सख्या रे
सख्या रे
प्रेम म्हणजे काय सख्या रे
फक्त ते शरीरसुख नसावे
हातामध्ये हात असावा अन
अजून बरेच काही असावे
एक होऊ या दोघे आपण
उगाच मी वा मीपण नसावे
माझ्या डोळ्यांमध्ये तू अन
तुझ्या नयनी मीच वसावे
नकोच शब्दांना त्या वेणा
मूकपणाचे अर्थ कळावे
ओठांना त्या नकोच कष्ट ते
भाव नयनांमध्ये वाचावे
कंटक मजला टोचता जरी
कळ तुझ्या हृदयात उठावी
खांद्यावरती डोके माझे
विश्वासाची नाळ असावी
श्वास एक नि प्राण एक तो
जरी भिन्न हे शरीरे असती
भावना माझ्या इवल्याश्या
सदैव तुझ्याच हृदयी वसती