आला श्रावण महिना साज नवा चढविल
आला श्रावण महिना साज नवा चढविल
कविता माझी मी कवितेची हे सत्य बाकी साऱ्या गोष्टी त्यापुढे न्यून आहेत. माझ्या मनातली अंतरंग सखी माझी कविता आहे, सर्व भाव भावना तिच्याजवळ ओतून पुर्णतया रिकाम व्हायचे, पुन्हा मन भरलं की कवितेला सांगायचं ,शब्दरुपाने मी कवितेची घागर भरते. कविता माझे मीपण सांभाळते, किती सुंदर नातं जमलंय आमचं दोघींचं, नेहमी आम्ही दोघी हितगुज करत असतोय. कुणाला आवडलीच पाहिजे माझी कविता, असा अट्टहास मुळीच नाही. प्रत्येकाला नाही कळणार माझ्या भावना, ती माझ्या ह्रदयातून कळवळून येतेय आणि माझी वेडी जिद्द माझा ध्यास तिला परीपुर्ण करण्याचा असतोय. आम्हा दोघींना अनंत सीमा पार करायच्या असतात. माझ्या कवितेला भूत, भविष्य, वर्तमान सर्व स्तरापासुन तर ती जन्म मृत्युपर्यंतचा प्रवासात साथीने अखंड स्पंदन शोधत असतो. माझी कविता निर्मळ नदीच्या प्रवाहासारखी माझ्या ह्रदयात वहाते. आम्ही दोघी क्षितिजापलिकडे जाऊन साऱ्या विश्वाच्या कानाकोपऱ्यात भ्रमण करत असतो. कधी मनसोक्त हसतो रडतो, उदासिन होतो विरहातही आणि आनंदातही नृत्य करत असतो.
माझी कविता नी मी एकतेची, शांतीची दयेची, क्षमेची, धैर्याची दखल घेतो. ती प्रगट वा अप्रगट माझ्या चंचल मनात स्तंभासारखी अटळ दृढ इच्छाशक्तीची ज्योत होऊन पेटत असते. कधी नदीच्या पाण्यासारखी निर्मळ झुळझुळ वहात असते. आमचं लक्ष आकाशापासून तर पाताळापर्यंत प्रत्येक वस्तू व मानवाच्या अवती भोवती फिरून बोध घेत असते, म्हणुन माझं तिच्यावरती अतिशय जिवापाड प्रेम आहे.
बुद्धीमत्तेला जागृत करून विद्वत्ता भूषविण्या मनातील प्रत्येक तरंगभाव चौफेर धूळकणासारखा पसरत जाऊन झुल्याविणा झोके घेतो. कोकिळेच्या कंठातल्या मधुर गीतामध्ये तल्लिन होऊन, राजहंस मोर, पारवा, निलकंठ पाखरांच्या पंखांवरती झोके घेतो. विलोभनिय दृष्य दोघींमध्ये साकार करतो.
विश्वात भुरळ पाडणारी, श्रीकृष्णाची गीता, बायबल, कुराण, वेदव्यासांचे महाभारत, तर वाल्मिकींचे रामायणाचे दोहे, कालीदासाचे महाकाव्य, नानकांचे गुरूग्रंथ साहिब, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, मीराबाईची रचना, स्वामी समर्थ, नामदेव, तुकारामाचेअंभग, जनाबाई, सावतामाळी, बहिणाबाई, सुरेश भट अश्या अनेकांच्या कविता समृद्ध करण्यात वाचन महत्वपुर्ण कार्य करतो. कबीरांचे दोहे, रैदासाचे, सुरदासांचे, बेखुद देहलवी, कातील शिफाई, आमिर खुसरो अनेक संतांचे अमर्याद वाचन, लिखाण करून आम्ही घडण्याचा प्रयत्न करतोय. मला या महान ग्रंथांनी शिकविले. हिंदी व मराठी दोन्ही भाषा माझा प्राण आहेत. प्रगल्भतेने कोणत्याही क्षेत्रात सादरीकरण करून वाहवा मिळवते..
गौतम बुद्धाला कविता पद्मासनात मिळाली,
महाविर सिद्धार्थाला आसनात मिळाली
येशू ख्रिस्ताला कृस, सुलीत मिळाली..
सुकरातला विषात मिळाली...
रैदासाला जोडे, चप्पल शिवताना मिळाली....
कबीरदासाला चादर विणताना मिळाली...
गोरा कुंभाराला माती सांधताना मिळाली...
सुरदासाला एकताऱ्यात मिळाली.
तसेच मलाही एकमेव चिरंतन शाश्वत सत्य व सुंदर अशी कविता लहानपणीच मिळाली आहे. या कवितेने मला देशातच नाही तर परदेशातही नेऊन मला उल्हासित केलेले आहे. विश्व साहित्य संमेलने मी कवितेच्या जोरावरच गाजविले आहे आणि श्वास असेपर्यंत या सखी कवितेचा साथ मी सोडणार नाही.
कैक अडी अडचणी जरी आल्या तरी मला माझी कविता प्रिय आहे.