सर्व ,
राजाभाऊ हे सर्व समोसे एकट्यानेच खाणार म्हणून काळजीत होते .
- ' प्रेक्षक हो , समोसे तयार झाले ना शेवटी ? ' गर्वाने राजाभाऊंनी समोर केमेऱ्याकडे बघितलं .
- ' नाही बरं .' आजी ओरडल्या . - आता हे तळलेले सर्व समोसे चुलीत निखाऱ्यांवर टाकायचे असतात . ' आजी म्हणाल्या .
- राजाभाऊ एकदम दचकले . अजून काय राहिलं आहे हे त्यांना समजले नाही . पण त्यांनी तसे भाव चेहऱ्यावर येऊ दिले नाही . ' ते तर मला ठाऊक आहे . 'मी तर सहज प्रेक्षकांची गम्मत केली . '
- आता हे तळलेले सर्व समोसे चुलीत निखाऱ्यांवर टाकायचे असतात . ' आजी म्हणाल्या .
- ते तर मला ठाऊक आहे . ' म्हणत राजाभाऊंनी , चुलीवरून कढई खाली ठेवली , आणि तळलेले सर्व समोसे चुलीत टाकले आणि आजीकडे बघितलं .
- ' आता समोसेकाळे कुट्ट होवोस्तोवर निखाऱ्यांवर असू द्यायचे .'
-' ते तर मला ठाऊक आहे ' म्हणत राजाभाऊ प्रेक्षकांना म्हणाले , ' तर प्रेक्षक हो आजची आपली रेसिपी ' तळलेले , भाजलाले , करपलेले काळे समोसे , हे चुलीत तयार होत आहे . मी ते पोटभर खाणारच आहे , पण तुम्ही नुसते फिदीफिदी हंसत बसू नका , तर कागद पेन घेऊन रेसिपी लिहून घ्या .'
- रेसिपी सांगून झाल्यानंतर राजाभाऊं एका प्लेटमध्ये समोसे घेऊन प्रेक्षकांसमोर होते . सोबत आजी पण होत्या .
-राजाभाऊंनी समोसा तोंडात टाकला आणि एका क्षणातच तो बाहेर काढला .
- " काय झालं ? " आजींनी विचारले .
-राजाभाऊंना काही बोलता येईना . समोसा राख झाला होता . त्यात स्वाद नव्हताच .
- पूर्ण एक पेला पाणी पिऊन राजाभाऊ आजींना म्हणाले , " अहो आजी हे समोसे जळाले हो . "
- " मला ठाऊक आहे . " आजी शांतपणे म्हणाल्या .
- म्हणजे ? मग आधी नाही का सांगायचे ? "
- " अरे मी त्या माझ्या लाडक्या स्वानंदीच्या खाष्ट सासूला चुटकी सरशी ठीक करू शकते तर तुला ठीक नाही करू शकत का ? " आजी हसत म्हणाल्या .
-" अहो पण तुम्ही सांगितल्या प्रमाणेच तर मी करत होतो . तरी ..... ? "
- "नाही बरं . प्रत्येक वेळेस मी सांगत होते तेव्हा आठवं तू दरवेळेस काय म्हणत होता ? " आजी म्हणाल्या .
-" ते तर मला ठाऊकच आहे . आणखीन काय ? "
- " मग जर तुला सर्व ठाऊक होतं तर मग तुला हे देखील ठाऊकच असेलच की तळल्यानंतर समोसे चुलीत
का बरं टाकावे ? " आजी म्हणाल्या .
-आता बडबोले राजाभाऊ गप्प . थोड्या वेळाने म्हणाले , " ते तर मी तसंच म्हणत होतो ."
-" मी देखील तुझी गंमत करत होते . आता तुला काही खाता येणार नाही . आजचा कार्यक्रम संपला . आणि
बरं का आता मला तुझ्यासोबत रोज यायचे आहे या कार्यक्रमासाठी . उद्या परत एक नवा पदार्थ असेल . मी निघते . '
- राजाभाऊबघतं होते सौ. राजाभाऊ , आणि आजी सकट सर्व टाळ्या वाजवीत होते .
राजाभाऊ प्रोग्राम डायरेक्टरला म्हणाले , " अरे हा काय कार्यक्रम आहे ? असाच टेलिकास्ट होणार आहे का ? "
- नाही बरं
... सर्व कैमरे बंदच होते . "
--- समाप्त ---------