आईची माया...
आईची माया...
नमस्कार खूप महिन्यानंतर मी आपल्यासाठी एक कथा घेऊन येत आहे.मागील काही दिवसांपासून मी खूप अडचणीतून जात होतो. दोन वेळा मी वेगवेगळ्या अपघातांतून मरता मरता वाचलो. नाहीतर आज तुमच्या समोर ही कथा घेऊन येऊ शकलो नसतो...
"राहुल राहील की एकटा,आपलं जाण गरजेच आहे. आता निघालो तर उद्या संध्याकाळ पर्यंत परत येऊ. मला पण काळजी आहे की त्याची. त्याला मी जरी जन्म दिला नसला तरी पोटच्या पोरासारखं प्रेम करते त्याच्यावर. तो आता १४ वर्षांचा झाला आहे." मीनल समीर ला म्हणाली. "अगं फक्त १४ वर्षांचाच आहे गं तो, अन एवढ्या मोठ्या घरात तो एकटा कसा राहील? आपण त्याला घेऊन जाऊया”...समीर. तुम्हाला माझं काहीच पटत नाही.तुम्हाला असं वाटत की मी त्याचं वाईट करायला बसली आहे. आता हे काय नवीन काढलसं तू...??? अहो...आपण त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी निघालोय अन असं राहुल ला घेऊन जाण चांगल नाही...म्हणून म्हणतेय मी...नाहीतर मी तरी त्याला एकटा सोडेन का असा? ठीक आहे आपण जाऊया...पण तू सांग राहूल ला....समीर मीनल ला म्हणाला. खोलीच्या दाराबाहेर उभा असलेला राहुल आपल्या आई - बाबांच सगळं बोलणं ऐकत होता. तशी त्याला चोरून ऐकायची सवय नव्हती पण...उद्या शाळेला सुट्टी आहे हे सांगण्यासाठी तो आई बाबांकडे आला होता पण हे सगळं ऐकून तो हिरमुसला...आता आई खोली बाहेर येणार हे कळल्यावर तो जरा गोंधळला...त्याला काय करावं हे सुचत नव्हतं. तो सरळ त्याच्या खोलीत जाऊन झोपेच नाटक करून बेडवर पडून राहीला...कारण त्याला माहित होतं की आपण बोलणं चोरून ऐकलयं हे जर त्यांना कळालं तर मग आपलं काही खरं नाही. पण त्याने एक गोष्ट मात्र नक्की ठरवली होती की...आईचं सगळं बोलणं ऐकून घ्यायचं अन तिला साफ नकार देऊन टाकायचा कारण त्याला खात्री होती की आईने जरी नाही ऐकलं तरी बाबा मात्र त्याचं बोलणं नक्की ऐकतील. ते आपल्याला कधीही एकटं सोडून जाणार नाहीत. आपल्याच कल्पनेच्या रंगात रंगत तो बेडवर पांघरून घेऊन पडून राहीला..रात्रीचे दहा वाजले होते...बाहेर आसमंतात एक वेगळाच सुगंध दरवळत होता. ती भयाण शांतता जणू पुढे होणा-या घटनांच्या साक्षीसाठी दबा धरून बसली होती. रात्र अजून गडद होत होती. रात्रीचे दहा वाजत आले होते म्हणून आत्ता पर्यंत राहुलचं झोपणं काही नवीन नव्हतं त्याच्या विचाराप्रमाणे आई बाबा खोलीत आले.ते आलेले कळताच त्याने झोपेचं नाटक केलं पण त्याच लक्ष त्यांच्या बोलण्यावर होतं. " अहो, कशाला उठवताय त्याला...जेऊन झोपलाय,उद्या कामवाली लवकर येईल तसं मी सांगितलं आहे तिला...ती करेल त्याला शाळेसाठी तयार...” बाबा राहुल ला हाक मारून उठवणार इतक्यात त्याची आई बाबांना म्हणाली. "हे तर अजून चांगलं झालं..समजवण्याचा प्रश्नचं मिटला...आता तर तो सकाळीच उठेल.....” बाबा म्हणाले. चला आपण जाऊ...तुम्ही गाडीत बसा आज मी गाडी चालवते....मीनल म्हणाली. हे सगळं ऐकून राहुलला कळलं की आपण स्वत:च्या पायावर दगड मारून घेतली आहे..आता आपण ना उठू शकतो ना त्यांच्या सोबत जायचा हट्ट करू शकतो.पण तो पर्यंत खूप वेळ झाला होता...तो बाबांना हाक मारणार तो पर्यंत आई बाबा गाडीत बसून गेलेले सुद्धा. आता राहुल त्या घरात एकटा होता...कसलाही विचार न करता त्यानी पहिल्या मजल्यावरील सर्व दिवे लावले आणि टीव्ही बघत बसला. जणू त्या घरातील दिव्यांच्या प्रकाशाचा त्याला आधार जाणवत होता. झोप येणं शक्य नव्हतं त्याला आपल्या मूर्खपणाचा खूप राग येत होता...टीव्ही बघण्यात त्याच मन रमत नव्हतं म्हणून त्याने बाबांच्या खोलीतून एक पुस्तक वाचायला आणलं. येताना मात्र तो बाबांच्या खोलीतील लाईट बंद करायला विसरला नाही. लाईट चालू राहिली की आई ओरडते हे त्याला पक्कं ठावूक होतं. पुस्तकाचं नाव होतं.."आईची माया"...हे वाचून त्याला फारसा आनंद झाला नाही...कारण त्याच्या सध्याच्या परिस्थितीला साजेसं नाव असल्यामुळे तो नाराज झाला.
रात्रीचे किडे किर्र किर्र करत होते...घड्याळाचा प्रत्येक काट्याचा आवाज तिथे असलेल्या प्रत्येक शांततेला भंग करत होता....प्रत्येक श्वासाचा आवाज हा तिथल्या शांततेला चिरत होता. त्यालाही आता एकटेपणाची भीती वाटू लागली होती. तेवढ्यात घराची बेल वाजली...राहुल ने घड्याळात बघितलं तर रात्रीचे ११ वाजले होते. एवढ्या रात्री कोण????? स्वाभाविक प्रश्न होता. पण उत्तरासाठी त्याला दार उघडणे आवश्यक होते. त्याला काय करावं सुचत नव्हतं...परत बेल वाजली....आता मात्र राहुल घाबरला..त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले....घामांच्या धारांनी तो भिजला होता...एवढ्या थंडीतही त्याला घाम फुटला होता.खोलीतल्या फोन वरून आईला फोन करून लावायचा तो प्रयत्न करू लागला...पण नंबर लागतच नव्हता...बहुदा कुठेतरी चुकत होता..तेवढ्यात तिस-यांदा बेल वाजली. घामाघूम झालेला राहुल गच्चीत आला...पहिल्या मजल्यावरून त्याने दरवाजाकडे बघितलं..आता एका पुरूषाचा आवाज येत होता...राहुल दार उघड मी आलो आहे...आता फक्त तू आणि मी.... आपण दोघेचं....आई बाबा परत कधीच येणात नाहीत ते गेले....खूप लांब गेले...अन तू दरवाजा नाही उघडलास तर आता लाईट पण जाणार...राहुल ने हे स्पष्ट ऐकलं. त्याचे हात पाय थरथर कापत होते. रडकुंडीला आलेल्या राहुलला आठवलं की त्याने त्याच्या आईचा नंबर शाळेच्या डायरीत लिहून ठेवला आहे. क्षणाचा ही विलंब न करता त्याने डायरी शोधून आईला फोन लावला..."आई तू कुठी आहेस? आई बोल ना...कोण तरी आलय दारावर..मला फार भीती वाटतेय...आई...बोल ना..” हॅलो..राहुल दरवाजा उघड..आई गेली कायमची मी सांगितलं ना तुला..चल आता दार उघड सोन्या....नाहीतर मी आत येईन अन मग तुला पण आईकडे पाठविन.तेवढ्यात लाईट पण गेली...अन त्यामुळे वाजणारी बेल पण बंद झाली...आता दरवाजा उघडल्याचा कर्र कर्र आवाज झाला...ते एकून राहुल ला कळून चुकलं की बाहेर जो कोणी आहे...तो आपल्या घरात आला आहे...त्याच्या काळजाचं पाणी झालं होतं. त्याने धीर धरत वरून बघितलं तर एक माणूस त्याच्या हॉल मधल्या सोफ्यावर बसला होता...त्याच्या हातात धारदार चाकू होता..तेवढ्यात त्या माणसाची नजर वर लपून बसलेल्या राहुल कडे गेली...त्याच्या डोळ्यातील ती भयरूपी चमक पाहून राहुल जागच्या जागी किंचाळला...तेवढ्यात क्षणाचाही विलंब न करता तो माणूस वर गच्चीत येण्यासाठी उठला..इकडे राहुल ला काय करावे सुचत नव्हते...तो एका काळोखाचा आधार घेऊन लपून बसला होता..आता तो माणूस गच्ची वर आला होता...त्याला हाक मारू लागला...."आता बस राहुल...जवळ ये माझ्या सोन्या...मी तुला जास्त यातना नाही देणार...लगेच मारून टाकतो तुला..बघ...जास्त त्रास पण होऊ देणार नाही मी तुला...आत्ताच तुझ्या आई बाबांना मारून आलोय..खूप कष्ट झाले मला त्यांना मारताना...अन त्यांना पण खूप मरनयातना झाल्या...तुझ्या बाबत तरी असं होऊ देऊ नकोस सोन्या...” हे सगळं ऐकून राहुल सुन्न झाला...त्याने धीर करून गच्चीतील कोप-यार ठेवलेली काठी हातात घेतली..आता काय करायचं हे त्याच्या डोक्यात पक्कं होतं...आवाज जसजसा जवळ येऊ लागला तसा त्यानी धीर करून हातातील काठेने जोरात प्रहार केला...आणि त्या माणसाच्या तोंडावर पण प्रहार केला...तो जागीच कोसळला..राहुल काहीही विचार न करता गच्चीतून खाली आला आणि त्याने दरवाजाल बाहेरून कडी लावून घेतली. रडत रडत तो घराच्या बागेत एका ठिकाणी लपून बसला होता...आपलं घर किती एकांतात आहे याची राहुलला आज प्रचिती आली.त्या बागेतच राहुल झोपी गेला.सकाळ्च्या किरणांसोबत राहुल उठला. आई बाबा कुठे असतील याचा विचार करण्यात तो मग्न असतानाच बाबांची गाडी गेट मधून आत आली. राहुलचा आनंद गगनात मावत नव्हता. गाडीतून मात्र आई एकटीच उतरली..राहुलने पळत जाऊन तिला मिठी मारली. झालेला सगळा प्रकार त्याने आईला सांगितला,ते ऐकून तिच्या तोंडावरचे भाव पालटले तिने त्याला परत मिठीत घेतलं चलं बघू कोण आहे ते...राहुल घाबरलेला होता...पण त्याला आईचा आधार होता, घरात गेले तर कोणीच नव्हतं... "म..म..मी खोट बोलत नाही..मी त्याच्या डोक्यात काठी मारली होती...अन तो इथेच पडला होता..” राहुल म्हणाला. आईने एका क्षणासाठी राहुल कडे बघितलं..अन म्हणाली, "मला आहे रे बाळा तुझ्यावर विश्वास...खाली जाऊन बघितलं तर मागचा दरवाजा उघडा होता...आई मागचा दरवाजा उघडा कसा राहिला असेल ग???? "मीच ठेवला...नाहीतर तो माणूस आत कसा आला असता...तुला बाबांकडे पोहोचवायला...??” राहुलने वर बघितलं तर आई....हसत हसत चाकू सोबत खेळत होती.......
समाप्त...

